सोमवार, २३ मे, २०११

आई भूक

"अण्णा, आपण आता कुटं! मामाच्या गावाला! बापाच्या खांद्यावर बसलेल्या त्या साडेचार, पाच वर्षांच्या पोरानं बापाचा मुंडासा घट्‌ट पकडत प्रश्‍न विचारला. झपाझप पावलं टाकत चाललेल्या त्या बापानं पोराच्या त्या प्रश्‍नाकडे लक्षच दिले नाही. सोबतिला त्याची बायको दिड पावनेदोन वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन त्याच्या चालण्याच्या गतीत गती मिळवत होती. तिन्हीसांजेची वेळ जवळ येत होती. शेतात राबणारी माणसं घराला जवळ करीत होती.
"अण्णा, या पावटी मला जत्रेतनं, ट्यॅक्‍टर घेणार न्हवं! रंग्याला तेच्या मामानं लय चांगला ट्यॅक्‍टर घेतलाया, ही चाबी दिली की धुssम! ते पोरगं अखंड बडबडत होतं. त्याचा बाप मात्र त्याच्या कुठल्याच प्रश्‍नाचं उत्तर देत नव्हता. चालण्याची गती तेवढी वाढत होती. बापाच्या खांद्यावर बसून ते पोर टकामका नजरेनं सगळा परिसर डोळ्यात साठवून घेत होतं. लांबच लांब जाणाऱ्या पायवाटा, अंब्यांनी लगडलेली झाडे, घरट्याकडे परतणारे पक्षी.. त्याची नजर स्थीर राहात नव्हती. या रानात तो कितीतरी वेळा आला होता, अनेकवेळा घराकडे परीतीच्या वाटेवर त्याला हेच चित्र दिसायचं. पण आज काही तरी वेगळं होतं. आज त्यानं आईचं बोट धरलं नव्हतं, तर बापाच्या खांद्यावर तो बसला होता, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट नविन वाटत होती. सहज त्याची नजर बगळ्यांच्या थव्याकडे गेली... नकळत त्याची मूठ झाकली गेली. मूठ झाकली की आकाशातून जाणारे बगळे आपल्या नखांवर येऊन बसतात, असं कोणतरी त्याला सांगितलं होतं. त्यानं मूठ वळली आणि ती बगळ्यांच्या दिशेने केली. बगळ्यांचा थवा आला आणि एका झाडावर जाऊन विसावला. त्यानं मूठ सोडली, मिटलेले डोळे उघडले. त्याच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांवरच्या नखांवर बगळ्यांनी दाटीवाटीने ठाण मांडले होते. त्याला प्रचंड आनंद झाला."अण्णा! समदं बगळं हातावर आल्याती! त्याचा बाप काही बोलला नाही. झपाझप पावलं टाकत तो पुढेच चालला होता. रानातील वर्दळ बरीच कमी झाली होती. अंधार पसरायला लागला होता. खरेतर त्याला अंधाराची खूप भीती वाटायची, पण आज बापाच्या खांद्यावर बसून जाताना ती भीती पार दूर लोटली होती. बाप जवळ असला की खरेच त्याला कशाचीच भीती वाटायची नाही. आईही बापासमोर त्याला काही बोलायची नाही. अंधार गडद होत गेला, तशी त्याची आईही दिसायची बंद झाली.
त्यानं मोठ्यानं हाक मारली. आई... . आईनं नुसतं हूूं केलं. छोटी घरातून निघातानच झोपली होती.मघाशी घरातून बाहेर पडताना दुधासाठी ती रडत होती. पण दूध घरात कुठे होतं, रडली रडली आणि झोपून गेली. अण्णा घरात आल्यावर आई खूप रडली. बराचवेळ त्याला काही कळेना. मग आई आणि अण्णा दोघे रडायला लागले, आणि आईनं छोटीला काखेत घेतलं. आणि अण्णांनी त्याला बखोटीला धरुनच खांद्यावर घेतलं.
अण्णा कुटं ! त्यानं विचारलं. गावाला त्याच्या बापानं त्याचं कुतूहल शमविण्याचा प्रयत्न केला. पण गावाला जाताना आई नेहमी तोंड धुते... त्याला त्याचा नवीन ड्रेस घालू देते पण आज यातील काहीच झाले नाही याचे त्याला आश्‍चर्य वाटले, पण तरीही गावाला जायचे या कल्पनेने तो आनंदून गेला.
अण्णा कवा यायचं गाव... त्यानं काकुळतीला येऊन प्रश्‍न केला. खरे तर त्याला भूक लागली होती, पण आईकडं काही मागायचं तर आई दिसत नव्हती. त्याचा बाप नेहमीसारखा शांत राहिला. आता अंधार मिट्‌ट झाला होता. मिणमिणत्या चांदण्यात काहीच दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज गहिरा झाला होता. एवढ्यात त्याला काही तरी विहिरीत पडल्याचा आवाज आला.... जोरात.... त्याला काही कळलं नाही. त्याची भूक त्याला जास्त जाणवायला लागली. त्यानं मोठ्याने आईला हाक मारली... आई भूक.... ते शब्द त्या विहिरीत घुमू लागले. त्याच्या अण्णांनी त्याच्यासकट विहिरीत उडी टाकली होती. "आई भूक' एवढेच शब्द जीवंत होते... बाकी चारही जणांचे श्‍वास शांबले होते.