मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

हार

तो. (हार)
मला गांधीजी आवडत नाहीत. एवढं एकच तर वाक्‍य आपण बोललो. कुठल्या संदर्भात बोललो तेही कळलं नाही. पण तिने एकदा मला नथुराम असल्यासारखं पाहिलं आणि मग तोंडाचा पट्‌टा सुरु केला, तो शेवटपर्यंत. गांधीजी आवडत नाही हे म्हणून मी जणू ब्रह्महत्या केल्याच्या आवेषात ती बोलत होती, आणि मला फाशीवर आत्तापर्यंत का चढवलं नाही ,असं तिची नजर विचारत होती. आपले मोठे डोळे आणखी मोठे करत ती काही-बाही सांगत होती. ती बोलत असताना हं, हू, हो शिवाय काही बोलता येत नाही हे खरंच, पण तरीही आपण तेही बोललो नाही. माझं ते गप्प बसणं तिला आणखी टोचलं असावं. त्यामुळे ती आणखीन उखडली. तुमच्यासारख्यांनी या देशात राहायलाही नको, सरळ सांगून टाकलं तिनं, मी नुसतंच बरं म्हणालो, त्यावरही चीडली. चहा घेतानाही तिची अखंड बडबड सुरु होती. शेवटी कंटाळून मी हरलो म्हटल्यावर ती थोडी शांत झाली. पण तुला आता सटकायचं आहे म्हणून तू हरलो म्हणतोयस हे सांगायला ती विसरली नाही. काय गांधीवादी आहे, गांधीवाद असा असतो हे जर गांधीजींना कळलं तर ते गांधीवादाची पुन्हा नव्याने व्याख्या करतील. गांधीवादी छे जहालवादी आहे....तिखट... शेवटी हरलो हे आपण उगाचच कुठे म्हटलं आपण. खरंच हरलेलोच आहोत की....

ती...(हार)
कोण समजतो कोण स्वतःला. क्रांतिकारी. पाच फूट चार इंच उंचीचा क्रांतिकारी. बोलता येतं का नीट आणि म्हणे गांधीजी आवडत नाहीत. काय माहिती आहेत याला गांधीजींबद्दल आणि एवढं आपण बोलत होतो तर पढ्ढ्यानं हू की चू केलं नाही. नाहीतर किमान हं.... हा... ही... ही... तरी चालू असतं पण ते काहीच नाही. शेवटी बरं आणि हरलो म्हणाला, पण तेही मजबुरीनं, कदाचित मला बरं वाटावं म्हणून. पण खरंच त्याला जर गांधीजी नसतील आवडत तर नसतील ना, त्याला ते आवडावेत म्हणून आपला अट्‌टाहास का? आणि आपण त्याच्यावर एवढं उखडायचं काय कारण होतं. केवढी आदळ-आपट केली आपण बिच्चारा ! छे वस्ताद आहे.. एखादाच शब्द बोलतो आणि मग आपला निवांत राहातो. पण खरंच तोच गांधीवाद्यासारखा वागला, अगदी शांत राहात सहन करत राहिला. त्याला या देशात राहण्याचा काडीचाही अधिकारही नाही असंही म्हणून टाकलं. पण शेवटी हरलो म्हणालाच की....खरचं तो हरला की मी हरले.....