रविवार, २४ जानेवारी, २०१०

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भीती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.