गुरुवार, २७ ऑगस्ट, २००९

मोठी माणसं...

"तुम्ही जेवढे लहान होता, तेवढेच तुम्ही मोठे होता' अशा अर्थाचा इंग्रजीत एक वाक्‌प्रचार आहे. त्याचा प्रत्यय या महिन्यात दोनदा आला. मॅगसेसे पुरस्कारविजेते आणि "नाही रे' वर्गाचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडणारे पी. साईनाथ व संपूर्ण जगाला दहशतवादी "कसाब' कोण हे दाखविणारे ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीराम वेर्णेकर यांच्याशी संवाद साधण्याचा योग जुळून आला. दोघेही पत्रकार. आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि तितकीच मोठी माणसंही. पी. साईनाथ यांच्याशी संवाद साधताना त्यांच्यातील प्रांजळ माणूस प्रखरतेने भेटला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नांवर जरी मी लक्ष वेधले असले तरी "इनाडू'ने (आंध्र प्रदेशमधील एक दैनिक) हा प्रश्‍न सर्वात आधी खूप जोरकसपणे मांडला, हे सांगायला ते विसरले नाहीत किंबहुना त्याचे सारे श्रेय आपले एकट्याचे नसल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले. खरे तर पी. साईनाथ यांच्या पत्रकारितेमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारने गांभीर्याने पाहिले हे सर्वज्ञात आहे; मात्र तरीही त्याचे सर्व श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी ते इनाडूच्या संबंधित पत्रकाराला दिले. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. जगन फडणीस पुरस्कार स्वीकारण्यास आलेल्या श्री. वेर्णेकरांशीही संवाद साधताना दुसरी तशीच मोठी व्यक्ती भेटल्याचे समाधान लाभले. त्यांना एका पत्रकाराने विचारले, की खरंच तुम्हाला स्वतसुरक्षितता, वर्तमानपत्राने दिलेले काम, की सामाजिक दायित्व मोठे वाटते? त्यांनी क्षणाचा विलंब न करता सुरक्षिततेला प्रथम क्रमांक देत सामाजिक दायित्वाला अखेरचा क्रमांक दिला. खरे तर जिवावर उदार होऊनच त्यांनी कसाबचे छायाचित्र काढले. हॅंडग्रेनेड फेकत, गोळीबार करत असलेल्या दहशतवाद्यावर फ्लॅश मारणे म्हणजे मृत्यूचे छायाचित्र घेण्यासारखेच; पण तरीही त्या घटनेला उगाच मोठा साज न चढवता त्यांनी
वास्तविकता मांडली. खरे तर त्यांना कामाप्रति असलेली निष्ठा, त्याबद्दल जिवावर उदार होणे अशा पद्धतीची गुळगुळीत वाझोडता आली असती आणि त्यांच्या तोंडी ती वाईटही दिसली नसती; पण तरीही अत्यंत नम्रपणे त्यांनी परिस्थितीजन्य निर्णय कसे घ्यावे लागतात हेच सांगितले.
या दोन्ही माणसांनी उत्तुंग यश मिळविले. हे यश मिळविताना त्यांनी अपार कष्ट घेतले; पण तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही. समोरच्यांना तेवढेच योग्य लेखत त्यांचा यथोचित सन्मानच केला, माणूसपण विसरले नाहीत म्हणूनच ते मोठे झाले.

20 जुलै 2009