शुक्रवार, ८ जून, २०१२

काजळी



काजळी

त्याने समईची वात हलकेच बाहेर काढली, काडेपेटीतील काडी पेटविली आणि हलकेच समईवर धरणार इतक्‍यात वीज चमकून गेली आणि त्यापाठोपाठ आलेल्या ढगांच्या गडगटाने खिडक्‍यांची तावदाने वाजली. तावदानांची बंधने झुगारुन आत आलेल्या वाऱ्याने हातातल्या काडीला अगोदर गच्च मिठी मारली तशी ती लाजून विझून गेली.
समई लावायची तर खिडक्‍या बंद केल्या पाहिजेत म्हणून तो उठला. त्याने खिडक्‍यांची दारे लावून घेतली. त्यावरचे पडदे लावून घेतले. बाहेर पाऊस कोसळायला लागला होता. धबाबा... हा कोसळणारा पाऊस मृगाचा नव्हता. वळीवाचा, आवेगाने आलेला... वाजत गाजत... वळीवाच्या पावसाला जितकी आतुरता असते तितकी मृगाच्या पावसाला नसते, असं त्याला पुर्वी वाटायचं. जणू तो प्रियकरासारखाच असतो, अगदी उत्कट... असं त्याचं ठाम मत होतं. आता छतावर टपोरे थेंब वाजू लागले होते. पावसाच्या आवेशात आता त्याचं अवघं घर आलं होतं. त्याला ते कोरडं हवं होतं... या मुरदाड पावसाने आपल्याला न सांगता आपल्या घराचा असा ताबा घेतल्याचा त्याला राग येऊ लागला होता.
कधी काळी त्याला वळीवाचा पाऊस प्रचंड आवडायचा. कधीही मग रात्री-अपरात्रीही पाऊस पडायला लागला की तो बाईक काढायचा आणि पावसात मनसोक्‍त भिजून घरी परतायचा. पाऊस मनात साठवून घ्यायचा. त्याच्याइतकी वळीवाच्या पावसाची कोणीच वाट बघितली नसेल... पहिला पाऊस अंगावर झेलण्यासाठी तो कुठलीही किंमत द्यायचा. एकदा ऑफीसची कसली तरी महत्त्वाची मिटींग सुरू होती. बाहेर ढगांनी गच्च दाटी केली होती. तो त्या मिटिंगरुममध्ये अस्वस्थपणे बसून राहिला होता. आता कुठल्याही क्षणी पाऊस पडायला सुरवात होईल, आणि इथली मिटींग तशीच सुरू राहिली तर.. या विचाराने तो अस्वस्थ होत होता.. बाहेर हलके हलके थेंब पडायला सुरवात झाले आणि त्याने मिटींगमध्ये स्पष्ट सांगितले, "" मला पावसात भिजायचे आहे. हा या वर्षीचा पहिला पाऊस आहे. आता पुन्हा पहिल्या पावसात भिजायला पुढच्या वर्षीशिवाय पर्याय नाही.'' गंमत म्हणजे त्या मिटींगला आलेल्या अनेकांनाही त्याचा हा पाऊसवेडेपणा आवडला आणि मिटींग भर पावसातच झाली. त्या मिटींगनंतर त्याला प्रमोशन मिळत गेली आणि मग त्याच्या आणि भिजण्याच्या आड कधी नोकरी आली नाही. पहिल्या पावसात मग तो भिजत राहायचा. कपड्यांसकट. ते कपडे मग अंगावरच वाळवायचा... पावसाच्या थेंबामुळे पडलेले डाग मग मिरवत राहायचा.. त्या डागांतून अत्तराचा वास येतो असं काही-बाही सांगत राहायचा. मग कधी-कधी उन्हाळा कडक वाटू लागला की तोच शर्ट घालून तो त्या पावसाच्या आठवणींत रमून जायचा. लोक त्याच्या माघारी मूर्ख, भावूक, मोठे पद मिळाले म्हणून असली थेरे सुचतात, असं म्हणायचे पण त्याकडे तो लक्ष द्यायचा नाही. त्या भिजून वाळलेल्या शर्टाचा त्याला अभिमान वाटायचा. दरवर्षीचे असे पहिल्या पावसात भिजलेले शर्ट त्याच्या कपाटात नांदत राहायचे. अलीकडे मात्र तो या पहिल्या पावसालाच घाबरायचा. काय कोण जाणे पण त्याला हा वळीवाचा पाऊस आवडायचा नाही.

ती शेवटची भेटली त्यालाही आता दहा वर्षे झाली. तिने नकार तर त्याअगोदर दहा वर्षांपुर्वी दिला होता. पण तरीही त्या दिवशी ती एवढंच म्हणाली होती...
तुला पहिला पाऊस आवडतो ना? त्याचा आवेग, त्याची आतुरता.. त्याचं निरपेक्ष अस्तीत्व.. त्याला ना धरतीवर काही पिकवायचे नसते ना नदी नाल्यांच्या प्रवाहात स्वतःला अडकवून घ्यायचे असते. त्याला फक्‍त समाधान द्यायचे असते, असं तू मानायचास ना?...
हो! एवढंच तो म्हणाला..
खरे तर तिला पाऊस नावडायचा नाही पण पावसावर तिने बोलावे इतका काही पाऊस तिला आवडत नव्हता खचितच.
पण तरीही त्याने आडवले नाही. तिला बोलू दिले.
...तूही वळीवाच्या पावसासारखाच रे. जगण्याची मजा एकाच गोष्टीतून अनुभवणारा. माझ्यावर वळीवाच्या उत्कटतेने प्रेम करणारा आणि नकारानंतर पुन्हा न परतणारा.. मला तू आषाढातल्या पावसासारखा हवा होतास. अनुराग करणारा... हक्‍काने पडणारा... आपल्या अस्तीत्वाने सगळं रान हिरवंगार करणारा... नद्या-नाल्यांतून ओसंडून वाहणारा... पण ती मजा तुला नाही कळली किंवा तू समजावून नाही घेतलीस... तु तुझ्याच मापाने सगळं मोजलंस... ती एवढंच म्हणाली आणि निघून गेली. कितीतरी दिवस त्याला तिच्या त्या शब्दांचे अर्थच समजले नाहीत. काही तरी बडबडायचे म्हणून ती बडबडली असेच वाटून तो आपल्या कामाला लागला... पण तिचे शब्द त्याच्या मेंदूत घर करुन राहिले होते.
चार वर्षांपुर्वी असाच तो खिडकीतून बाहेर बघत होता... बाहेर आषाढातला पाऊस कोसळत होता.. अखंडपणे... पण त्यात जोर-जबरदस्ती नव्हती... गवताच्या कोवळ्या पानालाही स्पर्श करताना त्याला काही यातना तर होत नाहीत याचीच जणू काळजी घेत असल्यासारखा. त्या दिवशी त्याला कळले.. ती काय म्हणाली ते... पण वेळ निघून गेली होती..
त्याने बाहेर बघितले... वळीवाचा पाऊस नेहमीप्रमाणे कोसळला आणि आता ओसरुनही गेला होता... त्याने पुन्हा काडेपेटीतील काडी पेटविली. समईच्या वातीने काजळी धरली होती. ही काजळी त्याला आज तरी काढता येणार नव्हती... समई आज पेटणार नव्हतीच..!


*** "सकाळ'च्या स्मार्टसोबतीमध्ये 7 जूनला प्रसिद्ध झालेली माझी लघुकथा 

३ टिप्पण्या:

Panchtarankit म्हणाले...

अप्रतिम झाली आहे कथा
पावसाच्या रूपकातून जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचे सुंदर वर्णन केले आहे.

Panchtarankit म्हणाले...

अप्रतिम झाली आहे कथा
पावसाच्या रूपकातून जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचे सुंदर वर्णन केले आहे.

dairy milk म्हणाले...

sunder