रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

उंटाचं पोर...

नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता. नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌ दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं. अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या राजाच्या सांडणीस्वारांच्या
तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...
ती उंटीण चरत होती त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते.
मग रोज तो त्या पुलावर थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला चाटायची... त्याची माया करत राहायची..
आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा. त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा, त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.
पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते... पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे... तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे. आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे... पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते... प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या.
बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी त्याची बायको पालात शिरली...
त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.
"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....
साब ए लोक पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल में सड जाओगे...
त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं पोर फार स्वस्त झालं होतं...!!

*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***

६ टिप्पण्या:

सौ गीतांजली शेलार म्हणाले...

khup chan ! dolyat pani aanlat!

Anjali म्हणाले...

manala sparshun geli...kharch khup chan.....

SUSHMEY म्हणाले...

thanks... sau.shelarji and annjaliji

SUSHMEY म्हणाले...

thanks... sau.shelarji and annjaliji

भानस म्हणाले...

भयंकर ! खरेच, आजकाल सगळ्यात स्वस्त झालाय तो ’जीव ’!

जियो मित्रा जियो ! !

Meenal Gadre. म्हणाले...

प्रसंग डोळ्यांसमोर उभे करणारे लेखन. छान !