संघाला चार धावांची गरज. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अस्वस्थ हीरो खेळपट्टीवरून क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत असतो... प्रेक्षकांत शांतता... हिरॉईन हात जोडून देवाचा धावा करत असते. व्हिलन जो गोलंदाजी करत असतो तो शोएब अख्तरच्या स्पीडने धावत येतो.. (बऱ्याच वेळा एवढा वेळ हा का धावतोय असा प्रश्न पडावा
इतका वेळ तो एक चेंडू टाकायला घेतो)... तो चेंडू टाकतो... हीरो बॅट घुमवतो. चेंडू उंच आकशात जातो... क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूखाली येतो आणि तो झेल पकडतोही; पण त्याचा एक पाय सीमारेषेबाहेर... अंपायर षटकार असल्याची खूण करतो आणि एकच जल्लोष... हिंदी चित्रपटात असेच थोडेफार बदल केलेले प्रसंग अनेक वेळा चितारलेले आहेत. प्रेक्षकांना खात्री असते की काहीही झाले तरी (म्हणजे तेथे आपल्या हीरोची फलंदाजी व्यंकटेश प्रसादसारखी असो आणि व्हिलनची गोलंदाजी मॅकग्रासारखी असली तरीही) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हीरो तो सामना जिंकून देणारच. प्रेक्षकही हा खरोखरचा सामना असल्यासारखे शिट्या वाजवून आपल्या हीरोने कशी जिरवली, म्हणत सिनेमागृहातून बाहेर पडतात.
भारतीय सिनेमा आणि क्रिकेट विश्व या दोन्ही गोलांच्या अनेक कड्या एकमेकांत मिसळल्या आहेत. क्रिकेटपटूंची आणि बॉलिवूड तारकांची अफेअर ही यातील एक कडी; पण ही कडी वगळूनही अनेक कड्या या दोन गोलांना एकत्र करतात. मग क्रिकेपटूंचे सिनेमात काम करणे असो वा नट-नट्यांनी क्रिकेट मॅच खेळणे असो; पण भारतीय सिनेमांत क्रिकेटचे प्रतिबिंब ठळकपणे पडले आहे.
भारतीय सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर चालणाऱ्या गणितांवर जास्त निर्माण केला जातो. त्यामुळे बाजारात जे चालते ते ते सगळे सिनेमात आणण्यासाठी काही निर्माते-दिग्दर्शक जिवाचा आटापिटा करतात. त्यामुळे ज्या देशाचा धर्मच क्रिकेट बनलेला आहे त्यामुळ क्रिकेटला 70 एमएमवर न आला असता तरच नवल. भारतीय सिनेमातही क्रिकेट अनेक अंगाने येत गेले. कधी ते कथानकाचा मुख्य भाग म्हणून तर कधी उपभाग म्हणून. अगदी काही वेळा त्याचा ओझरता उल्लेख; पण क्रिकेट भारतीय सिनेमात योग्य अंतरांनी येतच राहिले आहे. "इक्बाल', "ऑलराऊंडर', "लगान', "पटियाला हाऊस', "चेन कुली की मेन कुली', "दिल बोले हडीप्पा' यांसारख्या चित्रपटांचा मुख्य कथाभाग हा चित्रपटाभोवतीच गुंफला होता, तर "मासूम', "हम आपके है कोन', "मुझसे शादी करोगी', "चक दे इंडिया' यांसारख्या चित्रपटांत काही सेकंदांपुरते का होईना; पण क्रिकेट येऊन गेलेच.
ऑल राऊंडर ः भारताने 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण भारतात दिवाळी साजरी झाली. क्रिकेटचा फिव्हर एवढा होता की तो कॅश करण्यासाठी ऑल राऊंडर हा चित्रपट काढला. ज्याला अभिनयाचा एक पैलूही माहिती नव्हता अशा कुमार गौरवला अष्टपैलूची भूमिका मिळाली. लव्हस्टोरीच्या यशातून अजून कुमार गौरव बाहेर पडला नव्हता; पण लोकांनी या ऑल राऊंडरला नाकारले.
मालामाल ः हा खरे तर संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित चित्रपट नव्हता. या चित्रपटात नसिरुद्दीन शाहने क्रिकेटपटूची भूमिका केली होती. यामध्ये आता ज्याप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेट संघ स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला आहे त्याप्रमाणेच नासिरुद्दीन शहांना हा सामना गमवायचा होता. खरे तर या चित्रपटाची खरी प्रसिद्धी झाली ती भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यामुळे. नसिरुद्दीन शहा यांच्या सोबतीने तेही या सामन्यात दिसले होते.
अव्वल नंबर ः 1990 मध्ये आलेला हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलेच नाही. मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ज्या अमीर खानला संबोधले जाते तो या चित्रपटाचा हीरो. चित्रपट देव आनंदचा. त्यामुळे देव आनंद यांच्या चित्रपटात जे जे असते ते ते सगळे या चित्रपटात बघायला मिळते. विशेष म्हणजे त्यानंतर काही काळ आमीरवर तो देव आनंदसारखा अभिनय करतो अशी टीकाही झाली होती. आदित्य पांचोलीही या चित्रपटात होता; पण चित्रपटच लोकांच्या लक्षात नाही तिथे आदित्य पांचोली कोठून राहणार.
चमत्कार ः 1992 मध्ये आलेला हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी लोक काही वेळ का होईना; पण रिमोट बाजूला ठेवतात. या चित्रपटाचे रसायनच काही भन्नाट बनले आहे, की आजही हा चित्रपट बघायला आवडतो. शाहरूख या चित्रपटात जेवढा इनोसंट वाटला तेवढा पुन्हा कधीच वाटला नाही. नसिरुद्दीन शहा यांचे भूत आणि या चित्रपटातील क्रिकेट मॅच हे दोन्हीची खिचडी मस्त जमली आहे. आजही जेव्हा कधी भारतीय संघ संकटात सापडतो त्या वेळी सिनेमाप्रेमी लोक देवाचा धावा करण्याऐवजी नसिरुद्दीन शहाचाच धावा करतात. नसिरुद्दीनचे भूत हीरोच्या संघाला अशा काही विचित्र स्थितीतून बाहेर काढते ते खरे तर पडद्यावरच बघायला पाहिजे. बाकी या चित्रपटात शाहरूख खानने प्रशिक्षकाची भूमिका केली आहे; पण हा चित्रपट संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित नाही.
लगान ः 2001 मध्ये आलेला लगान चित्रपटाची कथा कोणा एका क्रिकेटपटूवर आधारित नव्हती, तर चित्रपटाचा आत्मा क्रिकेटच होता. अव्वल नंबरमध्ये मिळालेले अपयश आमीरने या चित्रपटात धुऊन काढले. आतापर्यंत एवढे यश कोणत्याही क्रिकेटपटाला मिळाले नव्हते, एवढे यश लगानने मिळविले. ब्रिटिश इंडियातील एका न झालेल्या सामन्यावर या चित्रपटाची कथा बेतली होती. तीन तासांहून अधिक काळ लांबी असूनही "लगान'ने तुफान यश मिळविले.
स्टंप्ड ः 2003 च्या विश्वचषक स्पर्धेचा फिव्हर कॅश करण्यासाठी निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या दांड्या बॉक्स ऑफिसवर अशा काही उडाल्या, की निर्माता नंतरचे काही दिवस रात्री क्रिकेट क्रिकेट... म्हणत जाबडत उठला असेल. चित्रपटात दम नव्हताच. केवळ धंदेवाईक दृष्टीने निर्माण केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी ग्राहक या दृष्टीने बघत नाकारले. सलमान खानने या चित्रपटात रविना टंडनच्या इच्छेखातर एक आयटम सॉंग केले होते, एवढीच या चित्रपटाची जमेची बाजू.
इक्बाल ः एका मूक-बधिर आणि तरीही क्रिकेटचे प्रचंड वेड असलेल्या मुलाची ही कथा. चित्रपटातील मुख्य कथानक आणि उपकथानकेही क्रिकेटभोवतीच फिरतात. श्रेयस तळपदेने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे दार ठोठावले. नसिरुद्दीन शहा आणि क्रिकेट यांचे काय नाते आहे माहिती नाही; पण याही चित्रपटात नसिरुद्दीन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. या चित्रपटाला समीक्षकांनी प्रचंड उचलून धरले.
चेन कुली की मेन कुली ः या चित्रपटात एका मुलाला एक बॅट मिळते. त्याच्यातील गुणांपेक्षा तो त्या बॅटवरच जास्त विसंबून राहतो. त्याला वाटत असते, की त्या बॅटमध्ये काही तरी जादू आहे. सचिन तेंडुलकरचा या चित्रपटात उल्लेख नाही; पण झईन खानला निवडताना तो थोडासा सचिनसारखा दिसतो म्हणूनच निवडले आहे हे जाणवते. सचिनही अवघ्या सोळाव्या वर्षी संघात आला तोच संदर्भ घेऊन हा चित्रपट केला आहे.
से सलाम इंडिया ः 2007 मध्ये भारतीय संघाचे वर्ल्डकपमध्ये जे झाले तेच या चित्रपटाचे झाले. भारतीय संघ वेस्ट इंडीजला गेला कधी आणि आला कधी हे जसे लोकांना कळले नाही; तसेच से सलाम इंडिया हा चित्रपट कधी लागला आणि कधी गेला कळले नाही. चित्रपटात संजय सुरीने काम केले होते. चित्रपट बरा होता; पण त्याची प्रदर्शनाची वेळ चुकली.
दिल बोले हडिप्पा ः राणी मुखर्जीने या चित्रपटात फलंदाजाचे काम केले आहे. एक मुलगी मुलगा बनून भारतीय संघात खेळते या आशयावर चित्रपट होता. चित्रपटात काहीच नव्हते. राणीला बघायला जावे तर दाढी आणि मिशीतील राणीही बघवत नव्हती.
पटियाला हाऊस ः ज्या ज्या वेळी वर्ल्ड कपचा फिव्हर कॅश करण्यासाठी क्रिकेट चित्रपटात आले त्या त्या वेळी लोकांनी ते नाकारले. खरे क्रिकेट बघायला मिळत असताना कोणी हे फालतू क्रिकेट का बघावे; पण नाही तरीही निर्मात्यांना याच वेळी चित्रपट काढण्याची भारी हौस. पटियाला हाऊस कधी आला आणि कधी गेला ते अक्षयकुमारलाही कळले नाही.
ही काही प्रतिनिधीक उदाहरणे याबराबरच अनेक चित्रपटांतून क्रिकेट आले. कधी क्रिकटपटूंवर, तर कधी पैजेतून तर कधी मॅच फिक्सिंगसारख्या विषयातून भारतीय सिनेमात क्रिकेट येत राहिले आणि यापुढेही ते येतच राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा