सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

हात दाखवून...


प्रसंग पहिला

महाराज! मुख्यमंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात केव्हा पडेल? आपला उजवा हात महाराजांपुढे करत त्या "नेत्याने' शब्दात जितका "विनय' आणता येईल तितका आणला.
महाराजांनी उजव्या पायाच्या मांडीवर डावा पाय टाकून त्याचा अंगठा उजव्या हाताने धरत, डाव्या हाताने जाणव्याला हिसका दिला. पंचांगावर ठेवलेल्या पाचशेच्या नोटेकडे लक्ष देत त्यांनी अनुनासिक स्वरात मुख्यमंत्री, मुख्यमंत्री असा जप सुरू केला.
काय झालं महाराज?
त्याचे काय आहे, राहू जरा वक्री आहे, बुधही अष्टमस्थानी आहे. पण गुरूचे पाठबळ चांगले आहे. "सुराज्य' आणणारे आहे.
महाराज म्हणजे मुख्यमंत्री होण्यात अडचण...
अडचण अशी काही नाही; पण... महाराजांनी "पण' उगाच लांबवला. पण गृहकलह दिसतो. नाराज ग्रहांची संख्या जास्त आहे. घरच्या लढाईत सैनिकांची मदत घ्यावी लागेल.
म्हणजे मी समजलो नाही महाराज.
त्याचे असे आहे. इथे तुम्हाला सैनिकाबरोबर लढायला लागणार आहे. त्यासाठी दुसऱ्या सैन्याची कुमक मागवावी लागेल, कसे. महाराजांनी मुद्द्याला हात घातला.
महाराज त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात यश येईल नव्हे. साहेबांचे मन काही कळत नाही.
येईल म्हणजे येणारच, पंचांगावर आणखी पाचशेची नोट बघून महाराजांनी विश्‍वास दिला. तुम्ही जोर धरा. अहो, त्यांनाही गरज आहे. त्यांनाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायचा आहे ना! तृतीय आघाडीवरच्या ग्रहांचे फासे व्यवस्थित पडले तर मुख्यमंत्री तुम्हीच.

प्रसंग दोन
महाराज, महाराज, मुख्यमंत्रिपदाचा योग कधी आहे जरा बघा की... परदेशात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला नेता आल्याचे बघून महाराज मोठे खूश झाले. पंचांगाची पाने उलटसुलट करत नेत्याकडे तिरप्या नजरेने त्यांनी बघितले. काय देखणे रूप, पण चेहऱ्यावर अस्वस्थता खूप बघून महाराजांनी उगाचच उच्छवास जोरात टाकला.
मुख्यमंत्रिपद, जरा कठीण दिसतंय. त्याचे काय आहे. तुमच्याकडे ते गुण आहेत; पण ग्रहांचे पाठबळ नाही ना. घरच्या लढाईत तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतोय. महाराजांनी खुलासा केला.
अहो मी घरचा मंत्री आहे म्हटल्यावर घरच्या लढाईकडे जास्त वेळ द्यावा लागणारच की...
ते घर नव्हे! आपल्या नाकपुड्या फुगवत महाराजांनी सांगितले. अहो सांगली, तासगाव अशा संस्थानात तुमचा जास्त वेळ जातो ना त्याबद्दल बोलतोय. हा ग्रहकाळ काही मुख्यमंत्रिपदासाठी अनुकूल नाही.
मग उपमुख्यमंत्रिपद तरी... मागच्या वेळी हुकलेली संधी मिळेल नव्हे?
महाराजांनी आता अंदाज काढला. पंचांगावर पैसे दिसत नसल्याचे बघून मोठा पॉज घेतला. मांडीवरचा पाय जोरात हलवत जानव्यातून अंगठा फिरवला. साहेबांच्या ते लक्षात आले. त्यांनी हजाराची नोट पंचांगावर सारली.
या वेळी संधी साधणार म्हणजे साधणार... पण त्यासाठी इतरांच्या "भुजा'तील बळ कमी झाले पाहिजे. कसे...

प्रसंग तीन
"साहेब' आले आहेत म्हटल्यावर महाराज स्वतः समोर गेले. तुम्ही मला बोलवायचे नाही का? महाराजांनी दारातून स्वागत करत करत साहेबांना विचारले.
"त्याचे काय आहे भटजीबुवा, आम्हाला आता वेळ मिळाला, इकडून जात होतो म्हटले तुम्हाला भेटून जावे.' साहेबांनी सांगितले.
तुमचं शिक्षणाचे एवढे काम, सरस्वतीची सेवा करताय बघा तुम्ही... आपल्या पोराला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्याचे आठवून महाराजांनी मधाचे जितके बोट लावता येईल तितके लावण्याचा प्रयत्न केला.
ते राहू द्या, या वेळी तरी आम्ही मुख्यमंत्री होणार का? साहेबांनी थेट प्रश्‍नाला हात घातला.
होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. महाराजांनी पुन्हा मधाळ स्वर आणत स्तुतीचा "पतंग' हवेत उडविला.
पण मागच्या वेळी तुम्ही तसेच म्हटला होता. साहेबांनी दुखत्या नसेवर बोट ठेवले.
अहो! त्यावेळी राहू काळ चालू होता ना... पण या वेळी तुम्ही मुख्यमंत्री आणि युवराज आमदार होणार म्हणजे होणार.

प्रसंग चार
नमस्कार महाराज! त्या नेत्याने आल्या आल्या महाराजांच्या पायालाच स्पर्श केला आणि महाराजांच्या कडेलाच मांडी घालून बसला.
एवढा मोठा नेता आणि वागणे कसे सर्वसामान्यासारखे. नेत्याचा हा साधेपणा बघून महाराजांना गहिवरून आले.
महाराज, काय होईल... नेत्याने एवढेच विचारले.
आघाडीबाबत प्रश्‍न म्हटला तर आघाडीचा प्रश्‍न निकालात निघालाय. मतदारसंघ गेला असला तर मतदारसंघातील प्रमुख विरोधक यांच्याच पक्षाकडून विधानपरिषदेवर मग प्रश्‍न कशाबद्दल असेल? महाराजांना काही कळेना.
कशाचे काय होईल?
अहो! मंत्रिपदाचे आणखी कशाचे...
तुम्ही निश्‍चिंत राहा... पण खरे सांगू मागच्यावेळीच तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता. सगळ्या ग्रहांचे पाठबळ तुम्हालाच होते. पण माशी कशात शिंकली कोणास ठाऊक!
एकदा चूक झाली ती झाली... पण उपमुख्यमंत्रिपदाची माळही गेली हो... त्याचे काय? नेत्याने नेहमीप्रमाणे आपली नजर खाली झुकवत मान तिरकी करत विचारले.
अहो! उपमुख्यमंत्री काय तुम्ही या वेळी मुख्यमंत्री व्हाल. कसे? महाराजांनी कसेंवर फारच जोर दिला.
.........................................
ता.क. ः महाराजांना आता कळेना की नेमका कोण मुख्यमंत्री होणार? त्यांनी 22 ऑक्‍टोबरच्या तीर्थयात्रेचे तिकीट बुक करून ठेवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: