मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,


खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात...

प्रिय,
खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय....
पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की.

तुझाच....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: