रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

"पॉलीश'

"पॉलीश'
एवढाच शब्द त्याने उच्चारला आणि त्याच्यापुढे पाय पुढे केला.
झाडाखाली बसलेल्या त्या सत्तरीतल्या चांभाराने एकदा त्याच्याकडं बघितलं आणि आपल्याकडचा चपलांचा एक जोडा त्याच्यापुढं ढकलला.
त्याने त्या जोड्यात पाय घुसविले आणि तसाच उभा राहिला.
लय दिस झालं, पन बुटाचं हे मॉडेल नायी बघिटलं. मागं लय फॅशन व्हती याची, पर आता कोन न्हाय वापरत.
चांभाराच्या त्या वाक्‍याने त्याला उगाचच अंगावर मास चढल्यासारखं वाटलं. आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्‍यांवर ताव मारत त्यानं नुसतं स्मित केलं. उगाचच आपल्या दाढी केलेल्या तुळतुळीत गालावरून हात फिरवला. कोटाची बटने काढली आणि पुन्हा घातली.
साधं करू की पेशल?
हं. स्पेशल. त्यानं आवाजात जितका जरब आणता येईल तितका आणला.
सायब कसं हाय! तुमच्यासारख्या लोकांस्नी असा चकचकीतच बूट लागतो. चालायचं कुठं असतंया. गाडीत बसला की धूम निघाला.....
हं.. चांभाराच्या त्या जवळीकतेनं तो थोडा अस्वस्थ झाला. बोलून चालून चांभार, दिडदमड्या मिळविणार आणि किती आगाऊपणे बोलतो, असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
किती वेळ? त्यानं पुन्हा आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न केला, पण ती तितकीशी जमली नाही.
लय नायी, पर चकाकी तर आली पाईजे..
हं. तो गप्प बसला.
बराचवेळ शांतता तशीच राहिली. कोणीच काही बोललं नाही. त्या चांभाराचे हात वेगानं बुटावर फिरत होते. मघापासून हातापेक्षा वेगाने चालणारी त्याची जीभ थंड पडली होती. एक बूट झाल्यावर त्यानं दुसरा हातात घेतला. त्याच्यावर तो ब्रश फिरवू लागला.
आपण उगाचच त्याला थांबवलं, असं वाटून त्यानं काही तरी प्रश्‍न करायचा म्हणून केला.
हं. किती वर्षे झाली. इथे बसतोस?
हं...
आता त्या चांभारानं त्याचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यानं गप्पपणे आपलं काम सुरूच ठेवले. सायबाने समोर बघितलं. उन तसं बऱ्यापैकी होतं. अंगातून आता घाम येऊ लागला होता. तो ज्या गाडीतून आला होता, ती नवीकोरी गाडी समोरच उभी होती. गाडीच्या थंडाव्यात जा,वं असं त्याला वाटून गेलं. पण त्यानं तो विचार टाळला. त्या चांभाराशेजारी असलेल्या एका मोडक्‍या खुर्चीवर त्यानं रुमाल टाकला आणि तिथंच बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. ती शांतता त्याला आणखी डसू लागली.
त्यानं पुन्हा विचारलं.
किती वर्षे झाली. इथे बसतोस?
वरीस, दोन वरीस झालं असल की, इथं बसतो. तेच्याआगुदर.. तो बघा बंगला तिथं बसायचो. म्हणजे तिथं बंगला नव्हता. व्हतं एक घर. त्याच्या पुढ्यात एक झाड व्हुतं. तिथं बसायचो, न्हान व्हतो, तवापसनं.
त्यानं त्या बंगल्याकडे बघितलं. खूपच दिमाखात तो बंगला उभा होता.
मागल्या साली घर पाडलं. अन्‌ आता तिथं बंगला झाला. म्या ज्या झाडाखाली बसत हुतो ते झाड बी तोडलं गेलं. मंग काय. काही दिस बंगल्याच्या भित्तीला टेकून टाका घालायचो. पन एकदा वाचमन चिडला, म्हणाला सायबांकडं लय पावणं येणार हायती, उठ इथंनं. मग दोन चार दिसाला कोण कोण येत राहिलं आणि मग म्या सरळ इथ मुक्‍काम ठोकला.' तो बोलत होता.
""मोठ्या बंगल्यांस्नी न्हान माणसं पेलवत न्हायीत सायेब. तेंच्या शिरमंतीपुढं आपल्यावानी गबाळ्याचा कशापायी संसार थाटायचा. ह्या बुटांचं भारी असतंया बघा, गरीब दिसू लागली की हात फिरवायचा. थोडं पॉलीश केलं की झ्याक नव्यावानी दिसतंया. माणसांचं तसं नसतंया. माणसांना का कोणी पॉलीश करणार. म्हणलं त्यांचं नशीब त्यांच्याकडं आपलं आपल्याकडं. आपण जनमलोच तुटक्‍या चपलेवानी, दोन-चार टाकं काय घातलं तेवढंच आपलं. आता ते बी काय उपेगाचं न्हायी. शिवायला आता तळ बी राहिला न्हायी.''
हं.. सायबानं आता नुसता हुंकार भरला.
तू बघितलं आहेस त्या बंगल्यातील सायबांना? पुन्हा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं प्रश्‍न केला.
नाय बा, काळ्या काचंच्या गाड्यातली माणसं कुठं दिसत्यात गरीबाला. पर गाड्या बघितल्यात. लय झ्याक हायती. तुमची ही गाडी बी तशीच, पर त्या बंगल्यातील गाड्या लय निराळ्या. रोज येगळी गाडी.
तो गप्प बसून राहिला. त्यानं त्या बंगल्याकडं एक नजर टाकली आणि पुन्हा त्या चांभाराकडं. त्याने आता दोन्ही बूट चकचकीत करुन ठेवले होते.
चांभाराने त्याच्याकडे बघितले.
त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. पण तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर पुढे आला, ड्रायव्हरने पन्नासाची एक नोट त्याच्यापुढे ठेवली. साहेब गाडीत बसून निघून गेला. चांभाराने त्याच्या गाडीकडे बघितले. गाडी त्या बंगल्याच शिरली.
चांभार स्वतःशीच हसला. त्या बंगल्याच्या सायबालाच आपण सांगत व्हुतो की. त्याने मान हलवली आणि सायबानं टाकलेल्या पन्नाशीच्या नोटेकडं बघत चांभार पुटपुटला, आजचा दिस गेला आता, उद्याचं उद्या बघू.
त्यानं तिथं ठेवलेलं आपलं सामान आवरायला सुरवात केली. सायब बसलेल्या खुर्चीवर सायबाचा रुमाल तसाच होता. एवढा मोठ्‌ठा साहेब आणि त्याचा रुमाल बघून चांभाराला कसंतरीच वाटलं. रुमालाला पडलेल्या भोकांवरुन त्याला समजलं, त्या बंगल्यात जाण्यापूर्वी सायबालाही पॉलीश केलं होतं. माणसांना पॉलीश केलेलं त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं.