बुधवार, २८ जुलै, २०१०

पत्र

नाव काय रे तुझं? जेवलास की नाही? आई कुठाय तुझी? काही खाणार का? तिनं प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्यानं हूं की चू केलं नाही. बहुतेक खूप रडल्याने त्याचा चेहरा सुजला होता... पण कुठेही मारल्याचे घाव नव्हते... नाकातून बाहेर आलेला शेंबूड त्यानं आत ओढला आणि पुन्हा तो त्या टेलिफोन खांबाला धरून राहिला... त्याची ती शांतता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी दहा वाजता ते आठ वर्षांचं पोर त्या खांबाशेजारी बसलेलं होतं. गोबऱ्या गालांचं. गोरंपान आणि अंगात चांगले कपडे असलेलं पोरगं मोठ्या खात्या-पित्या घरातलं वाटत होतं. पहिल्यांदा कोणीतरी असेल म्हणून तिनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं... दुपार झाली... ते तिथंच बसून होतं... त्याच्याकडे बघायचं नाही, असं अनेकदा ठरवूनही तिची नजर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होती... आता त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवून ती नजर वळवायची... संध्याकाळ झाली तशी ती अस्वस्थ झाली... त्या पोराची तिला आता दया येऊ लागली, ते चुकलंय की कोणी त्याला इथे आणून सोडलंय, याची विचारपूस करावी म्हणून ती त्याच्याजवळ गेली... तिनं त्याला नाव-गाव विचारलं; पण ते काही बोललं नाही... तिनं त्याला हरतऱ्हेची आमिषे दाखवून बघितली; पण ते बधलं नाही... खांबाचा हात काही त्यानं सोडला नाही... तिला काही सुचेना... त्याला त्याच्या स्थितीवर सोडूनही जाता येईना आणि थांबताही येईना... काही क्षण तिला पोलिसांना फोन करावा वाटला; पण तिला धाडस झालं नाही... पोलिस येणार, त्याला घेवून जाणार... पुन्हा हे तिथंही नाही बोललं तर त्याला बालसुधारगृहात ठेवणार... ती अनेक वर्षे तिथं नोकरीला होती... पोलिसांना फोन म्हणजे त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा आपल्या हाताने उघडण्यासारखंच... ती आता अस्वस्थ झाली... तिला काहीच सुचेना... त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून द्यायचं तिनं मनाशी पक्‍कं केलं आणि ती घरात गेली... देवापाशी दिवा लावला... थो
डं कुंकू कपाळाला लावलं... सकाळचं बरंच जेवण शिल्लक होतं... तिनं टीव्हीचा रिमोट हातात घेतला... एक एक चॅनेलवरून ती सरकू लागली... पण मन रमेना... त्या पोराचा विचार मनातून जाता जात नव्हता... खिडकीतून बघावं काय, तो कुठे गेला असा विचार करून ती दोनदा खिडकीपाशी गेलीही. पण तिनं खिडकी उघडली नाही... पण ते जर तिथं असेल तर त्याला अंधाराची भीती नको म्हणून तिनं बाहेरचा दिवा लावला... रात्री बऱ्याच उशिराने तिला झोप आली... पहाटे जाग आल्यावर तिनं पहिल्यांदा खिडकी उघडली आणि त्या खांबाकडे तिनं बघितलं. ते पोरगं तिथं नव्हतं... रात्रीच्या थंडीत ते कुठेतरी गेलं असेल... कुठे गेलं असेल ते... घरी सुखरूप पोचलं असेल का? कोण असतील त्याचे आई-वडील... असे अनेक प्रश्‍नांचे तरंग तिच्या मनात उमटत राहिले. पण तिनं त्याला बगल दिली....ते सुखरुप असेल असा मनाशी समज करून तिनं चहाचं आधण ठेवलं आणि पेपर आला का बघण्यासाठी तिनं दार उघडलं... दारातच ते पोरगं पाय मुडपून झोपलं होतं... अगदी निरागस.. त्याच्या मुठी वळल्या होत्या... त्या वळलेल्या एका मुठीत एक चिठ्ठी होती... तिनं अलगद ती चिठ्ठी सोडवून घेतली...
त्यावर लिहिलं होतं...
प्रिय, संगीता,
याची आई चार वर्षांपूर्वी गेली... कॅन्सरने माझं आयुष्य अवघ्या चार महिन्यांवर आलं आहे... यापुढे याला पाळणारे हजारो मिळतील... पण सांभाळणारं कोणीच नाही... याचा सांभाळ कर...
ज्याच्यासाठी ती आयुष्यभर अविवाहित राहिली होती त्या दिलीपचं ते पत्र होतं...

सोमवार, २६ जुलै, २०१०

नायक

ते पुस्तक बाजुला ठेव आणि ऑर्डर दे... मी माझ्या मित्राला सांगत होतो.. अरे ! हे पुस्तक हातात घेतल्यापासून सोडवतच नाही... आपल्याकडे कुठे होतात असे प्रयोग...सगळे भाषांतरीत किंवा रुपांतरीत....खरी नाटकं होतात... तिकडे युरोपात...
च्यायला तुझं हे असंच असतं.....मरु दे रे तो शेक्‍सपीअर.....
शेक्‍सपीअर कधीच मरणार नाही..... मी मरु दे म्हटल्याक्षणी आमच्या टेबलसमोर येवून ऑर्डसाठी उभा असलेला वेटर म्हणाला....
मला काही सुचलं नाही.... तोही मग काही बोलला नाही.... ऑर्डर घेतली आणि निघून गेला.....नंतर अनेकवेळा त्या हॉटेलमध्ये माझं जाणं-येणं-आणि खाणं होत राहिलं, कधी तो असायचा कधी नसायचा... असला तर ऑर्डर घेण्यावाचून तो काही करायचा नाही.... दोन तीनवेळा मी त्याला बोलतं करण्यासाठी शेक्‍सपीअर, हॅम्लेट असं काही तर बरळत राहिलो पण त्याच्याकडून प्रत्यूत्तर आलं नाही... मात्र मला एक जाणवलं तो असा काही विषय निघाला की त्याला त्याचा प्रचंड त्रास होत असावा, त्यामुळे तो ऑर्डर न घेताच जात असे आणि मग दुसराच कोणी तरी वेटर येवून ऑर्डर घ्यायचा.
एका शनिवारी असाच त्याच हॉटेलसमोरुन जाताना तो बाहेर बसलेला दिसला...
काय रे असा बाहेर का बसलायस.... उगाचच स्वतःच्या इस्त्री केलेल्या कपड्यांचा गर्व होऊन मी त्याला एकेरी हाक मारली.... त्यालाही बहुतेक त्याची सवय झाली असावी त्यामुळे तो काही बोलला नाही.... मग मी त्याच्याजवळ जावून बसलो... काय विशेष!
आज तेवीस एप्रिल.... शेक्‍सपीअर आजच्याच दिवशी गेला....गेला? छे ! तो तर कधी जातच नाही....ठेवून जातो मागे शोकांतिका.... जगण्यातल्या सगळ्या वेदना तशाच ठेवून.....
नंतर तो भेटत राहिला... हॉटेलमध्ये तो काही बोलायचा नाही... पण दर शनिवारी मात्र हॉटेलच्या बाहेरच्या कट्ट्यावर माझी वाट बघत राहायचा... मी भेटलो की मग त्याच्या मनावरची जळमटं थोडी दूर व्हायची... मग बोलत राहायचा इस्किलस, सॉफक्‍लिस, युरिपीडीज, इब्सेन या साऱ्यांविषयी....हॅम्लेट आणि लिअर तर त्याची दैवतंच जणू त्यातील प्रसंगच्या प्रसंग तो म्हणायचा... आख्खा लिअर उभा करायचा...अलीकडे आता त्याला ये-जा बोलावताना जीभ जड व्हायची... पण तोच म्हणाला... आता थोडीही मान वर काढणं मला पेलावणारं नाही... तू मला ये-जाच कर... मीही मग त्याला त्रास दिला नाही....त्याला त्याच्या जागेवर सोडून दिलं... त्यातूनही एकदा त्याला मी विचारलं.... तू इथे म्हणजे हॉटेलमध्ये कसा म्हणून, पण तो बोलला नाही...... त्याचे ते निस्तेज डोळे केवळ हलले.... आणि तो उठला....
माझा प्रश्‍न आवडला नसेल, तर राहू दे पण बोलायचं टाळू नको... मी म्हटलं.
तो काही बोलला नाही... पण त्या प्रश्‍नाचा त्याच्यावर फारसा फरकही झाल्याचे जाणवला नाही. त्यानंतरही तो अनेकवेळा अनेक विषयांवर बोलत राहायचा....
एकदा असाच तो बसलेला असताना त्याच्या हातात काहीतरी होतं....मी खोदून खोदून विचारल्यावर त्यानं तो फोटो दाखविला....
लग्नानंतर पाचच दिवसात सहकारी प्रोफसरबरोबरच पळून गेली..... एवढंच म्हणाला
मला काय समजायचं ते समजलं... मी गप्प बसलो त्याला पुढचं काही विचारलं नाही.... एखाद्या शनिवारी मी भेटलो नाही की अस्वस्थ व्हायचा.... पण काही बोलायचा नाही.... तू येत जारे एवढंच म्हणायचा... एकदा मी म्हटलं अरे तुला जर माझी आठवण आली की एखादा फोन करत जा ना.... तो म्हणाला नको रे तुम्ही कामात असता तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही.... मी काही समजावून सांगितलं तरी तो ऐकणार नव्हताच.... मग बळेच मी त्याच्या खिशात माझे कार्ड कोंबले....
यावर माझा मोबाईल नंबर आहे.... तुला फोन करावा वाटला की कर .....मी काही फार बिझी असत नाही....
तो काही बोलला नाही.... पण त्याने ते कार्ड फेकूनही दिलं नाही..... नंतर अनेक आठवडे त्या हॉटेलात मला जाता आले नाही.....
एक दिवस रात्री उपसंपादकगीरीचे काम करत असताना पोलिस ठाण्यातून फोन आला.....ओळख पटवायची होती... मी गेलो तो तोच होता....
डोक्‍यात जोराचा मार बसल्याने गेला, बहुतेक कुणीतरी बेदम चोपलेले दिसते.... पोलिसाने बातमीच्या अंगाने माहिती पुरविली...मी काही बोललो नाही... सरळ हॉटेलमध्ये गेलो...ं
मॅनेजरला विचारलं, "" काय झालं, त्याला कोणी मारलं.''
काही नाही ओ.. चांगला... चांगला म्हणता म्हणता नालायक निघाला साला, आहो हॉटेलमध्ये आलेल्या बाईचा हात धरला..... लोकांनी बेदम मारलं मी तरी काय करणार... लोक हॉटेलात यायचे बंद व्हायचे..... मारलं ते बरंच झालं.....
मला त्याचं पुढचं बोलणं ऐकूच आलं नाही.... जाता जाता त्या हॉटेलमालकाला विचारलं तो काही बोलला का?
त्या बाईला शीला म्हणत होता.....आहो एका प्रोफेसरची बायको ती ....
मला काहीच सूचलं नाही.... ज्या नायकांच्या प्रेमात तो होता... त्यांच्याच पंक्‍तीत तो केव्हाच जावून बसला होता....आणखी एक शोकांतिका बस्स!

सोमवार, १२ जुलै, २०१०

मोगरा!

प्रवेशाच्या रांगेत शेवटच्या क्रमांकावर तो होता. येता-जाता शिक्षक त्याच्याजवळ थांबत त्याची विचारपूस करत. बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात तो वर्गात पहिला आला होता. भौतिक शास्त्रासारख्या विषयात तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्याच्याकडून महाविद्यालयाला खूपच अपेक्षा होत्या. त्याने विद्यापीठात प्रथम यावे अशी सगळ्या प्राध्यापकांची इच्छा होती. तो मात्र शांत होता. अगदी बुद्धासारखा. कोणी त्याला "जिनीअस,' तर कोणी "न्यूटन' म्हणून हाक मारत; पण त्याच्या चेहऱ्यावरची स्मिताची लकेर कधी बदलली नाही. शिक्षक त्याच्याजवळ येऊन थांबत. त्याची विचारपूस करत. त्याच्या खांद्यावर हात ठेवत आणि पुढे जात.
प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सगळेच गडबडीत होते. कार्यालयातील कर्मचारी आपल्या नेहमीच्या शैलीत समोरच्या विद्यार्थ्यांवर खेकसत होता. प्रत्येक अर्जातील चुका त्याला पृथ्वीगोलाएवढ्या दिसत आणि हर्क्‍युलससारखा त्याचा भार आपल्या खांद्यावर पडल्यासारखा त्याचा चेहरा होई.
"शेवटच्या दिवशीच तुम्हाला कशी जाग येते,' असा प्रश्‍न जवळपास प्रत्येकाला विचारत एक-एक अर्ज हातावेगळा करत होता. रांग कूर्मगतीने पुढे सरकत होती. रांगेत आता त्याच्या मागेही मुले आली होती. शनिवार असल्याने कार्यालय दुपारीच बंद होणार, हे निश्‍चित होते. त्यामुळे रांगेत चुळबूळ सुरू झाली. सोमवारी जादा शुल्क भरून अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यामुळे मधल्या एक-दोन मुलांनी सोमवारचा पर्याय खुला करत काढता पाय घेतला.
बाराचे ठोके वाजले, तसे अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तासाभरात अर्ज भरला नाही, तर सोमवारी उगाच दोन-अडीचशे रुपयांना फटका बसणार होता. त्यातच ज्यांना दुसऱ्या वर्षाला कमी गुण होते त्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या अटीमुळे आवडीचा विषय मिळतो की नाही, याचीही धाकधूक होतीच. त्यामुळेच रांगेत चुळबूळ वाढली. तो मात्र शांत होता. मघाशी त्याच्याशी बोलून पुढे गेलेल्या प्राध्यापकांपैकी एक जण त्याच्याकडेच येत होते. त्याच्यापाशी आले, त्याच्याकडे बघून त्यांनी स्मित केले आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याकडे बघत म्हणाले, ""इथं काय करतोय? रांगेतून आज तुला प्रवेश मिळणार नाही. चल.'' तो मुलगा त्यांच्या पाठीमागून गेला. जाताना त्याने आपल्या बरोबरच्या मुलांनाही नेले. तो मात्र शांत होता. बरोबर एक वाजता त्याचा क्रमांक आला. त्याने आपला अर्ज त्या कारकुनाच्या हातात दिला आणि घड्याळाने एकाचा टोला दिला. कारकुनाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि दुसऱ्याच मिनिटात पावती हातात दिली. ""सरांना सांगितलं असतंस, तर लगेच काम झालं असतं. रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती,'' तो भाबडेपणाने म्हणाला. त्याचे वडील त्याच कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते.
""मोगऱ्याच्या वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज असते, फुलण्यासाठी नाही. त्यामुळे चालताना कुबड्या घेतल्या तेवढ्याच पुरेशा आहेत. आता आणखी कशाचाही कुबड्या नकोत मला,'' बाजूला ठेवलेली कुबडी उचलत तो शांतपणे म्हणाला आणि निघून गेला.
खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. का कोणास ठाऊक; पण कारकुनाला त्यातून मोगऱ्याचा गंध जाणवला.