बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

हे डोळे पुन्हा दिसणार...


तिच्या डोळ्यांनी घायाळ झालेल्यांची संख्या कमी नाही। अगदी अख्खा चित्रपट तिच्या डोळ्यांसाठीच बघणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. तिने नुसती पापण्यांची उघडझाप केली, तरी अनेक थांबलेली हृदये धडधडायची. अगदी तिच्या चेहऱ्यावरची रेघ बघता बघता मरण यावं, अशी इच्छा बाळगणारे कमी नव्हते, नाहीत. कोमेजलेली फुलेही तिच्या हसण्याने पुन्हा टवटवीत व्हायची. ती मीनाक्षी होती, ती रोहिणी होती, ती नूतन होती. नूतन यांचे टपाल तिकीट टपाल खाते प्रकाशित करणार आहे. आपले बोलके डोळे रूपेरी पडद्यावर ठेवून गेलेल्या या अभिनेत्रीची आठवण राहावी म्हणून हे टपाल तिकीट खचितच नाही, तर तो टपाल खात्याचा सन्मानच आहे."नूतनचा चेहराच एक अभिनयाचे व्यासपीठ होते. आजही जेव्हा तिचे चित्रपट बघतो, तेव्हा तिच्या चेहऱ्याशिवाय नजर दुसरीकडे वळत नाही' नाना पाटेकरसारख्या स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या अभिनयसम्राटाचे हे उद्‌गार नूतन यांचा गौरव अधिकच अधोरेखित करतात. नूतन यांचा मुखाभिनय त्यांच्या डोळ्यांतून प्रवाहित होत होता. त्यांचे हरिणीसारखे डोळे आणि पातळ ओठ एखाद्या सामान्य प्रसंगातही प्राण भरायचे. स्मिता पाटील, तब्बू किंवा दीप्ती नवल या नूतन यांच्या अभिनयाच्या विस्तारकच वाटतात. "बंदिनी' हा नूतन यांचा प्रचित्रपट. यात प्रत्येक फ्रेममध्ये नूतन नव्याने भेटतात. डोळ्यांतील भाव इतक्‍या सहजतेने बदलतात, की प्रेक्षक त्या डोळ्यांभोवतीच घुटमळत राहतो. एकीकडे त्यांचे ते पातळ ओठ थरथरत निशब्दता व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांचे डोळे ती निशब्दतेला चिरून ओरडत राहतात. त्यांच्या याच अभिनयावर बेहद्द खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी मी "कर्मा'पूर्वी नूतन यांच्याबरोबर चित्रपट का केला नाही, असा स्वत:ला प्रश्‍न विचारतात. दिलीप कुमार असो वा अशोक कुमार किंवा अमिताभ यांच्यासोबतच्या फ्रेम नूतन यांचा मुद्राअभिनय ठळकच होत नाही तर तो सहकलाकाराच्या चेहऱ्यावरचा चेहरा बनून जातो.संकोच, प्रेम, माया, हुरहूर हे भाव डोळ्यांतून अगदी सहजपणे उतरत होते. "मै तो भूल गयी बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे', हे गाणे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा या मुद्रेला टपाल खात्याने मुद्रित केले नसते तर नवलच; पण नूतन यांच्या तिकिटावर शिक्का मारताना पोस्टमनचे डोळे मात्र भरून येणार, हे निश्‍चित!