रविवार, २० फेब्रुवारी, २०११

युतीचा नवा खेळ


भारतीय जनता पक्ष असो वा शिवसेना या दोन्ही पक्षांना आता युती स्वबळावर सत्तेत येईल याबाबत आत्मविश्‍वास उरलेला नाही. जोपर्यंत दलित समाज युतीबरोबर येत नाही, तोपर्यंत युतीला बहुमत मिळणार नाही, हे त्यांना पक्‍के ठाऊक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. शिवसेनेला आगामी मुंबई महापालिकेसाठी रामदास आठवले पाहिजे आहेत, तर भाजप लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अपेक्षित धरून चालला आहे. त्यामुळे भाजपला आता कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून स्वतःचे आणि मित्रपक्षांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठीच मुंडेंची बांधणी सुरू आहे.लो कसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी आहे. गेल्या निवडणुकांत काय चुका झाल्या, याचे आत्मपरीक्षण सर्वच पक्षांनी केले आहे. तरीही आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यासारखी विधाने विरोधी पक्षांच्या नेत्याकंडून होत आहेत. यात विरोधी पक्षाची ताकद वाढविण्याचा जसा प्रयत्न आहे, तसाच सत्ताधाऱ्यांच्या मनातही चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत मनसेशी युती करणे कसे गरजेचे आहे, हे आकडेवारीनिशी सांगितले. त्याचदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या गणिताबाबत चर्चा रंगू लागली आहे. खरे तर भीमशक्ती- शिवशक्ती एकत्र येण्याची गोष्ट काही नवी नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आहेत आणि त्या वेळीही केवळ चर्चाच रंगली होती. त्यानंतरही रामदास आठवले ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होते, त्यांच्यासोबतच राहिले आणि शिवशक्ती आणि भीमशक्‍ती एकत्र येण्याची चर्चा हे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होणारच नाही असे नाही; पण मागच्या वेळीपेक्षा या वेळी ही युती होण्याच्या दिशेने रंकाळ्याचा नंदी एक तांदूळ पुढे सरकला आहे, हे निश्‍चित.
शिवसेनेला आता गरज आहे मुंबई महापालिका जिंकण्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला विरोधात मनसे असल्याने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विरोधातील ताकद जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबई ही शिवसेनेची पेढी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई जिंकायची आहे.
मुंबईतील दलित मते मिळविण्यासाठी रामदास आठवलेंची शिवसेनेला गरज आहे. (त्यासाठी ते काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याच्या तयारीतही आहेत.) रामदास आठवले जर शिवसेनेला मिळाले तर निवडणुकीची ही प्रश्‍नपत्रिका सोपी जाणार नसली तरी त्यातील दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरे अगोदरच माहीत असल्याने प्रश्‍नपत्रिकेला सामोरे जातानाचा आत्मविश्‍वास वाढेल, यात शंका नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवलेंची गरजच आहे. याच वेळी रामदास आठवलेंनाही लोकसभेचा पराभव जिव्हारी लागला आहे. आघाडीशी युती करूनही आपल्याला काहीच मिळाले नसल्याची भावना त्यांची तीव्र झाली आहे. हीच भावना कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांतही आहे. ग्रामीण पातळीवर काम करत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी-कॉंग्रेसने गृहीतच धरले आहे. त्यामुळे त्यांनाही आघाडीशी संबंध नकोसे झाले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मेळ रिपब्लिकन विचारांशी बसत नसला तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत हा मेळ बसू लागला आहे. त्यामुळे समान कार्यक्रम ठरवून एकत्र यायला हरकत नाही, अशीच भावना दलित कार्यकर्त्यांची आहे. आगामी विधानसभा निवडणुका व्हायच्या तेव्हा होवोत; पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुंकाअगोदर ही युती झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांत युतीच्या बळावर आपली ताकद वाढेल, असा विश्‍वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे. तरीही रामदास आठवलेंना आपल्यासोबत घेण्यासाठी युतीच्या नेत्यांना दोन पावले मागे यावे लागेल, हे निश्‍चित!
मनसेबाबत गोपीनाथ मुंडेंनी युतीचे केलेले वक्तव्य आणि राज ठाकरे यांनी त्याबाबत केलेला इन्कार दोघांच्याही राजकारणाचा भाग आहे. मुंडे आता दिल्लीत असल्याने दिल्लीतल्या वाऱ्याप्रमाणे ते बोलतात आणि राज ठाकरेंना दिल्लीतल्या वाऱ्यापेक्षा मुंबईचे खारे वारे जास्त प्रिय आहे. केंद्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडल्याने हे सरकार कधी कोसळते, अशी वाट भाजप बघत आहे. त्यामुळेच कोहाळा पडला तर काय काय करायचे, याची रणनीती ते आतापासून बनवायला लागले आहेत. आज मनसे युतीसोबत नसली तरी उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने युतीत सहभागी व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. (त्यामुळेच रविशंकर यांनी मनसेबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील न म्हणता एनडीए घेईल, असंच म्हटलं आहे.) पण यात एक फरक आहे. शिवशक्‍ती-भीमशक्‍ती एकत्र यावी, ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जशी इच्छा आहे, तशीच ती त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. त्या प्रमाणात भाजप-मनसे एकत्र येण्यास मनसेचे ना नेते इच्छुक आहेत ना कार्यकर्ते.