आंदोलनाचा विषय कोणी चांगला घेतला म्हणून तो माणूस महानायक ठरतो का? एखादा विषय मार्गी लावल्यानंतर त्या माणसाला सगळ्याच विषयांतील सगळेच कळते, असे मानायचे का? त्याच्या प्रत्येक कृतीमागे कोणताही छुपा उद्देश नाहीच, हे का मानून चालायचे? समाजहित बघताना त्या महानायकाने केलेल्या चुका आणि त्याच्याकडून होत असलेल्या चुका यांना क्षमा करतच राहायचे का? एखाद्या विचाराने प्रभावित होणे वेगळे आणि तो विचार अंगीकारताना त्यामागची विचारांची बैठक मजबूत असणे वेगळे. याबाबत त्या महानायकाचे विचार ठिसूळ असतील तर तो त्या विचारांचा कसा मानायचा?..... असे अनेक प्रश्न आहेत... त्याची उत्तरे सापडत नाहीत. केवळ भोळेपणाने आणि समाजातील मोठा घटक अण्णा हजारे यांच्या मागे जातो म्हणून अण्णांना महानायक म्हणायला मन धजत नाही. अण्णांच्या प्रामाणिकपणावर आक्षेप घ्यायचे कारण नाही. त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबाच द्यायला हवा, तरीही आंदोलनकर्त्या माणसाला महानायक मानण्याची गरज आहे का? अण्णा खरेच महानायक आहेत का? प्रश्नांची माळ तुटता तुटत नाही. या प्रश्नांची ठोस उत्तरे अण्णांना पाठिंबा देणाऱ्यांकडेही नाहीत.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेला कोणीतरी ठोसा लावला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. रोजच्या "संसारिक' जबाबदाऱ्या पेलताना भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांना दिसत होता; पण त्यावर उपाय मिळत नव्हता. ए. राजा, सुरेश कलमाडी यांच्या प्रकरणानंतर तर लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडू लागला होता. त्यातच अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केले आणि लोकांचा अण्णांना पाठिंबा मिळायला लागला. इथपर्यंत सगळं ठीक चालले होते; पण इथून पुढे मात्र अनेक घटकांनी हे आंदोलन प्रभावित होत गेले. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. अण्णांच्या आंदोलनाला इंग्रजी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. यामागे केवळ या देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले पाहिजे, हा हेतू नक्कीच नव्हता. गेल्या सहा महिन्यांतील काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चा बघितल्या तर हे लक्षात येईल, की यांना हे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. ए. राजा प्रकरण असेल, सुरेश कलमाडी प्रकरण असेल किंवा विकिलिक्स प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांतून सरकारला अडचणीतच आणायचे होते, हे सहज लक्षात येते. (केंद्रातील युपीए सरकारही काही फार दिवे लावत नसल्याने या माध्यमांची भूमिका अयोग्य म्हणता येणार नाही; पण त्या पाठीमागे केवळ लोकहित हाच उद्देश नाही हे त्यांच्या आक्रस्तळेपणावरून लक्षात येते.) इथे मात्र एक मूलभूत फरक आहे. कलमाडी, राजा किंवा विकिलिक्स प्रकरणी विरोधी पक्षाने मोठा गदारोळ केला; पण लोकांचा पाठिंबा मात्र त्यांना मिळाला नाही. आता विरोधी पक्षांनी उठविलेल्या प्रश्नांना लोकांतून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या माध्यमांचीही गोची होत होती. सरकारची विश्वासार्हता कमी झालीच आहे; पण विरोधकांकडेही ती नाही, असाच संदेश जणू जनता देत होती. या दोन्हीपेक्षा तिसऱ्याच कोणीतरी हा प
्रश्न हाताळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती आणि अण्णांच्या रूपाने ती पूर्ण झाली. आता या प्रश्नाचे भांडवल करून सरकारला नमवावे, यासाठी ही माध्यमे पुढे झाली. त्यांनी अण्णांना हिरो करायचे ठरविले. चोवीस तास अण्णांच्या बातम्या दाखवून लोकांमधील असंतोष जागृत केला. लोकांना तिसरी व्यक्ती मिळाली आणि माध्यमांना नवा मुद्दा. विकिलिक्स आणि ए. राजा प्रकरणात सरकार कोसळले तर नाही; पण तरीही काही चिरा पडल्या होत्या. आता अण्णांना हिरो करून ती तोफ डागायची, याच उद्देशाने माध्यमे कामाला लागली. अण्णांच्या अनिश्चित (बेमुदत नव्हे) उपोषणाचे दिवस जसे पुढे पुढे जाऊ लागले तस तसे माध्यमांची धार तीव्र होत गेली. लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि एका वळणावर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. आता खरा प्रश्न परत निर्माण झाला आहे. आता अण्णा महानायक झाले. ते गांधीवादी विचारांचे आहेत, ते अंगावरच्या कपड्यांनीशी लढताहेत वगैरे वगैरे चर्चा झडू लागल्या. प्रश्न सुटणे महत्त्वाचे आणि तो प्रश्न सोडविणाऱ्यांना प्रतीक करून त्यांचा यथोचीत मान राखणे, हेही महत्त्वाचे असतेच. अण्णांच्या आंदोलनाबद्दल कोणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही; पण याचा अर्थ अण्णांना महानायकपदावर बसविणे हे अण्णांसाठी आणि समाजासाठीही घातक ठरेल.
विचारांची पताका हातात घेणे आणि ती घेऊन पुढे जाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींना हे दोन्ही जमले. स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण यांनाही ते काही प्रमाणात जमले (जयप्रकाश नारायण यांना गुरू मानणारे किमान डझनभर नेते दिल्लीत सरकारला हलविताना दिसतील); पण हे अण्णांना जमेल का? हा प्रश्न आहे. अण्णांकडे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी शक्ती नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या विचारांचा गोंधळच प्रचंड आहेत. बौद्धीक क्षमतेविषयी कोणी जर आक्षेप घेत असेल, तर त्यामागील असूया आणि निगरगट्टपणा सोडून त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण, अशा माणसांना देव्हाऱ्यात ठेवून आपला कार्यभार करणारे निर्माण होतात (इथे तर ते झाले आहेतच) आणि आंदोलनाची दिशा दाखविणे, बघून घेणे, अडचणीतच आणणे या पातळीवर येते. त्याचबरोबर देव्हाऱ्यातील या महानायकालाही आपण खूप मोठे आहोत असा भास होतो आणि तो वेगवेगळ्या मागण्या करू लागतो. या मागण्या बहुंताशवेळा व्यवहारवादाच्या पलीकडच्या असतात आणि मग समाजासाठी रणांगणात उतरलेला महानायक समाजाचेच नुकसान करायला लागतो. त्यांचे शिष्य त्यांच्या विचारांना विरोध म्हणजेच समाजावादाला, पुरोगामित्वाला विरोध, देशाला विरोध अशा आवया उठवायला लागतात. त्यामुळेच अण्णांना महानायक करणे समाजाने पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे.
अण्णांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात कुठे गांधीवाद दिसत नाही. गांधीजी ज्या प्रकारे आंदोलन करायचे त्यालाच गांधीवाद समजायचा का? गांधीवाद हा विचारांचा आणि आचारांचा एक मार्ग आहे. एका बाजूला अण्णा फाशी द्या, गोळ्या घाला अशा पद्धतीचे आवाहन करताहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधीवादी म्हणवून घेताहेत. अरे गांधींना तलवारच मान्य नव्हती आणि हे तर तलवारीच्या म्यानेत गांधीवाद कोंबताहेत. प्रश्न केवळ तलवार किंवा फाशीची गोष्ट करण्याबाबत नाही, तर प्रश्न आहे त्या विचारांची अधिष्ठान असण्याचे. एक क्षणभर आपण मानू की काय फरक पडतो, की ते गांधीवादी आहेत की नाही याचा. भ्रष्टाचारविरोधी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपला प्राणही पणाला लावला होताच की. त्यांच्या प्राण पणाला लावण्याबद्दल आक्षेप नाही किंवा त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेबद्दलही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो त्यांच्याभोवती जमत असलेल्या जळमटांबद्दल. ही जळमटे वाढली, की त्यात समाजाचाच श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. नेत्याकडे अशी जळमटे बनू न देण्याची ताकद असायला हवी. दुर्दैवाने ती अण्णांकडे नाही. त्यामुळे ते दीर्घकालीन मोठे आंदोलन उभे करू शकत नाहीत. अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...
२ टिप्पण्या:
agdi zakas lihile aahe. satypristhiti aahe. phakt khare lihinyache dhadas dahwlet tey chan kelet
मस्त लिहिलंय.. आवडला लेख !
टिप्पणी पोस्ट करा