संवेदना जागृत ठेवल्या की मग समोर घडणाऱ्या घटनां मनापर्यंत पोहचतात आणि मग त्याचा गंध मनात दरवळत राहातो. अनेकदा हा गंध दर्पाच्या अंगाने गेला तरी अंतिम त्यातील जगणं चाफ्याच्या मंद गंधासारखं नितांत सुंदर असतंच असतं.
शनिवार, ९ जुलै, २०११
कपाटातील समृध्द अडगळ
अनेक साहित्यिकांची उतरत्या वयात प्रतिभा संपुष्टास गेलेली असते. प्रतिभेचे तळे आटले, की हे जुन्या काळात रमू लागतात; मग प्रतिभेच्या अत्युच्च स्थानी असताना यांच्या हातातून निसटलेली काही पाने त्यावेळी त्यांना दुय्यम दर्जाची वाटलेली, पण आता हातातून काहीच निसटत नसल्याने आधार वाटू लागतात. मग हे साहित्यिक असे कागदाचे कपटे गोळा करून एका पोत्यात बांधतात आणि त्याला काही तरी नाव देतात. अनेकवेळा हा प्रयोग यशस्वीही होतो. त्या कागदांच्या बोळ्यातून काहीतरी हाताला लागते. उरलेला कचरा जरी सोडला तरी काही तरी हाताला लागले म्हणून वाचकही खूश असतो. रा. रा. नेमाडेंनीही असाच सगळा कचरा एका पोत्यात भरला. त्याला गोंडस असे नावही दिले "हिंदू'. हे िंहंदू नाव का, तर त्या पोत्याबाबतीत काही तरी वाद निर्माण होईल आणि पोती हातोहात खपली जातील. "होराभूषण' नेमाडेंचा हा होरा पक्का खरा ठरला. पोती भराभर खपली खरे; पण लोकांनी त्याचे तोंड उघडले आणि हातात फक्त संदर्भहीन कागदांचे कपटे मिळायला लागले. त्यामुळे लोकांनी एकदा ते तोंड झाकले ते पुन्हा काही उघडले नाही. त्यामुळे 650 रुपयांची ही कादंबरी कपाटातील समृद्ध अडगळ ठरते.
साहित्यिकाची प्रत्येक कलाकृती एकटी असते. लेखकाने यापूर्वी काय लिहिले आणि ते कसे होते यावर त्याने नंतर लिहिलेल्या पुस्तकांना प्राथमिक ग्राहक मिळण्यासाठी फायदा होतो खरा; परंतु त्या प्रत्येक पुस्तकाची स्वतःची ओळख निर्माण झाली तरच साहित्यिक यशस्वी ठरतो, नाही तर लेखक अमुक"कार' तमुक"कार' बनतो. एखाद्या लेखकाच्या दृष्टीने असे "कार' बनणेही खूप मोठे भाग्याचे असल्याने तो त्यावर समाधानी असतो. पण जातिवंत लेखकाला त्याची स्वतःची ओळख एखाद्या पुस्तकावरून व्हावी, असे वाटत नसते. त्यामुळे तो प्रत्येकवेळी प्रतिभेची नवनवी शिखरे चढत राहतो. त्यामुळे त्याची मागची पुस्तके कितीही गाजली असली तरी तो नूतन नवा भेटतो. नेमाडेंच्या बाबतीत अगदी तसेच म्हणायला गेल्यास ते "कोसला'पुरतेच मर्यादित राहतात आणि उद्या त्यांची ओळख सांगायची झाल्यास "कोसला'कार म्हणूनच सांगावी लागेल. प्राध्यापकी पिंड असलेल्या नेमाडेंना हिंदू धर्माबद्दल लिहायचे होते, त्यांना जातीपातीबद्दल लिहायचे होते, त्यांना ब्राह्मणी संस्कृतीबद्दल लिहायचे होते, रुढी-परंपरा यावर लिहायचे होते, त्यांना प्रत्येक गोष्टीवर लिहायचे होते, पण त्यासाठीचा आराखडा सापडत नव्हता. मग ते पस्तीस वर्षे लिहित राहिले, जमेल तसे आणि जमेल तेवढे.. घरात कागदांची नुसती अडगळ निर्माण झाली. आता ही अडगळ कमी करण्यासाठी त्यांनी पोती शोधायला सुरवात केली. या कागदाच्या कपटांना एका धाग्यात गुंतविणे आवश्यक होते. सध्या प्रबंध आणि शोधनिबंधांना कोणी कुत्रं खात नाही. विचारवंतांची पुस्तके ग्रंथालयांच्या कपाटात धूळ खात पडली आहेत. अशात या कपटांना विकून चांगला पैसा मिळविण्याच्या दृष्टीने कादंबरीसारखा मार्ग हा सोयीस्कर होता. त्यामुळे त्यांनी कादंबरीचं पोतं निवडलं. ज्या पोत्यात ही सगळी कागदे घातल्यानंतर ते विकलंही गेलं पाहिजे. मग त्या पोत
्याच्या नावावरून वाद निर्माण झाला पाहिजे. मग काय करायचे तर पोत्याला "वादळी' नाव द्यायचे. समाजातील भावनांचे ध्रुवीकरण झाल्याच्या काळात त्यांना "हिंदू' नावाचं पोतं सापडलं. त्यात त्यांनी हा सगळा पसारा कोंबला आणि तो खंडेराव नावाच्या एका काल्पनिक पात्राला पकडून त्याच्यावर वाचकांच्या दारात नेऊन टाकण्याची जबाबदारी सोपविली.
मुळात नेमाडेंना काय म्हणायचे आहे, कशासाठी म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे काहीच या कादंबरीतून स्पष्ट होत नाही. त्यांना हिंदू धर्मातील रुढी-परंपरांवर टीकाही करायची आहे आणि त्याबद्दल भूमिकाही घ्यायची नाही. ब्राह्मणांना दुखवायचेही नाही आणि सोडायचेही नाही. केवळ मत्सर आणि आपल्याला खूप काही कळतं एवढं सांगण्यासाठी त्यांनी 603 पाने खर्ची घालण्याचे कारण नव्हते. त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं असतं, की मला खूप काही कळतं आणि मी यांचा यांचा मत्सर करतोय, तर नेमाडेंचे साहित्यिक पुण्य एवढेही लयाला गेलेले नाही. त्यामुळे मराठी माणसांनी मान डोलविली असती. पण महाकाव्य लिहिण्याच्या अट्टहासापोटी त्यांनी केलेला हा कारभार आहे. पुस्तकातील त्रुटींबद्दल लिहायचे तर प्रत्येक पानावर त्रुटीच आहे. "नेमाडपंथी' भाषा म्हणून लोकांच्या डोक्यावर काहीही थापायचे हे योग्य नाही. रंजकता तर नाहीच, पण निवेदनाच्या पातळीवरही सगळा सावळा गोंधळ आहे. शेजारी झेंडू बामची डबी ठेवून वाचायला बसले तरी वाचता येत नाही. कादंबरी कुठल्याच पातळीवर चांगली नाही. ज्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायची आहे अशा लोकांसाठी ही कादंबरी खूप चांगली आहे. त्यांनी ती वाचावी आणि सहनशक्ती दाखवावी हे माझे आव्हान आहे.
सोमवार, ६ जून, २०११
मोगऱ्याची वेणी
बारा रुपये! त्याने थंडपणे उत्तर दिलं. त्याला माहित होतं की बारा रुपये म्हणून सांगितलं की पुढची बाई दहा रुपयाला मागते. थोडा मोलभाव केला की दहा रुपयाला ते पान विकलं जायचं. पण तीनं ना पर्समध्ये हात घातला, ना मोलभाव केला, जशी आली तशी ती निघून मंदिरात शिरली.
त्याला क्षणभर वाटलं पुढे जावं... दहा रुपयाला देईन असं सांगाव पण त्याचा धीर झाला नाही. कदाचीत ती जर त्याच्या वयाचीच नसती तर तो पुढे नक्की गेला असता. पण ती त्याच्याच वयाची असल्याने तो संकोचला. जाऊ देत, म्हणून तो मागे सरला...
काय रे! काल तू केवड्याची पाने विकत होतास ना? मग आज तू या मोगऱ्याच्या वेण्या का आणल्या आहेस... कालची तीच ती होती. काल घातलेल्या निळ्या ड्रेसपेक्षा आज हिने घातलेला लाल रंगाचा ड्रेस खूप छान शोभतो. त्याच्या मनात एक विचार येऊन गेला..
केवड्याची पाने मिळाली नाहीत. विकायला काहीतरी पाहिजे ना? म्हणून मग मोगऱ्याच्या वेण्या आणल्या आहेत. घ्या ना वेण्या! दहा रुपयाला दोन दिल्या... त्यानं विनंती केली.
तिनं वेण्या उचलल्या... त्या मोगऱ्याचा गंध श्वास भरुन घेतला. केवड्याचा सुगंध, मोगऱ्याला नाही रे! मला केवडा हवा होता. ती एवढीच बोलली आणि निघून गेली.
तिसऱ्या दिवशी तो माळ्याशी भांडला, पण केवडा मिळाला नाही. आज कधी नव्हे तो त्याला केवडा हवा होता. नाही तर वेण्या संपल्या की याला केवडा मिळायचा...
आज ती परत आली आणि परत तिने केवडाच मागितला तर.. आज तिनं येऊच नये... उद्या तिच्यासाठी केवडा आणीन अगदी कुठूनही आणीन, पण आज तिनं येऊ नये...असं त्याला वाटत होतं... पण कालच्यावेळीच ती आली.
ती सरळ त्याच्यासमोरच आली... तीनं पुन्हा त्याच्याकडे बघितल... त्याच्या परडीतील मोगऱ्याच्या वेण्या इकडे तिकडे केल्या.
""केवडा नाही ना आणलास तू''
नाही... नाराजीनंच त्याने मान हलविली.
हातातील वेण्या तिथेच ठेवून ती निघायला लागली, तसा तो पुढे झाला.
"" या वेण्या घ्या... बघा किती ताजा मोगरा आहे...पैसे नका देऊ....''
त्याने हातात एक वेणी उचलली. त्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांच्या पार्श्वभूमिवरचा तिचा सावळा चेहरा आणखी तजेलदार दिसत होता. क्षणभर तीही भांबावली, पण लगेच सावरली...
""नको! मला केवडाच हवा.''
तिच्या उत्तराने तो हिरमुसा झाला. मागे सरला.... पुढच्या दोन दिवसांत त्याला केवडा मिळाला नाही, मिळालेले गजरेही त्याने घेतले नाहीत... तो रस्त्यावर आलाच नाही.... नंतर तो कितीतरी दिवस त्याच रस्त्यावर यायचा. केवडा घेऊन .. पण ती यायची नाही... तो गजरे विकायचा... पण त्याच्या परडीत एक केवड्याचे पान मात्र तसेच सूकुन जायचे... कोणी त्याला विचारलेच तर केवडा विकायला नाही एवढेच म्हणायचा... कधीतरी ती येईल म्हणून तो परडीत नेहमी केवड्याचे एक पान ठेवायचा.... पण ती आली नाही. त्याची नजर तिच्या रस्त्याकडे असायची....दिवसा मागून दिवस सरले....त्याचं कॉलेज संपलं.... तसं त्याचा गजरे विकण्याचा पार्ट टाईम जॉबही सुटला......हातात गाडी आली... कधी तो त्या रस्त्यावर थांबायचा... गाडीच्या काचा खाली करुन तेथील गजरे विकणाऱ्या पोरांकडे बघायचा.... तेथील पोऱ्याकडून केवडा घ्यायचा... त्या केवड्याचा वास त्याच्या केबीनमध्ये दरवळत राहायचा....
आजही तो असाच आपल्या नादात चालला होता... त्याची गाडी मंदिरासमोर थांबली.... एक पोरगं परडी सांभाळत त्याच्यासमोर आलं...
"" केवडा आहे का रे!''
""नाय साहेब! '' त्यानं उत्तर दिलं.... आज माळ्याने केवडा दिला नाही...
तो हसला... पोराला नाराज करायला नको म्हणून त्याने एक छानशी मोगऱ्याची वेणी घेतली आणि तो मंदिराच्या पायऱ्या चढला.... त्यानं देवीला नमस्कार केला आणि तो परतला... चप्पल घालायला तो सहज वाकला, तर एक केवड्याचे पान त्याच्या चपलासमोर पडलं होतं. त्यानं ते उचललं... समोर ती तीच होती... काळ लोटला असला तरी त्यानं तिला कधीच ओळखले होते... बहुतेक तिनेही ते ओळखले असावं... ती हलकेच पुढे आली... तिने त्याच्या हातातील ते केवड्याचे पान हलकेच घेतले... त्याच्यासमोरच ते केसांत माळले.... त्याने मघाशी घेतलेली वेणी तिच्या समोर केली.... आज तिने ती वेणीही घेतली....
सोमवार, २३ मे, २०११
आई भूक
"अण्णा, या पावटी मला जत्रेतनं, ट्यॅक्टर घेणार न्हवं! रंग्याला तेच्या मामानं लय चांगला ट्यॅक्टर घेतलाया, ही चाबी दिली की धुssम! ते पोरगं अखंड बडबडत होतं. त्याचा बाप मात्र त्याच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. चालण्याची गती तेवढी वाढत होती. बापाच्या खांद्यावर बसून ते पोर टकामका नजरेनं सगळा परिसर डोळ्यात साठवून घेत होतं. लांबच लांब जाणाऱ्या पायवाटा, अंब्यांनी लगडलेली झाडे, घरट्याकडे परतणारे पक्षी.. त्याची नजर स्थीर राहात नव्हती. या रानात तो कितीतरी वेळा आला होता, अनेकवेळा घराकडे परीतीच्या वाटेवर त्याला हेच चित्र दिसायचं. पण आज काही तरी वेगळं होतं. आज त्यानं आईचं बोट धरलं नव्हतं, तर बापाच्या खांद्यावर तो बसला होता, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट नविन वाटत होती. सहज त्याची नजर बगळ्यांच्या थव्याकडे गेली... नकळत त्याची मूठ झाकली गेली. मूठ झाकली की आकाशातून जाणारे बगळे आपल्या नखांवर येऊन बसतात, असं कोणतरी त्याला सांगितलं होतं. त्यानं मूठ वळली आणि ती बगळ्यांच्या दिशेने केली. बगळ्यांचा थवा आला आणि एका झाडावर जाऊन विसावला. त्यानं मूठ सोडली, मिटलेले डोळे उघडले. त्याच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांवरच्या नखांवर बगळ्यांनी दाटीवाटीने ठाण मांडले होते. त्याला प्रचंड आनंद झाला."अण्णा! समदं बगळं हातावर आल्याती! त्याचा बाप काही बोलला नाही. झपाझप पावलं टाकत तो पुढेच चालला होता. रानातील वर्दळ बरीच कमी झाली होती. अंधार पसरायला लागला होता. खरेतर त्याला अंधाराची खूप भीती वाटायची, पण आज बापाच्या खांद्यावर बसून जाताना ती भीती पार दूर लोटली होती. बाप जवळ असला की खरेच त्याला कशाचीच भीती वाटायची नाही. आईही बापासमोर त्याला काही बोलायची नाही. अंधार गडद होत गेला, तशी त्याची आईही दिसायची बंद झाली.
त्यानं मोठ्यानं हाक मारली. आई... . आईनं नुसतं हूूं केलं. छोटी घरातून निघातानच झोपली होती.मघाशी घरातून बाहेर पडताना दुधासाठी ती रडत होती. पण दूध घरात कुठे होतं, रडली रडली आणि झोपून गेली. अण्णा घरात आल्यावर आई खूप रडली. बराचवेळ त्याला काही कळेना. मग आई आणि अण्णा दोघे रडायला लागले, आणि आईनं छोटीला काखेत घेतलं. आणि अण्णांनी त्याला बखोटीला धरुनच खांद्यावर घेतलं.
अण्णा कुटं ! त्यानं विचारलं. गावाला त्याच्या बापानं त्याचं कुतूहल शमविण्याचा प्रयत्न केला. पण गावाला जाताना आई नेहमी तोंड धुते... त्याला त्याचा नवीन ड्रेस घालू देते पण आज यातील काहीच झाले नाही याचे त्याला आश्चर्य वाटले, पण तरीही गावाला जायचे या कल्पनेने तो आनंदून गेला.
अण्णा कवा यायचं गाव... त्यानं काकुळतीला येऊन प्रश्न केला. खरे तर त्याला भूक लागली होती, पण आईकडं काही मागायचं तर आई दिसत नव्हती. त्याचा बाप नेहमीसारखा शांत राहिला. आता अंधार मिट्ट झाला होता. मिणमिणत्या चांदण्यात काहीच दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज गहिरा झाला होता. एवढ्यात त्याला काही तरी विहिरीत पडल्याचा आवाज आला.... जोरात.... त्याला काही कळलं नाही. त्याची भूक त्याला जास्त जाणवायला लागली. त्यानं मोठ्याने आईला हाक मारली... आई भूक.... ते शब्द त्या विहिरीत घुमू लागले. त्याच्या अण्णांनी त्याच्यासकट विहिरीत उडी टाकली होती. "आई भूक' एवढेच शब्द जीवंत होते... बाकी चारही जणांचे श्वास शांबले होते.
रविवार, २४ एप्रिल, २०११
कडी जोडणारा संपादक

कडी जोडणारा संपादक
वर्तमानपत्रे आपला चेहरा गमावून बसली आहेत, अशी ओरड आता अभिजनांमध्ये सारखी होताना दिसते. संपादकांचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नाही अशा आशयाच्या चर्चाही घडत आहे. वाचकांची रुची आणि वर्तमानपत्रांना आलेले भांडवली स्वरुप या कारणांनी अभिजनांच्या या चर्चामध्ये तथ्य नाहीच असे नाही, पण तरीही काही संपादक आपला चेहरा अंकातून दाखवत आले आहेत. पण केवळ संपादकांचा चेहरा वर्तमापत्रात दिसून चालत नाही तर संपादकांमध्ये समाजाला एकवटण्याची आणि त्या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याची ताकद असली पाहिजे. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक संपादकांनी समाज एकवटण्याचे काम केले, स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रश्नांच्याबाबतीत संपादकांनी समाजाजागृती करुन त्याला दिशा देण्याचे काम केले नाहीच असे नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांचा ताजा इतिहास बघता संपादक मंडळींना हे काम जमल्याचे दिसत नाही. पण कोल्हापूरच्या 24 एप्रिलच्या पंचगंगा वाचवुया मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता ही तुटलेली साखळी जोडण्याचे काम "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीराम पवार करत आहेत हे दिसते. संपादकाला लागणारी वैचारीक बैठक त्यांची घट्ट तर आहेच पण त्याशिवाय समाजाला एकवटण्याची आणि त्याला दिशा देण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.
कोल्हापुरातील "झाडे लावा' ही मोहिम असो वा पंचगंगा स्वच्छता मोहिम या दोन्ही मोहिमांचे रुपांतर लोकचळवळीत करण्याची हातोटी आणि त्यापाठिमागचे तात्वीक अधिष्ठान पवारसर यांच्याकडे आहे. एकीकडे वर्तमानपत्रे रोजच्या घडामोडी देत असताना त्याच घडामोडींवर लिहिणारे अनेक संपादक आहेत ( ते चूकही नाही), तर दुसरीकडे आपल्याच विचारांना कवटाळून समाजातील सगळे प्रश्न त्याच चष्म्यातून बघत लिहिणारे संपादक आहेत. वेगळे विषय मांडणे आणि ते लावून धरणे हेही समजण्यासारखे आहे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी करता येईल का हे बघणे आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही गोष्ट आव्हानात्मकच नव्हे तर अवघडही आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न काय हे हेरुण तो प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनाच पुढे आणण्याची ताकद तुमच्या लेखणीत पाहिजे. पवारसर यांच्याकडे ही लेखणीची ताकद तर आहेच पण तो प्रश्न काय हे हेरण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच "सकाळ'च्या या दोन्ही मोहिमा लोकचळवळ बनल्या.
बुधवार, १३ एप्रिल, २०११
अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेला कोणीतरी ठोसा लावला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. रोजच्या "संसारिक' जबाबदाऱ्या पेलताना भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांना दिसत होता; पण त्यावर उपाय मिळत नव्हता. ए. राजा, सुरेश कलमाडी यांच्या प्रकरणानंतर तर लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडू लागला होता. त्यातच अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केले आणि लोकांचा अण्णांना पाठिंबा मिळायला लागला. इथपर्यंत सगळं ठीक चालले होते; पण इथून पुढे मात्र अनेक घटकांनी हे आंदोलन प्रभावित होत गेले. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. अण्णांच्या आंदोलनाला इंग्रजी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. यामागे केवळ या देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले पाहिजे, हा हेतू नक्कीच नव्हता. गेल्या सहा महिन्यांतील काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चा बघितल्या तर हे लक्षात येईल, की यांना हे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. ए. राजा प्रकरण असेल, सुरेश कलमाडी प्रकरण असेल किंवा विकिलिक्स प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांतून सरकारला अडचणीतच आणायचे होते, हे सहज लक्षात येते. (केंद्रातील युपीए सरकारही काही फार दिवे लावत नसल्याने या माध्यमांची भूमिका अयोग्य म्हणता येणार नाही; पण त्या पाठीमागे केवळ लोकहित हाच उद्देश नाही हे त्यांच्या आक्रस्तळेपणावरून लक्षात येते.) इथे मात्र एक मूलभूत फरक आहे. कलमाडी, राजा किंवा विकिलिक्स प्रकरणी विरोधी पक्षाने मोठा गदारोळ केला; पण लोकांचा पाठिंबा मात्र त्यांना मिळाला नाही. आता विरोधी पक्षांनी उठविलेल्या प्रश्नांना लोकांतून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या माध्यमांचीही गोची होत होती. सरकारची विश्वासार्हता कमी झालीच आहे; पण विरोधकांकडेही ती नाही, असाच संदेश जणू जनता देत होती. या दोन्हीपेक्षा तिसऱ्याच कोणीतरी हा प
्रश्न हाताळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती आणि अण्णांच्या रूपाने ती पूर्ण झाली. आता या प्रश्नाचे भांडवल करून सरकारला नमवावे, यासाठी ही माध्यमे पुढे झाली. त्यांनी अण्णांना हिरो करायचे ठरविले. चोवीस तास अण्णांच्या बातम्या दाखवून लोकांमधील असंतोष जागृत केला. लोकांना तिसरी व्यक्ती मिळाली आणि माध्यमांना नवा मुद्दा. विकिलिक्स आणि ए. राजा प्रकरणात सरकार कोसळले तर नाही; पण तरीही काही चिरा पडल्या होत्या. आता अण्णांना हिरो करून ती तोफ डागायची, याच उद्देशाने माध्यमे कामाला लागली. अण्णांच्या अनिश्चित (बेमुदत नव्हे) उपोषणाचे दिवस जसे पुढे पुढे जाऊ लागले तस तसे माध्यमांची धार तीव्र होत गेली. लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि एका वळणावर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. आता खरा प्रश्न परत निर्माण झाला आहे. आता अण्णा महानायक झाले. ते गांधीवादी विचारांचे आहेत, ते अंगावरच्या कपड्यांनीशी लढताहेत वगैरे वगैरे चर्चा झडू लागल्या. प्रश्न सुटणे महत्त्वाचे आणि तो प्रश्न सोडविणाऱ्यांना प्रतीक करून त्यांचा यथोचीत मान राखणे, हेही महत्त्वाचे असतेच. अण्णांच्या आंदोलनाबद्दल कोणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही; पण याचा अर्थ अण्णांना महानायकपदावर बसविणे हे अण्णांसाठी आणि समाजासाठीही घातक ठरेल.
विचारांची पताका हातात घेणे आणि ती घेऊन पुढे जाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींना हे दोन्ही जमले. स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण यांनाही ते काही प्रमाणात जमले (जयप्रकाश नारायण यांना गुरू मानणारे किमान डझनभर नेते दिल्लीत सरकारला हलविताना दिसतील); पण हे अण्णांना जमेल का? हा प्रश्न आहे. अण्णांकडे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी शक्ती नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या विचारांचा गोंधळच प्रचंड आहेत. बौद्धीक क्षमतेविषयी कोणी जर आक्षेप घेत असेल, तर त्यामागील असूया आणि निगरगट्टपणा सोडून त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण, अशा माणसांना देव्हाऱ्यात ठेवून आपला कार्यभार करणारे निर्माण होतात (इथे तर ते झाले आहेतच) आणि आंदोलनाची दिशा दाखविणे, बघून घेणे, अडचणीतच आणणे या पातळीवर येते. त्याचबरोबर देव्हाऱ्यातील या महानायकालाही आपण खूप मोठे आहोत असा भास होतो आणि तो वेगवेगळ्या मागण्या करू लागतो. या मागण्या बहुंताशवेळा व्यवहारवादाच्या पलीकडच्या असतात आणि मग समाजासाठी रणांगणात उतरलेला महानायक समाजाचेच नुकसान करायला लागतो. त्यांचे शिष्य त्यांच्या विचारांना विरोध म्हणजेच समाजावादाला, पुरोगामित्वाला विरोध, देशाला विरोध अशा आवया उठवायला लागतात. त्यामुळेच अण्णांना महानायक करणे समाजाने पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे.
अण्णांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात कुठे गांधीवाद दिसत नाही. गांधीजी ज्या प्रकारे आंदोलन करायचे त्यालाच गांधीवाद समजायचा का? गांधीवाद हा विचारांचा आणि आचारांचा एक मार्ग आहे. एका बाजूला अण्णा फाशी द्या, गोळ्या घाला अशा पद्धतीचे आवाहन करताहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधीवादी म्हणवून घेताहेत. अरे गांधींना तलवारच मान्य नव्हती आणि हे तर तलवारीच्या म्यानेत गांधीवाद कोंबताहेत. प्रश्न केवळ तलवार किंवा फाशीची गोष्ट करण्याबाबत नाही, तर प्रश्न आहे त्या विचारांची अधिष्ठान असण्याचे. एक क्षणभर आपण मानू की काय फरक पडतो, की ते गांधीवादी आहेत की नाही याचा. भ्रष्टाचारविरोधी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपला प्राणही पणाला लावला होताच की. त्यांच्या प्राण पणाला लावण्याबद्दल आक्षेप नाही किंवा त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेबद्दलही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो त्यांच्याभोवती जमत असलेल्या जळमटांबद्दल. ही जळमटे वाढली, की त्यात समाजाचाच श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. नेत्याकडे अशी जळमटे बनू न देण्याची ताकद असायला हवी. दुर्दैवाने ती अण्णांकडे नाही. त्यामुळे ते दीर्घकालीन मोठे आंदोलन उभे करू शकत नाहीत. अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...
रविवार, ३ एप्रिल, २०११
सोळा सहस्रातील स्त्री
तुमचं कृष्णाचं काम खूप सुंदर झालं. मला तुमचा अभिनय खूप आवडतो.
त्यानं उगाच हसण्याचा प्रयत्न केला. आभारी आहे, अशा अर्थाने त्याने मान हलविली.
ती बाई तिथेच उभी राहिली... त्याला तिचे तसे उभे राहणे अस्वस्थ वाटू लागले.
तुम्ही बसा ना?
तिही थोडी संकोचली होती; पण बसली. ती बसल्यावर त्याला आपण उगाचच तिला बसायला सांगितल्याचे वाटून गेले.
तुमच्याकडे बघितल्यावर कृष्ण तुमच्यासारखाच दिसत असेल असे वाटते हो?
""नाही हो हे तुमचे प्रेम आहे. रंगांची पुटं चेहऱ्यावर चढवून कृष्ण रंगवणारे आम्ही बहुरुपी. त्या योगेश्वराचे रुप कुठे यायचे आम्हला.''
त्याचे ते थोडे लांबलेले वाक्य ऐकून ती थोडी सैल झाली. तिथेच व्यवस्थित बसत तिने त्याच्याकडे बघितले. तो थकला होता; पण तरीही त्या बाईचे तिथे बसणे त्याला खुपत नव्हते. ती काही फार सुंदर म्हणावी अशी नव्हतीच. खरे तर थोडी सावळी होती. चाळीशी पार केली असेल; पण निटनेटक्या कपड्यांमुळे ती थोडी आकर्षक वाटत होती.
""पण तुमच्यातील राधाकृष्णच योगेश्वर कृष्णापेक्षा जास्त भावतो. त्या शेवटच्या प्रसंगातील यादवीने असह्य झालेल्या कृष्ण नाही बघवत.''
""पण खरे तर तोच कृष्ण खरा की... असह्य, दुर्बल तो कुठे योगेश्वर आहे. महाभारताच्या युद्धा वेळी अर्जुनाला उपदेश सांगणारा, पांडवांसाठी शिष्टाई करणारा आणि जरासंधाचा वध करण्यासाठी भीमाला प्रोत्साहित करणारा कृष्णच तो राधाकृष्ण.'' तो खाली बसला. त्या बाईंकडे त्याने आणखी एकदा निटस् बघितलं, कुठे ओळख लागते का बघण्यासाठी मेंदूच्या शेवटच्या पेशीपर्यंत ताण दिला; पण कुठेच संदर्भ लागला नाही.
""तुम्ही अनेक भूमिका केल्या; पण तरीही वीस वर्षांपूर्वीचे हे नाटक तुम्हाला अजून का करावे वाटते.''
तसा तो अबोल, खूप कमी बोलायचा. कोणी पत्रकाराने वैगेरे काही प्रश्न विचारले तरी तो जास्त काही नाही बोलायचा. त्याच्या मुलाखतीही खूप जणांनी घेतल्या; पण त्या शाळा-कॉलेजांत अर्ज भरून द्यावा तश्याच स्वरूपाच्या. अलीकडे तर तो काही बोलायचाच नाही. त्याच्या जुन्या मुलाखतींनाच नव्या स्वरूपात पत्रकार सादर करायचे. कधी काळी काही मते त्याने मांडलेली असायची; पण ती आज पुरती बदललेली असायची तरीही ती मते त्याच्या नावावर वर्तमानपत्रे खपवायची. त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. आता त्या मतांनाही किंमत फक्त काही मिनिटांच्या मनोरंजनाची आहे हे त्याला कळले होते. पण आज या बाईंशी बोलावं असं त्याला वाटू लागलं. कुठे तरी समानधागा असेल याची त्याला खात्री वाटू लागली.
तुम्हाला माझा प्रश्न आवडला नाही का?
त्या बाईंच्या अर्जवी आवाजाने तो भानावर आला.
""तसं काही नाही. या नाटकातील कृष्ण मला फार आवडतो. तो माझा वाटतो. नटाच्या आयुष्याची शोकांतिका हीच असते तो अनेक भूमिका करतो. अनेकांची चरित्र पडद्यावर किंवा रंगमंचावर मांडतो; पण स्वतः मात्र कोरडाच राहतो. या कृष्णाच्या भूमिकेत मला माझं पण दिसतं. खरे तर मला या भूमिकेच्या तालमीच जास्त करायला आवडतात. त्या आपल्यासाठी असतात ना? त्या भूमिकेतून बाहेर यावं असं वाटतचं नाही; पण तालमी केल्यानंतर नाटक रंगमंचावर यायलाच पाहिजे नाही तर इतरांची पोटे कशी भरणार म्हणून हे नाटक रंगमंचवर येते एवढेच.''
म्हणजे मला नाही समजलं. त्या योगेश्वर कृष्णात आणि तुमच्यात साम्य आहे असं वाटतं की काय?
नाही ओ. त्या योगेश्वर कृष्णात आणि माझ्यात काही साम्य शोधायचे म्हणजे असंख्य सूर्याने व्यापलेल्या आकाशात आणि आपल्यात एखाद्या काजव्याने साम्य शोधावे तसेच आहे. ''
मग तरीही तुम्हाला कृष्णात साम्य वाटतेच की.
हो पण त्या योगेश्वर कृष्णात नाही. तुम्हाला त्या नाटकातील एक प्रसंग आठवतो. नरकासूर वधानंतर कृष्ण त्या सोळा सहस्त्र स्त्रियांना आपलेसे करतो. त्या रात्री कृष्णाला झोप लागत नाही. आपल्या महालात येरझाऱ्या घालणाऱ्या त्या कृष्णाकडे त्या सोळा सहस्र स्त्रियांतील एक धीट स्त्री येते.
हो... आठवते. तोच एक तर प्रसंग मनाच्या कुपीत कायम ठेवलाय... त्या एका प्रसंगासाठीच तर मी हे नाटक अनेक वेळा बघितले. बघते आहे... त्यातील शब्द अन् शब्द तोंड पाठ आहे... ती म्हणते...
कृष्णा तुझी बेचैनी कळते रे...सहस्त्र स्त्रिया मिळूनही तू तसा कोरडाच की. खरे तर तू त्या राधेच्या प्रेमपाशातून मुक्त झालाच नाही, होणारही नाहीस.. तू गोकुळ आणि मथुरा सोडून इथे आलास त्यामागे राधेला विसरणे हेही होतेच की. पण ते तुला काही जमले नाही. राधेला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे. तुझ्या पराक्रमात, तुझ्या शिष्टाईत, तुझ्या साऱ्या गुणांतून राधाच तर दिसते. राधेला तुझ्यातून वेगळे केले की तू तुझा उरतोस कुठे. त्यामुळे आज तुला झोप लागणार नाही, तशी झोप मलाही लागणार नाही.
माणुसकीच्या नात्याने तू आम्हाला जवळ केलंस. तुझ्या राज्यात आम्ही तुझ्या बायका म्हणूनही फिरू. नकासुराच्या राज्यात ज्या बंदीवासात आम्ही होतो त्यापेक्षा निश्चितच तुझ्या राज्यात आम्हाला मोकळीक मिळेल. तुझ्या नावाच्या कुंकवामुळे समाजात मानही मिळेल; पण तरीही आम्ही तुझ्या नाही होऊ शकणार. खरे सांगू कृष्णा त्या बंदीवासापेक्षा ही मोकळी हवा फार लागते रे. नरकासुराच्या बंदीशाळेपेक्षा तुझा महाल मोठी बंदीशाळा वाटते. नरकासुराने केलेल्या यातनांचे काही वाटायचे नाही.. तुझी मूर्ती डोळ्यासमोर आली की सगळ्या वेदना सुसह्य व्हायच्या. तू येशील ही आशा होती आणि या सगळ्यातून तू आम्हाला बाहेर काढशील, या आशेवरच तर जगत होतो आम्ही; पण तू आलास आणि ती आशाही आमच्याकडून तू हिरावून घेतलीस. आता आम्ही तुझ्या आहोत आणि तू मात्र आमचा नाहीस. ... आता जगायचं कसं. तुझंही असंच होईल. राधेच्या विचाराशिवाय तुला जगायला येणारच नाही.''
तो त्या बाईंकडे बघत राहिला. त्याला एकट्यालाच वाटायचं हे नाटक माझ्यासाठीच लिहिलं आहे. प्रत्येक पात्र माझ्याच भावना बोलत आहे; पण त्या बाईंकडे बघितल्यावर त्याला वाटले हे नाटक माझे एकट्याचे कुठे आहे. त्या बाईतील आणि कृष्णाने मुक्त केलेल्या त्या सहस्र स्त्रियांतील अंतर पार मिटून गेल्याचे त्याला वाटले.
शुक्रवार, १ एप्रिल, २०११
एक भूत हवे आहे..... चमत्कारासाठी

संघाला चार धावांची गरज. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अस्वस्थ हीरो खेळपट्टीवरून क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत असतो... प्रेक्षकांत शांतता... हिरॉईन हात जोडून देवाचा धावा करत असते. व्हिलन जो गोलंदाजी करत असतो तो शोएब अख्तरच्या स्पीडने धावत येतो.. (बऱ्याच वेळा एवढा वेळ हा का धावतोय असा प्रश्न पडावा


इतका वेळ तो एक चेंडू टाकायला घेतो)... तो चेंडू टाकतो... हीरो बॅट घुमवतो. चेंडू उंच आकशात जातो... क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूखाली येतो आणि तो झेल पकडतोही; पण त्याचा एक पाय सीमारेषेबाहेर... अंपायर षटकार असल्याची खूण करतो आणि एकच जल्लोष... हिंदी चित्रपटात असेच थोडेफार बदल केलेले प्रसंग अनेक वेळा चितारलेले आहेत. प्रेक्षकांना खात्री असते की काहीही झाले तरी (म्हणजे तेथे आपल्या हीरोची फलंदाजी व्यंकटेश प्रसादसारखी असो आणि व्हिलनची गोलंदाजी मॅकग्रासारखी असली तरीही) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हीरो तो सामना जिंकून देणारच. प्रेक्षकही हा खरोखरचा सामना असल्यासारखे शिट्या वाजवून आपल्या हीरोने कशी जिरवली, म्हणत सिनेमागृहातून बाहेर पडतात.
भारतीय सिनेमा आणि क्रिकेट विश्व या दोन्ही गोलांच्या अनेक कड्या एकमेकांत मिसळल्या आहेत. क्रिकेटपटूंची आणि बॉलिवूड तारकांची अफेअर ही यातील एक कडी; पण ही कडी वगळूनही अनेक कड्या या दोन गोलांना एकत्र करतात. मग क्रिकेपटूंचे सिनेमात काम करणे असो वा नट-नट्यांनी क्रिकेट मॅच खेळणे असो; पण भारतीय सिनेमांत क्रिकेटचे प्रतिबिंब ठळकपणे पडले आहे.
भारतीय सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर चालणाऱ्या गणितांवर जास्त निर्माण केला जातो. त्यामुळे बाजारात जे चालते ते ते सगळे सिनेमात आणण्यासाठी काही निर्माते-दिग्दर्शक जिवाचा आटापिटा करतात. त्यामुळे ज्या देशाचा धर्मच क्रिकेट बनलेला आहे त्यामुळ क्रिकेटला 70 एमएमवर न आला असता तरच नवल. भारतीय सिनेमातही क्रिकेट अनेक अंगाने येत गेले. कधी ते कथानकाचा मुख्य भाग म्हणून तर कधी उपभाग म्हणून. अगदी काही वेळा त्याचा ओझरता उल्लेख; पण क्रिकेट भारतीय सिनेमात योग्य अंतरांनी येतच राहिले आहे. "इक्बाल', "ऑलराऊंडर', "लगान', "पटियाला हाऊस', "चेन कुली की मेन कुली', "दिल बोले हडीप्पा' यांसारख्या चित्रपटांचा मुख्य कथाभाग हा चित्रपटाभोवतीच गुंफला होता, तर "मासूम', "हम आपके है कोन', "मुझसे शादी करोगी', "चक दे इंडिया' यांसारख्या चित्रपटांत काही सेकंदांपुरते का होईना; पण क्रिकेट येऊन गेलेच.
ऑल राऊंडर ः भारताने 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण भारतात दिवाळी साजरी झाली. क्रिकेटचा फिव्हर एवढा होता की तो कॅश करण्यासाठी ऑल राऊंडर हा चित्रपट काढला. ज्याला अभिनयाचा एक पैलूही माहिती नव्हता अशा कुमार गौरवला अष्टपैलूची भूमिका मिळाली. लव्हस्टोरीच्या यशातून अजून कुमार गौरव बाहेर पडला नव्हता; पण लोकांनी या ऑल राऊंडरला नाकारले.
मालामाल ः हा खरे तर संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित चित्रपट नव्हता. या चित्रपटात नसिरुद्दीन शाहने क्रिकेटपटूची भूमिका केली होती. यामध्ये आता ज्याप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेट संघ स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला आहे त्याप्रमाणेच नासिरुद्दीन शहांना हा सामना गमवायचा होता. खरे तर या चित्रपटाची खरी प्रसिद्धी झाली ती भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यामुळे. नसिरुद्दीन शहा यांच्या सोबतीने तेही या सामन्यात दिसले होते.
अव्वल नंबर ः 1990 मध्ये आलेला हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलेच नाही. मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ज्या अमीर खानला संबोधले जाते तो या चित्रपटाचा हीरो. चित्रपट देव आनंदचा. त्यामुळे देव आनंद यांच्या चित्रपटात जे जे असते ते ते सगळे या चित्रपटात बघायला मिळते. विशेष म्हणजे त्यानंतर काही काळ आमीरवर तो देव आनंदसारखा अभिनय करतो अशी टीकाही झाली होती. आदित्य पांचोलीही या चित्रपटात होता; पण चित्रपटच लोकांच्या लक्षात नाही तिथे आदित्य पांचोली कोठून राहणार.
चमत्कार ः 1992 मध्ये आलेला हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी लोक काही वेळ का होईना; पण रिमोट बाजूला ठेवतात. या चित्रपटाचे रसायनच काही भन्नाट बनले आहे, की आजही हा चित्रपट बघायला आवडतो. शाहरूख या चित्रपटात जेवढा इनोसंट वाटला तेवढा पुन्हा कधीच वाटला नाही. नसिरुद्दीन शहा यांचे भूत आणि या चित्रपटातील क्रिकेट मॅच हे दोन्हीची खिचडी मस्त जमली आहे. आजही जेव्हा कधी भारतीय संघ संकटात सापडतो त्या वेळी सिनेमाप्रेमी लोक देवाचा धावा करण्याऐवजी नसिरुद्दीन शहाचाच धावा करतात. नसिरुद्दीनचे भूत हीरोच्या संघाला अशा काही विचित्र स्थितीतून बाहेर काढते ते खरे तर पडद्यावरच बघायला पाहिजे. बाकी या चित्रपटात शाहरूख खानने प्रशिक्षकाची भूमिका केली आहे; पण हा चित्रपट संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित नाही.
लगान ः 2001 मध्ये आलेला लगान चित्रपटाची कथा कोणा एका क्रिकेटपटूवर आधारित नव्हती, तर चित्रपटाचा आत्मा क्रिकेटच होता. अव्वल नंबरमध्ये मिळालेले अपयश आमीरने या चित्रपटात धुऊन काढले. आतापर्यंत एवढे यश कोणत्याही क्रिकेटपटाला मिळाले नव्हते, एवढे यश लगानने मिळविले. ब्रिटिश इंडियातील एका न झालेल्या सामन्यावर या चित्रपटाची कथा बेतली होती. तीन तासांहून अधिक काळ लांबी असूनही "लगान'ने तुफान यश मिळविले.
स्टंप्ड ः 2003 च्या विश्वचषक स्पर्धेचा फिव्हर कॅश करण्यासाठी निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या दांड्या बॉक्स ऑफिसवर अशा काही उडाल्या, की निर्माता नंतरचे काही दिवस रात्री क्रिकेट क्रिकेट... म्हणत जाबडत उठला असेल. चित्रपटात दम नव्हताच. केवळ धंदेवाईक दृष्टीने निर्माण केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी ग्राहक या दृष्टीने बघत नाकारले. सलमान खानने या चित्रपटात रविना टंडनच्या इच्छेखातर एक आयटम सॉंग केले होते, एवढीच या चित्रपटाची जमेची बाजू.
इक्बाल ः एका मूक-बधिर आणि तरीही क्रिकेटचे प्रचंड वेड असलेल्या मुलाची ही कथा. चित्रपटातील मुख्य कथानक आणि उपकथानकेही क्रिकेटभोवतीच फिरतात. श्रेयस तळपदेने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे दार ठोठावले. नसिरुद्दीन शहा आणि क्रिकेट यांचे काय नाते आहे माहिती नाही; पण याही चित्रपटात नसिरुद्दीन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. या चित्रपटाला समीक्षकांनी प्रचंड उचलून धरले.

चेन कुली की मेन कुली ः या चित्रपटात एका मुलाला एक बॅट मिळते. त्याच्यातील गुणांपेक्षा तो त्या बॅटवरच जास्त विसंबून राहतो. त्याला वाटत असते, की त्या बॅटमध्ये काही तरी जादू आहे. सचिन तेंडुलकरचा या चित्रपटात उल्लेख नाही; पण झईन खानला निवडताना तो थोडासा सचिनसारखा दिसतो म्हणूनच निवडले आहे हे जाणवते. सचिनही अवघ्या सोळाव्या वर्षी संघात आला तोच संदर्भ घेऊन हा चित्रपट केला आहे.
से सलाम इंडिया ः 2007 मध्ये भारतीय संघाचे वर्ल्डकपमध्ये जे झाले तेच या चित्रपटाचे झाले. भारतीय संघ वेस्ट इंडीजला गेला कधी आणि आला कधी हे जसे लोकांना कळले नाही; तसेच से सलाम इंडिया हा चित्रपट कधी लागला आणि कधी गेला कळले नाही. चित्रपटात संजय सुरीने काम केले होते. चित्रपट बरा होता; पण त्याची प्रदर्शनाची वेळ चुकली.
दिल बोले हडिप्पा ः राणी मुखर्जीने या चित्रपटात फलंदाजाचे काम केले आहे. एक मुलगी मुलगा बनून भारतीय संघात खेळते या आशयावर चित्रपट होता. चित्रपटात काहीच नव्हते. राणीला बघायला जावे तर दाढी आणि मिशीतील राणीही बघवत नव्हती.

पटियाला हाऊस ः ज्या ज्या वेळी वर्ल्ड कपचा फिव्हर कॅश करण्यासाठी क्रिकेट चित्रपटात आले त्या त्या वेळी लोकांनी ते नाकारले. खरे क्रिकेट बघायला मिळत असताना कोणी हे फालतू क्रिकेट का बघावे; पण नाही तरीही निर्मात्यांना याच वेळी चित्रपट काढण्याची भारी हौस. पटियाला हाऊस कधी आला आणि कधी गेला ते अक्षयकुमारलाही कळले नाही.
ही काही प्रतिनिधीक उदाहरणे याबराबरच अनेक चित्रपटांतून क्रिकेट आले. कधी क्रिकटपटूंवर, तर कधी पैजेतून तर कधी मॅच फिक्सिंगसारख्या विषयातून भारतीय सिनेमात क्रिकेट येत राहिले आणि यापुढेही ते येतच राहील.
सोमवार, १४ मार्च, २०११
ठिपका.....
त्याने थरथरत्या हाताने कपाटातील कागद काढले. ते पिवळसर कागद त्याने एकदा नाकापाशी नेले आणि जोरात श्वास घेतला. त्याची ही जुनी सवय, केव्हा लागली कोणास ठावूक. आता त्याची पहिली कादंबरी येऊनही 50 वर्षे उलटली असतील, मग दुसरी, मग तिसरी.. किती कादंबऱ्या, नाटके, लघुकथासंग्रह येत राहिले, त्याचे आकडे त्याचे चाहते मोजत राहिले, हा मात्र लिहित राहिला. अनुभवांना आणि कल्पनांना अगदी चंदनाचे लेप लावत लिहीत राहिला. पण काहीही लिहायला बसले की पहिल्यांदा कोऱ्या कागदांचा गंध श्वासात भरुन घ्यायची त्याची सवय सुटली नाही. नंतर नंतरच्या काळात तर त्याला अनेकांनी सल्ले दिले, की असे कागदावर लिहित राहू नका. संगणकाचा वापर कर, पण त्याने ते फारसे मनावर घेतले नाही. शाई पेनातील पहिला शब्द जेव्हा कागदारवर उमटतो, त्यावेळेचा आनंद कळपटावरच्या कळा दाबून येणार नाही, असे त्याचे म्हणणे असायचे. दोन वर्षांपुर्वी झालेल्या अपघातानंतर मात्र त्याचा आणि पेन-कागदांचा संबंध तुटलाच होता. हॉस्पीटलमधुन घरी आल्यावर तो अनेक दिवस बेडवर पडूनच होता. डोक्यात कल्पनांचे डोंगर तयार होत नव्हते असे नाही, पण थकलेल्या गात्रांना ते डोंगर उचलायचे सामर्थ्यच राहिले नव्हते. कित्येकदा त्याचा त्याला त्रास व्हायचा. कल्पनांचे डोंगर आपल्या अंगावर कोसळून त्यात गुदमरुन जातोय की काय, असे त्याला वाटत राहायचे. मग तो बडबडायचा, हातवारे करायचा.. मोठ्याने ओरडायचाही. त्याच्या आजुबाजुचे लोक मग चिडायचे. कोणी म्हणायचे त्याला वेड लागलंय, तर कोणी म्हणायचे तो बोलतो त्यात दैवी काही तरी आहे, त्याला समजायचे ते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला ना वेडा म्हणवून घ्यायचं होतं, ना कोणी अवतारी पुरुष. तो बडबडायचा. झाडांशी, ढगांशी, पक्ष्यांशी कोणाशीही बोलत राहायचा, कल्पनांचे डोंगर विरघळेपर्यंत तो बोलायचा. ते डोंगर विरघळले की मग तो हलका व्हायचा आणि शांत झोपी जायचा. बेडवरुन तो खाली आला तरी त्याने लिहणं सुरु केलं नव्हतं. आता लेखक म्हणून संन्यास घ्यावा असा विचार डोक्यात यायचा पण मन त्याला विरोध करत राहायचे.लिहिण्यासाठीचा मनाएवढा उत्साह गात्रांत राहिला नव्हता. तरीही मन त्याची पाठ सोडत नव्हते.
..................................
भेटवस्तू हा असा प्रकार आहे की, जो आपण पुढच्या माणसाला सांगतो की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस. त्यात त्याची किंमत देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर असते. आपल्याकडची सर्वात लाडकी गोष्ट त्याच व्यक्तीला दिली जाते जो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते, मग पैशाच्या बाजारात तिची किंमत काहीही होवो. अगदी असेच. स्वप्नांना सत्यात उतरायला निघालेल्या माझ्या मित्राला माझी ही नवी कोरी कथा भेट. happy journy...
रविवार, २० फेब्रुवारी, २०११
युतीचा नवा खेळ



भारतीय जनता पक्ष असो वा शिवसेना या दोन्ही पक्षांना आता युती स्वबळावर सत्तेत येईल याबाबत आत्मविश्वास उरलेला नाही. जोपर्यंत दलित समाज युतीबरोबर येत नाही, तोपर्यंत युतीला बहुमत मिळणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. शिवसेनेला आगामी मुंबई महापालिकेसाठी रामदास आठवले पाहिजे आहेत, तर भाजप लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अपेक्षित धरून चालला आहे. त्यामुळे भाजपला आता कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून स्वतःचे आणि मित्रपक्षांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठीच मुंडेंची बांधणी सुरू आहे.
लो कसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी आहे. गेल्या निवडणुकांत काय चुका झाल्या, याचे आत्मपरीक्षण सर्वच पक्षांनी केले आहे. तरीही आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यासारखी विधाने विरोधी पक्षांच्या नेत्याकंडून होत आहेत. यात विरोधी पक्षाची ताकद वाढविण्याचा जसा प्रयत्न आहे, तसाच सत्ताधाऱ्यांच्या मनातही चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत मनसेशी युती करणे कसे गरजेचे आहे, हे आकडेवारीनिशी सांगितले. त्याचदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या गणिताबाबत चर्चा रंगू लागली आहे. खरे तर भीमशक्ती- शिवशक्ती एकत्र येण्याची गोष्ट काही नवी नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आहेत आणि त्या वेळीही केवळ चर्चाच रंगली होती. त्यानंतरही रामदास आठवले ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होते, त्यांच्यासोबतच राहिले आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा हे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होणारच नाही असे नाही; पण मागच्या वेळीपेक्षा या वेळी ही युती होण्याच्या दिशेने रंकाळ्याचा नंदी एक तांदूळ पुढे सरकला आहे, हे निश्चित.
शिवसेनेला आता गरज आहे मुंबई महापालिका जिंकण्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला विरोधात मनसे असल्याने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विरोधातील ताकद जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबई ही शिवसेनेची पेढी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई जिंकायची आहे.
मुंबईतील दलित मते मिळविण्यासाठी रामदास आठवलेंची शिवसेनेला गरज आहे. (त्यासाठी ते काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याच्या तयारीतही आहेत.) रामदास आठवले जर शिवसेनेला मिळाले तर निवडणुकीची ही प्रश्नपत्रिका सोपी जाणार नसली तरी त्यातील दोन-तीन प्रश्नांची उत्तरे अगोदरच माहीत असल्याने प्रश्नपत्रिकेला सामोरे जातानाचा आत्मविश्वास वाढेल, यात शंका नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवलेंची गरजच आहे. याच वेळी रामदास आठवलेंनाही लोकसभेचा पराभव जिव्हारी लागला आहे. आघाडीशी युती करूनही आपल्याला काहीच मिळाले नसल्याची भावना त्यांची तीव्र झाली आहे. हीच भावना कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांतही आहे. ग्रामीण पातळीवर काम करत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी-कॉंग्रेसने गृहीतच धरले आहे. त्यामुळे त्यांनाही आघाडीशी संबंध नकोसे झाले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मेळ रिपब्लिकन विचारांशी बसत नसला तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत हा मेळ बसू लागला आहे. त्यामुळे समान कार्यक्रम ठरवून एकत्र यायला हरकत नाही, अशीच भावना दलित कार्यकर्त्यांची आहे. आगामी विधानसभा निवडणुका व्हायच्या तेव्हा होवोत; पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुंकाअगोदर ही युती झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांत युतीच्या बळावर आपली ताकद वाढेल, असा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे. तरीही रामदास आठवलेंना आपल्यासोबत घेण्यासाठी युतीच्या नेत्यांना दोन पावले मागे यावे लागेल, हे निश्चित!
मनसेबाबत गोपीनाथ मुंडेंनी युतीचे केलेले वक्तव्य आणि राज ठाकरे यांनी त्याबाबत केलेला इन्कार दोघांच्याही राजकारणाचा भाग आहे. मुंडे आता दिल्लीत असल्याने दिल्लीतल्या वाऱ्याप्रमाणे ते बोलतात आणि राज ठाकरेंना दिल्लीतल्या वाऱ्यापेक्षा मुंबईचे खारे वारे जास्त प्रिय आहे. केंद्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडल्याने हे सरकार कधी कोसळते, अशी वाट भाजप बघत आहे. त्यामुळेच कोहाळा पडला तर काय काय करायचे, याची रणनीती ते आतापासून बनवायला लागले आहेत. आज मनसे युतीसोबत नसली तरी उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने युतीत सहभागी व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. (त्यामुळेच रविशंकर यांनी मनसेबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील न म्हणता एनडीए घेईल, असंच म्हटलं आहे.) पण यात एक फरक आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र यावी, ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जशी इच्छा आहे, तशीच ती त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. त्या प्रमाणात भाजप-मनसे एकत्र येण्यास मनसेचे ना नेते इच्छुक आहेत ना कार्यकर्ते.
बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११
हे डोळे पुन्हा दिसणार...

तिच्या डोळ्यांनी घायाळ झालेल्यांची संख्या कमी नाही। अगदी अख्खा चित्रपट तिच्या डोळ्यांसाठीच बघणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. तिने नुसती पापण्यांची उघडझाप केली, तरी अनेक थांबलेली हृदये धडधडायची. अगदी तिच्या चेहऱ्यावरची रेघ बघता बघता मरण यावं, अशी इच्छा बाळगणारे कमी नव्हते, नाहीत. कोमेजलेली फुलेही तिच्या हसण्याने पुन्हा टवटवीत व्हायची. ती मीनाक्षी होती, ती रोहिणी होती, ती नूतन होती. नूतन यांचे टपाल तिकीट टपाल खाते प्रकाशित करणार आहे. आपले बोलके डोळे रूपेरी पडद्यावर ठेवून गेलेल्या या अभिनेत्रीची आठवण राहावी म्हणून हे टपाल तिकीट खचितच नाही, तर तो टपाल खात्याचा सन्मानच आहे."नूतनचा चेहराच एक अभिनयाचे व्यासपीठ होते. आजही जेव्हा तिचे चित्रपट बघतो, तेव्हा तिच्या चेहऱ्याशिवाय नजर दुसरीकडे वळत नाही' नाना पाटेकरसारख्या स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या अभिनयसम्राटाचे हे उद्गार नूतन यांचा गौरव अधिकच अधोरेखित करतात. नूतन यांचा मुखाभिनय त्यांच्या डोळ्यांतून प्रवाहित होत होता. त्यांचे हरिणीसारखे डोळे आणि पातळ ओठ एखाद्या सामान्य प्रसंगातही प्राण भरायचे. स्मिता पाटील, तब्बू किंवा दीप्ती नवल या नूतन यांच्या अभिनयाच्या विस्तारकच वाटतात. "बंदिनी' हा नूतन यांचा प्रचित्रपट. यात प्रत्येक फ्रेममध्ये नूतन नव्याने भेटतात. डोळ्यांतील भाव इतक्या सहजतेने बदलतात, की प्रेक्षक त्या डोळ्यांभोवतीच घुटमळत राहतो. एकीकडे त्यांचे ते पातळ ओठ थरथरत निशब्दता व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांचे डोळे ती निशब्दतेला चिरून ओरडत राहतात. त्यांच्या याच अभिनयावर बेहद्द खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी मी "कर्मा'पूर्वी नूतन यांच्याबरोबर चित्रपट का केला नाही, असा स्वत:ला प्रश्न विचारतात. दिलीप कुमार असो वा अशोक कुमार किंवा अमिताभ यांच्यासोबतच्या फ्रेम नूतन यांचा मुद्राअभिनय ठळकच होत नाही तर तो सहकलाकाराच्या चेहऱ्यावरचा चेहरा बनून जातो.संकोच, प्रेम, माया, हुरहूर हे भाव डोळ्यांतून अगदी सहजपणे उतरत होते. "मै तो भूल गयी बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे', हे गाणे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा या मुद्रेला टपाल खात्याने मुद्रित केले नसते तर नवलच; पण नूतन यांच्या तिकिटावर शिक्का मारताना पोस्टमनचे डोळे मात्र भरून येणार, हे निश्चित!
शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११
रेल्वे स्टेशन
एवढाच शब्द त्या पोरीनं उच्चारला आणि त्याच्यासमोर तिने हात पुढे केला. पहाटे साडेतीन-चारची वेळ.
रेल्वे स्टेशनवर त्याच्याबरोबर उतरलेले, घराकडे लगबगीने चाललेले प्रवासी, चहावाल्या पोरांच्या आरोळ्या.. पेपर स्टॉलवर मोठ्याने लावलेला रेडिओ.. रिक्षावाल्यांची येणाऱ्या प्रवाशांकडे कुठे जाणार म्हणून विचारपूस. या गर्दीत भिकारी नव्हतेच. नव्हते म्हणजे ते भीक मागत नव्हते. झोपलेली, पेंगाळलेली भिकाऱ्यांची पोरे आणि बाया अस्थाव्यस्थ पडल्या होत्या. अशा या पहाटेच्या वेळी हात पुढे केलेली ती बारा-तेरा वर्षांची पोरगी अस्वस्थ करत होती. अंगात कुठल्याशा शाळेचा युनीफॉर्म होता. पण तो इतका मळला होता, की तो नेमक्या कोणत्या शाळेचा हेच कळत नव्हतं. हातात कंडे, केस विस्कटलेले आणि मातीने माखलेले. गाल खोल गेलेले, अगदी बरेच दिवस काही खाल्लं नसल्यासारखे. बरेच दिवस झोप नसल्यासारखे डोळे तारवटलेले आणि पोटातील भूकेमुळे लाचार झालेले. तिची ती नजर आणखी अस्वस्थ करत होती.
चल हट यहॉं से!
बहुतेक त्याची अस्वस्थ नजर बघून चहावाल्याने तिला हटकलं. पण ती हलली नाही. आपली लाचार दृष्टी आणखी लाचार करत ती त्याच्याभोवती घुटमळत राहिली. त्याने खिशात हात घातला, काही नाणी हाताला लागतात का बघायला, पण हात रिकामा वर आला.
तू चहा पिणार?
त्याच्या या प्रश्नावर ती काही बोलली नाही. पण हललीही नाही. हिला एक चहा दे.. चहावाल्याने आपल्या ठेवणीतील एक कप काढला आणि तिच्यापुढे चहा ओतला. ब्रेड खाणार...तिने नकार दिला नाही. चहावाल्याने न सांगताच ब्रेड काढला आणि तिच्या हातात दिला. तिने तो अगदी आधाशासारखा खाल्ला. पुन्हा तिने हात पुढे केला नाही. अजून उजाडायला दोन तास अडिच तास अवकाश होता, तोपर्यंत त्याला स्टेशनवरच थांबावे लागणार होते. तिथल्याच एका बाकड्यावर त्याने बॅग ठेवली आणि प्रवासाने थकलेल्या अंगाला त्या बाकड्यावर अक्षरशः सैल सोडलं. डोळ्यातील झोप चहाने कमी झाली नव्हती, त्याने जोराची जांभई दिली. एवढ्यात ती पोरगी त्याच्याजवळ येऊन बसली. ती जवळ बसल्यावर त्याला काही सुचेना. बॅगेत फारसे सामान नव्हतेच पण आहे, ती बॅगही चोरीला गेली तर या अनोळखी शहरात फार पंचायत व्हायची म्हणून त्याने ती मांडीवर ठेवली. पोरीच्या ते लक्षात आलं असावं, त्यामुळे तिने नजर फिरवली. तो काही बोलला नाही. बसून राहिला. तीही काही बोलली नाही. बराच वेळ गेल्यानंतर तीची चूळबूळ सुरु झाली.
सुटे पैसे नाहीत माझ्याकडे, तिच्यापासून सुटका करण्यासाठी तो बोलला.
""नको दादा, पैसे नको मला.''
मग काय? जा इथून निघून. मला थोडं झोपायचं आहे.
ती काही बोलली नाही, पण तिथून निघूनही गेली नाही. बाकड्याच्या कोपऱ्यावर बसून ती बाकड्याचा हात टोकरत राहिली.
आई-बाबा कोणी आहे का नाही? तिची अस्वस्थता सहन न होऊन तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
त्याच्या या प्रश्नासरशी ती गडबडीने मागे सरकली. त्याच्याकडे बघत म्हणाली.
आहेत की.
मग तू इथे काय करते आहेस.
घरातून पळून आले आहे?..
काय म्हणतेस काय? त्या प्रश्नाने तो उडाला. आता त्याला ती भिकारी वाटेनाशी झाली. आपल्यासारखीच कोणीतरी चांगल्या घरातील मुलगी ही भावना त्याला सुखावून गेली.
का आलीस पळून... मघापेक्षा त्याच्या बोलण्यात आलेला तो ओलावा. तिला जाणवला पण लगेच ती सावरली. मघाशी मागे सरलेली ती पुन्हा पुढे सरकरली, तिने बाकड्याचा कडा आणखी घट्ट पकडला.
त्याला ते जाणवलं. तो मागे सरला. काहीच बोलला नाही. बराचवेळ शांतता पसरली.
काय झालं.. आई रागावली म्हणून घर सोडलंस?
नाही..
मग?
ती काही बोलली नाही. कदाचित तिला कारण सांगायचे नसेल, समजून तो गप्प बसला. कुठे राहातात आई-बाबा..
बोरीवलीला.
फोन नंबर आहे. आपण फोन करुया.
त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्याकडे आशेने बघायला लागला.
पण, बाबा मारतील मला.
नाही मारायचे..
काय करतात तुझे बाबा..
मॅथचे प्रोफेसर आहेत.
मग, गणितात नापास झालीस म्हणून घर सोडलंस काय?
नाही. गणितात मला नेहमीच सेंट परसेंट असतात.
मग?
पुन्हा ती गप्प बसली.
बर राहू दे, नंबर सांग...
तिने नंबर दिला. नावही सांगितलं. तिचे बाबाच होते फोनवर. खूपवेळ रडले. मग बोलले. गयावया करु लागले, पोरीची काळजी घ्या म्हणून... खूपवेळ दोघे तसेच बसून राहिले. आता उजाडले होते, गर्दीचा आवाज वाढला होता.
बराच काळ गेल्यानंतर त्याने पुन्हा चहा घेतला. दोन-चार तास तसेच निघून गेले. त्याचा मोबाईल वाजला. साहेब त्याची वाट बघत बसला होता. त्याने थातूर-मातूर उत्तरे दिली. थोड्यावेळान पुन्हा फोन वाजला. तिच्या वडिलांचा फोन होता. ते समोरच उभे होते. त्यांची पोरगी मात्र त्याच्यामागे लपली होती. तो काही बोलला नाही. ते पुढे आले त्यांनी तिला एका हाताने जवळ घेतलं. त्याच्याही डोळ्यातून अश्रु आले. ती अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. बाप-लेकीचं भेटणं झाल्यावर ते त्याच्याजवळ आले, त्यांनी त्याचा हात हातात घेतला. डोळ्याच्या कडा ओलावल्याच होत्या.
""आम्हला आनाथ होण्यासापासून वाचवलंत.'' त्यांचे हे वाक्य त्याच्या जिव्हारी लागलं. फोनवर मघाशी त्यांनी सांगितलं होतं, ती अनाथ होती, हे समजल्याने तिनं घर सोडलं होतं.
तो मागे न बघता निघून गेला. मागे त्यानेच त्याच्या आई-वडिलांना असंच आनाथ केलं होतं.
सोमवार, १० जानेवारी, २०११
लोकांचा हुंकार सरकारपर्यंत पोचेल?
सरकारची जशी परराष्ट्र नीती असते तशीच ती अंतर्गत कारभारातही असायला पाहिजे. जिथे लोकशाही आहे, अशा देशांत तर ही जबाबदारी आणखी वाढते. परराष्ट्र नीतीत ज्याप्रमाणे प्रत्येक देशाबरोबरचे संबंध वेगवेगळे असतात, तेच भानदेशातील विविध घटकांशी संवाद साधताना सरकारने ठेवायला पाहिजे. बहुतेक सर्वच लोकशाही राज्ये बहुतेकवेळा या प्रकारानेच कारभार करतात; पण काहीवेळा देशांतील खूप ताकदवान समुहाला खूश करताना, कमकुवत पण संख्येने खूप अशा समाजाला दुखावले जाते. त्यामुळे "आहे रे' आणि "नाही रे' गटात संघर्ष पेटतो. त्यामुळे "नाही रे' गटाला सोबत घेऊन त्याला "आहे रे' गटापर्यंत आणण्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेला काही ठोस पावले उचलावी लागतात. यात अनेकवेळा कायद्याच्या जाळ्यातून समस्येला बाहेर काढून तिचा विचार करावा लागतो. एका बाजूला भारत सरकार उल्फाचा प्रमुख अरविंद राजखोवा याला जामीन मिळवून देऊन मुक्त करताना आपल्या "नाही रे' गटाच्या विचारांना ऐकण्याची मानसिकता दाखवित आहे; तर दुसरीकडे डॉ. बिनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून या गटात पुन्हा चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. सेन यांना देशभरातील संघटनांकडून मिळत असलेला पाठिंबा पाहता ही चलबिचल खूप मोठी आहे हे जाणवते.
लोकशाहीत राजकारण आणि सरकार या दोन गोष्टी भिन्न करता येत नाहीत. सरकार नावाची व्यवस्था राजकारणीच चालवत असल्याने ज्या विचारसरणीने ते राजकारण करतात त्याचे प्रतिबिंब सरकाराच्या कारभारात उमटते. बहुसंख्य लोकांच्या पसंतीने सरकार सत्तेत आल्याने समाजातूनही सरकारच्या कारभाराला मान्यता मिळते. त्यामुळेच लोकशाहीत विरोधी विचारांच्या लोकांना मान देऊन प्रसंगी ते मुख्य प्रवाहातून बाहेर पडत असतील तर त्यांचा सरकार आणि व्यवस्थेवरील विश्वास उडू नये यासाठी सत्ताधारी पक्षाला प्रयत्न करावे लागतात. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत फारसा फरक नसेल तर तिथे नैसर्गिक न्यायाने सरकार विरोधकांना डावलत नाही, किंबहुना डावलता येत नाही; पण विरोधक केवळ विरोधी बाकावर बसलेलेच नसतात तर तिथंपर्यंत न पोचलेले अनेक जण विरोधाचे काम करत असतात. अशांचा आवाज सरकारपर्यंत पोचला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, प्रसंगी त्यांच्यासाठी चार पावले मागे यावे लागते. पण जिथे विरोधी आवाज खूप क्षीण असतो आणि सरकार नावाची व्यवस्था त्या आवाजाला ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते, तिथे तो आवाज सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांची असते आणि त्यांना साथ राजकारण्यांनी साथ देण्याची गरज असते आणि इथेच भारतीय राजकारणी कमी पडले की काय, असा प्रश्न येतो. डॉ. बिनायक सेन यांच्याबाबत सरकारी यंत्रणांनी जी भूमिका घेतली ती बघता ही रेष आणखी अधोरेखित होते.
डॉ. बिनायक सेन हे खरे तर गरिबांत काम करणारे, ज्या भागात ते काम करतात तिथे व्यवस्थेविद्ध प्रचंड चीड आहे. आपले प्रश्न सध्याची यंत्रणा सोडवू शकत नाही, अशी तेथील लोकांची धारणा बनल्याने ते यंत्रणा राबवू देत नाहीत. पण तरीही हे लोक गरीब, त्यांच्यात आरोग्याबाबत अनास्था, त्यामुळे सरकारी यंत्रणेपलीकडे त्यांच्यात जाऊन काम करणे आवश्यक होते. अशी पोकळी डॉ. बिनायक सेन यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते भरून काढतात. व्यवस्थेविरुद्ध जाणाऱ्या घटकाला पुन्हा व्यवस्थेत आणणे आणि त्यांचा व्यवस्थेवर पुन्हा विश्वास निर्माण करण्यात अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा फायदा सरकारने करून घ्यायला पाहिजे. पण डॉ. बिनायक सेन यांच्याबाबतीत सरकारला हेच कळले नाही की काय, असा प्रश्न पडतो. मुळात डॉ. सेन हे आदिवासी आणि गरिबांच्यात काम करायचे. त्यामुळे तेथील लोकांशी संपर्क हा त्यांच्या कार्याचा भागच होता. आता त्यांना ज्या कारणांनी सरकारने अटक केली; (न्यायालयाचा निकाल हा स्वतंत्र विषय आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक माजी न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली आहे.) मुळात डॉ. बिनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला सरकारी पक्ष कसा काय चालवू शकतो हाच प्रश्न आहे.
गरिबांसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला सरकारने पाठिंबा द्यायला हवा आणि गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचे, की अशा कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे खटले चालवायचे हा खरा मुद्दा आहे. एकीकडे डॉ. बिनायक सेन यांना देशद्रोही ठरविण्याकडे सरकारचे (मग ते छत्तीसगडचे डॉ. रमणसिंग यांचे असो वा त्यापूर्वीचे कॉंग्रेसचे); दुसरीकडे मात्र उल्फाचा प्रमुख अरविंद राजखोवा याला मात्र सरकारने जामीन मिळावा म्हणूनच प्रयत्न केला. देशाविरुद्ध बंड पुकारलेल्या राजखोवावरही राजद्रोहाचा आरोप आहे. पण त्याला एकट्याला शिक्षा करण्यापेक्षा उल्फा संघटनेतील इतरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने राजखोवाला संधी दिली. "नखाच्या कामासाठी तलवारीची गरज काय', या उक्तीप्रमाणे सरकारने राजखोवाला मुक्त केले, आणि अंतर्गत नीतीचा भाग म्हणून हे योग्यच होते. हिंसाचाराला हिंसाचाराचे उत्तर नसून ते चर्चेत आणि विचारात आहे, ही सरकारची भूमिका रास्त आहे. एका बाजूला कठोरपणे सरकारविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करायची तर दुसऱ्या बाजूला या संघटनांचे बळ वाढू नये, एखादी संघटना नेस्तनाबूत झाल्यानंतर तिच्या राखेतून दुसरी त्याच विचारांची संघटना निर्माण होऊ नये यासाठी विचारांचा मार्ग मोकळा करणे आवश्यक असते. त्यामुळे राजखोवाबाबतीत जो सुज्ञपणा सरकारने दाखविला, तो सुज्ञपणा डॉ. सेन यांच्याबाबत का दाखविला नाही हा प्रश्न आहे.सामाजिक कार्यकर्त्यांना हा देश आपला वाटला पाहिजे, या देशातील गरिबांतील गरिबांसाठी काम करताना भांडवलशाहीला विरोध करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला असला पाहिजे. विशेष म्हणजे घटनेच्या चौकटीतील अधिकार घटनेच्या चौकटीत न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत झिरपले पाहिजेत आणि यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांना गजाआड टाकून आणि त्यांचा आवाज दाबून प्रश्न सुटणार नाहीत तर प्रश्न चिघळतील आणि आज जिथे "नाही रे' गटात प्रचंड नाराजी आहे, तिथे प्रश्न चिघळू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, समाजातून उमटणारा हुंकार राज्यकर्त्यांपर्यंत पोचला तरी डॉ. सेन यांची सुटका शक्य आहे.
