रविवार, १५ एप्रिल, २०१२

एक सांज अनुभवायलाच हवी

जगण्याचे संदर्भ बदललेत... एक एक मिनिट महत्त्वाचा ठरू लागलाय... कामं तर पाचवीला पुजल्यासारखीच मागं लागली आहेत... हात रिकामे म्हणून रिकामा वेळ म्हणायचा, तर तोही रिकामा कुठे आहे? मेंदूत तणाव निर्माण करणाऱ्या पेशी कॅन्सरसारख्या वाढत असतातच की! त्या स्वस्थ कुठे बसू देतात... मग एक दिवस सरतो... आठवडे सरतात... महिने, वर्षेही कधी सरून गेली हेच कळत नाही... मागे वळून बघितले तर पाऊलखुणाही दिसत नाहीत... खरं आहे ना!
जरा बाहेर पडून बघा... चैत्र फुललाय... झाडांची हिरवी-पोपटी पालवी सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत आहे... कधी पावसाळ्यात पाऊस आला म्हणून ज्या झाडाखाली थांबलो होतो, त्या झाडांना आता तांबड्या-पिवळ्या फुलांचे गुच्छ लगडलेले आहेत... तापलेले रस्ते मुजोर वाटताहेत खरे, पण ती मुजोरी नाही... नाराजी आहे. संध्याकाळी भरून वाहणाऱ्या रस्त्यांवर दुपारी कोणीच नसते याची... आणि नेहमी पश्‍चिमेच्याच दिशेकडून येणारे ढग आता कुठल्याही दिशेने येत आहेत. आभाळ काळ्या-निळ्या ढगांनी गच्च होत आहे... दिवसभर तापलेल्या धरित्रीवर जणू छत घालावे म्हणून ढग दाटीवाटीने बसलेले असतात... मग हलकेच टप टप करत टपोरे थेंब पडताहेत... कधी कधी गाराही पडताहेत... पण हे अनुभवायला थोडं बाहेर पडायला हवं. एक संध्याकाळ एकटेच रस्त्यावर येऊन फिरायला हवं... किमान खिडक्‍यांची दारे पडद्यातून मुक्‍त करायला हवीत.
चैत्र-वैशाखातला पाऊस हा श्रावणातल्या पावसापेक्षा वेगळा... त्याचा आवेग वेगळा... त्याची गती वेगळी... तो येणार याची खात्री नसते आणि जाताना काय नेईल याचा नेम नसतो; म्हणूनच तर तो कधी काय होईल हे सांगता न येण्यासारख्या आयुष्यासारखा असतो.. "अनप्रेडिक्‍टेबल'. तो येतानाही आवाज करत येणार आणि गेल्यानंतरही आपल्या खुणा मागे ठेवणार... ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखखाट होतोय, ढग गच्च दाटून आलेत म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडलाच नाहीत तर त्या दिवशी पाऊस यायचाच नाही आणि आज पाऊस नाही येणार म्हणून तुम्ही बाहेर पडावे आणि त्यावेळी हृदयाचा ठोका चुकविण्यासारखी सर्रकन वीज चमकावी आणि धबाबा पाऊस कोसळावा... खरी मजा इथे आहे... या पावसात एकदा भिजलं की मग अख्खा चैत्र-वैशाख कितीही आग ओकत राहिला तरी त्याचा राग येत नाही... चैत्रातील एक संध्याकाळ खरंच अनुभवायला हवी... अगदी पावसाच्या गच्च मिठीत शिरताना अंगावरचा "ब्रॅंडेड' ड्रेस भिजतोय, याची काळजी सोडायला हवी. चिखल बूट, सॅंडलला जरा लागलाच पाहिजे... डोक्‍यावरून ओघळणारे थेंब नाकाच्या शेंड्यावरून अलगद तोंडात घेताना जी मजा आहे ती पंधरा-वीस रुपयांच्या मिनरल वॉटरमध्ये नक्‍कीच नाही. पाकिटातील नोटांना तसेच भिजू द्यावे. बघा या महिन्यात एक संध्याकाळ अशी जगता येते का? संध्याकाळचा बाहेर पडणारा पाऊस मनात साठवता येतो का?... खरंच एक सांज अनुभवायलाच हवी!


** 14 एप्रिललच्या "सकाळ' मध्ये छापून आलेला माझा लेख....**

२ टिप्पण्या:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ म्हणाले...

चैत्र-वैशाखातला पाऊस>>> aajakaal kadhee ho paDato? :(

SUSHMEY म्हणाले...

ajun tari kolhapurla hoto o....