तो आणि ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तो आणि ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आणखी एक दिवस बुडाला....

तो
आणखी एक दिवस बुडाला. हा सूर्य पश्‍चिमेला गेल्यावर एक अनामिक ओढ निर्माण होत आहे. सूर्याचा हा प्रवास थोडा वेगात करता आला तर... आयुष्य जर-तर वर चालत नाही. व्यवहाराच्या पक्‍क्‍या भिंतींनी आयुष्य कोंडलेलं असतं. कितीही म्हटलं तरी या भिंती मोडकळीला येत नाहीत. त्याची रंगरंगोटी होते एवढंच. आज ती कुठे असेल.. अशीच माझ्यासारखी कातरवेळी मनात हुरहूर घेऊन एकांतात बसली असेल, की कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून टाकून स्वतःलाच हरवून बसली असेल.. की, प्रश्‍नांच्या जंजाळात तिने स्वतःला अडकवून घेतले असेल. अनेक प्रश्‍न तिच्या मनात उमटत असतील.. मी का थांबलो नाही...? का, पुन्हा एकदा तिचा हात जोरात पकडून तिला सांगितले नाही की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... ? अर्ध्या वाटेत का सोडलं..? .जर सोडायचेच होते तर कशाला आशेचे मोरपंख लावायचे.. कितीतरी प्रश्‍न.. प्रश्‍नांचा कोळी तिच्याभोवती आपली जाळी विणत असेल आणि ती त्यातून स्वतःला सोडवत असेल....माहित नाही. कदाचित विसरूनही गेली असेल. नव्या वाटेवर नव्या सवंगड्याबरोबर खूष असेल. काहीच माहित नाही.... जगणं इतकं अवघड या पुर्वी कधीच नव्हतं. व्यवहाराच्या भिंती इतक्‍या उंच व इतक्‍या काळ्या कधीच भासत नव्हत्या, ज्यात साध्या मैत्रीच्या नात्यासाठीही झरोका नसावा. कालप्रवाहाचा हा वेग वाढावा, त्या प्रवाहाच्या आवेगात या भिंती कोसळाव्यात आणि जगण्याला एक निमित्त मिळावं. खरे, तर हीच भावना एक निमित्त आहे जगण्यासाठी!. कधीतरी या भिंती कोसळतील हीच एक आशा आहे. कालप्रवाहाचा वेग वाढवावा आणि त्याच्या खुणा अंगावर दिसाव्यात. जख्खड म्हातारपण यावं, जिथे समाजाच्या बंधनांचा पिळ सुटलेला असेल, खुपऱ्या झालेल्या डोळ्यातूनही जाणिवा प्रकट होतील, अगदी तिथपर्यंत पोचायचे आहे. हा आजचा एक दिवस बुडाला, असे अनेक दिवस बुडावेत आणि मग तो एकच दिवस उगवावा. जो एकच दिवस जगलो तरी आयुष्य तृप्त व्हावे.... आजचा आणखी एक दिवस बुडाला...

ती
आणखी एक दिवस बुडाला.....मावळतीचे रंग खूप फिके वाटताहेत आज. आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसांत हा केशरी रंग केशरी वाटतच नाही. जणू आयुष्याचेच रंग फिके पडलेत की काय? असे वाटते. तो सोडून गेला याचे दुःख आहे, की त्याला जाऊ दिले हेच कळत नाही. हात सोडवून घेताना त्याचीही नक्‍कीच घालमेल झाली असेल, किंबहूना आपल्यापेक्षा जास्त त्याचीच घालमेल झाली असणार, हे निश्‍चित! वेड्यासारखं मरायचा. बोलायचा कमी, पण ऐकायचा खूप.. प्रेम करायचा... आणि ते जाणवूही द्यायचा. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला धीरच झाला नाही. ज्यावेळी द्यावा वाटला त्यावेळी त्याने हात सोडवून घेतला होता. मोरपंखी काही दिवस त्याच्या सहवासात गेले खरे पण त्याच्या आठवणींवर कसे जगायचे. व्यवहाराच्या भिंतीपलीकडील त्याची कुजबूज ऐकावी म्हटलं तरी ते शक्‍य नाही. रितेपणा जावणतो आहे सगळा... त्याच्या नसण्याचा... तो नव्हताच कधी; पण तो येण्याची एक आस होती. तीही मावळली.. या मावळतीच्या सूर्याप्रमाणे आता अंधार आणि मग त्यातून डोकावणारा चंद्र.. चांदण्या.. याच तर सोबतीला... प्रत्येक रात्र हवीहवीशी वाटावी... चांदण्याच्या जागा बदलताना, चंद्राच्या कला न्याहाळताना रात्र सरावी... डोळ्यात झोप असतानाही अशा कितीतरी रात्री जागून काढल्यात, रात्रीसारखी सखी नाही, तिच्या खांद्यावर डोके ठेवून कितीहीवेळ रडा, ती खुलासे मागत नाही. थोपटत राहाते. आजचा दिवस संपला... असे अनेक दिवस संपतील.. कधीतरी एक दिवस नक्‍की येईल, जो रात्रसखीप्रमाणे खुलासे मागणार नाही... व्यवहाराच्या भिंती इतक्‍या जोरात कोसळतील की पलीकडची कुजबूजच नाही तर त्याची हाकही ऐकू येईल...त्या एका दिवसासाठी असे अनेक दिवस जायला हवेत.... आजचा आणखी एक दिवस बुडाला.....

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

पौर्णिमा...

तो
गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.
""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''
माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही.

--------------------------

ती

त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता,
""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.

https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl 

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

अश्रू

तो
ती काय करत असेल आता.... कदाचित रडून-रडून डोळे सुजले असतील.... जगजीत सिंह गेल्याचा धक्‍का तीनं कसा सहन केला असणार... वेड्यासारखी प्रेम करायची त्याच्यावर. त्याच्या गजलांवर मरायचीच म्हणा ना....वो कागज कि कश्‍ती हे तिचं आवडतं गाणं... हात छुटे भी तो रिश्‍ते नही छोडा करते.... या गझलेप्रमाणे तिने अनेकवेळा जगण्याचा प्रयत्नही केला पण जमला नाही.... जगणं गाण्याचे शब्द बनतात... पण गाण्याच्या शब्दांवरच्या मार्गावरुन चालणं सोप्प नसतं, हे तिला जाणवून गेलं त्यामुळेच तिनं हात सोडवून घेतला... ती गाण्यात रमायची... .. पण गजलांवर तिचं खास प्रेम....प्रत्येकवेळी ती नवनव्या गजलांवर बोलायची... तिच्या जगण्याच्या अनेक आधारांपैकी एक आधार गझल आहे हे नक्‍की.. त्यामुळे या आधाराला बसलेला धक्‍का तीनं कसा सहन केला असेल देव जाणे... कदाचित दारं खिडक्‍या बंद करुन जगजितचीच एखादी कॅसेट प्ले केली असेल... किंवा त्या अंधारात उशी ओली होईपर्यंत रडत बसली असेल...गुलजार आणि जगजीत सिंह या दोघांच्या शब्द -सुरावर तिचे अनेक इमले उभे आहेत, अशा इमल्यांना असे धक्‍के थोडे जडच जातात.....

ती
जगजीत सिंह गेले...त्याला बातमी समजल्यावर तो कसा रिऍक्‍ट झाला असेल.... त्याला धक्‍का बसला असेल... छे धक्‍का बसणाऱ्यांमध्ये तो कधीच नव्हता.... ब्रेन हॅमरेज झालेलं होतं... डॉक्‍टरांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले एवढंच म्हणेल आणि मान एका दिशेला फिरवून गप्प बसेल.... माहित नाही नक्‍की तो कसा रिऍक्‍ट झाला असेल... संवेदना तशा त्याच्या बोथटच झाल्यात जणू.... सुख -दुःख मानायला वेळ कोणाकडे आहे, हे त्याचं तत्वज्ञान....त्यात माणसं मरायचीच कधी ना कधी हे नेहमीचंच वाक्‍य त्यानं नक्‍की कोणाच्या तरी तोंडावर फेकलं असणार... पण जगजीत वेगळाच माणुस... या माणसाकडे काय शक्‍ती आहे नाही, जखमांना तोच उघडं करतो आणि त्यावर हळुवार फुंकरही घालतो.... जखमा ओल्या ठेवताना त्यातील वेदना हलकेच सुखावह करण्याचे जे कसब त्याच्यात आहे ते मुळी कुणाच्यात नाहीच...शब्दांच्या अर्थांना सुरातून त्यानंच प्रवाहीत करावं... त्याचं गाणं रेडीओवर लागावं आणि ऐन दुपारी कातरवेळीची हुुरहूर जाणवावी... त्याच्यासारखा सूरकर्मी सापडणं मुश्‍किल... बंधमुक्‍त गाताना, ऐकणाऱ्याला बंधिस्त करण्याची त्याची हातोटी जगावेगळी... ही सारी वाक्‍ये तर त्याचीच की... त्यामुळं जगजीत गेल्याचं त्याला नक्‍कीच दुःख झालं असणार... रात्री घरी आल्यावर त्यानं जगजीतच्या गझला लावल्याच असतील... आणि त्या ऐकताना नाकावर अश्रुचा थेंब आला असणारच....

शुक्रवार, १५ जुलै, २०११

पाऊस

तो....
काळ्या ढगांचा हिला एवढा नाद का? नादच, नाही तर काय!
ढग जमू लागले की ही तिची उरत नाही. सगळी हातातील कामे बाजूला टाकून ती अंगणात येते, ढगांच्या काळ्या पंखाखाली स्वतःला हरवून बसते. कानठळ्या बसविणारा तो ढगांचा गडगडाट ऐकण्यासाठी जन्माची आतूर झाल्यासारखी वाटते. निसर्गातील प्रत्येक श्‍वासाला घाबरवून सोडणाऱ्या त्या आवाजाने हिला कोणती मोहिनी घातली आहे कोणास ठावूक. पण तिला तो आवाज आवडतो. त्या लखलखणाऱ्या विजांचा तिच्या नितळणाऱ्या सावळ्या चेहऱ्यावरून परावर्तीत होणारा तो प्रकाश जेव्हा माझ्या खिडकीत येतो त्यावेळी तो गोळा करून साठवून ठेवावा वाटतो. किती पावसाळे लोटले पण, पहिल्यांदा तिला पावसात भिजताना बघितले तेव्हाची "ती' आणि आजची "ती' तशीच आहे उत्कट. उत्कटता हाच तर तिच्यातील आणि पावसातील समानतेचा धागा. कधी कधी प्रश्‍न पडतो की, तिचा हा सावळा रंग तिने ढगांकडून घेतला की ढगांनी तिच्याकडून. दोघांकडेही स्वतः रिते होऊन दुसऱ्याला सर्वस्व देण्याचा गुण. पाऊस जणू तिच्यात पुरता भिनला आहे. कधी ती गडगडाटासह येणाऱ्या वादळी पावसासारखी वाटते तर कधी आषाढातल्या मुक्त होऊन कोसळणाऱ्या सरीसारखी, तर कधी श्रावणसरींसारखी हलकेच बरसत राहते. ती अशी बरसत राहते म्हणूनच तर आपल्या रखरखीत आयुष्यात हिरवाई आहे....

ती
"तो' असा का आहे हा प्रश्‍नच आहे. वळवाच्या ढगांसारखा अगदी अनाकलनीय. कधी कोसळेल? कधी नाही काहीच पत्ता लागू देत नाही. पावसाचं याला वावडं म्हणावं तर तासन्‌तास खिडकीत बसून "तो' पाऊस न्याहाळत असतो; पण त्याने कधी ओंजळ गजाबाहेर काढून हात ओले केल्याचं स्मरत नाही. पावसात चालायची वेळच जर आली, तर इतका अंग चोरुन चालतो की रेनकोटवरचा पाऊसही जणू त्याच्या अंगाला छेडतो की काय असे वाटते. भर पावसात हा इतका कोरडा कसा राहू शकतो? कधी कधी ढगांनाच जणू तो जमत असेल तर मला भिजवून दाखवा, असे आव्हान करतो आणि त्यावर हे आव्हान न पेलवल्याने ढग थयथयाट करतात की काय असे वाटून जाते. पण तो आहे तसाच आहे म्हणून तर मी आहे. तो त्या खिडकीत उभा असतो त्यामुळेच तर त्या ढगांच्या आवाजाची भीती नाही वाटत. एकटीला भयग्रस्त करणारे ते ढग, तो सोबतीला असला की
अगदी सुतासारखे सरळ वागायला लागतात. मग त्यांच्या त्या गर्जनेत ढोलांचा नाद ऐकायला मिळतो, विजांचा लखलखाट अंगभर घ्यावा वाटतो, पण त्यासाठी तो खिडकीत उभा असायला हवा. तो समोर असतो त्यामुळेच तर हे ढग आणि वीज आपल्या मर्यादा नाही सोडत...

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मौनाची भाषांतरे व्हावीत

तिच्या पैंजणाची रुणझुण ऐकली की तो तिथेच थबकायचा. मग त्याच्या समोरचे सगळे रंग बदलून जायचे. भरदुपारीही मग त्याला पश्‍चिमेची गुलाबी प्रभा दिसायची. तो तसाच होता. अगदी वेडा. ती समोर आली की मग मात्र तो मुग्ध व्हायचा. तिच्या प्रत्येक हालचाली तो डोळे भरून पाहायचा. मग घसा खाकरून बोलण्याचा प्रयत्न करायचा; पण ओठ साथ द्यायचे नाहीत, जीभ वळायची नाही. बोलायचं असायचं एक आणि तो भलतंच बोलून जायचा. तिला हे जाणवायचं; पण तिही काही बोलायची नाही. फक्‍त हसत राहायची, गालावर आलेले केस मागे घेत राहायची. मग त्याची अवस्था बघून आपणच काहीतरी सांगत राहायची. खूप बोलल्यावर मग ती जाते म्हणायची, तो थांबवायचा तिला. ""जाऊ नको,'' म्हणायचा... थोडा वेळ परत ती थांबायची. मग जायला निघायची. मग त्याच्या हृदयाची धडधड आणखी वाढायची; पण तिला अडवायचं बळ त्याच्या हातात यायचं नाही. ती निघून गेली की, मग याला सगळे विषय सुचायचे... काय बोलायचे होते, ते सगळे आठवायचे. मघाशी बोलताना आपण खूपच मूर्खपणा केला, हेही त्याला जाणवायचे. मग तो स्वतःच्याच डोक्‍यावर एक टपली मारायचा. जोरात शीळ फुंकायचा आणि पुन्हा ती कधी भेटेल याची वाट बघत राहायचा. पुन्हा ती भेटली की याचं असंच व्हायचं. ती त्याला नेहमी म्हणायची, ""तू असा कसा?'' मग तो गप्प बसायचा. काही प्रश्‍नांची उत्तरे नाही देता येत, असं काहीबाही समजावयाचा. मग तीही ताणायची नाही. त्याला त्याच्या स्थितीत सोडून द्यायची. कस्तुरीमृगाच्या बेंबीसारखं त्यांचं प्रेम दरवळत राहायचं आणि ते दोघेही त्याच्याच शोधात हिंडत राहायचे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं तिला सांगायलाच पाहिजे का? तिला ते समजत नसेल का, असं त्याला वाटायचं. तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर तो मग सांगत का नाही, असं तिला वाटायचं आणि मग दोघेही मौन बाळगून राहायचे. उद्याच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्यांच्या मौनांची भाषांतरे व्हावीत.

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

स्वल्पविराम

तो (स्वल्पविराम)
will you marry me.... मी सरळ तिला विचारुन टाकलं. तिला ते अनपेक्षित नव्हतं पण हा प्रश्‍न मी इतक्‍या सरळ विचारेन असं वाटलं नसावं. माझी उत्तराच्या अपेक्षेने रोखलेली नजर तिला असाह्य झाली असावी. तिनं गालावर आलेल्या बटा हलकेच मागे सारल्या मग चेहरा वळवला आणि दीर्घ उच्छ्शास सोडला..... हे बघ...... मी तिला तिथेच थांबवलं. उत्तर फक्‍त हो की नाही एवढंच तर दे.... मी आवडतो किंवा नाही एवढं महत्त्वाचं.... कारणांत अडकवू नको मला... मी सरळ सांगितलं. माझ्या या सरळ बोलण्याचा तिच्यावर व्हायचा तो परिणाम झाला. तिचे डोळे लकाकले माझ्या रोखलेल्या नजरेला टाळत तिनं पुन्हा एकदा दीर्घ उच्छ्शास सोडला आणि म्हणाली......sorry I can't. म ाझी तिच्यावर रोखलेली नजर खाली झुकली...... o. k. चहा घ्यायचा काय? मी इतक्‍या सहजतेनं पुढे जाईन असं तिला वाटलं नसावं कदाचित. तिने निमिषभर माझ्याकडे बघितलं. मग नजरेत तोच मिश्‍किलपणा आणत म्हणाली चल!
आयुष्यात असे स्वल्पविराम पडत असतातच.
..................
ती (स्वल्पविराम)

तो विचारणार हे आपल्याला नक्‍की ठावूक होतं. त्याच्या नेहमीच्या बोलण्यातूनही ते जाणवत राहायचही.... त्यानं विचारावं असही आत खोल वाटत होतच की आपल्याला पण आज त्यानं विचारलं आणि आपण मात्र त्याला नाही म्हटलं......का? तोच म्हणतो, कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी फायदा तोटा यांचा विचार करायचा नसतो. फक्‍त मनाशी प्रामाणिक राहायचं मन तुम्हाला कधी धोका देत नाही.... पण मन आणि बुद्धी वेगळे कुठे असतात. त्याला होय म्हणायचं धाडस ना मनात आहे ना बुद्धीत. तो शंभर टक्‍के हसबंड मटेरियल आहे पण लग्न म्हणजे गारमेंट नव्हे. चांगला वाटला म्हणून केलं आणि नंतर फेकून दिलं. तो मित्र म्हणून चांगला आहे.... त्यानं तिथंच राहावं.....गाज देत. पण तो काही किनाऱ्याला धडका देत बसणाऱ्यातला नव्हे..... सावरेल लगेचच..... पण एक नक्‍की आयुष्याच्या ओळीत एक स्वल्पविराम नक्‍की पडला.

रविवार, २४ जानेवारी, २०१०

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भिती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा तो एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

लपंडाव

तो....(लपंडाव)

तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे चारच शब्द आपण किती घोगऱ्या आवाजात बोललो. अखंड बडबडणारी ती मग शांत झाली. बोल की एवढच म्हणाली, नंतरची एक दोन मिनीटं तरी दोघंही काहीच बोललो नाही. नंतर महत्त्वाचं बोलणं राहूनच गेलं. पण तिला बहुतेक ते कळलं असावं. त्यामुळे तीही बोलली नाही. खूप दिवसांपासून तिला विचारायचं धाडसं करत होतो पण ते जमलं नाही म्हणून आज मनाचा हिय्या केला. पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं एकच वाक्‍य बोलल्यानंतर मात्र आपला धीर झाला नाही. श्‍वास जड झाला... छाती धडधडत होती. बहुतेक तिला ते जाणवलं त्यामुळे नंतर
तिने बोलण्याचा आग्रह धरला नाही. अखंड बडबडणारी ती हरवून गेल्यासारखी होती. नजर चोरटी आणि श्‍वास जलद होतं होते.
नंतर बराच वेळ हवा-पाण्यासंदर्भात बोलत होतो. एका चित्रपटाची सगळी कथाही सांगून टाकली. उगाच हसलो... पण ती शांत होती.....तिच्या केसांच्या बटांनी आपल्याला वेड लावले आहे हेच तर सांगायचे होते. पण धीर झाला नाही. महत्त्वाचं बोलण्यासाठी भेटलो पण शब्दांचाच लपंडाव खेळत राहिलो.

ती....(लपंडाव)

तो असा का आहे वाट चुकलेल्या वाटसरुसारखा. कायम भांबावलेला असतो. समोरची सरळ वाट त्याला त्याच्या मुक्‍कामापर्यंत घेवून जाणारी असते पण तो वळणं घेत राहातो. आणि वळल्यावर मग तो मार्गदर्शकाची वाट बघत राहातो. प्रत्येकवेळा त्याला सावरणारं कोणीतरी लागतं. तो मुलगा आहे त्यानं विचारलं पाहिजे. मी कोण वाघीण आहे का सिंहीण याला फाडून खाणार आहे का? .... पण त्याचा हाच स्वभाव तर आपल्याला खूप आवडला. त्यानं चटकन विचारलं असतं तर त्याच आश्‍चर्य वाटलं असतं. पण त्याचं वळणं घेत बोलणंच तर आपल्याला आवडतं. नेहमी शांत शांत असणारा आज किती बडबडला. महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला, पण हवा पाण्याच्या गप्पा मारत राहिला. उगाचच हसत होता.
आज आपण नुसतं हं हा हू करत राहिलो, पण तो बोलत होता. त्याच्या बोलण्याचे हसू येत होते, पण तो ओशाळेल म्हणून ते दाबून धरले. कदाचित मनातल्या भावना ओठावर येऊ नयेत यासाठीच तर तो बोलण्याचा लपंडाव करत होता.

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

हार

तो. (हार)
मला गांधीजी आवडत नाहीत. एवढं एकच तर वाक्‍य आपण बोललो. कुठल्या संदर्भात बोललो तेही कळलं नाही. पण तिने एकदा मला नथुराम असल्यासारखं पाहिलं आणि मग तोंडाचा पट्‌टा सुरु केला, तो शेवटपर्यंत. गांधीजी आवडत नाही हे म्हणून मी जणू ब्रह्महत्या केल्याच्या आवेषात ती बोलत होती, आणि मला फाशीवर आत्तापर्यंत का चढवलं नाही ,असं तिची नजर विचारत होती. आपले मोठे डोळे आणखी मोठे करत ती काही-बाही सांगत होती. ती बोलत असताना हं, हू, हो शिवाय काही बोलता येत नाही हे खरंच, पण तरीही आपण तेही बोललो नाही. माझं ते गप्प बसणं तिला आणखी टोचलं असावं. त्यामुळे ती आणखीन उखडली. तुमच्यासारख्यांनी या देशात राहायलाही नको, सरळ सांगून टाकलं तिनं, मी नुसतंच बरं म्हणालो, त्यावरही चीडली. चहा घेतानाही तिची अखंड बडबड सुरु होती. शेवटी कंटाळून मी हरलो म्हटल्यावर ती थोडी शांत झाली. पण तुला आता सटकायचं आहे म्हणून तू हरलो म्हणतोयस हे सांगायला ती विसरली नाही. काय गांधीवादी आहे, गांधीवाद असा असतो हे जर गांधीजींना कळलं तर ते गांधीवादाची पुन्हा नव्याने व्याख्या करतील. गांधीवादी छे जहालवादी आहे....तिखट... शेवटी हरलो हे आपण उगाचच कुठे म्हटलं आपण. खरंच हरलेलोच आहोत की....

ती...(हार)
कोण समजतो कोण स्वतःला. क्रांतिकारी. पाच फूट चार इंच उंचीचा क्रांतिकारी. बोलता येतं का नीट आणि म्हणे गांधीजी आवडत नाहीत. काय माहिती आहेत याला गांधीजींबद्दल आणि एवढं आपण बोलत होतो तर पढ्ढ्यानं हू की चू केलं नाही. नाहीतर किमान हं.... हा... ही... ही... तरी चालू असतं पण ते काहीच नाही. शेवटी बरं आणि हरलो म्हणाला, पण तेही मजबुरीनं, कदाचित मला बरं वाटावं म्हणून. पण खरंच त्याला जर गांधीजी नसतील आवडत तर नसतील ना, त्याला ते आवडावेत म्हणून आपला अट्‌टाहास का? आणि आपण त्याच्यावर एवढं उखडायचं काय कारण होतं. केवढी आदळ-आपट केली आपण बिच्चारा ! छे वस्ताद आहे.. एखादाच शब्द बोलतो आणि मग आपला निवांत राहातो. पण खरंच तोच गांधीवाद्यासारखा वागला, अगदी शांत राहात सहन करत राहिला. त्याला या देशात राहण्याचा काडीचाही अधिकारही नाही असंही म्हणून टाकलं. पण शेवटी हरलो म्हणालाच की....खरचं तो हरला की मी हरले.....

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

मेघ

तो ....(मेघ)
किती बडबडे. श्‍वास कमी घेते पण बडबडते खूप. काल आपण फोन केला, हॅलो एवढाच शब्द आपण बोललो त्यानंतर हं... हं... हं... याशिवाय तिने काही बोलूच दिले नाही. हरिदास संमेलनातील बुवांबद्दल किती बोलली, त्यानंतर नवीन चित्रपट आणि नंतर स्वारी चक्‍क राजकारणावर घसरली. पण खूपच गोड मुलगी आहे. मनात येतं ते सारं बोलून जाते. काही मनात ठेवत नाही. रिकामं होऊन जाते. अगदी वादळी पावसासारखं, रितं होईपर्यंत कोसळत राहावं आणि रिकामं रिकामं व्हावं तसं. बोलताना कुणाला नावं ठेवणार नाही, पण चुकीला चूक म्हणण्याचं धाडस मात्र तिच्यात आहे. एकूणच ती केवळ बोलकी नाही, तर ठाम मतांचीही आहे. म्हणूनच तर ती आपल्याला आवडू लागली आहे. जगण्याची एक विशिष्ट कला तिला अवगत आहे. जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्यायचं आणि स्वतः श्रीमंत व्हायचं. म्हणूनच ती पावसानंतरच्या पांढऱ्या ढगासारखी भासते. त्या पांढऱ्या ढगांच्या चित्रविचित्र आकारामुळे त्यात लोक अनेक आकृत्या शोधतात, त्या आकृत्यांचे वेगवेगळे अर्थ लावतात. पण ती त्यातही भासते पांढऱ्या मोगऱ्यासारखी, गंधीत.......

ती ....(मेघ)
काय विचित्र माणूस आहे. स्वतः फोन करतो आणि काहीही बोलत नाही... हं...हं... हं. या शिवाय मराठी भाषेत दुसरे शब्द आहेत हे त्याला माहित आहे की नाही, कोणास ठाऊक.. खरंच तो मीतभाषी आहे का? आपणच जास्त बोलतो. थोडं आपण जास्त बोलतो हे खरंच, पण आपण नेहमीच जास्त बोलतो. पण लोक तरीही आपलं बोलणं पुरं करतातच की, पण याला मराठीत हं...हं शिवाय आणखी काही शब्द आहेत हेच माहित नसावं. तसा तो मीतभाषी हे खरंच पण त्याचा स्वभावही मृदू आहे असं सारखं वाटतं. त्याला आणखीन जवळून बघायला पाहिजे. पण काही का असेना गोड आहे. भारदस्त वाटतो. त्याच्या कमी बोलण्यामुळे असेल पण प्रत्येक शब्दाला धार वाटते. अगदी ओथंबून आलेल्या ढगांसरखा केव्हाही वाऱ्याची झुळूक येईल आणि आपल्या असंख्य हातांनी जलधारांचे दान धरित्रीच्या पदरात टाकेल असा मेघ. कृष्णवर्णीय का? हो काळाच. पण हा काळा रंग कुरुपतेचा कुठे आहे. हा तर श्‍यामचा लाघवी श्‍यामवर्ण......

रविवार, १७ जानेवारी, २०१०

मैफल रंगली

तो.... (मैफल रंगली)
हरिदास संमेलनाचे रिपोर्टींग करायला गेल्यावर आधी बुवांची छोटेखानी मुलाखत घ्यायला स्टेजच्या मागे गेलो, तर ती तिथेच होती. आपल्याला बघून ती चटकन सामोरी आली. बुवांना नमस्कार करायला आलात ना? मीही नमस्कार करायला आले आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडतं? खरं तर नाही म्हणायचं होतं. पण तोंडातून नकळत हो! आलं. मलाही आवडतं मी तर दोन परीक्षाही दिल्या आहेत इती ती. मी बुवांची मुलाखत न घेताच तिच्याबरोबर कार्यक्रमाला गेलो. व्यासपीठावर बुवा ताणा घेत होते आणि आपली नजर मात्र तिच्यावरच खेळली होती. एखादं निरागसं बाळ आजी सांगत असलेल्या गोष्टींकडे कसं लक्ष देवून ऐकेल तसंच ती गाणं ऐकत होती. तिच्या पापण्यांची होणारी जलद उघडझाप जाणवून गेली. मध्यंतरात तिचे अखंड बोलणं चालू होतं. एक मात्र जाणवलं ज्या मैत्रीणीबरोबर ती कार्यक्रमाला आली होती तिला सोडून तिने माझ्या शेजारील खुर्चीवरुन मैफल ऐकली. मैफल रंगली रंगमंचावर बुवांची आणि रंगमंचाखाली माझी.....

ती..... (मैफल रंगली)
त्याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं वाटलं नव्हतं. किंबहूना त्या नाटकानंतर आपली त्याच्याशी भेट होईल असंही वाटलं नव्हतं. केवळ शास्त्रीय संगीताची आवड आहे असं नाही तर बुवांचा किती आदर करतो तो.नाहीतर मैफीलीआधि कशाला आला असता बुवांना नमस्कार करायला. बुवांचे गाणं आपण यापुर्वीही अनेकदा ऐकलं अगदी प्राण कर्णाशी आणून ऐकलं. पण आज मात्र आपलं सगळं लक्ष बुवांच्या गाण्याकडे नव्हतंच. बुवांचं गाणं एकीकडे रंगत असताना आपलं मन मात्र दुसरीकडेच स्वप्न रंगवत होतं. एकदा दोनदा आपण चोरुन त्याच्यावर कटाक्ष टाकला तेव्हा त्याचं लक्ष आपल्याकडेच असल्याचं जाणवलं. कदाचित आपल्या मनाचे ते मांडेही असावेत. पण तो आपल्याकडे चोरुन बघत होता हे मात्र नक्‍की. मध्यंतरात आपण गाण्याविषयी इतकं बोललो पण तो मात्र शांत होता. अगदी विरक्‍त साधूसारखा पण त्याची नजर तशीच रोखलेली आणि टोकदार. नंतरचा दीड तास मैफल रंगली व्यासपीठावर बुवांची आणि मनात त्याची....

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

तो आणि ती

तो....(पडदा उघडला)
नाट्यगृहाच्या खिडकीपाशी किती वेगात आली ती. तिकीट घेतलं आणि झटकन सटकली.. तिकिटासाठी आपण तासभर रांगेत ताटकळत बसलोय हेच विसरलो. वाऱ्याचा झंझावात यावा तशी ती आली आणि गेलीही. आपण नुसतेच तिच्याकडे बघत राहिलो. नंतर नाटकाच्या मध्यंतरात चहा पीताना ती दिसली. रमेशही होता तिच्याबरोबर.... त्यानेच तिची ओळख करुन दिली. किती बडबडत होती. एखाद्या धबधब्यासारखी अखंड वहात होती. डोळे कितीदा मिचकावत होती. जाताना "परत भेटू' म्हटल्यावर आपण उत्स्फूतपणे कधी म्हणालो. त्या कधीवर ती काय खळखळून हसली. एखाद्या निष्पाप बाळासारखी आणि तेवढ्यात तिच्या गालावरची खळी आपल्याला दिसली....
नाटकाचा दुसरा अंक रंगमंचावर चालू झाला. पडदा वर गेल्याचे तेवढे जाणवले... पुढचे काही आठवतच नाही. उरलेला दिड तास तीच तर दिसत होती. नाट्यगृहाच्या खिडकीपाशी गडबडीत येणारी, अखंड बोलणारी, खळखळून हसणारी, हसताना गालावरचे केस मागे सारणारी, नाटकाचा हाच तर अंक डोळ्यासमोर उभा राहिला अगदी पडदा पडेपर्यंत.
....................................................................
ती....(पडदा उघडला)
काय शामळू आहे. तिकिटासाठी रांगेत उभा होता. पण एखादी मुलगी सरळ येते तिकिट घेते म्हणजे काय. मख्खपणे तसाच होता. चम्याच दिसतोय. नंतर मध्यंतरात भेटला. शर्टाचे हातोबे कोपरापर्यंत दुमडलेले. नाटक बघायला आलात की मारामारी करायला असं विचारल्यावर नुसताच हसला. आत्तापर्यंत अनेक मुले बघितली. अगोदर मुलीकडे एकटक बघतात आणि मुलगी बघायला लागली की मग नजर फिरवतात. हा मात्र एकटक बघत होता. आपण नजरेला नजर दिली तर नजर फिरवेल असं वाटलं पण पठ्ठ्याने नजर फिरविली नाही. पाच मिनीटात आपण किती बडबडलो पण त्याने मान हलविण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. जाताना भेटू म्हटल्यावर मात्र "कधी' किती उत्स्फूर्तपणे म्हणाला.
नाटक मध्यंतरानंतर पुढे सरकलंच नाही." कधी' एवढाचा त्यानं उच्चारलेला शब्द कानात घुमत राहिला आणि त्याची नजर टोचत राहिली. त्याचा चेहरा नजरेसमोरुन हललाच नाही, अगदी पडदा पडेपर्यंत.