मंगळवार, २ एप्रिल, २०१३

प्रिय,


हे पत्र 26 मार्चला लिहिलं होतं.....फक्‍त पोस्ट आता करतोय....


प्रिय,
आज 26 मार्च. बरोबर याच दिवशी वर्षापूर्वी एक प्रतिभावंत आत्मा आपला देह सोडून आपल्या जगात निघून गेला. ग्रेस त्याच्या जगात निघून गेला. खरे तर तो इथे कधी रमलाच नाही. तो इथला कधी नव्हताच, त्याचे जग वेगळे. तो त्या आपल्या जगात निघून गेला. ग्रेस गेला. माणिक गोडघाटे नावाच्या माणसाचा देह त्याने त्यागला. त्याची इथे घुसमट झाली की नाही माहीत नाही. जाण्याच्या दिवशी त्याचे पाय इथेच राहण्यासाठी थोडे घुटमळले की नाही माहीत नाही; कदाचित थोडे घुटमळले असतील. पण तरीही त्याला आपले पाय सोडवून घ्यायला फारसा त्रास झाला नसेल. खरे तर त्या दिवशी तो फक्‍त आपल्या दृष्टिआड झाला. ज्या दिवशी माणिक गोडघाटे नावाच्या देहाला "ग्रेस'ची ओळख पटली, त्याच दिवसापासून त्याचा त्या गूढ अंधारात जाण्याचा प्रवास सुरू झाला होता. या प्रवासात तो एकटा निघाला खरे; पण त्याला तो एकट्याचा प्रवास नको होता. त्या प्रवासात सोबत येण्यासाठी त्याने अनेकांना शब्दांच्या माध्यमातून साद घातली; पण ती साद ऐकण्याचे कान फार थोड्याच जणांकडे होते. जी. ए. कुलकर्णींकडे तो कान होता. पण जी. ए. तर त्याच्याआधीच त्या अंधारात निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने त्या अंधाराला सोनेरी किनार लागली होती. तरी ग्रेस
बाकीच्या लोकांना साद घालत राहिला, वाट दाखवत राहिला. आपल्यासोबतीने येण्याचे आमंत्रण देत राहिला; पण त्या वाटेवरून चालण्याचे धाडस फारसे कोणी करू शकले नाही. तो कंठाच्या मुळापासून साद देत राहिला; पण त्या सादेतील आवाज बहुतांश जणांच्या कानापर्यंत पोचत नव्हता. ज्यांच्या कानापर्यंत पोचत होता, त्यांनाही त्यात अधिक गोंधळच जाणवायचा. त्यामुळे त्याच्या त्या वाटेला कोणी गेले नाही. खरे तर ग्रेस इथे रमलाच नाही. तो इथे रमला असता तर माणिक गोडघाटेच्या देहाची ग्रेसशी ओळख झाली नसती. तो ग्रेस होता. आपल्या भाळावरची जखम तो अशी दाखवी, की समोरच्याला ती जखम न वाटता नक्षीदार गोंदण असल्याचे वाटून जाई. ग्रेस गेला. पण जाताना त्याने जखमांची केलेली गोंदणे तशीच ठेवून गेला. इथे इतकी वर्षे राहिल्याचे ते कदाचित देणं असेल. तशी त्याने कोणतीच देणी बाकी ठेवली नव्हती. त्या देण्यावर कित्येक पिढ्या गुजराण करू शकतील. अर्थात ही संपत्ती वापरण्यासाठी त्याचा वारसा सांगणारे हवेत, ते मिळोत म्हणजे झाले. मला ग्रेसचा वंश वाढलेला बघायचा आहे. जखमा जपाव्यात तर ग्रेसने. भळभळत्या जखमेवर तो हलकेच फुंकर घालतो आणि नकळत भरत आलेल्या जखमेत नखही खुपसतो. त्याला जखमेची वेदना सहनही होत नाही आणि तो तिला सोडतही नाही.
तो असा का? हा प्रश्‍न नाही, कारण तो ग्रेस. ग्रेस मनावर उमटतो. ग्रेसचा मुक्‍काम तिथे. त्याला जर मेंदूच्या खिडकीतून बघायचा प्रयत्न केला तर त्याचा चेहरा धूसर होत जातो. दाढीआड लपवलेल्या चेहऱ्यावरच्या वेदनांच्या खुणा अस्पष्ट होत जातात, नव्हे तर चेहराच अस्पष्ट होत जातो. त्यामुळे त्याचा मनावरचा मुक्‍काम हलवू नये. खरे तर सगळीच मनावरची घरटी उचलून मेंदूच्या पेशींवर ठेवली तर ती टुमदार दिसतात खरी; पण त्यांच्या भिंती ठिसूळ होऊन गेलेल्या असतात. त्यामुळे अशी घरटी मेंदूच्या पेशींवर रुजत नाहीत. त्यांना मनावरच ठेवून द्यावे. अगदी मोडक्‍या-तोडक्‍या अवस्थेत त्यांना तिथेच रुजू द्यावे. ग्रेस अशी घरटी करणारा खरा "क्रिएटिव्ह'. तो म्हणायचाही creativity is my life and its conviction is my character...' ग्रेस असं बोलून जायचा आणि मग त्याचा अर्थ समजावत-बिमजावत बसायचा नाही. याचा अर्थ काय काढायचा माणसानं? conviction चा अर्थ डिक्‍शनरीत खूप गंमतीदार आहे; एक तर शिक्षा किंवा दृढ विश्‍वास. गम्मत म्हणजे ग्रेसला दोन्ही लागू होते. त्याला नेमके काय म्हणायचे होते? पण त्याचा त्याच्या निर्मितीवर असलेला दृढ विश्‍वासच जास्त महत्त्वाचा वाटत असणार. खरे तर त्याला love is my life असं म्हणायचं असणार. खूप मोठ्या माणसांनाही सगळ्याच वेळी सगळंच खरं कुठे बोलता येतं. तो प्रचंड प्रेमी होता. कशावरून विचारलंस तर सांगता येणार नाही. पण होता खरे. प्रेमी फक्‍त प्रेम करणाऱ्यांनाच म्हणायचे? मला नाही पटत, प्रेमासाठी भुकेलेल्यांना, ज्यांचा शोध अखंड सुरू असतो त्यांनाही प्रेमीच म्हणायला हवे. ग्रेस शोधणारा... प्रत्येकाचा शोध वेगळा. ग्रेसचा मार्ग वेगळा. त्यामुळे त्याच्या कवितांमधून उमटणारा अर्थ प्रत्येकाला वेगवेळा लागतो. ज्यांच्या मनापर्यंत ती कविता पोचली, त्यांनी त्या कवितेला आपल्यापरीने अर्थ लावले. काही कविता आपण कधी ऐकतो, कोणाच्या तोंडून ऐकतो यावरही त्याचा अर्थ अवलंबून असतो का? "भय इथले संपत नाही...' ग्रेसचीच कविता. तुझ्या तोंडून ऐकलेली... त्यापूर्वीही बऱ्याचवेळा ऐकली होती आणि त्यानंतरही बऱ्याचवेळा ऐकली. पण काळजाच्या खोलीत शिरली ती तुझ्या तोंडून ऐकलेली. तसे सगळेच शब्द. my conviction is my life... असं आज मला म्हणावंसं वाटतं आणि त्याचा नेमका अर्थ काय हे तुलाच शोधायला लावावं वाटतं....
तुझाच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: