बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

प्रति, सुप्रिया मॅडम,

प्रति, सुप्रिया मॅडम,
गेल्या शुक्रवारी पुस्तक घेण्या-देण्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होतीच, पण तसा योग येत नव्हता. तो यानिमित्ताने आला. भेटीपूर्वी तुमच्याबद्दल वाटणारा आदर भेटीनंतर दुप्पट-चौपट झाला. अनेकवेळा आपण एखाद्याचे लेखन वाचतो किंवा त्या लेखकाबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवरुन त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो. याला मी पूर्वग्रह असं म्हणत नाही, पण अशा चौकटीत आपण लेखकाला ठेवतो. त्यामुळे आपल्यातील अस्वस्थता थोडी कमी होते. तशी एक प्रतिमा तुमच्याबद्दल माझ्या मानात होतीच. पण जेव्हा प्रत्यक्षात तुमच्याशी बोलणं झालं, त्यावेळी प्रत्यक्ष बऱ्याचवेळा प्रतिमेच्या खूपच उत्कट असंत हे माझ्यालेखी पुन्हा अधोरेखीत झालं.(याचं श्रेय मा. भोसलेसाहेबांना जाते.)
एक आठवड्यानंतर पत्र लिहण्याला एक कारण आहे ते म्हणजे तुमची पुस्तके. शुक्रवारी संध्याकाळी "पॉपकॉर्न' वाचायला घेतलं. पहिला लेख वाचल्यानंतर दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा लेख वाचण्याचा मोह आवरता आवरला नाही. बऱ्याचवेळा रात्री बेडवर पडल्यावर झोप येईपर्यंत पुस्तक नाकासमोर राहातं आणि त्यानंतर ते उलटं छातीवर कधी पडतं हे कळतच नाही..पण एखाद्या लहान मुलापुढे खाऊचा डबा ठेवला तर ते मूल किती हरखून जाईल तेवढाच हरखून गेलो. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देत आता हा शेवटचाच लेख वाचायचा आणि झोपायचा असा विचारही केला. लाईट बंद केली पण तरी एक अस्वस्थता कायम राहीली आणि पुन्हा लाईट लावला पुस्तक पूर्ण केलं मगच शांत झोप आली. विशेष म्हणजे मला आता जेव्हा जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल आणि रिलॅक्‍स होण्यासाठी एक लेख सकाळी आणि एक लेख रात्री वाचण्याचा डोस पुरेल हे नक्‍की!
"टाईमपास' मात्र पाच- सहा वर्षांपुर्वी माझ्या वाचनात आलं नाही हे बरे झाले. बऱ्याचवेळेला शब्दांचा समोरचा अर्थ दिसतो तसा असतोच असं नाही. किंवा एखाद्या वाक्‍याचाही अर्थ असाच संदर्भहीन आला तर त्याच्या छटा वेगळ्याच दिसतात. किमान मला तरी समुहातील शब्द आणि समुहाबाहेरचा शब्द वेगवेगळा भासतो. पुस्तकांत येणारा शब्द हा रिलेतील खेळाडूसारखा असतो अगदी आपल्या हातातील काठी पुढच्या खेळाडूच्या हातात देणारा, तर एकटा शब्द धावण्याच्या स्पर्धेत एकटा धावत असल्यासारखा. त्यामुळे शब्दांचे समोरचेच अर्थ घेण्याच्या वयात मला हे पुस्तक कदाचित आवडलं नसतं. पण आज मात्र हे पुस्तक वाचताना जगण्यातली शुचिर्भूतता ही कल्पनेतच असते पण जसं जगलो तसं मांडणं याला किती धीटपणा असावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे हे पुस्तक डोक्‍यात कमी जातं आणि मनात घर करुन बसतं. प्रोतिमांचं जगणं जितकं प्रवाही आहे, त्याहीपेक्षा तुम्ही केलेलं त्याचं भाषांतर. या प्रवाहात एकदा माणूस पडला की पुन्हा किनाऱ्याचा शोध तो घेत नाही अगदी शेवटापर्यंतच तो येवून पोहोचतो. यासाठी तुम्हाला धन्यवाद!

ता.क. काही व्याकरणाच्या चुका असतील तर क्षमा! मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.