गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

स्पर्श

स्पर्श
प्रवीण कुलकर्णी
या इथेच तुझे घर आहे ना.. हो इथेच.. या नव्या बिल्डिंग झाल्यात खऱ्या पण पुढच्या  वळणावर एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्याखाली चहाची टपरी आणि तिथेच कोपऱ्यात तुमचं घर.... हो ना...आणि हो आई आता काय करते, कॉलेजला असताना केवळ तुझ्या आईचाच तेवढा क्लास मी अटेंड करायचो तुला माहीत आहे ना...
तो खूप बोलत होता... बावीस वर्षांनी भेटला होता... मध्ये काहीच आतापत्ता नाही.. ना त्याने तिला भेटायचा प्रयत्न केला ना तिने....आज अचानक हा या कार्यक्रमात भेटला......छे किती बदललाय...डोळे खोल गेलेत... साधारणतः या वयात वजन वाढलेले असते हा अधिकच बारीक झालाय...केसांनी साथ सोडलीय आणि गालपटे आत गेली आहेत.... हा कार्यक्रमाला आहे माहीत असते तर आलेच नसते... कदाचीत आलेही असते... काय ठावूक... ती आपल्याच विचारात होती...
मी काय म्हटलं... काय... मॅडम कशा आहेत... त्यानं पुन्हा विचारलं तशी ती भानावर आली..
हं... आई ना.... आई जाऊनच झाली १२ वर्षे
काय.. त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.
पण एवढ्या लवकर कश्या?
माहीत नाही... पण ताण होता... चालता चालता ती थांबली.. तिनं त्याच्याकडे परत एकदा बघितले...डोळ्यावरचा चष्मा हलक्या हाताने सावरला... काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द उमटला नाही...
हं... म्हणून तोही गप्प राहिला..
तो घुटमळला... काय बोलायचे त्याला काहीच सूचेना... थांबायचे तर का? आणि जायचे तरी कसे...
थोडावेळ चालत राहिला... तिच्या पावलाच्या पावलांशी गती मिळवित राहिला.
घरी येशील... तिच्या या प्रश्नावर मात्र त्याला काय उत्तर द्यावे कळले नाही...तो नुसताच हं.. म्हणाला...
कॉलेजला असताना तो यायचा तिच्या घरी... तिचे ते घर...आईचं आणि लेकीचं विश्व होतं... संपूर्ण घर मॅडमनी आपल्या हातांनी सजवलेलं.. कोपरा आणि कोपऱ्याला त्यांच्या त्या स्निग्ध स्पर्शाची जाणीव असल्यासारखे.....
बावीस वर्षांनी पुन्हा तो त्या दारात आला होता... त्या घराची चौकट त्याला पुन्हा खुणावत होती.... अजुनी तसाच रंग होता... थोडा काळपटलेला होता... पण तो जपला होता...दारावरची पाटी तशीच होती... बाहेरची झाडेही बरीच तशीच दिसत होती... तो पूर्वीचे ते घर आणि आत्ताचे घर यांत फरक करण्याचा, साम्य शोधण्याचा प्रयत्न करत होता... पण दोन्ही फसत होतं.... आठवणींवर काळाची जळमटं होती त्यामुळे साम्यही धुरकट आणि फरकही अस्पष्टच होते... त्याला आठवलं.. पहिल्यांदा तो तिच्या घरी आला त्यावेळी मॅडमनी दार उघडलेले... त्यांच्या कपाळावरच्या आठ्या.... मग तो येत राहिला.. तिला भेटायला अनेक निमित्ताने... कधी नोट्स, कधी पथनाट्याचे वाचन, कधी सहज म्हणून...
तिने दार उघडले... समोरच्या भिंतीवरचे कृष्णाचे ते पेंटींग तसेच होते... आठवणींनी जळमटांतून मार्ग काढला होता... ते मॅडमचे पेनाचे स्टँडही तसेच होते... अगदी खिडक्यांचे पडदेही तसेच होते...
घर अगदी तसेच आहे नाही... त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला...
नाही... ती स्पष्ट बोलली...
बावीस वर्षांपूर्वी हे घर होतं.... आता फक्त निर्जिवतेतील रेखिवपणा आहे तसा ठेवण्याचा प्रयत्न आहे...
तो गप्प बसला...
चहा घेणार...
नाही... मी चहा नाही घेत...
का रे... तुला तर चहा खूप आवडायचा... आई एकदा चहावरून तुला रागावल्याचे आठवते काय?
हो... मग
चहा सोडला मी....
हं....एकदा तुला भेटायचे होते... आई गेल्यापासून तर ही रोजचीच इच्छा होती... पण कसं ते कळत नव्हतं... म्हणजे भेटणं अवघड होतं असं नाही.. पण भेटल्यावर काय बोलायचे हे कळत नव्हते. त्यामुळे गेली दहा वर्षे भेटणं टाळलं... कदाचीत  नशिबानेच आज भेटलो आहे... ती बोलता बोलता गप्प झाली...
बराच वेळ शांततेत गेला... तो खिडकीपाशी गेला... त्याने पडदा बाजुला केला... ते चाफ्याचं झाड अजूनही त्या कंपाऊंडच्या कोपऱ्यात तसेच होते...
ती त्याच्या मागे आली...
चाफ्याचं झाड ही पद्मा गोळेंची कविता इथेच या खिडकीत उभा राहून मॅडमकडून ऐकली होती... प्रत्येक प्रसंगाची, प्रत्येक स्थितीची अशी एक कविता असते... असं त्या म्हणायच्या आणि त्यांना त्या प्रत्येकवेळी आठवायच्याही...कवितांचे आणि त्यांचे एक अलौकीक नाते होते...
हो... आयुष्य तर ती तसेच जगली होती...
हे घे.. तिची ही डायरी... काही कविता आहेत यात तिच्या... काही आठवणी आणि बरेचसे न सांगता येणारे क्षण...
बावीस वर्षांपूर्वीच्या त्या संध्याकाळी जशी ती होती अगदी तशीच ती राहिली पुढची बारा वर्षे... ती बोलत होती...
तो केवळ खिडकीतून बाहेर बघत नव्हता तर काळाची पाने मागे ढकलून काही क्षण सापडताहेत का बघत होता...
आईने मला दत्तक घेतले होते... हे तर सर्वांनाच माहीत आहे.. तिच्या आयुष्याला स्पर्श करून गेलेला तू एकमेव होतास... तिचं आयुष्य भरून वाहणारा होतास... तू गेलास आणि आई तो स्पर्श तुझ्या आठवणींसकट जपू लागली... या पडद्यांनाही कोणी दुसऱ्याने स्पर्श केलेला तिला खपायचे नाही... मघापासून त्याने डोळ्यांच्या कडांमध्ये रोखून धरलेल्या धरणाने बांध फोडलाच..
ती जवळ आली... तीने त्याचा हात हातात घेतला आणि हलकेच दाबला....
तो रडत राहिला.... ती कुठेतरी आहे याच आशेने त्याची पोकळी भरलेली होती आज त्या पोकळीतून आशाही  संपली होती...