मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

प्रिय,

सुनीताबाई देशपांडे म्हणतात, तुमचं पहिलं पत्र हे निव्वळ पत्र किंवा मूळ पत्र आणि बाकीची सगळी पत्रे ही पत्रोत्तरे. खरे असेलही. पत्राला उत्तर लिहिताना किंवा त्याचा संदर्भ घेऊन लिहिताना ते पत्र मूळ पत्र राहत नाही. पत्रांच्या माळेतील तो एक मणी होतो, त्याचे अस्तित्व त्या माळेतील इतर मण्यांप्रमाणेच असते. वेगळे अस्तित्व त्याला असत नाही. दोन्ही हात एकमेकांत गुंफून घेतलेल्या शिल्पाप्रमाणे. त्यातील प्रत्येक शिल्प आपपल्या ठिकाणी सुंदर दिसत असले तरी, त्या शिल्पांना एकमेकांपासून दूर करता येत नाही. ते केलं की मग अपुरेपणा जाणवतो. मूळ पत्रात तो अपुरेपणा असत नाही. पण मूळ पत्र म्हणजे तरी काय? प्रत्येक पत्र मूळ पत्र असू शकते का? छे! प्रत्येक पत्र कधीच मूळ असू शकत नाही. पहिले पत्र केवळ मूळ म्हणता येईल. बाकीची सगळी पत्रे ही पुन्हा माळेतील मणीच. त्याला एकमेकांपासून दूर नाही करता येणार. आता हेच बघ. तुला लिहिलेले पहिले पत्र आणि त्यानंतरची ही सगळी पत्रे ही एका अदृश्‍य अशा कडीत बांधलेलीच आहेत की. त्यातून त्यांना वेगळे करता येणार नाही. पहिल्याच पत्रात फक्‍त तुम्हाला तुमचेपण मांडता येते. बाकीच्या पुढच्या सगळ्या पत्रांमध्ये तो पहिला धागा असतोच, कधी उत्तरांचा तर कधी प्रश्‍नांचा. पण ज्या पत्रांना उत्तरे मिळत नाहीत, ती पत्रे पुन्हा मूळ पत्रासारखी असतात का? छे तीही मूळ असत नाही. जाऊ दे ! आपण या भानगडीतच न पडलेले बरे. मला तुला जे सांगायचे आहे ते सांगितले म्हणजे झाले. ते पत्र मग मूळ आहे की पत्रांच्या कडीमधले याला काही अर्थ असत नाही.
तू साथ-साथ चित्रपट बघितला असशीलच ना? दीप्ती तुलाही आवडते आणि मलाही. तिच्या डोळ्यात तुझे साधेपण दिसते. खरे तर नूतनच्या मीनाक्षी डोळ्यांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलके आहेत. हे कधीतरी सांगायचे होते, पण ते राहिलेच. तर दीप्तीचा साथ-साथ चित्रपट. त्यातील बहुतेक गाणी सुंदरच आहेत. पण तरीही "तुम को देखा तो ये ख्याल आया ' हे गाणं अप्रतिम. तुझ्या आवडत्या जगजीतसिंहने गायलेले. पडद्यावर फारुख डोळ्यात ीजतका आर्त भाव आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मागे गेलेले केस आणि समोर साधी पण आश्‍वासक दीप्ती. जगजीतच्या पहिल्या हुंकारापासून आणि चित्राच्या आलापापासून गाणं खोल मनात उतरत राहातं. समोरची दीप्ती हळूहळू विरत जाऊन तिथे तू दिसू लागतेस. खास करुन ज्या वेळी आज फिर हमने इक तमन्ना की, ही ओळ तो गातो त्यावेळी हाय! जणू ती ओढणी आपल्याच हातात असल्याचा भास होतो. तो ज्या सहजतेने ती सोडून देतो आणि म्हणतो "आज फिर दिल को हमने समझाया... हाय... दीप्तीच्या चेहऱ्यावरचे ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मागे केस हलक्‍या हाताने घेणारी. मान हलकेच तिरकी करुन बोलणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे मी नजर चुकवत असताना धिटाईने नजर मिळविणारी... तूच आणखी कोण असणार.. "हम जिसे गुणगुणा नही सकते...' हे कडवं गाताना जगजीतचाही घसा थोडा कोरडा पडला असणार नक्‍की. काही वेळाच अशा असतात.. त्यांची गाणी आपल्याला गुणगुणायला येतच नाहीत... कितीही ओठांवर असलं तरी सांगता येत नाही हेच खरे.... आज पुन्हा तुझी आठवण खूप दाटून आली. असे काही क्षण असतात त्यावेळी खूप सैरभैर व्हायला होतं. जगणंच अवघड वाटायला लागतं, पण हे क्षण धिटाईने पेलायला लागतात. ही कला मला यायला लागली आहे असे वाटते तरी काही क्षण सुटतातच की... आजही आठवणींचा आवेग आवरून धरला आहे. आज पुन्हा मनाला समजावलं आहे....

                                                                                                                                     तुझाच