शनिवार, २८ एप्रिल, २०१२

प्रिय,

खूप दिवसांनी जुने कपाट आवरायला घेतले होते. वर्तमानपत्रातील काही कात्रणे, काही टिपण्या आणि पिवळे पडलेल्या पुष्कळश्‍या कागदांनी कपाट गच्च भरुन गेलं होतं. अर्धवट लिहिलेले.. रेघोट्या ओढलेले.. टाचण मारुन ठेवलेले....कोणी कथेच्या शेवटाच्या प्रतिक्षेत तर कोणी अगदीच एखादा शब्द लिहून ठेवून टाकल्यामुळे रुसलेले, तर काही पत्रे लिहून पूर्ण झालेली पण पत्त्याच्या शोधात... म्हटलं तर सगळा कचरा म्हटलं तर प्रत्येक कागद आणि कागद एक-एक जाणिव.. एक-एक भावना.. एकाच कपाटात कोंबून ठेवलेल्या.. काही दडवलेल्या... काही कागदांच्या ओझ्यामुळे दडपून गेलेल्या... मुक्‍या आणि बहिऱ्याही...खरे तर त्या मुक्‍या होत्या म्हणूनच तर त्या एकत्र राहात होत्या. एकमेकांच्या उरावर पडलेले काही पिवळे कागद मात्र आपल्याच भावविश्‍वात रमलेले होते. अंगाला माती लागल्यावर पैलवान कसे छाती काढून चालतात, तसेच अंगावरची धूळ अभिमानाने मिरवत होते. मी ती हलक्‍या हाताने झटकल्यावर उगाचच त्यांना राग आला की काय असे वाटून गेले. त्यातच एका कोपऱ्यात एक कागद सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कोरा.. हा पण पिवळा पडला नव्हता. मी सहज तो उचलला... चटकन तो थरथरला असे वाटून गेलं. सगळ्या पिवळ्या कागदांत हा पांढरा शुभ्र कागद कुठून आला हे मलाही कळले नाही. कागद आणि पेन गोळा करण्याची मला तशी हौस आहेच, पण हा त्याखातर हा कागद नक्‍कीच आणला नव्हता. कारण तसे असते तर त्याच्यासारखे आणखी काही कागद तिथे असायला हवे होते. एकटाच.. त्याचा उजवा कोपरा थोडासा मुडपला होता.. तो मुडपलेला कोपरा मी हलकेच सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण वळल्याची खूण घट्‌ट उमटली होती. त्यावर तारीख 20 फेब्रुवारी असं लिहिलं होतं. आणि मग काहीच लिहिणं झालं नव्हतं.
20 फेब्रुवारी...तुला पत्र लिहायला घेतलं होतं. त्यासाठीच हा खास कागद आणला होता. पत्र लिहायचे ही कल्पनाच खूप मजेशीर आणि धाडसाची वाटत होती. अगदी उत्साहाने पत्र लिहायचा घाट घातला होता. त्यासाठी हा खास कागद आणला होता. त्याचे पाकिटही तितकेच खास आणले होते.अगदी चित्रपटात दाखवतात ना तसेच गुलाबी रंगाचे.. इथेच कपाटात कुठेतरी नक्‍की असेल. ते पाकिट मिळविण्यासाठी किती दुकाने फिरलो होतो देव जाणे. सायकल मारुन मारुन पाय थकले होते. त्यावर गुलाबाचे एक फुल चितारले होते. मस्त टपोरे फूल होते ते. तो कागद हातात घेतला आणि विचारांच्या माळेत दोरा ओवला गेला बघ.
किती दिवस.. किती वर्षे सरली तरी त्या कागदाचा शुभ्रपणा तसाच होता. अगदी पांढऱ्या ढगांसारखा. तो काळवंडला नाही की पिवळा पडला नाही. काळाच्या खुणा त्याच्या अंगावर जराही दिसत नाहीत, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमासारखं. काळाचा कधीच त्यावर परिणाम झाला नाही. अगदी व्हावा, अशी इच्छा बाळगुनही. खरेच हे पत्र पहिलं प्रेमपत्र होतं. अगदी कोरं. निखळ, निरपेक्ष आणि सर्वात महत्त्वाचं खूपच निरागस. खरं बोलणारं. आपल्या भावना न दडविणारे, त्याला कसलाच मुलामा न लावलेलं. तुझ्या डोळ्यांसारखं. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझे डोळे बोलतातच, मी तुला कधी सांगितलं नाही. पण तुझे डोळे खूप बोलतात खूप..खूप.. आनंद झाला की किलकीले हसतात. रागावले की कोरडे पडतातत.. वेदना पापण्यांच्याच्या आड लपवतात.. आज या कागदाने पुन्हा डोळ्यांची आठवण करुन दिली. पापण्या.. कोरिव भूवया.. भूवयांमध्ये लावलेली टिकली.. कधी साधी..कधी चंद्रकोरीसारखी.. किती आठवणी आल्या दाटून.. आज हे पत्र त्याच कागदावर लिहितोय. पण बघ ना. मघाशी प्रिय शब्द लिहिताना त्यातील य चा पाय थोडा लांबलाच. शाई थोडी जास्तच खाली ओघळली.. हा कागद तसाच कोरा ठेवायला हवा होता. जरा माझं जास्तीच झालं.
तुझाच 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: