सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

हात दाखवून...


प्रसंग पहिला

महाराज! मुख्यमंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात केव्हा पडेल? आपला उजवा हात महाराजांपुढे करत त्या "नेत्याने' शब्दात जितका "विनय' आणता येईल तितका आणला.
महाराजांनी उजव्या पायाच्या मांडीवर डावा पाय टाकून त्याचा अंगठा उजव्या हाताने धरत, डाव्या हाताने जाणव्याला हिसका दिला. पंचांगावर ठेवलेल्या पाचशेच्या नोटेकडे लक्ष देत त्यांनी अनुनासिक स्वरात मुख्यमंत्री, मुख्यमंत्री असा जप सुरू केला.
काय झालं महाराज?
त्याचे काय आहे, राहू जरा वक्री आहे, बुधही अष्टमस्थानी आहे. पण गुरूचे पाठबळ चांगले आहे. "सुराज्य' आणणारे आहे.
महाराज म्हणजे मुख्यमंत्री होण्यात अडचण...
अडचण अशी काही नाही; पण... महाराजांनी "पण' उगाच लांबवला. पण गृहकलह दिसतो. नाराज ग्रहांची संख्या जास्त आहे. घरच्या लढाईत सैनिकांची मदत घ्यावी लागेल.
म्हणजे मी समजलो नाही महाराज.
त्याचे असे आहे. इथे तुम्हाला सैनिकाबरोबर लढायला लागणार आहे. त्यासाठी दुसऱ्या सैन्याची कुमक मागवावी लागेल, कसे. महाराजांनी मुद्द्याला हात घातला.
महाराज त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात यश येईल नव्हे. साहेबांचे मन काही कळत नाही.
येईल म्हणजे येणारच, पंचांगावर आणखी पाचशेची नोट बघून महाराजांनी विश्‍वास दिला. तुम्ही जोर धरा. अहो, त्यांनाही गरज आहे. त्यांनाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायचा आहे ना! तृतीय आघाडीवरच्या ग्रहांचे फासे व्यवस्थित पडले तर मुख्यमंत्री तुम्हीच.

प्रसंग दोन
महाराज, महाराज, मुख्यमंत्रिपदाचा योग कधी आहे जरा बघा की... परदेशात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला नेता आल्याचे बघून महाराज मोठे खूश झाले. पंचांगाची पाने उलटसुलट करत नेत्याकडे तिरप्या नजरेने त्यांनी बघितले. काय देखणे रूप, पण चेहऱ्यावर अस्वस्थता खूप बघून महाराजांनी उगाचच उच्छवास जोरात टाकला.
मुख्यमंत्रिपद, जरा कठीण दिसतंय. त्याचे काय आहे. तुमच्याकडे ते गुण आहेत; पण ग्रहांचे पाठबळ नाही ना. घरच्या लढाईत तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतोय. महाराजांनी खुलासा केला.
अहो मी घरचा मंत्री आहे म्हटल्यावर घरच्या लढाईकडे जास्त वेळ द्यावा लागणारच की...
ते घर नव्हे! आपल्या नाकपुड्या फुगवत महाराजांनी सांगितले. अहो सांगली, तासगाव अशा संस्थानात तुमचा जास्त वेळ जातो ना त्याबद्दल बोलतोय. हा ग्रहकाळ काही मुख्यमंत्रिपदासाठी अनुकूल नाही.
मग उपमुख्यमंत्रिपद तरी... मागच्या वेळी हुकलेली संधी मिळेल नव्हे?
महाराजांनी आता अंदाज काढला. पंचांगावर पैसे दिसत नसल्याचे बघून मोठा पॉज घेतला. मांडीवरचा पाय जोरात हलवत जानव्यातून अंगठा फिरवला. साहेबांच्या ते लक्षात आले. त्यांनी हजाराची नोट पंचांगावर सारली.
या वेळी संधी साधणार म्हणजे साधणार... पण त्यासाठी इतरांच्या "भुजा'तील बळ कमी झाले पाहिजे. कसे...

प्रसंग तीन
"साहेब' आले आहेत म्हटल्यावर महाराज स्वतः समोर गेले. तुम्ही मला बोलवायचे नाही का? महाराजांनी दारातून स्वागत करत करत साहेबांना विचारले.
"त्याचे काय आहे भटजीबुवा, आम्हाला आता वेळ मिळाला, इकडून जात होतो म्हटले तुम्हाला भेटून जावे.' साहेबांनी सांगितले.
तुमचं शिक्षणाचे एवढे काम, सरस्वतीची सेवा करताय बघा तुम्ही... आपल्या पोराला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्याचे आठवून महाराजांनी मधाचे जितके बोट लावता येईल तितके लावण्याचा प्रयत्न केला.
ते राहू द्या, या वेळी तरी आम्ही मुख्यमंत्री होणार का? साहेबांनी थेट प्रश्‍नाला हात घातला.
होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. महाराजांनी पुन्हा मधाळ स्वर आणत स्तुतीचा "पतंग' हवेत उडविला.
पण मागच्या वेळी तुम्ही तसेच म्हटला होता. साहेबांनी दुखत्या नसेवर बोट ठेवले.
अहो! त्यावेळी राहू काळ चालू होता ना... पण या वेळी तुम्ही मुख्यमंत्री आणि युवराज आमदार होणार म्हणजे होणार.

प्रसंग चार
नमस्कार महाराज! त्या नेत्याने आल्या आल्या महाराजांच्या पायालाच स्पर्श केला आणि महाराजांच्या कडेलाच मांडी घालून बसला.
एवढा मोठा नेता आणि वागणे कसे सर्वसामान्यासारखे. नेत्याचा हा साधेपणा बघून महाराजांना गहिवरून आले.
महाराज, काय होईल... नेत्याने एवढेच विचारले.
आघाडीबाबत प्रश्‍न म्हटला तर आघाडीचा प्रश्‍न निकालात निघालाय. मतदारसंघ गेला असला तर मतदारसंघातील प्रमुख विरोधक यांच्याच पक्षाकडून विधानपरिषदेवर मग प्रश्‍न कशाबद्दल असेल? महाराजांना काही कळेना.
कशाचे काय होईल?
अहो! मंत्रिपदाचे आणखी कशाचे...
तुम्ही निश्‍चिंत राहा... पण खरे सांगू मागच्यावेळीच तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता. सगळ्या ग्रहांचे पाठबळ तुम्हालाच होते. पण माशी कशात शिंकली कोणास ठाऊक!
एकदा चूक झाली ती झाली... पण उपमुख्यमंत्रिपदाची माळही गेली हो... त्याचे काय? नेत्याने नेहमीप्रमाणे आपली नजर खाली झुकवत मान तिरकी करत विचारले.
अहो! उपमुख्यमंत्री काय तुम्ही या वेळी मुख्यमंत्री व्हाल. कसे? महाराजांनी कसेंवर फारच जोर दिला.
.........................................
ता.क. ः महाराजांना आता कळेना की नेमका कोण मुख्यमंत्री होणार? त्यांनी 22 ऑक्‍टोबरच्या तीर्थयात्रेचे तिकीट बुक करून ठेवले.

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

डोळ्यांची "शाळा'


गुरुजी! गुरुजी! पाचवीच्या वर्गात मुन्ना आणि बंटी भांडताहेत. एकमेकांच्या गळपट्ट्या धरताहेत. स्टाफरुमध्ये पळत आलेल्या दक्षिण्यानं धापा टाकत गुरुजींना सांगितलं. बहुतेक या भांडणात त्यालाही दोन-तीन बसल्या असतील, असा त्याचा अवतार बघून गुरुजी उठले आणि त्याच्याबरोबर चालू लागले.
काय रे आज काय कारण ः गुरुजी
काही नाही गुरुजी कमळीला वही कोणी आणि कशी दिली त्यावरून भांडणं सुरू आहेत.
म्हणजे? ः गुरुजी
अहो! गेल्या वाढदिवसाला मिळालेल्या वह्यांपैकी एक वही बंटीनं कमळीला दिली, तर मुन्नानं बाजारात जाऊन विकत घेऊन वही दिली.
मग देईनात की! यात भांडायचं काय?
तसं नाही गुरुजी, पण कमळीनं दोघांच्याही वह्या घेतल्या ना.
गुरुजींना आता कळेना. अरे वह्या दिल्या म्हटल्यावर घेणारच. त्यात भांडायचं कारण काय ः गुरुजी
तसं नाही गुरुजी, तिनं बंटीकडून वह्या घेताना बंटीला डोळा मारला, तर मुन्नाकडून घेताना मुन्नालापण डोळा मारला. आता त्यांच्यात भांडण चाललंय, ते डोळा खरा मारला कुणाला.
गुरुजींचं डोकं फिरलं अरे गेली पाच वर्षे बघतोय एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे हे दोघे एकदम भांडायला का लागलेत.
काय रे, ते दोघे भांडताहेत का?
काही नाही गुरुजी, वहीचं निमित्त आहे सगळं. दोघांचाही जीव आहे कमळीवर; पण ती नेमकी कुणाची हेच कळेना. मग तिला पटवायला दोघंही काही ना काही करताहेत आणि भांडणात अडकताहेत. दक्षिण्यानं खुलासा केला.
........
गुरुजी आणि दक्षिण्या वर्गाजवळ येतात
........
मुन्नानं बंटीची आणि बंटीनं मुन्नाची गळपट्टी धरलेलेली. दोघं एकमेकांकडं बघून दात-ओठ खात भांडत होते. गुरुजी आलेले बघून दोघंही आपापल्या बाकावर जाऊन बसले.
काय रे, आतापर्यंत तुम्ही चांगले मित्र होता ना? अगदी हातावर बांधलेल्या घड्याळासारखं नातं होतं ना तुमचं, मग असं भांडताय का? ः गुरुजींनी प्रश्‍नपत्रीकाच उघडली.
गुरुजी, मी आपला माझ्या रस्त्यानं चाललोय; पण हाच "वाम' मार्गाला लागलाय. बंटीनं खुलासा केला.
वाम मार्गाला! एवढूश्‍या पोरांकडून वाम मार्ग वगैरे ऐकून गुरुजींना घामच फुटला.
मागच्या वेळी नाही का डाव्यांबरोबर हा लग्नात अक्षता घेऊन उभा होता. बंटीनं आपलं घोडं पुढं दामटलं.
नाही, गुरुजी मी माझ्या रस्त्यानं चाललोय. यालाच मी आडवा येतोय, असं वाटतंय. त्याला मी काय करू. आपलं उगाच ज्यात-त्यात नाक खुपसायचं. कमळीवरच नाही, तर काकांच्या साखरेवरही याचा डोळा होता, आता त्यात काही जमलं नाही म्हणून माझ्याशी भांडतोय. मुन्नानं आपलं म्हणनं मांडलं.
आता गुरुजींना काहीच समजेना. कमळी काय, साखर काय, डावा काय, काही काही कळेना. त्यांनी मघाशी त्यांच्याकडे आलेल्या दक्षिण्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, ही भानगड काय आहे.
भानगड वैगेरे काही नाही गुरुजी. कमळी एकदा याला डोळा मारते तर एकदा त्याला; पण ती नेमकी कोणाची होणार हेच कळत नाही.
पण आतापर्यंत ती त्या दिंगतात कीर्ती असणाऱ्या विजयबरोबर फिरत होती ना.?
होती की. मागं एकदा तिची साथ सुटली ती अजून काय जमली नाही बघा. त्यामुळे आता ती नेमकी कोणाला होय म्हणणार हेच कळत नाही. एवढंच नाही तो किल्ल्यावरचा आपला संजयही तिच्यावर बाण रोखून आहे.
बाण ः गुरुजी
नयनबाण.
मग त्यालाही डोळा मारते की काय ती... गुरुजींनी आवाक होऊन विचारलं.
काय माहीत, आता 22 आक्‍टोबरलाच काय ते कळेल.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

गर्दीतील "माणूस'कोल्हापूर एसटी स्टॅंडवर सोलापूर फलाटावर बसलेल्या त्या वृद्धेकडं लक्ष जाण्याचं काहीच कारण नव्हतं. विस्कटलेले पांढरे केस, अस्ताव्यस्त झालेली मळकी साडी, शेजारीच गाठोडेसदृश असलेली पिशवी आणि त्यावर असलेली काठी बघून ती कोणी भिकारीच वाटत होती. गाडीची वाट पाहणाऱ्या स्टॅंडवरील माझ्यासारख्या अनेकांनी तिच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं; पण मला मात्र तिची आशाळभूत नजर अस्वस्थ करत होती. तिच्याकडं लक्ष द्यायचं नाही असं ठरवूनही नजर मात्र तिच्याकडंच वळत होती. अर्ध्याएक तासात तिच्याजवळून जवळपास पन्नासएक लोक इकडेतिकडं गेले; पण तिनं कोणाकडेच पैसे मागितले नाहीत आणि कोणी तिला पैसेही टाकले नाहीत. एवढ्यात एक पन्नाशीचा विजार-शर्ट घातलेला माणूस तिथं आला. तो काहीतरी तिच्याशी बोलला आणि निघून गेला. मला वाटलं काही पैसे देऊन तो गेला असेल; पण तो परत आला. त्याच्या हातात ब्रेड आणि पेला होता. बहुतेक त्यात चहा असावा. तिनं तो ब्रेड आणि चहा संपवला. तो माणूस पेला घेऊन परत गेला आणि पुन्हा आला. एसटीची चौकशी करून परत तिथं आला. मग मात्र मला राहावलं नाही. मी त्याच्याजवळ गेलो. शांतपणे त्यांच्या मागे उभा राहिलो, तो तिला सांगत होता, "आता लगेचच एसटी आहे.' एवढ्यात एसटी लागली. त्यानं तिची काठी आणि गाठोडं एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हातानं तिला आधार दिला. मला ते गाठोडं घ्यावं वाटलं; पण धीर झाला नाही. त्यानं तिला सोलापूरच्या एसटीत बसविलं आणि कंडक्‍टरकडून तिकीट घेतले. तिच्या त्या गाठोड्यात ते ठेवत त्यानं ते कुठे ठेवलं ते कंडक्‍टरला दाखविलं. जाताना पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवत रिक्षानं जा, असं त्यानं सांगितलं. एसटीतून उतरल्यावर मी त्याला नाव विचारलं, पण तो फक्‍त हसला आणि ज्या गर्दीतून तो आला होता त्याच गर्दीत पुन्हा मिसळला. कोण असावा तो?

सोमवार, ७ सप्टेंबर, २००९

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.

प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी


दहावीची मंडळाची परीक्षा असावी की नसावी हा वाद गेली अनेक वर्षे अधूनमधून डोके वर काढतो, त्याप्रमाणे तो सध्याही जोरात सुरू आहे. शिक्षणतज्ज्ञांतच दोन मोठे गट पडले आहेत. त्यांच्या जोडीला मानसशास्त्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्तेही हिरीरीने सहभागी होताना दिसत आहेत. मोठ-मोठी चर्चासत्रे बोलाविली जात आहेत आणि त्या चर्चासत्रांना शहरात इंग्रजी शाळांत शिकणारे आणि शिकविणारे दोघेही पोटतिडकीने मते मांडत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा परीक्षाकेंद्रीत विद्यार्थी बनत चालल्याची ओरड सगळेच करत आहेत आणि त्याच्या बाजूने आणि विरोधात मते मांडली जात आहेत. ज्याप्रमाणे इतर सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे प्रश्‍न शहरातील मंडळी अभ्यासूपणे मांडतात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दर्जाविषयीही जमीनस्तरावर काम करणाऱ्या खेडेगावातील शिक्षकाला न विचारता शहरात राहाणाऱ्या आणि कधी तरी ग्रामीण भागात जावून शाळांना भेट देणाऱ्या तथाकथीत शिक्षणतज्ज्ञांना विचारुन निष्कर्षापर्यंत पोहचले जात असल्याचे चित्र आहे.
आज प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला आहे आणि हा खालाविण्याचा आलेख आणखी तीव्र होत असल्याचे म्हणणे सगळेच मांडताना दिसत आहेत. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण व्यक्‍तीमत्त्वाचा एक महत्त्वाचा (अपवादात्मक ठिकाणी नसला तरी) घटक आहे हे सारेच मान्य करतात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालाविण्याला सरकार आणि सरकारची धोरणेच जबाबदार आहेत हा सरळ साधा निष्कर्ष मांडला जातो. कल्याणकारी राज्यात सरकारी दायित्त्व फार मोठे असले तरी ज्या समाजाच्या जाणिवा जाग्या असतात त्या समाजाला सरकारपेक्षा स्वतःवरच फार विश्‍वास असतो आणि आज तोच डळमळताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालविण्यात अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षकांची बदललेली मानसिकता हा आहे, आणि त्यावर फार कमी प्रमाणात लक्ष दिले जात आहेत.
शिक्षण देणे हे पुण्यकर्म संपून आठ-दहा दशके उलटून गेली असली तरी शिक्षकीपेशातील त्याग अजून टिकून होता. त्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन नक्‍कीच चांगला होता. अगदी पंधरा वर्षांपुर्वीचे प्राथमिक शिक्षक आणि सध्याचे शिक्षक यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. फरक केवळ विजार जावून पॅंट आली आणि गुरुंजीचे सर झाले या बाह्य रुपात नाही तर शिक्षकांचा शिक्षकीपेशाकडे बघण्याचा आणि समाजाचा शिक्षकांकडे बघण्याच्या दृष्टीचा अर्थात मानसिकतेचा फरक आहे.
अगदी 70 च्या दशकांपर्यंत शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार होते. एखादा विद्यार्थी शाळेत आला नाही तर त्याला घेवून येण्यासाठी वर्गातीलच चार मुलांना पाठवत असत. उचल बांगडी हा प्रकार त्यावेळी सर्रास चालायचा. शाळेबाहेरही जर एखादा मुलगा उनाडक्‍या करत असेल तर त्याला शाळा मास्तरांचा धाक असायचा अर्थात या धाकापोटी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला कायमचा रामराम केला ही गोष्ट खरीच पण मुलांना प्रत्येक गोष्ट ही आलीच पाहिजे हा ध्यास पराकोटीचा होता. इतर कोणत्याही नोकरीपेक्षा त्याकाळात शिक्षकाला मिळणारा पगार तुटपुंजा असला तरी त्यात तो समाधानी असायचा. शाळाबाह्य उपक्रमातही शाळेतीलच जे विद्यार्थी कच्चे आहेत त्यांना शिकविण्याचा एकमात्र धंदा असायचा (कोणतीही फी न घेता). विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिवा जागृत करण्यात या शिक्षकांचा हात सर्वात मोठा होता. विशेष म्हणजे ज्या समाजातून (जातीचा इथे संदर्भ नाही) विद्यार्थी येत त्याच समाजातून शिक्षक येत असल्याने विद्यार्थ्यांना तो आपला वाटे. त्याने दिलेली उदाहरणे आपली वाटत आणि ती त्यांच्या जगण्यातील होती.
पण गेल्या दोन दशकांत शिक्षकांत प्रचंड बदल होत गेला. मास्तराचा गुरुजी आणि गुरुजीचा सर होणाऱ्या बदलात धोतर जावून विजार आणि विजार जावून जीन्स एवढाच फरक राहिला नाही तर शिक्षक समाजापासून दुरावत गेला. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक यांच्यातील दरी रुंदावत गेली. प्राथमिक शिक्षणाचा उगम आणि संगम शहरी आणि ग्रामीण भागात एकच असला तरी त्याचा प्रवाह वेगवेगळ्या स्तरातून वाहतो आणि हाच मुद्‌दा बऱ्याचदा दुर्लक्षीत राहातो. शहरातील प्राथमिक शिक्षणापुढची संकटे वेगळी आणि ग्रामीण भागातील वेगळी आहेत. जीथे शहरात एका संथ लयीत प्राथमिक शिक्षण देणे सुरु आहे त्याचवेळी ग्रामीण भागात त्याची वाट फारच बिकट आहे. अनेक बांध पार करुन त्याला संगमापर्यंत पोहाचावे लागते. त्यामुळे या प्रवाहात पडलेल्यांना मार्गदर्शन करणारेही तितक्‍याच ताकदीचे पोहणारे हवेत.
गाव तेथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक ही योजना कितीही लाभदायक वाटली तरी तिचे परीणाम मात्र तितकेसे चांगले दिसत नाहीत. शिक्षकांना मिळणारा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या अनेक सोयी-सुविधांमुळे अनेकजण शिक्षकीपेशाकडे वळले आहेत. यात नागरी विद्यार्थी जसे आहेत तसेच ग्रामीण भागातीलच नागरी बेटांच्या संस्कृतीत वाढलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या सामाजिकस्तरातून येतात त्या समाजाशी शिक्षकांचा संबंध असत नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी ही दरी केवळ रुंद होत नाही तर ती खोलही होत आहे. त्यामुळे शिक्षक एका परीने शिकवत राहातो आणि विद्यार्थी कोरडाच राहातो. त्यामुळे दहावीपर्यंत पोहचलेला विद्यार्थी दहावीत नापास होतो.
मला काय करायचे, मी एकटा काय करणार, माझा पगार थांबणार आहे थोडीच , या मानसिकतेतूनच विद्यार्थ्यांना शिकविलं जाते. याला काही अपवाद आहेत पण सर्रास हेच दिसत आहे. हे चित्र ग्रामीण आणि शहरात सारखेच दिसत असले तरी त्याचा विचार मात्र पुन्हा वेगळा करायला हवा. एखाद्या विद्यार्थ्याला शहरात एखादी शाळा नाही आवडली तर त्याला पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे संधी दवडली जाण्याची शक्‍यता कमी आहे. पण ग्रामीण भागात शाळाच एक, एकशिक्षकी असल्याने तिथे जे पदरात पडलं आहे ते पवित्र मानायला हवे. एकंदरीतच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावयचा असेल तर प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बदलायला हवी.(त्यांच्यावर असलेल्या शालाबाह्य कामांना गृहीत धरुन).