शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

चहा


अजूनही साखर डबल लागते का रे?... तिने स्वयंपाकघरातूनच जोरात विचारले...
""न.. नाही... साखर नको...''
""का? काय रे, काय झालं... डॉक्‍टरांनी बंदी घातली आहे का साखर खायला? तू ज्या पद्धतीने साखर खायचास ना, त्यावरून तर हे कधी ना कधी होणार होतंच म्हणा!''
""हं..!'' त्याने नुसता हुंकार सोडला.
""किती चहा प्यायचास... त्यात ती डबल साखर... दोन तासांच्या गप्पांमध्ये पाच कप चहा व्हायचा तुझा... मी एकदा संजयला म्हटलंही होतं, अरे, माझा एक मित्र होता.. तो फक्‍त चहाने आंघोळ करायचा बाकी होता...!
तुला आठवतं, एकदा तू म्हटला होतास... काश... ये बारिश च्याय की होती... तो कितना मजा आता! अरे ते वाक्‍य आठवून मी कितीदा हसलीय...''
""हं!'' त्याने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला.
""अरे तू बोलत का नाहीस? किती बडबडायचास! तोंडात एक तर चहा किंवा शब्द!! त्याशिवाय तुझं तोंड आठवता आठवत नाही...'' ती खळखळून हसली.
""काही नाही गं! त्या वयात असतो तो पोरकटपणा...''
त्याने पुन्हा तिच्याकडे वर मान करून बघितले आणि पुन्हा डोळे फिरवले.
""बाकी चहा पिण्याव्यतिरिक्‍त काही करतोस की केवळ चहाच पित असतोस.. खातो-बितोस की नाही?...'' ती पुन्हा खळखळून हसली.
""नाही... एक ग्रंथालय चालवतो.''
""अरे, ग्रंथालय आणि तू?'' तिने फक्‍त उडी मारायची बाकी होती. ""तुला पुस्तकांची कधीपासून आवड निर्माण झाली?... मला तर म्हणायचास, पुस्तकांपासून तुला लांब एका बेटावर ठेवलं पाहिजे... आणि तूच पुस्तकांच्या दुनियेत?... तुला आठवतं, तू केलेली ती कविता... आई शप्पथ! कसले शब्द एकमेकांना जोडले होतेस... कविता होय ती?... निव्वळ फालतूपणा होता..!''
""तुला आठवते ती कविता?...'' त्याने चमकून विचारलं.
""अरे अगदी शब्द अन्‌ शब्द आठवते...''
""हं!'' त्याने नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर शांतपणा आणण्याचा प्रयत्न करत काहीतरी प्रतसाद द्यायचा म्हणून दिला.
""थांब, चहा आणते हं...'' म्हणत ती आत उठून गेली...
तो शांतपणे कोचावर रेलून बसला. समोर राधा-कृष्णाचे भले मोठे पेंटिंग होते.
तो उठला. पेंटिंगजवळ गेला. त्याच्या भोवतीही अनेक चित्रे होती. बहुतांश राधा-कृष्णाचीच... अनेक नामी चित्रकारांची. काही नुसत्या बासऱ्या आणि एक-दोन मोरपिसांची चित्रे.
""अरे, संजयला खूप आवड होती पेंटिंगची. त्यानेच जमवलीत सगळी... फिरतीची नोकरी असल्यानं त्याला मिळवताही आली...'' तिच्या या वाक्‍यासरशी तो चटकन्‌ भानावर आला. ती चहाचा ट्रे घेऊन आली होती. तिने ट्रे बाजूला ठेवला आणि पेंटिंगजवळ येऊन सांगू लागली...
""हे पेंटिंग राजस्थानमधून आणले... हे पंजाबमधून... हे बांगलादेशातील एका गावातून...'' ती एक एक पेंटिंग दाखवत होती. ते कोठून आणले, कोणाचे आहे, हे सांगत होती. तिने त्या राधा-कृष्णाची माहिती सोडून सगळ्या पेंटिंगची माहिती सांगितली. त्याचे फारसे लक्ष त्याकडे नव्हते.
""अरे चहा थंड होतोय...''
""हा...''
""तू नाही चहा घेत...?''
""अं? नाही!''
""हं!'' त्याने पुन्हा काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचा प्रयत्न केला. पण जमला नाही.
""जरा बशी देतेस...''
""अरे, चहा थंडच तर झालाय... मग बशी कशाला...''
""हं...'' पुन्हा त्याने हुंकार सोडला आणि गप्प बसला.
""थांब, मी गरम करून आणते चहा! किती वेळ झाला ना...''
""हं! चालेल...'' म्हणत त्याने मान डोलावली.
तिने लगबगीने चहाचा कप उचलला आणि ती आत गेली.
""बरं, असं करता का... आय मीन... असं करतेस का, चहा राहूदेच...''
""का रे?... बरं राहू दे...'' तिने पण पुन्हा आग्रह नाही केला.
""ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत?'' तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
""भरपूर आहेत! रजनीश आणि जे. कृष्णमूर्तींची तर जवळपास सगळीच आहेत... कुठून कुठून मागवली माहितीए... '' आपण फारच उत्साहात सांगतोय हे जाणवून तो पुन्हा गप्प राहिला.
आता तिने फक्‍त "हं'चा हुंकार सोडला...
""अरे त्या बाजारात तुला मी बघितलं आणि मला पटलंच नाही... तू आणि इथे? शक्‍यच नाही! पण तू... तूच होतास!! बाय द वे, तू कसा या शहरात...?''
""कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाची एक सीडी इथे होती... ज्यांच्याकडे ती आहे ते गृहस्थ खूप वयस्कर आहेत ना... मग म्हटलं आपणच यावं... खूप जुनी आहे...
तू कविता करतेस का गं... अजून?''
""नाही जमत आता...''
तिने भिंतीवर लावलेल्या राधा-कृष्णाच्या पेंटिंगकडे बघत विचारलं... ""आणि तू पेंटिंग बंदच केलं असशील ना?''
त्याने फक्‍त मान डोलावली...
""चल, माझी चारची ट्रेन आहे. मी निघतो आता...''
तो निघायला उठला तशी तीही उठली. ""चहाही नाही घेतलास आणि चाललास...''
""माझ्याऐवजी तू घे! पोचेल मला...'' गिळता गिळता त्याच्या तोंडातून सांडलंच.
""हं...''
""पण चहा करताना केवळ दूध उकळू नको म्हणजे झालं...''
तो उठला. जसा आला तसा निघून गेला.
त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत ती किती काळ उभी होती कोणास ठाऊक. मग ती उठली. किचनमध्ये गेली. चहाच्या डब्यात चहा नव्हताच. संजय होता तोपर्यंत घरात चहा असायचा तरी. संजय गेल्यापासून चहा आणणंही बंद झालं होतं. आज तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं.
चहा प्यायची खूप तलफ आली होती.

"सकाळ'च्या 10 ऑक्‍टोबरच्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: