शुक्रवार, २३ मे, २०१४

प्रिय,


प्रिय,
बाहेर अवकाळी पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालतोय. गारांच्या माऱ्यामुळे गाल लालबुंद झाले होते. अजूनही कपाळावर ओल्या बटा रेंगाळत आहेत. गाडी पार्क करण्याच्या ठिकाणी कुत्र्याचे एक पिल्लू अंग चोरून बसले होते. गाडी बघून ते तिथेच सरकले. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे ते करुण नजरेने बघत राहिले. मी त्याला परत पावसात तर पिटाळणार नाही ना? असा सवाल त्याच्या त्या भेदरलेल्या डोळ्यांत होता. मी हलकेच गाडी स्टॅंडला लावली आणि त्याला तिथेच सोडून दिले. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ते तसेच उजेडाच्या आशेने रात्रभर कुडकुडत पडलं असेल. अशा मिट्‌ट काळोखाच्या काही रात्री सरता सरत नाहीत. अशा अनेक रात्री मी जागून काढल्या आहेत. दारातल्या चांदण्यांना साक्षी ठेवून. या रात्री खरेतर कालिंदीच्या डोहासारख्या असतात. लांबून शांत वाटणाऱ्या पण आत कालियाचे विष पचविणाऱ्या.

कालिंदिच्या डोहाचे वैशिष्ट्यच असे की तो डोह पेलवतही नाही आणि सोडवतही नाही. हा कालियामर्दनापुर्वीचा डोह खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यात साठवला तो राधेने. व्याकुळतेने. विरहाने.कृष्णभेटीची आस लागून. कृष्णभेटीचा आस म्हणण्यापेक्षा राधेचा आसच मुळी कृष्ण होता. त्याच्यामुळेच तर तिला गती होती. एवढ्यानेही राधेचा डोह पुरा होत नाही, त्याच्यावरचे तरंग अजून स्पष्ट होत नाहीत. कारण व्याकुळता तर अहल्या, शबरी आणि सीतेच्याही डोळ्यांत होती पण कालिंदीचा काळाभिन्न डोह काही त्या डोळ्यांत कधी दिसला नाही.
अहल्या तर शिळा होऊन पडली होती. त्यामुळे निर्जीव डोळ्यांमध्ये "राम'भेटीने प्राण आतले गेले आणि मग ते काही काळ झरलेही पण तेवढेच. इथे मला ग्रेसचे ते रुपक आठवते. ग्रेस म्हणतो, राम त्या शिळेजवळून जाताना तिचा गळा दाटून आला. न जाणो तो तसाच निघून गेला तर. अहल्येचे अश्रू रामाच्या पाद्यपुजेइतकेच. त्या अश्रुत राम विरघळणारा नव्हता की प्रवाहीत होणारा नव्हता. शबरीच्या डोळ्यातही रामभेटीची व्याकुळता होतीच. त्यामुळेच तर रामाला तिने डोळे भरून साठवून घेतले. पण तरीही तिच्या डोळ्यातला तो डोह कधीच नव्हता. होता फक्‍त राम राम आणि राम. कालिंदीच्या डोहाला खरे तर विरहाचा पदर आहे. अहल्या आणि शबरीला भेटीपर्यंतची आस होती. त्यानंतर राम तिथे थांबणारा नव्हताच.
रावणाच्या तावडीत सापडलेल्या सीतेच्या डोळ्यांनाही रामाची प्रतीक्षा होती. होती तडफ, आग आणि वेदना. सीतेच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या प्रवाहातच लंका संपून गेली. खरे तर तिचे डोळे आग ओकत होते. मारुतीच्या शेपटाला लावलेल्या आगीपेक्षाही भयंकर ज्वाला सीतेच्या डोळ्यांतून उमटत होत्या म्हणून मारुतीच्या निमित्ताने लंका दहन झाली. कालिंदीचा डोह जर तिच्या डोळ्यांत असता तर लंका कधीच जळली नसती. ती तर समुद्राच्या पोटात गेली असती. त्यामुळे राधेचा डोह मोठा. तो अचल आणि काळाभिन्न. कालियाच्या विखारी शेपटासारख्या आर्ततेने तो डोह प्रवाहबंदी केला आहे, आणि त्याला प्रवाहबंदी आहे म्हणून तर तो खोल आहे. त्यामुळे राधेला कालियामर्दनाची आशा आहे.
आपल्या नशिबी असतात कालियाच्या विखारी शेपटाचे तडाखे. त्यामुळेच रात्रीचा काळोख कितीही खोल आणि गडद असला, कितीही कालींदिच्या डोहासारखा असला तरी तो डोळ्यांत साठवता येत नाही. डोहाची आर्तता नाही. त्यामुळे कालियामर्दन नाही.....
बाहेर, प्राजक्‍तांचा सडा पडला असणार त्याचा गंध घरभर पसरला आहे. अगदी तुझ्या आठवणींसारखा....

तुझाच 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: