रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

खाली डोकं वर पाय...

बाबांनी आपल्या काळ्या लांब वाढलेल्या दाढीवरून पुन्हा हात फिरविला आणि आपला डावा डोळा आणखी लहान करत मानेनं आणखी एक मुरका मारला... प्रेक्षकांतल्या काही बायका लाजल्या... "तो अब मै आप को शीर्षासन कर के दिखाता हुँ!' असं म्हणत बाबांनी आपलं खाली डोकं वर पाय केले... लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या... बाबांना नेमके काही कळेना... अरे मी इथे योग शिकवतोय आणि लोक त्याला सर्कस समजून टाळ्या काय वाजवताहेत... बाबा गरजले... "टाळ्या वाजवू नका, तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा...' काही पोरा-सोरांनी प्रयत्न केला; पण तो पार फसला... बाबा पुन्हा पुन्हा स्टेजवर उड्या मारत होते... पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... काही जण बाबांप्रमाणे करायचा प्रयत्न करत होते; तर बरेच जण बाबांचा स्टेज परफॉर्मन्स बघून हसत होते, टाळ्या वाजवत होते... बाबांनी मोठ्याने स्टेजवर उडी मारली आणि एका झटक्‍यात खाली डोके वर पाय केले आणि तशाच अवस्थेत घोषणा केली... या सरकारला असंच खाली डोकं वर पाय करायला लावीन... प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि बाबांना प्रोत्साहन दिलं...

बाबा मनोमनी खूश झाले... आपल्या वर्गाला येणाऱ्या प्रेक्षकांनी साथ दिली की मग झालं... बाबा गावोगाव सांगत सुटले... लोक त्यांचं ऐकायचे... त्यांच्या शीर्षासनाला टाळ्या ठोकायचे आणि घरी परतायचे... बाबांना वाटायचं, लोक आपल्या मागे आहेत, त्यांच्या जीवावर आपण सरकारला खाली डोकं वर पाय करायला लावू...
मग बाबा जोरात उड्या मारायचे... हातवारे करत सुटायचे... तिरकी मान करत डावा डोळा आणखी बारीक करत राहायचे.... शीर्षासन कसं आरोग्याला चांगलं आहे सांगायचे... देशासाठी, लोकांसाठी शीर्षासन सरकारला करावंच लागणार हे ते पुन्हा पुन्हा सांगत होते... लोक माना डोलवत होते... बाबा खूश होत होते... दिवस ठरला... स्टेज ठरलं... सरकारला धडा शिकवायला बाबांनी मुहूर्त बघितला... बाबांचा आवेग बघितल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, आता सरकारचे खाली डोके वर पाय होणार... सरकार घाबरणार... बाबा मनोमनी खूश होते... बाबा स्टेजवरून सांगत होते... आदेश देत होते... लोक पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... बाबांना आता विश्‍वास आला, आता आपण सरकारला शीर्षासन करायला लावू... बाबा दाढीवरून हात फिरवत होते, डोळा बारीक करून प्रेक्षकांकडे बघत होते... आता सरकारचे शीर्षासन नक्‍की... रात्र चढत चालली तशी बाबांच्या स्टेजवरच्या उड्या वाढल्या... लोक पेंगाळून झोपले... पण बाबा मात्र कधी पोट आत घेत, कधी बाहेर सोडत... असंच बाबांनी पोट आत घेतलं आणि ते बाहेर काढणार इतक्‍यात सरकारच्या सैनिकांनी त्यांनाच स्टेजवरून बाहेर काढलं... बाबा तोंड लपवत-छपवत बाहेर आले... लोक चिडले... सरकारने बाबांचा घात केला... सैनिकांची कारवाई रात्री झाली... सरकारला काही सुचेना... बाबांचा महिमा कसा कमी करायचा... सरकारचा एक मानकरी पुढे झाला... बाबांच्या दाढीला हात घालायची त्यानं घोषणा केली... लोक बोलू लागले, आता बाबा आणि यांच्यात चकमक उडणार... बाबा सांगत राहिले, नखावर नख घासत राहा... केस काळे ठेवत राहा... मानकऱ्याच्या लक्षात आलं... लोकांना नखावर नख घासायला सांगणाऱ्या बाबांच्या दाढीचे दोन केस पांढरे आहेत... मानकऱ्याने लगेच ढोल वाजवायला सुरवात केली... बाबांच्या दाढीत पांढरे केस... बाबांचं हे काम एकट्याचे नसून "सांघी'क आहे... लोकांनाही बाबांच्या दाढीतले हे पांढरे केस दिसू लागले... लोक कु
जबुजू लागले... मानकऱ्याचे काम झाले... सरकारला संधी मिळाली... सरकारचं खाली डोकं वर पाय करण्याच्या गप्पा मारणाऱ्या बाबांचंच सरकारने खाली डोकं वर पाय केलं होतं... आणि त्यांच्या संघातलेच इतर जण "सर्कस' कशी झाली म्हणून टाळ्या वाजवत राहिले...!!

6 नोव्हेंबरच्या सकाळ मधील माझा लेख