सोमवार, ६ जून, २०११

मोगऱ्याची वेणी

केवढयाला रे, हे केवड्याचे पान.. सोळा, सतरा वर्षांच्या त्या मुलीने त्याच्याकडे बघत, थोडं मुरकंतच विचारलं.
बारा रुपये! त्याने थंडपणे उत्तर दिलं. त्याला माहित होतं की बारा रुपये म्हणून सांगितलं की पुढची बाई दहा रुपयाला मागते. थोडा मोलभाव केला की दहा रुपयाला ते पान विकलं जायचं. पण तीनं ना पर्समध्ये हात घातला, ना मोलभाव केला, जशी आली तशी ती निघून मंदिरात शिरली.
त्याला क्षणभर वाटलं पुढे जावं... दहा रुपयाला देईन असं सांगाव पण त्याचा धीर झाला नाही. कदाचीत ती जर त्याच्या वयाचीच नसती तर तो पुढे नक्‍की गेला असता. पण ती त्याच्याच वयाची असल्याने तो संकोचला. जाऊ देत, म्हणून तो मागे सरला...
काय रे! काल तू केवड्याची पाने विकत होतास ना? मग आज तू या मोगऱ्याच्या वेण्या का आणल्या आहेस... कालची तीच ती होती. काल घातलेल्या निळ्या ड्रेसपेक्षा आज हिने घातलेला लाल रंगाचा ड्रेस खूप छान शोभतो. त्याच्या मनात एक विचार येऊन गेला..
केवड्याची पाने मिळाली नाहीत. विकायला काहीतरी पाहिजे ना? म्हणून मग मोगऱ्याच्या वेण्या आणल्या आहेत. घ्या ना वेण्या! दहा रुपयाला दोन दिल्या... त्यानं विनंती केली.
तिनं वेण्या उचलल्या... त्या मोगऱ्याचा गंध श्‍वास भरुन घेतला. केवड्याचा सुगंध, मोगऱ्याला नाही रे! मला केवडा हवा होता. ती एवढीच बोलली आणि निघून गेली.
तिसऱ्या दिवशी तो माळ्याशी भांडला, पण केवडा मिळाला नाही. आज कधी नव्हे तो त्याला केवडा हवा होता. नाही तर वेण्या संपल्या की याला केवडा मिळायचा...
आज ती परत आली आणि परत तिने केवडाच मागितला तर.. आज तिनं येऊच नये... उद्या तिच्यासाठी केवडा आणीन अगदी कुठूनही आणीन, पण आज तिनं येऊ नये...असं त्याला वाटत होतं... पण कालच्यावेळीच ती आली.
ती सरळ त्याच्यासमोरच आली... तीनं पुन्हा त्याच्याकडे बघितल... त्याच्या परडीतील मोगऱ्याच्या वेण्या इकडे तिकडे केल्या.
""केवडा नाही ना आणलास तू''
नाही... नाराजीनंच त्याने मान हलविली.
हातातील वेण्या तिथेच ठेवून ती निघायला लागली, तसा तो पुढे झाला.
"" या वेण्या घ्या... बघा किती ताजा मोगरा आहे...पैसे नका देऊ....''
त्याने हातात एक वेणी उचलली. त्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांच्या पार्श्‍वभूमिवरचा तिचा सावळा चेहरा आणखी तजेलदार दिसत होता. क्षणभर तीही भांबावली, पण लगेच सावरली...
""नको! मला केवडाच हवा.''
तिच्या उत्तराने तो हिरमुसा झाला. मागे सरला.... पुढच्या दोन दिवसांत त्याला केवडा मिळाला नाही, मिळालेले गजरेही त्याने घेतले नाहीत... तो रस्त्यावर आलाच नाही.... नंतर तो कितीतरी दिवस त्याच रस्त्यावर यायचा. केवडा घेऊन .. पण ती यायची नाही... तो गजरे विकायचा... पण त्याच्या परडीत एक केवड्याचे पान मात्र तसेच सूकुन जायचे... कोणी त्याला विचारलेच तर केवडा विकायला नाही एवढेच म्हणायचा... कधीतरी ती येईल म्हणून तो परडीत नेहमी केवड्याचे एक पान ठेवायचा.... पण ती आली नाही. त्याची नजर तिच्या रस्त्याकडे असायची....दिवसा मागून दिवस सरले....त्याचं कॉलेज संपलं.... तसं त्याचा गजरे विकण्याचा पार्ट टाईम जॉबही सुटला......हातात गाडी आली... कधी तो त्या रस्त्यावर थांबायचा... गाडीच्या काचा खाली करुन तेथील गजरे विकणाऱ्या पोरांकडे बघायचा.... तेथील पोऱ्याकडून केवडा घ्यायचा... त्या केवड्याचा वास त्याच्या केबीनमध्ये दरवळत राहायचा....
आजही तो असाच आपल्या नादात चालला होता... त्याची गाडी मंदिरासमोर थांबली.... एक पोरगं परडी सांभाळत त्याच्यासमोर आलं...
"" केवडा आहे का रे!''
""नाय साहेब! '' त्यानं उत्तर दिलं.... आज माळ्याने केवडा दिला नाही...
तो हसला... पोराला नाराज करायला नको म्हणून त्याने एक छानशी मोगऱ्याची वेणी घेतली आणि तो मंदिराच्या पायऱ्या चढला.... त्यानं देवीला नमस्कार केला आणि तो परतला... चप्पल घालायला तो सहज वाकला, तर एक केवड्याचे पान त्याच्या चपलासमोर पडलं होतं. त्यानं ते उचललं... समोर ती तीच होती... काळ लोटला असला तरी त्यानं तिला कधीच ओळखले होते... बहुतेक तिनेही ते ओळखले असावं... ती हलकेच पुढे आली... तिने त्याच्या हातातील ते केवड्याचे पान हलकेच घेतले... त्याच्यासमोरच ते केसांत माळले.... त्याने मघाशी घेतलेली वेणी तिच्या समोर केली.... आज तिने ती वेणीही घेतली....