सोमवार, १ मार्च, २०१०

जुगार तुम्ही जिंकलात

प्रिय डॉ. सलील यांना,
स. न. वि. वि.
परवा शनिवारी कोल्हापुरात तुमचा गाणी मनातील हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम सुंदर होता, आवडला या प्रतिक्रीया तर खूप लोकांकडून तुम्हाला आल्याच असतील, त्या पुन्हा इथे देण्यात आणि तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. खरे तर सोन्याला सोने किंवा हिऱ्याला हिरा म्हणणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम आणि तो चांगला झाला या गोष्टी एका सुत्राच्या बरोबर चिन्हाच्या आल्याड पल्याडच्या दोन बाजू आहेत. पण पत्र हे सांगण्यासाठी लिहिलंच नाही.
पत्र लिहिण्यामागे खरं कारण खूप दिवसांनी एखाद्या संगीतकाराने आपली पहिली निर्मिती रंगमंचावर सादर केली. अलिकडे माध्यमांच्या प्रसारामुळे गाणी गाजतात, लोकांच्या ओठावरही येतात पण ती कानावर अनेकवेळा आदळल्याने, गाण्यात फार दम आहे म्हणून नाही. त्यामुळे एकदा का हा पूर ओसरला की मग मागे उरतो तो केवळ कचराच. अशात तुमची गाणी खूप गाजली आणि ओठावर नुसती आलीच नाहीत तर ती रेंगाळलीही आणि मनात घर करुन राहिली. त्याच त्या कार्यक्रमांना खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळत असतानाही तुम्ही "गाणी मनातली' हा कार्यक्रम घेवून आलात. खरे तर डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे ब्रॅंडींग इतके मोठे आहे की पुण्यात तुमचा सोलो कार्यक्रम झाला असता तरी लोकांनी तोबा गर्दी केली असती. पण तरीही कोल्हापुरात कार्यक्रम घेण्याचा जुगार तुम्ही खेळलात. पहिल्यांदाज डाव मांडावा आणि तिन्ही एक्‍के हाती लागावे तसा तो जुगार तुम्ही जिंकलातही. रंगमंचाखालून तुमच्या उत्स्फूर्ततेला आणि आत्मविश्‍वासाला सलामही ठोकला गेला. खरे तर तुमच्या समकालीन संगीतकारांत तुम्ही ठसा उमटविला आहे. आमच्या जन्माअगोदरची गाणी गातच आम्ही मोठे झालो... मधल्या काळात खूपच सुमार दर्जाचे संगीत महाराष्ट्राला ऐकायला मिळाले. सौमित्रची गीते आणि मिलींद इंगळे यांचा आवाज घेवून आलेल्या गारव्याने कोरड्या घशात ओलावा निर्माण केला खरा पण तोही कट पेस्ट असाच होता, कारण त्यापुर्वी हिंदीत त्याच संगीताने यश मिळविले होते मग त्याच बोलांवर मराठी शब्द पेरले गेले. सौमित्र यांच्या शब्दांनी मात्र तरीही जादू केलीच. पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने मराठी भावगीतांना पुन्हा सोनेरी दिवस आणले. हे सगळं लिहिण्यामाने केवळ तुमची स्तुती करावी हा हेतू नाही, स्तूती करायची असेल तर आता पायलीला पन्नास भाट मिळतात, आणि अशी तुणतुणी मला वाजवता येतच नाही. पण कोल्हापुरात तुम्ही केलेल्या नव्या प्रयोगाबद्दल तुमचे अभिनंदन आणि मला खात्री आहे की तुम्ही यापुढेही आमचा विश्‍वास ढळू देणार नाही.