रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

लाडू....
""लाडू येतात ना रे तुला?''

बाईंनी कपाळावर आठ्या आणतच विचारलं.

आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हाताने सावरत महादेवने फक्‍त आपल्या ओठांना विलग केलं. त्याचे निम्म्याहून दात पडलेलं बोळकं खूपच विचित्र वाटलं.

सहा फूट उंची, डोक्‍याला टक्‍कल, अंगात कळकट-मळकट शर्ट आणि तसलीच तेलकट पॅंट, पायांना चपलांचा कधी स्पर्श झाला होता की नाही याबाबत शंकाच यावी, असे राकटलेले पाय. वर्षानुवर्ष चुलीच्या धगीसमोर बसून रापलेल्या चेहऱ्याच्या महादेवच्या ओठावरचे हसू मात्र कधी रापले नव्हते. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर "त्याला काय लागतंय' या तीन शब्दांनी सुरू करून महादेव बोलायला लागला की त्याचे बोलणे थांबवणे जाम कठीण होऊन जायचे. बुंदीचा शेवटचा घास संपल्यावर त्याचे हात जसे लाडू वळवायचे थांबायचे तसा अचानक कधी तरी तोच थांबायचा. मग पुढचा माणूस बोलायचा.
""काय विचारलं मी? तुला लाडू येतात ना ?'' बाईंनी आवाजात जितका शांतपणा आणता येईल तितका आणला.

""त्याला काय लागतंय?'' महादेवाने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला... ""आहो, आयुष्यभर तेच तर काम केलं आहे. बाईसाहेब, मी वळलेल्या लाडवांना बघूनच लोकांचे समाधान होते. तोंडात लाडू गेला की लाडवाबरोबर माणूस पण विरघळतो बघा. अहो! तिसरी पिढी आमची लाडू वळणारी. मी जन्माला आलो त्यावेळी आमच्या अण्णांनी म्हणजे आमच्या वडिलांनी चार पायलीचं लाडवाचं कंत्राट घेतलं होतं. आई लाडू वळत होती आणि त्याचवेळी तिच्या पोटात दुखायला लागलं. त्यातनं पण तिनं तीन पायलीचे लाडू वळलेच. मग मी जन्माला आलो. अण्णांनी आधी उरलेले लाडू वळले आणि मगच माझं तोंड बघितलं. माझा आणि लाडवाचा तिथून जो संबंध आहे, तो अजून तसाच आहे. तुमचे किती पायलीचे लाडू वळायचे आहेत?''

बाईंनी त्या रापलेल्या चेहऱ्याकडे परत बघितले. त्याच्या कळकट-मळकट कपड्यांवरून पुन्हा नजर फिरविली.

""अंघोळ करतोस ना रोज?'' बाईंनी त्रासिकपणे प्रश्‍न केला.

हा प्रश्‍न आता त्याला नेहमीचा आणि परिचयाचा होता.

""त्याला काय लागतंय, परवाच चार साबण आणलेत...''

"बरं बरं...' आता हा आपले अंघोळ पुराण सांगणार हे बघून बाईंनी त्याला थांबवलं.

""किती पायलीचे लाडू करायचे आहेत?'' महादेवाने आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हातांनी आणखी घट्ट पकडत पुन्हा विचारले.

""हे पायलीचे गणित काही कळत नाही. तूच सांग, पन्नास माणसांना पुरवठा यायला हवेत.''

""त्याला काय लागतंय, पण माणसं कुठली आहेत त्यावर अवलंबून. तुमच्यासारखी सुशिक्षित आहेत, की आमच्यासारखी गावाकडची. म्हणजे तुमच्यासारखी माणसं असली की कमी लागतात, पण आमच्यासारखी असली की दे दणका...! तुम्हाला सांगतो, परवाच मी एका लग्नाचे लाडू केले होते. परवा. पण त्यालाही झाली चार-पाच वर्षे. माणसं होती शंभरच. पण दोन पायलीचे लाडू पुरले नाहीत...''

""पाच किलोचे लाडू करायचे आहेत आणि तेही न बोलता. जमेल का?'' बाईंच्या पाठीमागून साहेबांनीच विचारले.

""त्याला काय लागतंय...'' महादेवने बोलायचा पुन्हा प्रयत्न केला.

""त्याला तोंड बंद करायला लागतंय.'' साहेबांनी त्याला थांबवलं.

बाई खूप हसल्या आणि आत निघून गेल्या. महादेव आपल्या टकलावरून हात फिरवत तिथेच पायरीवर उभा राहीला.

""ये आत. चहा घेणार?''

साहेबांनी त्याला आत बोलवत विचारलं.

""न नको... म्हणजे सकाळी-सकाळी दोनदा झाला ना चहा. त्यामुळे आता चहा घेतला की पित्त होतं. मग चार दिवस काम होत नाही. अंगावर हे मोठे मोठे फोड उठतात'' महादेवने कमीत कमी शब्दांत उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

""हं... बरं..!''

""कधी करणार लाडू, किती साहित्य लागेल?'' बाईंनी आतूनच विचारलं.

""आज आत्ता.'' महादेवने क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं.

""अरे, आज कसं शक्‍य आहे...? फक्‍त विचारायचं होतं की किती साहित्य लागेल, यासाठी तुला बोलावलंय.''

""नाही बाईसाहेब, आज आणा की साहित्य. पाच किलोला किती लागणार आहे साहित्य. दोन तासाचं तर काम.''

""अरे पण...''

""हवं तर मजुरी कमी करा; पण आज कराच बाईसाहेब लाडू.'' महादेवने आपलं म्हणणं जितकं रेटता येईल तितकं रेटलं.

""अरे, पण आज का जबरदस्ती आहे का?... बाईंच्या बोलण्यात नाखुशी साफ दिसत होती.

""न नाही पण...'' महादेवाची जीभ जरा आडखळलीच.

""काय... आज साहित्याची यादी दे आणि ये उद्या-परवा मी तुझ्या त्या मित्राजवळ निरोप ठेवते.''

महादेवनं यादी दिली आणि खाली ठेवलेला झारा पुन्हा खांद्यावर घेतला. जाता जाता त्याचा पाय घुटमळलाच.

""बाईसाहेब बोलवा हां नक्‍की! लोकं बोलावतात, साहित्याची यादी ठेवून घेतात आणि पुन्हा लाडू करायला परत कोण बोलवत नाही. आजकाल लाडू कोण खातंय म्हणतात, आणि बेत बदलतो. या हातांना झारा धरण्याशिवाय आणि लाडू वळण्याशिवाय दुसरं काही येत नाही हो. हातात झारा नसला की हात थरथरतात. दोन महिन्यात एकपण काम नाही मिळालं. बाईसाहेब, रोज पोरगी विचारते, "बाबा, आज येताना लाडू आणणार?' पोरीला बाजारातून लाडू घ्यायला पैसे नाहीत. या हातांनी नेहमी पायली - चार पायलीचे लाडू केले. आता किलो-दोन किलोचे लाडू केले की ती चव येत नाही. त्यामुळे बेकरीवाले कामावर ठेवत नाहीत.'' त्याचे खोबणीतील डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटले.

त्याने झारा उचलला अणि तो जायला लागला.

""थांब.''

बाई आत गेल्या. त्यांनी कागदात गुंडाळून दोन लाडू आणले होते.

""हे लाडू दे तुझ्या पोरीला.''

""नको बाईसाहेब, बुंदीच्या लाडवाची चव रव्याच्या लाडवाला येणार नाही आणि पोरीला असे तुपात-बिपात केलेल्या लाडवाची चव कळली तर अवघड होईल. नकोच.''

""आज हे लाडू दे... उद्या ये आमच्याकडे... आम्ही लाडवाचा बेत देऊ की नाही माहीत नाही. पण तू उद्या आमच्याकडे लाडू नक्‍की करायला ये.''

महादेवच्या हातातला लाडू चटकन खाली पडला. त्याला बाईंचे पाय दिसले. क्षणभर त्याला बाईंचे पाय धरावे वाटले; पण फुटलेल्या लाडवाला गोळा करताना त्याला ते जमलं नाही.


सकाळ'च्या 7 November च्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

1 टिप्पणी:

Anandraw म्हणाले...

khup diwsat kahi lihile nahit praveen sir.hi post aawadali.
- Anandraw