बुधवार, ४ जुलै, २०१२

प्रिय,

प्रिय,
पहाटेचे तीन वाजलेत. गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही झोप आलेली नाही. येण्याची शक्‍यताही नाही. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश आत येतोय. नुकत्याच चालायला लागलेल्या बाळाच्या पायातील पैंजणाप्रमाणे पावसाच्या थेंबांचा नाद होत आहे. मघाशी ऑफीसमधून येताना त्याचा नाद कानात साठवतच आलो. पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस थांबायची खूप वेळ वाट बघितली आणि मग रेनकोट अंगावर चढविला. गाडीला किक मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आषाढी पौर्णिमेचा चंद्र ढगांच्या दाटीतून चांदण बरसत होता. शब्दशः चांदणं बरसत होतं. चंद्राचा मंद प्रकाश आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्यासाठी रेनकोट काढला आणि पाऊस आणि चांदण दोन्ही अंगावर झेललं. रिकाम्या, एकट्या रस्त्याला सोबत करत रस्त्याच्या मध्येच गाडी लावून चिंब भिजत राहिलो. पावसाच्या धारांसोबत तुला आठवत राहिलो. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द, तू घेतलेला एक अन्‌ एक हुंकार, तुझं हसणं. सगळं आठवत राहीलं. पावसाचा सांगाती बनून जणू आठवणींच्या धारा बरसत राहिल्या आणि त्यात मी चिंब होत राहिलो. पावसासारखा आठवणींचा दुसरा कोणी सांगाती नाही. आवणींबरोबर येणाऱ्या आसवांना तो हलकेच आपलेसे करतो. तू कोण? कोणासाठी? असले प्रश्‍न विचारत बसत नाही आणि त्याचे डागही मागे ठेवत नाही. त्यामुळे त्याच्यासोबतीने खूप रडून घेतले. मोकळे होण्याचे मी नवनवे मार्ग शोधतो आणि प्रत्येक वाटेत तूच भेटत राहतेस. तू एकदा म्हणाली होतीस, माझं सगळं विश्‍व तू व्यापून टाकले आहेस. तू तर माझं विश्‍वच आहे. त्यातून कसं बाहेर पडणार. पण पडायचे आहे कोणाला ?
तुला लहानपणीची एक गोष्ट सांगतो. तेव्हा दुसरीत होतो मी. नागपंचमीची सुटी होती. गावाकडे त्यावेळी आमच्या वर्गातील बरीच मुलं गुरांना चारायला घेऊन जात. मग मीही त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो. दिवसभर त्या माळरानात आम्ही चिखलाचे नाग करत राहिलो. संध्याकाळ झाली तरी आम्ही तिथून हालायला तयार नाही म्हटल्यावर आमच्यासोबत असलेल्या एका मोठ्या माणासाने उगाचच आम्हाला दटावले. नागपंचमीला नाग करायचे नसतात. त्यात तुम्ही मातीचा नाग करुन तो मोडलात. आता नाग रात्री येऊन तुम्हाला चावणार. आप्पांना विचारलं, त्यांना वाटलं मला देवघरात ठेवलेला नाग हवाय, त्यामुळे त्यांनीही सांगितलं, नाग मोडला की नाग रात्री येतोच. मला काही सुचेना. भीती प्रचंड वाटत होती. त्या रात्री नाग बऱ्याचदा स्वप्नात आला. दरदरून घाम फुटला आणि कडाडून ताप आला. दुसरा आख्खा दिवस आप्पा समजावत राहिले, नाग-बिग काही येत नाही. पण भीती काही पुरती गेली नाही. पुढे-पुढे तो नाग माझ्या गळ्याभोवती वेटोळा घालून बसलाय असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून तो कुठे बिळात लपून बसला होता, देव जाणे. तू गेलीस आणि पुन्हा तो नाग वळवळायला लागला. जणू कात टाकून ताज्या दमाने तो येतो आहे असं वाटू लागलं, आणि तेवढ्यात तुझ्या आठवणींचे हजारो गरुड आकाशात घिरट्या घालू लागले. आता काही तो परत येईल असे वाटत नाही.


तुझाच