मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!
प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: