गुरुवार, १५ ऑक्टोबर, २००९

ओझं

माई ! दिवाळी हाय, काय करंजी लाडू असत्याल तर घाला गरिबाच्या झोळीत..... वाड्याच्या अंगणात आलेल्या त्या भिकारणीकडे बघून तिचं मस्तक तापलं.... चल बाहेर हो आधी... चल... तिनं थरथरत्या आवाजात फर्मान सोडलं... पण ती हलली नाही आपली लाचार नजर तिच्याकडे टाकत तिथल्या पायरीवर ती पसरली.... हातातील ताटली समोर ठेवत तीनं माई द्या चा घोष लावला.... त्या भिकारणीचं ते पसरणं तिला आवडलं नाही.
चल म्हटलं ना! काही, मिळणार नाही.... उचल ती ताटली आणि निघ... तिनं शब्दात जितका जोर आणायचा तितका आणला....
पण तरी ती भिकारीण हालली नाही....
माई! आज दिवाळी हाय कालपसनं कायबी खाल्लं नाही.... खायाला कायतरी द्या... गरीबाचा आशीर्वाद लागंल.... घरात दुधा-तुपाच्या नद्या व्हातील.... त्या चौसोपी वाड्याकडं बघत ती असं काही बाही बडबडत राहिली....
आता मात्र ती अस्वस्थ झाली....तिला त्या भिकारणीला वाड्याबाहेर कसे घालवायचे हेच कळत नव्हतं.
ती पुन्हा जोरात खेककसली... चल बाहेर काही काही मिळणार नाही....
आपला केवीलवाणा चेहरा आणखी केवीलवाणा करत ती तिथंच बसून राहिली..
तिला हाताला धरावं आणि सरळ वाड्याबाहेर काढावं असं तिला वाटून गेलं पण तिच्या हातात ते बळ आलं नाही.....
भिकारणीनं आपल्या फाटक्‍या झोळीतील काहीबाही काढलं आणि ताटलीत टाकलं.... माई पानी तरी द्या....
आता मात्र कळस झाला.... हे खाऊन झाल्यावर जाणार ना येथून..तिनं विचारलं......भिकारणीनं मान डोलावली.....
तिनं कळकट मळकट तांब्यातून पाणी आणलं.... भिकारणीनं थोडं खाल्ल,पाणी प्यायली आणि आल्या वाटनं निघून गेली...
तिनं दरवाजा लावला.... त्या मोठ्या वाड्याचा दरवाजा थोडा करकरला आणि बंद झाला. बंद दरवजाकडं बघंत ती तिथंच थोडावेळ बसली.... मग उठली... काटी टेकत टेकत ती सोप्यात आली.... मग तिथं बसून राहिली.... दिवे लागणीची वेळ आल्यावर तिनं दरवाजा उघडला..... बाहेर सगळीकडे दिव्यांची झगमगाट होती...ती स्वतःशीच हसली... . तिने तुळशीपाशी आणि बाहेर एक एक दिवा लावला.....मग ती देवापाशी दिवा लावायला गेली.... जुन्या समईतील संपत आलेली वात तिने पुढे ढकलली आणि काडी पेटवली....समई लागली....मग तिच्या लक्षात आलं, अरे आज तर लक्ष्मीपूजन.... मग कनवटीची चार नाणी तिनं काढली आणि ती देवासमोर ठेवली....दिवाळीचा नैवैद्य काय दाखवावा, म्हणून तिला प्रश्‍न पडला... घरी काहीच नव्हतं... नंतर तिच्या लक्षात आलं मघाशी जी भिकारीण बसून गेली तिथं तिची एक करंजी तशीच पडलीय.... ती उठली आणि तिनं ती करंजी उचलली... त्या करंजीचं ओझं तिला तिच्या आयुष्यापेक्षा जास्त वाटलं.....