शुक्रवार, ५ जुलै, २०१३

प्रिय,

बाहेर ज्येष्ठातला पाऊस अखंडपणे कोसळतोय. रात्रीच्या या काळाखोत पावसाचा तेवढा आवाज ऐकू येतोय.. जणू आता सगळं आपल्या मिठीत घेऊन वाहून नेण्यासाठी आतुर असलेला हा पाऊस कधी थांबेल की नाही असंच वाटू लागलंय. रात्र, बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस, अशावेळी एकटं वाटतं. हा एकटेपणा दूर करण्याचा एक पर्याय असतो तो म्हणजे तुला पत्र लिहिण्याचा. पत्राच्या सोबतीने तुला सोबतीला आणण्याचा.. या मिट्ट अंधारात टेबलावरची ही मेणबत्ती आपल्या तुटपुंज्या शक्‍तीने तेवत आहे. खिडकीतून येणाऱ्या ओलसर वाऱ्याला न जुमानता तिची जगण्याची लढाई सुरू आहे. कधी कधी तिची ज्योत थरथरते, पण तेवढीच... पुन्हा ती ताठ मानेने तेवत राहते. अगदी थकलेल्या म्हातारीसारखी ती करारीपणे जगत आहे...
संध्याकाळची गोष्ट... दुपारपासूनच सुरू असलेल्या पावसाने सगळीकडे पाणी पाणी केले होते. झाडांवरून पावसाच्या पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. इथे आमच्या घराच्या समोरच्या झाडावर असाच एक कावळा आपल्या सर्व शक्‍तीनिशी पावसाशी लढत असलेला मी बघितला.
आपल्या कोवळ्या काळ्या पंखावर पावसाचे बाण सहन करत तो फांद्यांच्या आधाराने पावसाच्या डोळ्यांत डोळा घालून बसला होता..त्याचे ते काट्या-कुट्याचे घरटे खाली कोसळले होते... फांद्यांचा आडोसा अपुरा पडत होता... त्याच्या तलम काळ्या पंखांचा आता पार झाडू होऊ गेला आहे. हे त्यालाही माहीत होते, पण तरीही त्याने आपली फांदी सोडली नव्हते... तिथून अगदी एका झेपेच्या अंतरावर माझ्या घराची बाल्कनी आहे. त्यात तो आला असता तरी त्याला कोणी हुसकावून लावले नसते तरी तो त्या झाडावर बसून राहिला. आपल्या मोडतोडत्या घरट्याकडे बघत. पावसाचे टपोरे थेंब आपल्या पंखावर झेलत. आताही तो या किर्र अंधारात त्याच फांदीवर तिथेच तसाच पडून असेल नया ज्येष्ठातल्या पावसाला तशी माया कमीच... तू म्हणायचीस नेहमी... "" मला वळिवाचा पाऊस आवडतो, कारण तो येतोच मुळी नाद करत, ढोल-ताशे घेऊन. येताना वाजत गाजत येतो आणि जाताना सगळा कचरा आपल्यासोबत नेतो, उन्हाने रापलेली मनं आणि तापलेल्या जमिनीला तृप्त करुन मागे ठेवतो फओलावा. ज्येष्ठ-आषाढ हे निमंत्रितांसारखे येतात. आपल्या ठराविक जागेवर बसतात आणि उठतात. कोसळतातही कर्तव्य केल्यासारखे. त्यांना माया नसतेच.'' खरंच आहे तुझं. आता बघ हा पाऊस येता तसाच. अगदी आपल्या कामाचे आठ तास मोजून भरावेत, यासाठी जणू केव्हापासून कोसळतो आहे.. त्याबरोबर आता वाराही जोराचा सुटला आहे.... मघापासून धीराने वाऱ्याचे आव्हान पेलणारी मेणबत्ती आता जास्तच थरथरू लागली आहे. या लढाईत ती जिंकणे अशक्‍य आहे. त्यामुळे आता पत्र अपुर्ण ठेवून झोपेला जवळ करणे हेच उत्तम...!
सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मला त्या आपल्या काट्या-कुट्याच्या घरट्याकडे बघत फांदीवर पाऊस झेलणाऱ्या कावळ्याची आठवण आली..
पत्र पूर्ण करावे की कावळ्याला बघावे या द्विधा अवस्थेत होतो. पण पहिल्यांदा तो कावळा बघावा आणि मग पत्राला हात घालावे असे वाटले म्हणून मी अंगणात गेलो. अंगणात त्या झाडाखाली पडलेल्या काट्या-कुट्याच्या घरट्याशेजारी तो कावळाही अचेतन होऊन पडला होता. त्याचे पंख त्या विस्कटलेल्या घरट्यासारखेच विस्कटले होते. त्याच्याच कडेला दुपारी पोरांनी सोडलेल्या नावांचे कागद. मला आता कळतंय की तुला ज्येष्ठ-आषाढातला पाऊस का आवडत नाही... कावळ्याची घरे ज्येष्ठ-आषाढातच कोसळतात... आणि कधी कधी कावळेही....!

                                                                                                                                                  तुझाच....