गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९

पन्नास रुपडे......

माय! आजचा शेवटचा दिस हाय, आज जर पैसं दिलं नाय तर मास्तर शाळंत बसू देणार नाय.... बारा-तेरा वर्षाच्या पोरानं काकुळतीला येत आईचा पदर धरत तिला थांबवायचा प्रयत्न केला....ती थांबली... त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे तिनं निमिषभर बघितलं पण त्याच्या डोळ्यात बघणं तिला पेलवलं नाही.... तिने पदराचा काठ त्याच्या हातातून सोडवला ...आणि निघून गेली...

बाई! पोरगं आठ दिस झालं, मागं लागलंया आज त्याला पैकं दिलं नायी तर त्येला मास्तर शाळंत बसू देणार नाय... म्होरल्या पगारातनं कापून घ्या की....भांडी घासता घासता ती ज्या घरी धुनं-भांडी करायची तिथल्या मालकीनीकडं तीनं पन्नास रुपयांची मागणी केली...
नाही गं ! आत्ता कुठले माझ्याकडे पैसे... आणि साहेबही बाहेरगावी गेलेत ना... तुला पुढच्या आठवड्यात पैसे देते काय... तिच्या पुढे आणखी चार भांडी आणून ठेवत मालकीनीनं नकाराची घंटा वाजवली.
मग, तीनं खूप गया-वया केली... पण मालकीनीनं काही पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली नाही.... नंतर ती निघून गेली...
काही पोराचं शिक्षण बिक्षण थांबत नाही... हिलाच पाहिजे असतील पैसे, गावाला जायला... मालकीन स्वतःशीच पुटपुटली...
नंतर चार दिवस झाले तरी ती कामावर आली नाही...
मालकिनीचा संशय आणखी गडद झाला... कोणीतरी नक्‍की हिला पैसे दिले असणार आणि ही नक्‍की गावाला गेली असणार... पण आता मालकिनिला धुन्या-भांड्याचा कंटाळा येवू लागला होता.... ती आज नाही पण पुन्हा कधी येणार हे तरी कळावं म्हणून ती तिच्या घराकडं गेली...
त्या एवढ्याशा झोपडीत खूप माणसं बघून तिला काही सुचलं नाही.... तिनं शेजारच्या बाईकडं चौकशी केली....
बाई ! ती मेली....
मेली.... मालकिनीला आता भोवळ यायला लागली होती...
आवं परवाच्या दिशी पोराला पैकं पायजे म्हणून ती म्होरल्या बिल्डींगवर कामाला गेलती....असलं काम कवा केलं न्हवतं न्हवं......पाचव्या मजल्यावरनं पाय घसरला... खाली पडली.... जागच्या जागी गेली बघा.....
मालकिनीला काय करावं कळलं न्हायी.....ती घराकडे जाण्यासाठी वळली....
त्या झोपडीसमोरच तिचं ते पोरगं विटी-दांडूनं खेळत होतं.... त्याला बहुतेक मास्तरांनी शाळेतनं काढलं होतं.......