तिची पत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तिची पत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

प्रिय

प्रिय
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. दिवस. कदाचित वर्षही उलटून गेले असेल. असो. मुंबईच्या या धावपळीच्या जगण्यात पाठिवरचे ओझे पोटावर कधी आले हे कळलेच नाही. (इथे मुंबईत पाठिवरची सॅक पोटावर घ्यावी लागते हे तुला माहितच आहे.) अर्थात हे माझे रडगाणे ऐकवायला हे पत्र लिहिले नाही. तसे पत्र लिहायला एकच एक कारणही नाही. अनेक कारणे आहेत... खरे तर कारण असे नाहीच.... काल रात्री बगळयांची माळ फुले अजुनी अंबरात हे गाणं कोठूनसं  कानावर आलं....आणि  सर्रकन आठवणींच्या पक्ष्यांचा थवा आकाशात उडाला.
तुला आठवतं तुझ्या टेस्टीमोनीयलवर मी ‘छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ’ हे कडवं टाकलं होतं. किती हसली होतीस. म्हणाली होतीस टेस्टीमोनीयलवर काय टाकायचे असते हे तरी कळते का? मी नेहमीप्रमाणे गप्प बसून होतो. गप्प कसला शब्दच सुचायचे नाहीत. या शब्दांइतके दगाबाज कोणी नाही. ऐनवेळी योग्य शब्दाने तुमचा हात धरला, असे होतच नाही. मग अक्षरांची जुळवाजुळव करायची आणि जे जुळेल त्याला शब्द म्हणायची माझी पद्धत. त्यावेळी ही अक्षरांची जुळवाजुळवही करता आली नाही. काल हे गाणं ऐकताना पुन्हा त्या सगळ्यांची आठवण झाली. वा. रा. कातांनी किती हळुवार लिहिलय. ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात..... अशी ती ओळ होती. मी एवढेच कडवे टाकले होते. हातांसह सोन्याची सांज गुंफता आली नाही हे खरेच.... पण अशा अनेक सांज आठवणींनी गुंफल्या आहेत... मला कल्पनाच भारी वाटते..... त्या गाठी, त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भरदिवसा झाली..प्रत्येक शब्दावर जीव ओवाळून टाकावा वाटते..यातील शेवटचे कडवे तर कळस आहे...
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात? .   प्रेमात न पडलेलाही एखादा या कडव्यासाठी प्रेमात पडेल.... जगण्याचे अवघे रंग एखाद्या सांजेत मिसळावेत असे हे गीत आहे..... बर्‍याच दिवसांनी पत्र लिहितोय. फार काही लिहित नाही.....पुन्हा कधीतरी......
                                            तुझाच

शुक्रवार, २३ मे, २०१४

प्रिय,


प्रिय,
बाहेर अवकाळी पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालतोय. गारांच्या माऱ्यामुळे गाल लालबुंद झाले होते. अजूनही कपाळावर ओल्या बटा रेंगाळत आहेत. गाडी पार्क करण्याच्या ठिकाणी कुत्र्याचे एक पिल्लू अंग चोरून बसले होते. गाडी बघून ते तिथेच सरकले. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे ते करुण नजरेने बघत राहिले. मी त्याला परत पावसात तर पिटाळणार नाही ना? असा सवाल त्याच्या त्या भेदरलेल्या डोळ्यांत होता. मी हलकेच गाडी स्टॅंडला लावली आणि त्याला तिथेच सोडून दिले. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ते तसेच उजेडाच्या आशेने रात्रभर कुडकुडत पडलं असेल. अशा मिट्‌ट काळोखाच्या काही रात्री सरता सरत नाहीत. अशा अनेक रात्री मी जागून काढल्या आहेत. दारातल्या चांदण्यांना साक्षी ठेवून. या रात्री खरेतर कालिंदीच्या डोहासारख्या असतात. लांबून शांत वाटणाऱ्या पण आत कालियाचे विष पचविणाऱ्या.

कालिंदिच्या डोहाचे वैशिष्ट्यच असे की तो डोह पेलवतही नाही आणि सोडवतही नाही. हा कालियामर्दनापुर्वीचा डोह खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यात साठवला तो राधेने. व्याकुळतेने. विरहाने.कृष्णभेटीची आस लागून. कृष्णभेटीचा आस म्हणण्यापेक्षा राधेचा आसच मुळी कृष्ण होता. त्याच्यामुळेच तर तिला गती होती. एवढ्यानेही राधेचा डोह पुरा होत नाही, त्याच्यावरचे तरंग अजून स्पष्ट होत नाहीत. कारण व्याकुळता तर अहल्या, शबरी आणि सीतेच्याही डोळ्यांत होती पण कालिंदीचा काळाभिन्न डोह काही त्या डोळ्यांत कधी दिसला नाही.
अहल्या तर शिळा होऊन पडली होती. त्यामुळे निर्जीव डोळ्यांमध्ये "राम'भेटीने प्राण आतले गेले आणि मग ते काही काळ झरलेही पण तेवढेच. इथे मला ग्रेसचे ते रुपक आठवते. ग्रेस म्हणतो, राम त्या शिळेजवळून जाताना तिचा गळा दाटून आला. न जाणो तो तसाच निघून गेला तर. अहल्येचे अश्रू रामाच्या पाद्यपुजेइतकेच. त्या अश्रुत राम विरघळणारा नव्हता की प्रवाहीत होणारा नव्हता. शबरीच्या डोळ्यातही रामभेटीची व्याकुळता होतीच. त्यामुळेच तर रामाला तिने डोळे भरून साठवून घेतले. पण तरीही तिच्या डोळ्यातला तो डोह कधीच नव्हता. होता फक्‍त राम राम आणि राम. कालिंदीच्या डोहाला खरे तर विरहाचा पदर आहे. अहल्या आणि शबरीला भेटीपर्यंतची आस होती. त्यानंतर राम तिथे थांबणारा नव्हताच.
रावणाच्या तावडीत सापडलेल्या सीतेच्या डोळ्यांनाही रामाची प्रतीक्षा होती. होती तडफ, आग आणि वेदना. सीतेच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या प्रवाहातच लंका संपून गेली. खरे तर तिचे डोळे आग ओकत होते. मारुतीच्या शेपटाला लावलेल्या आगीपेक्षाही भयंकर ज्वाला सीतेच्या डोळ्यांतून उमटत होत्या म्हणून मारुतीच्या निमित्ताने लंका दहन झाली. कालिंदीचा डोह जर तिच्या डोळ्यांत असता तर लंका कधीच जळली नसती. ती तर समुद्राच्या पोटात गेली असती. त्यामुळे राधेचा डोह मोठा. तो अचल आणि काळाभिन्न. कालियाच्या विखारी शेपटासारख्या आर्ततेने तो डोह प्रवाहबंदी केला आहे, आणि त्याला प्रवाहबंदी आहे म्हणून तर तो खोल आहे. त्यामुळे राधेला कालियामर्दनाची आशा आहे.
आपल्या नशिबी असतात कालियाच्या विखारी शेपटाचे तडाखे. त्यामुळेच रात्रीचा काळोख कितीही खोल आणि गडद असला, कितीही कालींदिच्या डोहासारखा असला तरी तो डोळ्यांत साठवता येत नाही. डोहाची आर्तता नाही. त्यामुळे कालियामर्दन नाही.....
बाहेर, प्राजक्‍तांचा सडा पडला असणार त्याचा गंध घरभर पसरला आहे. अगदी तुझ्या आठवणींसारखा....

तुझाच 

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

प्रिय,

बाहेर ज्येष्ठातला पाऊस अखंडपणे कोसळतोय. रात्रीच्या या काळाखोत पावसाचा तेवढा आवाज ऐकू येतोय.. जणू आता सगळं आपल्या मिठीत घेऊन वाहून नेण्यासाठी आतुर असलेला हा पाऊस कधी थांबेल की नाही असंच वाटू लागलंय. रात्र, बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस, अशावेळी एकटं वाटतं. हा एकटेपणा दूर करण्याचा एक पर्याय असतो तो म्हणजे तुला पत्र लिहिण्याचा. पत्राच्या सोबतीने तुला सोबतीला आणण्याचा.. या मिट्ट अंधारात टेबलावरची ही मेणबत्ती आपल्या तुटपुंज्या शक्‍तीने तेवत आहे. खिडकीतून येणाऱ्या ओलसर वाऱ्याला न जुमानता तिची जगण्याची लढाई सुरू आहे. कधी कधी तिची ज्योत थरथरते, पण तेवढीच... पुन्हा ती ताठ मानेने तेवत राहते. अगदी थकलेल्या म्हातारीसारखी ती करारीपणे जगत आहे...
संध्याकाळची गोष्ट... दुपारपासूनच सुरू असलेल्या पावसाने सगळीकडे पाणी पाणी केले होते. झाडांवरून पावसाच्या पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. इथे आमच्या घराच्या समोरच्या झाडावर असाच एक कावळा आपल्या सर्व शक्‍तीनिशी पावसाशी लढत असलेला मी बघितला.
आपल्या कोवळ्या काळ्या पंखावर पावसाचे बाण सहन करत तो फांद्यांच्या आधाराने पावसाच्या डोळ्यांत डोळा घालून बसला होता..त्याचे ते काट्या-कुट्याचे घरटे खाली कोसळले होते... फांद्यांचा आडोसा अपुरा पडत होता... त्याच्या तलम काळ्या पंखांचा आता पार झाडू होऊ गेला आहे. हे त्यालाही माहीत होते, पण तरीही त्याने आपली फांदी सोडली नव्हते... तिथून अगदी एका झेपेच्या अंतरावर माझ्या घराची बाल्कनी आहे. त्यात तो आला असता तरी त्याला कोणी हुसकावून लावले नसते तरी तो त्या झाडावर बसून राहिला. आपल्या मोडतोडत्या घरट्याकडे बघत. पावसाचे टपोरे थेंब आपल्या पंखावर झेलत. आताही तो या किर्र अंधारात त्याच फांदीवर तिथेच तसाच पडून असेल नया ज्येष्ठातल्या पावसाला तशी माया कमीच... तू म्हणायचीस नेहमी... "" मला वळिवाचा पाऊस आवडतो, कारण तो येतोच मुळी नाद करत, ढोल-ताशे घेऊन. येताना वाजत गाजत येतो आणि जाताना सगळा कचरा आपल्यासोबत नेतो, उन्हाने रापलेली मनं आणि तापलेल्या जमिनीला तृप्त करुन मागे ठेवतो फओलावा. ज्येष्ठ-आषाढ हे निमंत्रितांसारखे येतात. आपल्या ठराविक जागेवर बसतात आणि उठतात. कोसळतातही कर्तव्य केल्यासारखे. त्यांना माया नसतेच.'' खरंच आहे तुझं. आता बघ हा पाऊस येता तसाच. अगदी आपल्या कामाचे आठ तास मोजून भरावेत, यासाठी जणू केव्हापासून कोसळतो आहे.. त्याबरोबर आता वाराही जोराचा सुटला आहे.... मघापासून धीराने वाऱ्याचे आव्हान पेलणारी मेणबत्ती आता जास्तच थरथरू लागली आहे. या लढाईत ती जिंकणे अशक्‍य आहे. त्यामुळे आता पत्र अपुर्ण ठेवून झोपेला जवळ करणे हेच उत्तम...!
सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मला त्या आपल्या काट्या-कुट्याच्या घरट्याकडे बघत फांदीवर पाऊस झेलणाऱ्या कावळ्याची आठवण आली..
पत्र पूर्ण करावे की कावळ्याला बघावे या द्विधा अवस्थेत होतो. पण पहिल्यांदा तो कावळा बघावा आणि मग पत्राला हात घालावे असे वाटले म्हणून मी अंगणात गेलो. अंगणात त्या झाडाखाली पडलेल्या काट्या-कुट्याच्या घरट्याशेजारी तो कावळाही अचेतन होऊन पडला होता. त्याचे पंख त्या विस्कटलेल्या घरट्यासारखेच विस्कटले होते. त्याच्याच कडेला दुपारी पोरांनी सोडलेल्या नावांचे कागद. मला आता कळतंय की तुला ज्येष्ठ-आषाढातला पाऊस का आवडत नाही... कावळ्याची घरे ज्येष्ठ-आषाढातच कोसळतात... आणि कधी कधी कावळेही....!

                                                                                                                                                  तुझाच....

शुक्रवार, १० मे, २०१३

प्रिय,



कशी आहेस? काही प्रश्‍न हे उगाचच विचारले जातात ना? त्या प्रश्‍नांना तसा अर्थ नसतो. त्याची उत्तरे माहीत असतात. पण तरीही सुखात! हा शब्द ऐकण्यासाठी कान नेहमीच आतुर असतात. अनेकदा कानाचे आणि मनाचे पटत नाही; पण कानावर जास्त विश्‍वास ठेवावा लागतो. मागच्या वेळी मी ग्रेसबद्दल लिहिलं होतं. आठवतं... ग्रेस मनात शिरता शिरत नाही आणि एकदा शिरला की तो निघता-निघत नाही... तो रेंगाळत राहतो... त्याचे आर्त शब्द कानांत घट्ट आवाज करून राहतात.. अनेक अर्थांचे शेले ओढून आणलेले ते शब्द आपले सगळे शेले हळुहळू सोडून देतात...
अगदी हवेत शब्दांना फेकावे आणि त्या शब्दांना त्याने शब्दांनीच तोलून धरावे असे काही... पण केवळ शब्दांच्या आणि प्रतिमांच्या प्रेमात पडलेला हा कवी नव्हता. तो जपणूकदार होता... आपल्या सगळ्या जखमांची जपणूक करायचा. ग्रेस यांनी आपल्या शेवटच्या काळात लिहिलेल्या ओल्या वेळूच्या बासरीचे सूर आता माझ्या कानात घुमत आहेत... खरे तर ही कला त्यांनाच जमू शकते... पोकळ वेळूत कोणीही फुंकर मारून सुरांना आळवू शकते... ग्रेस प्राणांनी फुंकतात... त्यामुळे ओल्या वेळूची बासरीही मग सूरमयी होऊन जाते... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत असताना ग्रेस यांच्या श्‍वासातून उमटलेले हे सूर आहेत. मला त्यात आर्तता दिसते. कधी भूतकाळाशी नाते जोडण्याचा प्रयत्न दिसतो. प्रतिमांच्या चौकटीतून जगाला बघणारा हा कवी प्रतिमांची चौकट एवढी मोठी करतो, की त्यात आपणही सामावून जातो. कधी कधी वाटते, की तो हा प्रतिमांचा पसारा सगळा आवरून, छे! उधळून देऊन मुक्‍तपणे लिहितो की काय? पण पुन्हा तो मागे फिरतो आणि प्रतिमांमध्ये अडकत राहतो. कर्करोगासारखा असाध्य रोग झालेला असताना जगण्याच्या भूतकाळाच्या पाटीवर पुसलेल्या आठवणींच्या रेषा त्यांना आठवत नसतील, असे म्हणणे म्हणजे तो त्यांच्यावरच अन्याय आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लेखांत जणू याच रेषा त्यांनी ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना पुन्हा प्रतिमांची चौकट घातली आहे इतकेच! या प्रतिमांच्या चौकटीत त्यांना सापडला तो देवदास... कर्करोगाशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत असताना, त्या औषधांच्या आणि फिनेलच्या वातावरणात त्यांना देवदास का आठवतो?... तो केवळ आठवत नाही तर तो समग्र आठवतो. त्याच्या मनाच्या कप्प्यांसह आठवतो... चार दशकांहून अधिक प्रवास केल्यानंतर अगदी शेवटी त्यांना आठवतो तो देवदास... तोच देवदास जो पार्वतीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे... पण का? देवदासच का आठवला?
...ही देवदासाची मरणवाट नाही तर हा पार्वतीव्यतिरिक्‍त उरलेल्या जीवनसलगीचा एकमेव घाट आहे, अशी ओळ लिहिणाऱ्या ग्रेस यांना पार्वतीबरोबर घालवलेले क्षण जितके देवदासला आठवतात किंबहुना छळतात तितकेच ते छळतात जणू... गंमत आहे बघ... मला यांमध्ये प्रतिमांच्या जंजाळात अडकवून हलकेच आपले सांगणे पोचविण्याचा प्रयत्न दिसतो. तो तर त्यांच्या लेखनशैलीचा अविभाज्य घटक होता, पण यावेळी त्यांनी निवडलेल्या प्रतिमा सामान्य डोळ्यांच्या माणसांनाही स्पष्ट दिसतात... देवदासचे दुःख सगळ्यात मोठे का वाटते? कारण तो पार्वतीवर आसक्‍त नाही... आसक्‍ती ही प्रेमाची पायरीच असू शकत नाही... शरदचंद्रांनी लिहिलेल्या 1917 च्या या कादंबरीच्या नायकाचे आणि नायिकेचे अंतरंग कळण्यासाठी प्रेम करायला हवे... पार्वती आपल्याला मिळणार नाही, म्हटल्यावर देवदास कोलमडतो... ग्रेस म्हणतात, जगाकडून आलेली समीकरणे अनेक असतात. गोमेचा एक पाय तुटला म्हणून काय झाले... पण गोमेच्या अनेक पायांपैकी एक पाय तुटल्यावर तिच्या जीवाचा समग्र आकृतिबंध शबलित होतो, कलंकित होतो त्याचे काय? किती सहजतेने खरे सांगून टाकले... काय झालं... आयुष्य थांबतं का कोणासाठी? जगणं म्हणजे एवढंच का? हे सरळ नियम लोकांनी कुबड्यांसारखे निर्माण केले आहेत. त्याला उत्तरे देण्याची गरज नसते... जगण्याची रीतच अशी, की त्यात आकृतिबंध तुमचा हवा... अगदी तुझा हवा... पण तसं होत नाही... गोमेचा पाय करून टाकतात... आणि प्रश्‍नाची कुबडी हातात देऊन टाकतात... कुबड्या कधीच पायाची जागा घेऊ शकत नाहीत... त्या आधार देतील; पण पाय नाही होऊ शकत... आणि त्या चालण्याला प्रवास म्हणायचं की आयुष्य... खरे तर ते खुरटत चालणं... ढकलणं...
मी डोळे मिटून बघतो... अगदी आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असावा, या कल्पनेने डोळे मिटतो... आता या क्षणी मिटलेले डोळे कायमचे मिटले तर त्या अखंड अंधाराच्या प्रवासात डोळयांच्या पटावर कुठले चित्र उमटेल याचा मी विचार करतो, त्यावेळी तुझा एकच चेहरा दिसतो... अगदी हसरा... सोबत देणारा... त्या मिटलेल्या पापण्यांवर आपले गरम ओठ टेकवणारा... कदाचित हा कल्पनेचा खेळ असावा. आपण मिटलेले डोळे उघडले जाणार आहेत, याचा विश्‍वास कुठेतरी मनात खोल रुतून बसलेला असतो. त्यामुळे त्याचे काही वाटत नाही... पण खरोखर आपला मृत्यू समोर दिसतोय हे बघितल्यावर माणसाच्या मनात नेमके काय येत असेल...?

इथे आठवतो तो भीष्म... शरशय्येवर पडलेला भीष्म... उत्तरायणाची वाट बघणारा भीष्म... स्वतःच्या बापासाठी राजगादीवर लाथ मारून अखंड ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करणारा देवव्रत, भावासाठी राजकुमारींना पळवून आणणारा भाऊ, सत्यवतीने कुरूवंशवाढीसाठी प्रतिज्ञा मोडण्यासाठी भरीस घालूनही न बधलेला भीष्म... परशुरामासारख्या योद्‌ध्यासमोरही हार न पत्करणारा पण द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी गप्प राहणारा भीष्म... शरशय्येवर पडलेल्या आणि उत्तरायणाची वाट बघणाऱ्या भीष्माच्या डोळ्यासमोर काय येत असेल...? त्याच्या दीडशे वर्षांच्या आयुष्याच्या कुठल्या गोष्टी अगदी ठळक दिसत असतील... बापासाठी भीष्मप्रतिज्ञा केल्याचा दिवस की त्यानंतरचा दिवस...? राजा प्रदीपचा नातू आणि शंतनू-गंगेचा मुलगा देवव्रत याने आपल्या ताकदीच्या मनोनिग्रहाच्या जोरावर प्रतिज्ञा घेतली खरी; पण... त्या रात्री त्याला खरंच झोप लागली असेल...? त्याच्या डोळ्यांतही एखादा चेहरा तरळला नसेल का? मला वाटतं... शरशय्येवर आडवा झाल्यावर भीष्माच्या डोळ्यासमोर तोच चेहरा दिसत असणार... आठवणींचा गुंता झाला असणार... त्या प्रत्येक बाणाबरोबरची टोचणी त्याला जाणवत असणार... तो कोणाचा तरी देवव्रत होता... कधी तरी कोणीतरी देवव्रताच्या मनाच्या झरोक्‍यात प्रवेशलं असणार आणि भीष्माच्या प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली ते दबून गेलेलं... मृत्यूशय्येवर पडलेल्या भीष्माला माफी मागावी वाटली असेल का? खरे म्हणजे तो राजगादी सोडून बाकीचे राजवैभव उपभोगत होता. पण त्यात त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन का केले? सत्यवतीने विनवूनही त्याने विचित्रवीर्याच्या बायकांना का हात लावला नाही... कुरुवंशाचे खरे रक्‍त त्याच्या नसा-नसात वाहत असताना त्याला व्यासाचा आधार का घ्यावा वाटला? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला की ती त्या मनाच्या झरोक्‍याशी येऊन मिळतात. त्याने घेतलेली शपथ जर आणखी कोणाच्या भाळी लिहिली गेली असेल तर त्याचा उल्लेख महाभारतात नाही; पण त्यावेळी तो अस्तित्वात नसेलच कशावरून... आपल्यामागून असं फरफटलेलं आयुष्य त्याने कदाचित बघितले असेल... आणि त्याचा दोषी तोच होता... त्यामुळेच तर त्याला त्या बाणांची टोचणी फार लागली नाही. त्यापेक्षा मोठी टोचणी त्याला लागून राहिली होती. ग्रेस म्हणतात तसे गोमेचा एक पाय... त्याने एक पाय तोडला पण पुन्हा जे कलंकित आयुष्य त्याच्यासाठी भोगावे लागले त्याचे काय? देवव्रताचा भीष्म झाला... तसेच कोणीतरी हे व्रत आपलेच समजून जगले नसेलच असे नाही... कदाचित त्या चेहऱ्याला पुन्हा बघण्यासाठीच उत्तरायणाचा बहाणा करून भीष्म जिवंत राहिला नसेल कशावरून...?

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

प्रिय,


हे पत्र 26 मार्चला लिहिलं होतं.....फक्‍त पोस्ट आता करतोय....


प्रिय,
आज 26 मार्च. बरोबर याच दिवशी वर्षापूर्वी एक प्रतिभावंत आत्मा आपला देह सोडून आपल्या जगात निघून गेला. ग्रेस त्याच्या जगात निघून गेला. खरे तर तो इथे कधी रमलाच नाही. तो इथला कधी नव्हताच, त्याचे जग वेगळे. तो त्या आपल्या जगात निघून गेला. ग्रेस गेला. माणिक गोडघाटे नावाच्या माणसाचा देह त्याने त्यागला. त्याची इथे घुसमट झाली की नाही माहीत नाही. जाण्याच्या दिवशी त्याचे पाय इथेच राहण्यासाठी थोडे घुटमळले की नाही माहीत नाही; कदाचित थोडे घुटमळले असतील. पण तरीही त्याला आपले पाय सोडवून घ्यायला फारसा त्रास झाला नसेल. खरे तर त्या दिवशी तो फक्‍त आपल्या दृष्टिआड झाला. ज्या दिवशी माणिक गोडघाटे नावाच्या देहाला "ग्रेस'ची ओळख पटली, त्याच दिवसापासून त्याचा त्या गूढ अंधारात जाण्याचा प्रवास सुरू झाला होता. या प्रवासात तो एकटा निघाला खरे; पण त्याला तो एकट्याचा प्रवास नको होता. त्या प्रवासात सोबत येण्यासाठी त्याने अनेकांना शब्दांच्या माध्यमातून साद घातली; पण ती साद ऐकण्याचे कान फार थोड्याच जणांकडे होते. जी. ए. कुलकर्णींकडे तो कान होता. पण जी. ए. तर त्याच्याआधीच त्या अंधारात निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने त्या अंधाराला सोनेरी किनार लागली होती. तरी ग्रेस
बाकीच्या लोकांना साद घालत राहिला, वाट दाखवत राहिला. आपल्यासोबतीने येण्याचे आमंत्रण देत राहिला; पण त्या वाटेवरून चालण्याचे धाडस फारसे कोणी करू शकले नाही. तो कंठाच्या मुळापासून साद देत राहिला; पण त्या सादेतील आवाज बहुतांश जणांच्या कानापर्यंत पोचत नव्हता. ज्यांच्या कानापर्यंत पोचत होता, त्यांनाही त्यात अधिक गोंधळच जाणवायचा. त्यामुळे त्याच्या त्या वाटेला कोणी गेले नाही. खरे तर ग्रेस इथे रमलाच नाही. तो इथे रमला असता तर माणिक गोडघाटेच्या देहाची ग्रेसशी ओळख झाली नसती. तो ग्रेस होता. आपल्या भाळावरची जखम तो अशी दाखवी, की समोरच्याला ती जखम न वाटता नक्षीदार गोंदण असल्याचे वाटून जाई. ग्रेस गेला. पण जाताना त्याने जखमांची केलेली गोंदणे तशीच ठेवून गेला. इथे इतकी वर्षे राहिल्याचे ते कदाचित देणं असेल. तशी त्याने कोणतीच देणी बाकी ठेवली नव्हती. त्या देण्यावर कित्येक पिढ्या गुजराण करू शकतील. अर्थात ही संपत्ती वापरण्यासाठी त्याचा वारसा सांगणारे हवेत, ते मिळोत म्हणजे झाले. मला ग्रेसचा वंश वाढलेला बघायचा आहे. जखमा जपाव्यात तर ग्रेसने. भळभळत्या जखमेवर तो हलकेच फुंकर घालतो आणि नकळत भरत आलेल्या जखमेत नखही खुपसतो. त्याला जखमेची वेदना सहनही होत नाही आणि तो तिला सोडतही नाही.
तो असा का? हा प्रश्‍न नाही, कारण तो ग्रेस. ग्रेस मनावर उमटतो. ग्रेसचा मुक्‍काम तिथे. त्याला जर मेंदूच्या खिडकीतून बघायचा प्रयत्न केला तर त्याचा चेहरा धूसर होत जातो. दाढीआड लपवलेल्या चेहऱ्यावरच्या वेदनांच्या खुणा अस्पष्ट होत जातात, नव्हे तर चेहराच अस्पष्ट होत जातो. त्यामुळे त्याचा मनावरचा मुक्‍काम हलवू नये. खरे तर सगळीच मनावरची घरटी उचलून मेंदूच्या पेशींवर ठेवली तर ती टुमदार दिसतात खरी; पण त्यांच्या भिंती ठिसूळ होऊन गेलेल्या असतात. त्यामुळे अशी घरटी मेंदूच्या पेशींवर रुजत नाहीत. त्यांना मनावरच ठेवून द्यावे. अगदी मोडक्‍या-तोडक्‍या अवस्थेत त्यांना तिथेच रुजू द्यावे. ग्रेस अशी घरटी करणारा खरा "क्रिएटिव्ह'. तो म्हणायचाही creativity is my life and its conviction is my character...' ग्रेस असं बोलून जायचा आणि मग त्याचा अर्थ समजावत-बिमजावत बसायचा नाही. याचा अर्थ काय काढायचा माणसानं? conviction चा अर्थ डिक्‍शनरीत खूप गंमतीदार आहे; एक तर शिक्षा किंवा दृढ विश्‍वास. गम्मत म्हणजे ग्रेसला दोन्ही लागू होते. त्याला नेमके काय म्हणायचे होते? पण त्याचा त्याच्या निर्मितीवर असलेला दृढ विश्‍वासच जास्त महत्त्वाचा वाटत असणार. खरे तर त्याला love is my life असं म्हणायचं असणार. खूप मोठ्या माणसांनाही सगळ्याच वेळी सगळंच खरं कुठे बोलता येतं. तो प्रचंड प्रेमी होता. कशावरून विचारलंस तर सांगता येणार नाही. पण होता खरे. प्रेमी फक्‍त प्रेम करणाऱ्यांनाच म्हणायचे? मला नाही पटत, प्रेमासाठी भुकेलेल्यांना, ज्यांचा शोध अखंड सुरू असतो त्यांनाही प्रेमीच म्हणायला हवे. ग्रेस शोधणारा... प्रत्येकाचा शोध वेगळा. ग्रेसचा मार्ग वेगळा. त्यामुळे त्याच्या कवितांमधून उमटणारा अर्थ प्रत्येकाला वेगवेळा लागतो. ज्यांच्या मनापर्यंत ती कविता पोचली, त्यांनी त्या कवितेला आपल्यापरीने अर्थ लावले. काही कविता आपण कधी ऐकतो, कोणाच्या तोंडून ऐकतो यावरही त्याचा अर्थ अवलंबून असतो का? "भय इथले संपत नाही...' ग्रेसचीच कविता. तुझ्या तोंडून ऐकलेली... त्यापूर्वीही बऱ्याचवेळा ऐकली होती आणि त्यानंतरही बऱ्याचवेळा ऐकली. पण काळजाच्या खोलीत शिरली ती तुझ्या तोंडून ऐकलेली. तसे सगळेच शब्द. my conviction is my life... असं आज मला म्हणावंसं वाटतं आणि त्याचा नेमका अर्थ काय हे तुलाच शोधायला लावावं वाटतं....
तुझाच...

गुरुवार, २८ मार्च, २०१३

प्रिय,


प्रिय,
दुपार टळली आहे. उन्हाची सरळ किरणे आता तिरपी झाली आहेत. झरोयेणाऱ्या किरणांनी आपल्या पावलांचा वेग वाढविला आहे. इथे खिडकीत बसून आता हे पत्र लिहिताना समोरच्या झाडांवरील पक्ष्यांची लगबग वाढलेली जाणवत आहे. झाडांच्या बुडख्याशी पडलेल्या पानांची सळसळही वाढली आहे. मध्येच कोकिळेचा स्वर ऐकू येत आहे. वसंत आल्याची ती खूण. म्हणजे तसे प्रत्येक ऋतूच्या येण्याचे पडघम वाजतातच. म्हणजे बघ, वर्षा ऋतू येणार असेल तर एखादा वळीव आधीच पडतो. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट सांगत असतो की अरे! पुढे पावसाळा येणार आहे, तयार राहा. पावसाळा ऋतू सम्राटाप्रअसतो, येताना आणि जातानाही शंखनाद होतो. तो येतोही असा, की सगळं आपल्या आधीन करून टाकतो. बाकीचे ऋतू तुलनेत शांत.
आता हेच बघ ना.. हेमंत, शिशिर येतात चोरपावलाने आणि जातातही चोरपावलाने. अगदी आपल्या उत्कर्षाच्या काळात त्यांचे अस्तित्व जाणवते एवढेच. पण वसंत यापेक्षा निराळा. तो येतोही मंद सुरांनी आणि जातोही भैरवी गाऊन.. ही मैफल संपू नये वाटत असतानाच तो निघतो.. हेमंत अजून सरलाही नाही, त्याअगोदरच कोकिळेने आपला तंबोरा लावायला घेतला आहे. झाडांनी आपल्याभोवती पिकल्या पानांचा सडा घातला आहे. फांद्यांवर हळूहळू पालवी फुटू लागली आहे. हे असंच होतं माझं, नेहमी भरकटत राहतो... लिहायचे असते एक आणि लिहितो भलतेच.
तुला माहीतच आहे, ज्यावेळी जे बोलायचे ते बोलता कुठे आले मला? जाऊ देत! तर सांगत होतो, माझ्या घरासमोरच्या शेवग्याची अशीच पानगळती सुरू आहे. त्याची ती इवलीशी पिवळी पाने अंगणात मुबागडत असतात... दिवाळी-दसऱ्याला आपण जशी अंगणात मोठी रांगोळी घालतो तशी ती पानांची स्वैर रांगोळी पसरलेली असते.. आताही खिडकीतून बघताना या पिकल्या पानांची पाठशिवण सुरू आहे. त्यातच मध्ये-मध्ये दिसणारी ही सावरीची म्हातारी म्हणजे लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या पोरांमध्ये लिंबू-टिंबू पोरं जशी लुडबुडतात तसंच आहे हे. या सावरीच्या कापसाला म्हातारी का म्हणत असतील याचं मला नेहमी कोडं पडतं. छे! हे तर एखाद्या लहानग्याला त्याच्या आईने झालरीचे टोपडे घातले आहे, त्याला दृष्ट लागू नये म्हणून कपाळाला, गालाला, हनुवटीला तीट लावली आहे आणि अंगणात खेळायला सोडले आहे असेच वाटते. ते पोर मग अशा पाठशिवणीच्या खेळात मध्ये-मध्ये लुडबुडत राहातं... आता हेच बघ, त्या पाठशिवणीच्या खेळात रममाण झालेलं एक पान लपण्यासाठी हळूच खिडकीतून आत आलं आहे. माझ्या टेबलवरच्या उघड्या वहीच्या पानांत अलगद जाऊन बसलं आहे. मी ही वही अशीच मिटली तर ते तिथेच राहील... कित्येक दिवस, महिने, कदाचित वर्षही... मग त्या पानाचे आणि त्या वहीच्या पानाचेही नाते जमून जाईल. मी हलकेच वही मिटून टाकली.. वहीप्रमाने मनही मिटता येत असतं तर किती बरं झालं असतं ना? पण मन मिटता येत नाही...
आता या वसंतात अंगणातील, परसातील सगळी झाडे नव्याने हिरवीगार होतील. जुनी पाने गळून ताजीतवानी होतील.. पण मनाचं तसं होत नाही ना? पिकलेल्या पानांना मन लगेच सोडत नाही.. ती गळूनही पडत नाहीत लवकर... कदाचित पडलीच तर नवी पालवी... छे! नवी पालवी येईलच असे नाही... अगदी आमच्या मळ्यात कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या वठलेल्या आंब्यासारखंच हे.. अनेक ऋतू येऊन गेले.. पण त्या आंब्याला पुन्हा काही पालवी फुटली नाही... दर पावसाळ्यात त्याच्या खोडावर शेवाळ साठतं, खोड हिरवंगार होतं... काही काळासाठी आम्ही सुखावून जातो.. पण पुन्हा त्या वठलेल्या लाकडाचा आणखी एक भाग तुटून जातो... दरवर्षी असं होतं.... या वसंतातही ते आंब्याचं झाड असंच पालवीविना उभं राहील.. त्याच्यासाठी वसंत आणि ग्रीष्यात काहीच फरक नाही... मातीत मिसळेपर्यंत त्याचा वसंतही असाच ग्रीष्जाईल.. पण मनाचं तसं होत नाही ना! मातीत मिसळेपर्यंत त्याला जगावं लागतं... चढलेल्या शेवाळाला पालवीसारखं जपावं लागतं... खरंच ना? तुला माहीत आहे, मी काय सांगतो आहे आणि काय सांगू पाहतोय... यावर्षीच्या वसंतात तू शेवाळाला सोडून पालवीला जपशील अशी अशा करतो... पुढचे मग कितीही ग्रीष्आले तरी त्यात ती पाने तगून राहतील आणि तुला टवटवीत करत राहतील... बाकी पत्र खूप लांबलंय... दिवेलागणीची वेळ झाली आहे.. वाराही मस्त सुटलाय... काळजी घे... यंदा पालवीला खुडू नको... एवढंच....
तुझाच........

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. इतके दिवस पत्राला का उशीर हा काही तुला प्रश्‍न पडणार नाही. आणि खरेतर माझ्याकडेही त्याचे असे खास उत्तर नाही. कंटाळा, आळस हे माझ्या नावाचे काही समानार्थी शब्द आहेत. (त्यात तू म्हणतेस तो मूर्ख हा शब्दही आहेच!).त्यामुळे कोणत्याही प्रश्‍नाचे माझे सरळ साधे उत्तर असते. कंटाळा! अर्थात काही करण्याचा उत्साह असण्याचे काही प्रयोजन तरी हवे... जाऊ देत. पत्र लिहिण्यास एक कारण मात्र आज मस्त आहे.. काल 24 फेब्रुवारीला पन्हाळ्यावर चंद्रशेखर गाडगीळांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. मैफल खासगी स्वरुपाचीच होती. आणि ती रंगलीही अशी की खूपच खासगी वाटून गेली. अगदी पौर्णिमेचा चंद्र आपल्या पूर्ण तेजाने आकाशात माथ्यावर येऊन आपली किरणांची बरसात करत होता आणि त्याचवेळी गाडगीळ "" फिर वही श्‍याम वही गम, वही तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है... '' गात होते. तलतच्या आवाजात लागलेला सूर गाडगीळांनी तंतोतंत लावला होता. आणि तीच आर्तता होती. रात्रीततल्या त्या चंद्रबिंबाकडे बघत त्यावर सुरांचा अभिषेक ते घालत होते. व्हायोलिनवर फिरणार गज तर लिलया फिरत होता. या वाद्याचे वैशिष्ट्यच असे की त्याची तार ही उसाच्या पानाइतकी धारधार असते. चटकन कोणी उसाच्या पानावरुन हात फिरवावा आणि बोटे रक्‍तबंबाळ व्हावीत इतकी ताकद व्हायोलिनमध्ये आहे. तो गज त्या तारांवर पडला की मनाशी तो तार जोडू पहातो. आणि गझलेची जर त्याला फूस असेल तर तो ती तार आणखी धारधार होत जाते. त्यामुळेच ती ""फिर वही...चे सूर आणि तुझी याद एकदमच आली.... नारळांच्या झावळ्यांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे बघत कानातून मनात अलगद उतरणारी ती गझल तुझ्यापर्यंत तो चंद्र वाहून नेतो आहे की काय असे वाटून गेले. तू आत्ता त्या चंद्राकडे एकटक बघत बसली असशील असे वाटून गेले. आणि तो आपला दुवा साधतोय असा भास झाला. मैफीलीचा रंग वाढत होता.. गाडगीळ रंगात आले होते. आपल्या गायकीचे एक एक अनुभव सांगत होते. आणि अचानक त्यांनी एक शेर ऐकवला...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो ज़माने के लिए आ

पन्हाळ्याच्या त्या उघड्या वातावरणात गार वारा अलगद गरम वाटू लागला..

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ...

ंदी हसन साहेबांचीची ही गझल पूर्वीही मी ऐकली होती, पण खरेच यावेळी ती आणखी वेगळी वाटली. अहमद फराज यांनी ती लिहिलीय अप्रतिम. पण मनापर्यंत पोचविण्यासाठी जो सूर लावावा लागतो तो मेहंदी हसन साहेबांचा तर लागतोच पण काल गाडगीळांचाही लागला. त्या शब्दांच्या अर्थापर्यंत ते घेऊन गेले आणि तिथून पुढचा प्रवास अर्थात तुझ्यासोबतीनेच झाला. गम्मत बघ कार्यक्रमाची सुरवात भजनाने झाली आणि शेवट गझलेने. देवाला भजन का आवडते याचा प्रत्यय मला काल पुन्हा उमजला. भजनातील भाव सुरांच्या रस्त्यावरून धावत सुटतात ते भगवंताच्या चरणापाशीच जाऊन थांबतात, गझलही तशीच अगदी शब्दांचे रुपेरी रूप घेऊन आलेले भाव आर्ततेच्या सुरांना जेव्हा मिठी मारतात तेव्हा ते मनात घर करत नाही तर तिथून आपला रस्ता शोधत हव्या त्या ठिकाणी पोचतात. त्यामुळेच ज्यावेळी कार्यक्रमाचा शेवट "तोच चंद्रमा नभात या गाण्याने झाला त्यावेळी... एकांती मजसमीप तीच तूही कामीनी.. हे शब्द खोटे नाही वाटले..!

तुझाच...

बुधवार, २ जानेवारी, २०१३

प्रिय,

प्रिय, 
नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! प्रत्येकवेळा पत्राची सुरवात काय करावी हेच कळत नाही. म्हणजे माणूस  बघ कोणाशी बोलायचं असेल तर मुद्दाम खाकरतो. कळलं का? ऐकलं का? असे उगाच सांगतो. तसेच पत्र लिहिताना हा उगाचचा पसारा खूप मांडावा लागतो. मग एकदा पसारा मांडला की मग त्यातून हवे ते उचलून दाखविता येते. खरे तर पत्र लिहिण्याचा उद्देश दुस्तर हा घाट. गौरी तुझी आवडती लेखिका होय ना! तुला तिची नमू आवडते! नमू, हरिभाई आणि वनमाळी सगळ्यांच्याच प्रेमात जणू तू. गौरीने खूप सहजतेने नमू निर्मिली आहे. मला नमू अस्वस्थ करुन गेली हे खरेच पण मला आवडला तो नकुल. अलिप्त. मुक्‍याने प्रेम करणारा. कादंबरीत त्याला फारसा वाव नाही तरीही का कोणास ठावूक पण मला नकूलच आवडला. अर्थात त्याच्यावर गौरीने अन्याय केलाय ही भावनाही आहेच. नकुलचा जेवढा हक्‍क होता तेवढं काही त्याला मिळालेलं नाही. अगदी त्याला दिलेल्या अपंगत्वासारखंच कादंबरीतील त्याचं अस्तित्वही पंगू करुन ठेवलंय जणू. गौरीने त्याला "नकुल' हे का नाव दिले मला माहीत नाही. कदाचित तो घोड्यावरुन रपेट मारतो एवढ्या एकाच संदर्भासाठीच जर तिने त्याला नकुल म्हटले असेल तर त्या नकुल या नावावरही अन्याय आहे. अर्थात त्या एका कारणासाठी गौरीने त्याला नकुल हे नाव दिले नसणार हे निश्‍चित. त्याच्यातील आणखी काही पुसटरेषांना अधोरेखीत करण्यासाठी तिने हे नाव दिले असावे पण तरीही
महाभारतातील नकुलाची बाकीची वैशिष्ट्य गौरीच्या नकुलमध्ये अस्पष्टच दिसतात. काही रेषा आणखी ठळक करता आल्या असत्या तर... तर कदाचित त्या रेषांपुढे वनमाळीच्या रेषा कमकुवत झाल्या असत्या की काय? हा प्रश्‍न पडतो.
नकुल शब्दाचा मुळात अर्थच देखणा, विद्वान आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारा असा आहे. महाभारतातील नकुल असाच होता. आपल्या भावांवर कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा. अश्‍वप्रशिक्षणात प्रवीण असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनक पित्याचे रुप घेतलेला. माद्रीची दोन्ही मुले देखणी होती. सहदेव आणि नकुल. पण त्यातही नकुल उजवा होता. व्यासांनी अर्जुनाला पुर्ण पुरुष केले पण आकर्षक ठेवले नकुलला. तो एवढा देखणा होता की त्याच्यासारखा देखणा पुरुष त्याकाळी अस्तित्वातच नव्हता. ( लक्षात घे कृष्ण आणि अर्जुन दोघे असतानाही नकुलाबाबत जर ही अख्यायिका असेल तर तो किती देखणा असेल!) त्यामुळेच अज्ञातवासाच्या काळात नकुलला आपल्या अंगावर राख आणि माती माखून घेऊन रुप लपवावे लागले होते. अशा देखण्या पुरुषाचे नाव देताना गौरीने या नकुलवर प्रचंड अन्यायच केला ही भावना तीव्र होते. त्यात त्याला पंगू करुन तर तिने नकुलवर सुड उगवलाय की काय असे वाटत राहाते. वनमाळीचे रुप आणि नकुलाचे रुप हे भिन्न. अगदी कृष्ण आणि नकुलासारखे. दोघांच्या रुपातला गोडवा वेगळा. दोघांची प्रेम करण्याची ते जाणवू द्यायची पद्धत वेगळी. पण तरीही महाभारतातल्या नकुलाला मिळालेली अवहेलना गौरीनेही कायम ठेवली म्हणायला वाव आहे. खरे तर तिने नकुल हे नावच घ्यायला नको होते.
पांडवांच्यात सगळ्यात कर्तृत्वान पुरुष होता अर्जून त्याखालोखाल भीम मग युधिष्ठीर आणि नकुल सहदेव हे पांडवांची पाच नावे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली दोन कडी एवढ्याच अंगाने येतात. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी त्वेषाने लालेलाल झालेला भीम लोकांना दिसला, पण त्याचवेळी आपल्या भावाच्या प्रेमाखातर गप्प बसावे लागल्याची विषन्नता मनात दाबून काळाठिक्‍क पडलेला नकुल नाही कोणाला दिसला. मल्लविद्येत निपून असलेला भीम, धनुर्विद्येत एकमेवाव्दितिय असलेला अर्जून किंवा धर्मनिष्ठेने राहणाऱ्या युधिष्ठिराच्या झोळीत व्यासांनी भरभरुन माप ओतले. पण माद्रीच्या नकुल आणि सहदेवाच्या ओंजळीत तिर्थ घालतानाही जणू कंजूषपणा केला. यक्ष प्रश्‍नावेळीसुद्धा युधिष्ठीर माद्रीचा एक पुत्र मागतो तो माद्रीवर उपकार करत असल्यासारखा. त्याला तर भीम आणि अर्जुनच हवा असतो पण मग मी कुंतीचा एक मुलगा जिवंत असताना दुसराही कुंतीचा कशाला त्यापेक्षा माद्रीचा एक. त्यात भावना आणि धर्म असेलही पण त्यातही व्यासांनी नकुलला किंवा सहदेवाला त्यांच्या अंगभूत कर्तृत्वाची शबासकी दिलेली नाही. त्या प्रश्‍नावेळी तर युधिष्ठीराला त्यागाची मूर्ती दाखविताना नकुल आणि सहदेवाला नालायकच जणू दाखविण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे मूळ महाभारतात नकुलला त्याचे माप ओंजळीत टाकलेलेच नाही उलट त्याच्याकडे असलेल्या अश्‍वविद्येचा आणि तलवारबाजीत निपूण असलेल्या कलेचा ओझरता उल्लेख केला आहे. महायुद्धात अर्जूनाने रथ अडकलेल्या कर्णाचा वध केला तोही शल्याच्या सारथ्यामुळे. शल्य हा सहदेव आणि नकुलचा मामा. त्यामुळे आपल्या भाच्यांचा पराभव होऊ नये म्हणून क्षणोक्षणी त्याने कर्णाचा तेजोभंग केला आणि त्याचा रथ चिखलात अडकला. अर्जूनाने कर्णाचा वध काय किंवा भिष्म, द्रोणाचा केलेला वध हा युद्धनिपूणतेवर कुठे केला आहे. कधी शिखंडीची मदत तर कधी युधिष्ठिराची मदत घेऊन कट-कारस्थाने रचून विजय मिळविले. पण त्याचवेळी धर्माने युद्ध करणाऱ्या नकुलने कर्णादि कौरंवाच्या मुलांचा केलेला पराभव अगदी त्रोटकपणे मांडला आहे. व्यासांनी कदाचित सर्वांना समान न्यायाने वागवले असेलही पण त्यानंतर महाभारत जीरविणाऱ्या लोकांनी मात्र नकुल आणि सहदेवाला खड्यासारखे बाजुला काढून ठेवले हे मात्र खरे. गौरीनेही तेच केले. नकुलला तेवढेच महत्त्व दिले. त्याच्यातील अंतर्विरोध, त्याच्या भावना सगळे कसे त्याच्यासोबतीनेच ठेवले. त्याचे नमूवर प्रेम आहे का? नमू त्याच्याबाबतीत नेमका किती विचार करते ते स्पष्टपणे येतच नाही. तोही येता-जाता येतो. डोकावतो आणि निघून जातो. घर करुन राहात नाही. तो घर करतो अगदी काहींच्याच मनात. त्यांना तो हॅण्डसम वाटतो कदाचित दुर्लक्षित किंवा अजाणही. त्याच्या एकटेपणाची किव येत नाही तर त्याच्या एकटेपणाबाबत कुतुहलता वाटते. कुसुमाग्रजांची एक कविता आहे . अहि नकुल नावाची त्या कवितेतला नकुलही असाच. अचानक येणारा आणि आपले कार्य संपल्यावर निघून जाणारा. रेंगाळणे हे त्याच्या प्राक्‍तनात नाहीच. रेंगाळले की आशा वाढते आणि आशा वाढल्या कि त्यातून अटी निर्माण होतात. त्यामुळे तो अटी निर्माण करत नाही. जे द्यायचे त्याचा हिशोब मांडत नाही. त्यासाठी त्याला काही वेदना होतात का? याचाही हिशोब नसतो. म्हणूनच त्याला नकुल म्हणतात. मला नकुलासारखे प्रेम करणे ज्याक्षणी जमेल त्या क्षणाची वाट बघतोय.

तुझाच...

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

प्रिय,



सुनीताबाई देशपांडे यांचा उल्लेख मागच्या पत्रात झाला होता. तो सहज आला आज मात्र तो मुद्दाम करतो आहे. बाईंची दोन-तीन पुस्तके पूर्वी कॉलेजमध्ये असताना वाचली होती. त्यातील आहे मनोहर तरी हे तर सगळ्या गावाने सांगितल्यामुळे केवळ उत्सुकतेपोटी वाचले आणि मग ठेवून दिले. त्याचा त्या वयातही फारसा परिणाम झाला नाही. पु.लं.च्या बद्दल त्यांनी एक दोन जिव्हारी लावणारे उल्लेख केले असले तरी त्याचा मूर्तीभंजन वैगेरे होण्याचा काही परीणाम झाला नाही. खरे तर त्या वेळी या जातकुळीतील अनेक पुस्तके वाचली होती. वाचली कसली चावलीच होती ती. कांचन घाणेकरचे नाथ हा माझा आणि माधवी देसाई यांचे नाच गं घुमा... पण या पुस्तकांमुळे काशिनाथ घाणेकरांबद्दल वेगळं वाटण्याचा संभव नव्हता कारण त्यांना काही मी रंगमंचावर कधी बघितले नव्हते. रंगमंचावरील त्यांच्या अभिनयाचे विश्‍लेषण जाणकार नाटककाराने केले असते आणि त्यावर जर काही प्रश्‍नचिन्हे उपस्थित केली असती तर ती मान्यही झाली असती. पण ते तसे नव्हते हे मनाशी पक्‍के ठाऊक असल्याने मूर्तीभंजन झाले नाही हे खरेच.
विषयांतर हा पत्रकारांना राजकारण्यांकडून मिळालेला संसर्ग आहे की काय असा प्रश्‍न मला अलीकडील काळात पडायला लागला आहे. नाही तर पत्राचा विषय आणि आशय या दोन्ही बाबतीत मी जे काही विषयांतर करतो त्याची कारणमिमांसा करताच येत नाही. असो! तर सुनीताबाईंनी लिहिलेल्या त्या पुस्तकाचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर मात्र सुनीताबाईंनी पु.लं. गेल्यानंतर लिहिलेल्या लेखाने परत त्यांना वाचावे वाटू लागले. "मण्यांची माळ' फारसं रुचलं नाही. पण मग प्रिय जी. ए. वाचनात आले. जी.ए. बद्दल प्रचंड कुतूहल होतेच पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या कथांतून दिसणाऱ्या अंधाराचे कुतूहल किंवा ओढ जास्त होती. त्यापायी प्रिय जि. ए. हातात घेतले. त्या पत्रातून एखादा कवडसा त्या अंधारावर पडावा हीच अपेक्षा होती. पण झालं भलतंच. सुनीताबाईंच्या पत्रात जी. ए. भेटतात ते पुन्हा अंधाराच्या अनेक छटांमधुन. दरीतील खोल अंधार, गुहेतील अंधार आणि त्यापेक्षा जास्त खोल विहिरीतील खुणावणारा अंधार. खरे तर त्या विहिरीत नेमकं किती गोड पाणी आहे हे बघण्यासाठी खोल खोल उतरत राहातो पण तरीही एखादी पायरी चुकतेच. काळजाचा ठेका चुकतो. पुन्हा सावरतो. त्या विहिरीत पुन्हा उतरायचे नाही असे ठरवून वर येतो आणि पुन्हा पुन्हा ती विहीर खुणावत राहाते. त्या विहिरीतील तो निळाशार काळोख अजब आहे. सुनीताबाई त्या अंधारात आपल्या घेऊन जातात आणि मग हलकेच आपला हात सोडवून पुढे निघून जातात. मग आपला प्रवास सुरू होतो. त्या काळोखातून पुढे जाण्याचा. खोल उतरत राहण्याचा. काळोखात भरकटत राहावं वाटणं हेच तर जी. ए.चं वैशिष्ट्य. त्यातील प्रत्येक पत्र असेच आहे. त्या विहिरीकडे नेणारे, खोलपर्यंत पोचविणारे आणि पुन्हा माघारी फिरायला लावणारे. झिंग आणणारे आहे हे. व्यसनी माणुस एकाच गोष्टीकडे परत परत का वळतो याचे कारण येथे कळते. ती झिंग हवी-हवीशी वाटते. त्याच-त्या सुखासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी माणुस पुन्हा पुन्हा करतो. त्यामुळेच ती पत्रे.. (तशी सगळीच पत्रे आपली) पुन्हा पुन्हा वाचत असतो. तूही वाचली असशील ती पत्रे. तरी पुन्हा एकदा वाच.. अनेकदा त्या पत्रातून तू दिसतेस. आहा! काय पण प्रत्येकवेळा मीच कशी दिसते रे तुला? असा प्रश्‍न तुझ्या डोक्‍यात उमटेलही.. पण खरेच तू दिसतेस. भांडणारी.. आपल्या मतांवर ठाम असणारी... पत्र हा खरे तर वैयक्तिक मामला. पण तो वैयक्‍तिक राहात नाही. याचे कारण व्यक्‍तीला चिकटलेले सगळे गुण-दोष त्यातून प्रकट होतात. ते काही एकाच व्यक्‍तीची मक्‍तेदारी असू शकत नाही. तशाच गुणांच्या अनेक व्यक्‍ती असतातच. त्यामुळे प्रत्येकवेळी मीच कशी दिसते असा जर तुझा प्रतिवाद असेल तर तो आधीच खोडून काढलेला बरा. " तुम होती तो ऐसा होता' च्या तालावर हे नाही... तुम ही हो चा ताल आहे हा..

बाकी.. आज शतकातील सर्वात अनोखा दिवस होता. 12-12-12.. भारीच ना! आपल्या आयुष्यात आता पुन्हा ही तारीख येणार नाही. पुढच्या या तारखेला कदाचित तू असू शकतेस...( हा हा...मी तुझ्यापेक्षा लहान आहे हा तुझा युक्तिवाद असतो ना म्हणून.) हा झाला विनोदाचा भाग. पण असे दिवस, असे काही क्षण साठवून ठेवावे वाटतात. ते साठवायचे असतातही. पण आज काहीच नाही.. साठवण्यासारखे.. दिवस असा-तसाच गेला.. अगदी रोजची कामेही नीट झाली नाहीत... मग चला तुला पत्र लिहावे म्हणून पत्र लिहायला घेतले..पत्र बारा तारखेलाच लिहिले आहे. कदाचित ते 13 तारखेला पोस्ट होईल. पण ते लिहून झालं बारा तारखेला. बारा तारीख खरेच किती महत्त्वाची आहे तुलाही माहीत आहे.....मागच्या पत्रात लिहिलं होतं की प्रत्येक पत्र कुठे स्वतंत्र असतं आता हेच बघ ना? हेही त्याच माळेतील पत्र..

तुझाच....

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

प्रिय,

सुनीताबाई देशपांडे म्हणतात, तुमचं पहिलं पत्र हे निव्वळ पत्र किंवा मूळ पत्र आणि बाकीची सगळी पत्रे ही पत्रोत्तरे. खरे असेलही. पत्राला उत्तर लिहिताना किंवा त्याचा संदर्भ घेऊन लिहिताना ते पत्र मूळ पत्र राहत नाही. पत्रांच्या माळेतील तो एक मणी होतो, त्याचे अस्तित्व त्या माळेतील इतर मण्यांप्रमाणेच असते. वेगळे अस्तित्व त्याला असत नाही. दोन्ही हात एकमेकांत गुंफून घेतलेल्या शिल्पाप्रमाणे. त्यातील प्रत्येक शिल्प आपपल्या ठिकाणी सुंदर दिसत असले तरी, त्या शिल्पांना एकमेकांपासून दूर करता येत नाही. ते केलं की मग अपुरेपणा जाणवतो. मूळ पत्रात तो अपुरेपणा असत नाही. पण मूळ पत्र म्हणजे तरी काय? प्रत्येक पत्र मूळ पत्र असू शकते का? छे! प्रत्येक पत्र कधीच मूळ असू शकत नाही. पहिले पत्र केवळ मूळ म्हणता येईल. बाकीची सगळी पत्रे ही पुन्हा माळेतील मणीच. त्याला एकमेकांपासून दूर नाही करता येणार. आता हेच बघ. तुला लिहिलेले पहिले पत्र आणि त्यानंतरची ही सगळी पत्रे ही एका अदृश्‍य अशा कडीत बांधलेलीच आहेत की. त्यातून त्यांना वेगळे करता येणार नाही. पहिल्याच पत्रात फक्‍त तुम्हाला तुमचेपण मांडता येते. बाकीच्या पुढच्या सगळ्या पत्रांमध्ये तो पहिला धागा असतोच, कधी उत्तरांचा तर कधी प्रश्‍नांचा. पण ज्या पत्रांना उत्तरे मिळत नाहीत, ती पत्रे पुन्हा मूळ पत्रासारखी असतात का? छे तीही मूळ असत नाही. जाऊ दे ! आपण या भानगडीतच न पडलेले बरे. मला तुला जे सांगायचे आहे ते सांगितले म्हणजे झाले. ते पत्र मग मूळ आहे की पत्रांच्या कडीमधले याला काही अर्थ असत नाही.
तू साथ-साथ चित्रपट बघितला असशीलच ना? दीप्ती तुलाही आवडते आणि मलाही. तिच्या डोळ्यात तुझे साधेपण दिसते. खरे तर नूतनच्या मीनाक्षी डोळ्यांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलके आहेत. हे कधीतरी सांगायचे होते, पण ते राहिलेच. तर दीप्तीचा साथ-साथ चित्रपट. त्यातील बहुतेक गाणी सुंदरच आहेत. पण तरीही "तुम को देखा तो ये ख्याल आया ' हे गाणं अप्रतिम. तुझ्या आवडत्या जगजीतसिंहने गायलेले. पडद्यावर फारुख डोळ्यात ीजतका आर्त भाव आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मागे गेलेले केस आणि समोर साधी पण आश्‍वासक दीप्ती. जगजीतच्या पहिल्या हुंकारापासून आणि चित्राच्या आलापापासून गाणं खोल मनात उतरत राहातं. समोरची दीप्ती हळूहळू विरत जाऊन तिथे तू दिसू लागतेस. खास करुन ज्या वेळी आज फिर हमने इक तमन्ना की, ही ओळ तो गातो त्यावेळी हाय! जणू ती ओढणी आपल्याच हातात असल्याचा भास होतो. तो ज्या सहजतेने ती सोडून देतो आणि म्हणतो "आज फिर दिल को हमने समझाया... हाय... दीप्तीच्या चेहऱ्यावरचे ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मागे केस हलक्‍या हाताने घेणारी. मान हलकेच तिरकी करुन बोलणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे मी नजर चुकवत असताना धिटाईने नजर मिळविणारी... तूच आणखी कोण असणार.. "हम जिसे गुणगुणा नही सकते...' हे कडवं गाताना जगजीतचाही घसा थोडा कोरडा पडला असणार नक्‍की. काही वेळाच अशा असतात.. त्यांची गाणी आपल्याला गुणगुणायला येतच नाहीत... कितीही ओठांवर असलं तरी सांगता येत नाही हेच खरे.... आज पुन्हा तुझी आठवण खूप दाटून आली. असे काही क्षण असतात त्यावेळी खूप सैरभैर व्हायला होतं. जगणंच अवघड वाटायला लागतं, पण हे क्षण धिटाईने पेलायला लागतात. ही कला मला यायला लागली आहे असे वाटते तरी काही क्षण सुटतातच की... आजही आठवणींचा आवेग आवरून धरला आहे. आज पुन्हा मनाला समजावलं आहे....

                                                                                                                                     तुझाच 

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

प्रिय,



तुझी आठवण आली की... छे! आठवण हा शब्दच चुकीचा. तुझ्याशी खूप बोलावं वाटलं की पत्र लिहिणं हे आता माझं नित्याचं झालं आहे. तुझ्याशी बोलायचे म्हणजेच तुला पत्र लिहायचे, म्हणजे तुझं वेगळं अस्तित्व मान्य करायचं. म्हणूनच या पत्र लिहिण्याच्या काळापुरता का होईना, मी तुझ्यापासून वेगळा होतो. तुला माझ्यातून बाहेर काढून, तुझ्याशी गप्पा मारण्याचा हा एकच मार्ग माझ्याकडे आता उरला आहे. एवढंच. जगातील माहीत झालेली प्रत्येक गोष्ट तुला सांगावी, त्या गोष्टीकडे तुझ्या डोळ्यांनी बघावे अशी खूप इच्छा असते, पण.. पण हा पण आडवा येतो. म्हणून हा पत्रप्रपंच. तुझ्यापर्यंत पोचण्याचा. तुला पुन्हा पुन्हा आळवत स्वतःला जगवत ठेवण्याचा. एकदा का तू समोर आलीस की मग अनेक गोष्टी सुचू लागतात. काही उपयोगाच्या काही निरूपयोगी, तरीही मग मी बरळत राहातो. तुझ्याशी बोलत राहातो अखंडपणे. आताही असंच होईल. विषय एक आणि मी भलतंच काहीतरी सांगत राहीन.......
रामायणाचा मी अनेक अंगाने विचार करतो. रामायणातील प्रत्येक पात्र प्रत्येकवेळी वेगळी भासतात. त्याच्याकडे तर्काने बघितले तर ती आपापल्या जागा सोडून दुसऱ्याच जागा घेताना दिसतात. श्रद्धेने बघितले तर त्यांच्यात दैवत्व दिसते, तर डोळ्यांना मर्यादा दिसतात. पण हीच पात्रे मनाच्या चक्षुतून बघितली की तर त्यांची उंची कैक पटीने वाढते. रामायण आणि महाभारताचे हेच तर वैशिष्ट्य आहे कि त्यांतील अनेक पात्रे आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे भेटतात. ती कोणालाच भेट नाकारत नाहीत. जसे समोरच्याला हवे तसेच ती भेटत राहातात. आता हेच बघ. रामायणात जर उत्तम प्रेमकथा आहेत असं म्हटलं तर तुलाही शंका येईल. पण खरेच रामायणात अप्रतिम अशा प्रेमकथा आहेत. राम-सीता, रावण-मंदोदरी, लक्ष्मण-उर्मिला अशा अनेक. पण यांत प्रेमाचे सगळे रंग दिसतात ते राम-सीता प्रेमकथेत. रावण-मंदोदरीला कधी वियोग सहनच करावा लागला नाही. रावणाचे मंदोदरीवर इतके प्रेम होते, त्यामुळेच समोर सीतेसारखी रुपगर्वीता असतानाही त्याचे मन चळले नाही. लक्ष्मण-उर्मिला यांच्यात वियोगाचा एक मोठा कालखंड आला पण नंतर ते एकत्र झाले. अगदी शेवटपर्यंत. राम-सीतेच्या प्राक्‍तनात मात्र मिलन-वियोग-मिलन आणि पुन्हा वियोग आहे. खरे तर खूप मोठी आणि उत्सुकतेने ताणलेली ही प्रेमकथा आहे. आपल्या पुराणांनी याबाबत अनेक श्‍लोक लिहिले आहेत. ते अनेकदा अतिशयोक्‍ती अलंकारांनी सजलेले वाटतात, तरीही त्यात राम आणि सीतेच्या प्रेमाचे रंग अचूकतेने टिपलेले आहेत. एका श्‍लोकाचा अर्थच मुळी असा आहे. रावणाने सीतेला पळवून आणून अशोकवनात ठेवलेली असते. रामाच्या वियोगाने सीता प्रचंड दुःखी झालेली आहे आणि तिला रामाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ती तिच्या सेवेत असलेल्या त्रीजटा नामक राक्षसीला म्हणते, त्रीजटे मला आता भीती वाटू लागली आहे. ज्या प्रमाणे किडा कुंभार माशीचे सतत ध्यान करतो आणि तिचेच रुप घेतो, अगदी तसेच माझे झाले आहे. मी रामाचा इतका विचार करते, त्याचे इतके चिंतन करते की मला कधी कधी वाटते की मी रामच होऊन जाईन. पण मी राम झाले तर संसारसुख कसे घेणार?, त्यावर त्रीजटा तिला म्हणते, ""अगं तू जसा रामाचा विचार करतेस अगदी तसाच रामही तुझाच विचार आणि चिंतन करतो आहे. त्यामुळे जर तू राम बनलीस तर तोही सीता बनेल. मग राम बनलेली तू रावणाचा वध कर आणि आपल्या सीतेकडे जा.
राम आणि सीतेतला हा प्रेमगंध खरेच अगदी वेगळा आहे. विरह
प्रेमाचा हा रंग विरहात असलेल्यांनाच कळतो, कळावा. विरह रंग हाच तर प्रेमाचा खरा रंग. मलाही कधी कधी वाटतं माझंही असंच होईल. मलाही तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. जगण्याचे मार्ग सगळे तुझ्याभोवतीच घुमत राहातात. मी तुझा इतका विचार करतो आहे की कदाचित मी तूच बनून जातो की काय असं वाटत राहातं. तुझ्या बोलण्यासारखं बोलू लागतो. अलीकडे तर अनेक शब्द तुझेच तोंडात येतात. तुझ्या आवडी निवडी माझ्याच होऊन गेल्या आहेत. कधी कधी मी चटकन असा बोलून वा वागून जातो की मी असा नव्हतोच कधी . कुंभारमाशीच्या चिंतनात अडकलेल्या किड्यासारखा मीही कुंभारमाशीच होऊ लागलो आहे. पण या कुंभारमाशी होण्यातही एक मजा आहे. एक गुंगी आहे हे खरेच.
तुझाच...

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

प्रिय



खूप दिवसांनी पत्र लिहितोय. त्याबद्दल माफ कर. तुझ्याकडे माफी मागायची हाही एक बहाणा असतो, तुझ्याजवळ जाण्याचा, हे बहुतेक तुलाही माहीत आहे. काही नात्यांचं असंच असतं. जे दिसतं तसं असत नाही. महाभारत हा जसा तुझ्या आवडीचा विषय तसा माझ्याही. महाभारताचे वैशिष्ट्यच हे की ते प्रत्येकाला आपपल्या नजरेतून वेगळे भासते. कृष्ण-राधा ही जोडी महाभारतात नाही, ती नंतरच्या काळात कीर्तनकारांनी टाकली, दुर्गा भागवतांनी याबाबत खूप संशोधन केले आहे. खरे तर राधा आणि द्रौपदी ही पात्रे कीर्तनकारांनी वेगळी केली. राधाही विवाहित आणि द्रौपदीही विवाहित. पण दोघींचे कृष्णावर प्रेम. राधा-कृष्ण मांडताना कीर्तनकारांनी त्या प्रेमाला भक्‍तीचे रुप दिले आणि द्रौपदी-कृष्ण प्रेमाला बहीण-भावाचा मुलामा; पण मला नेहमी वाटते, राधा ही काही गोकुळातली गवळण नव्हती. शिवाजी सावंतांनी युगंधर लिहिताना राधेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण त्यांनाही तो लागला नाही. मग त्यांनी शब्दांचा किस काढत राधा म्हणजे मोक्ष वगैरे असा काहीसा अर्थ लावला. पण राधेला महाभारतात शोधण्याचा त्यांनी आणखी थोडा प्रयत्न केला असता तर राधा महाभारतात क्षणा-क्षणाला भेटली असती. राधा आणि द्रौपदी या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. द्रौपदीत राधेला बघायचे थोडेसे धाडस केले तर तिच्यात राधा दिसतेच. अगदी स्वच्छ निर्मळपणे ती दिसते. विशेष म्हणजे प्रियतमेसाठी सर्वस्व देणारा कृष्ण द्रौपदीसाठीच भारतीय युद्ध घडवून आणतो हेही आरशासारखे स्पष्ट आहे. पाच पती असूनही द्रौपदीला कृष्ण का आवडावा? हा प्रश्‍न उपस्थित होईलही, पण नवऱ्यांची संख्या किती यावर का प्रेम असते. पाचही पतींमध्ये पराक्रम आणि शौर्य होते, पण प्रेम केवळ शौर्य आणि पराक्रमावर केले जात नाही, ती अंतरिक गोष्ट आहे. दुर्गाबाई याबाबत खूप सविस्तर सांगायच्या, पण त्यांनीही राधेला आणि द्रौपदीला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मांडलेले नाही. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते हे भावा-बहिणीचे रंगविले ते खरे कीर्तनकारांनी आणि त्यानंतर भावगीत रचणाऱ्या कवींनी. द्रौपदी खरे तर कृष्णाची सखी. गंमत बघ हं, कृष्णाच्या रुक्‍मिणी-सत्यभामेसह सोळा सहस्र स्त्रिया असल्या तरी त्याला त्याची सखी भेटली ती द्रौपदीत आणि पाच नवरे असूनही कृष्णेला अर्थात द्रौपदीला कृष्णातच सखा दिसला. खरे तर हा प्रेमाचा रंग नाटककारांनी आणि कवींनी फुलवायला हवा होता. अगदी प्लेटो सांगतो तसे हे प्रेम अशारीरिक आणि उच्च पातळीवर होते. द्रौपदीच्या लज्जा रक्षणापासून ते तिच्यातील सूडाला मूर्त रूप देण्यापर्यंतच्या प्रवासात पांडवांहून जास्त पुढाकार कृष्णाने घेतला आहे. त्यासाठी त्याने वाट्‌टेल ते केले आहे. यांत तिच्यासाठी सर्वस्व द्यायचा हेतू होता. कृष्णाला भारतीय युद्ध थांबवायचे असते तर ते केव्हाच थांबले असते. पण ते त्याला थांबवायचे नव्हते. द्रौपदीचा झालेला अपमान जितका पांडवांना जिव्हारी लागला होता, त्यापेक्षा जास्त कृष्णाला लागला होता. म्हणूनच तर त्याने अर्जुनाला "युगंधर' तत्त्वज्ञान सांगून लढायला भाग पाडले. एखाद्या शूर सेनानीने युद्ध लढण्यापूर्वी आपल्या शस्त्रांना धार द्यावी, दारूगोळ्यांचा साठा करावा, व्यूहरचना करावी, अगदी त्याचप्रमाने द्यूत सभेनंतर कृष्णाने केले. पांडवांपेक्षा कृष्णालाच हे युद्ध हवे होते हे उघड आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण काही चक्रवर्ती सम्राट वगैरे होणार नव्हता, किंवा तोही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरच्या साम्राज्यातील एक मांडलिक राजा होणार होता. तरीही त्याने पांडवांना मदत केली. याचे कारण धर्माची पुनर्स्थापना हे नव्हतेच. कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा पक्ष धर्माचा हे कशावरून ठरणार? युद्धभूमीवरचा धर्म काय हे कृष्णाने सांगितले, याचा अर्थ असा नव्हे, की कौरवांचे राज्यच मूळी अधर्माचे होते. त्याचे संदर्भ वेगळे वेगळे करायला हवेत. सांगायचा मुद्दा हाच, की कृष्णाने केवळ आणि केवळ द्रौपदीसाठी हा महाभयंकर संग्राम घडवून आणला. पण हे अमूर्त आणि संयमी प्रेम उघड झाले नाही हे खरेच. आपल्याकडे सामाजिकदृष्टया स्त्री-पुरुषांना कुठल्यातरी नात्यात अडकविणे भाग पडते. तसे न झाल्यास अनैतिकतेच्या गाळात त्यांना अडकावे लागते. द्रौपदी विवाहित आणि कृष्णही विवाहित त्यात कृष्णाला दैवपद बहाल केलेले. त्यामुळे द्रौपदी आणि कृष्ण यांच्यात प्रेम होते आणि राधा दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदीच होती, असे जर कोणी सांगितले तर त्याला एक तर मुर्खात काढण्याचा संभव होता किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा. त्यामुळे राधेला कृष्णेतून वेगळे करण्यात आले आणि द्रौपदीला बहीण करण्यात आले. पण द्रौपदी आणि कृष्णाचे खरे प्रेम होते. अपुरेपण दोघांतही होते, माणसांच्या गर्दीत आपण एकटे असतो ना तसेच त्या दोघांचे होते.
पण त्यातही गंमत आहे. या दोघांचे प्रेम उच्च असले तरी खरे उच्चतम प्रेम महाभारतात सापडते ते भीमाचे. युधिष्ठिर एकपत्नीव्रत राहिला पण त्यात त्याच्या प्रेमापेक्षा तत्त्वाचा भाग जास्त होता, भीमाचे हिडिंबाशी लग्न झाले होते, ते खरे द्रौपदी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी. हे खरे तर एकतर्फी प्रेम होते. द्रौपदी मनाने कृष्णाची होती. खरे तर ती राधेसारखी कृष्णाबरोबर होती आणि भीम राधेप्रमाणे द्रौपदीवर प्रेम करायचा. द्यूत सभेत कृष्णेची विटंबना होताना तिला आठवला तो कृष्ण, पण पांडवात ज्याची सर्वात जास्त तडफड झाली तो भीम.
तुझाच..

बुधवार, ४ जुलै, २०१२

प्रिय,

प्रिय,
पहाटेचे तीन वाजलेत. गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही झोप आलेली नाही. येण्याची शक्‍यताही नाही. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश आत येतोय. नुकत्याच चालायला लागलेल्या बाळाच्या पायातील पैंजणाप्रमाणे पावसाच्या थेंबांचा नाद होत आहे. मघाशी ऑफीसमधून येताना त्याचा नाद कानात साठवतच आलो. पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस थांबायची खूप वेळ वाट बघितली आणि मग रेनकोट अंगावर चढविला. गाडीला किक मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आषाढी पौर्णिमेचा चंद्र ढगांच्या दाटीतून चांदण बरसत होता. शब्दशः चांदणं बरसत होतं. चंद्राचा मंद प्रकाश आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्यासाठी रेनकोट काढला आणि पाऊस आणि चांदण दोन्ही अंगावर झेललं. रिकाम्या, एकट्या रस्त्याला सोबत करत रस्त्याच्या मध्येच गाडी लावून चिंब भिजत राहिलो. पावसाच्या धारांसोबत तुला आठवत राहिलो. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द, तू घेतलेला एक अन्‌ एक हुंकार, तुझं हसणं. सगळं आठवत राहीलं. पावसाचा सांगाती बनून जणू आठवणींच्या धारा बरसत राहिल्या आणि त्यात मी चिंब होत राहिलो. पावसासारखा आठवणींचा दुसरा कोणी सांगाती नाही. आवणींबरोबर येणाऱ्या आसवांना तो हलकेच आपलेसे करतो. तू कोण? कोणासाठी? असले प्रश्‍न विचारत बसत नाही आणि त्याचे डागही मागे ठेवत नाही. त्यामुळे त्याच्यासोबतीने खूप रडून घेतले. मोकळे होण्याचे मी नवनवे मार्ग शोधतो आणि प्रत्येक वाटेत तूच भेटत राहतेस. तू एकदा म्हणाली होतीस, माझं सगळं विश्‍व तू व्यापून टाकले आहेस. तू तर माझं विश्‍वच आहे. त्यातून कसं बाहेर पडणार. पण पडायचे आहे कोणाला ?
तुला लहानपणीची एक गोष्ट सांगतो. तेव्हा दुसरीत होतो मी. नागपंचमीची सुटी होती. गावाकडे त्यावेळी आमच्या वर्गातील बरीच मुलं गुरांना चारायला घेऊन जात. मग मीही त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो. दिवसभर त्या माळरानात आम्ही चिखलाचे नाग करत राहिलो. संध्याकाळ झाली तरी आम्ही तिथून हालायला तयार नाही म्हटल्यावर आमच्यासोबत असलेल्या एका मोठ्या माणासाने उगाचच आम्हाला दटावले. नागपंचमीला नाग करायचे नसतात. त्यात तुम्ही मातीचा नाग करुन तो मोडलात. आता नाग रात्री येऊन तुम्हाला चावणार. आप्पांना विचारलं, त्यांना वाटलं मला देवघरात ठेवलेला नाग हवाय, त्यामुळे त्यांनीही सांगितलं, नाग मोडला की नाग रात्री येतोच. मला काही सुचेना. भीती प्रचंड वाटत होती. त्या रात्री नाग बऱ्याचदा स्वप्नात आला. दरदरून घाम फुटला आणि कडाडून ताप आला. दुसरा आख्खा दिवस आप्पा समजावत राहिले, नाग-बिग काही येत नाही. पण भीती काही पुरती गेली नाही. पुढे-पुढे तो नाग माझ्या गळ्याभोवती वेटोळा घालून बसलाय असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून तो कुठे बिळात लपून बसला होता, देव जाणे. तू गेलीस आणि पुन्हा तो नाग वळवळायला लागला. जणू कात टाकून ताज्या दमाने तो येतो आहे असं वाटू लागलं, आणि तेवढ्यात तुझ्या आठवणींचे हजारो गरुड आकाशात घिरट्या घालू लागले. आता काही तो परत येईल असे वाटत नाही.


तुझाच

शनिवार, २३ जून, २०१२

प्रिय,


प्रिय,
तुला माहीत आहेच, मी जिथे राहतो तिथे झाडांची दाटी आहे. तिथे एक आंब्याचे डेरेदार झाड आहे. गच्च काळपट हिरव्या पानांनी बहरलेल्या त्या झाडाच्या एका फांदीवर एक कोकीळ नेहमी बसलेला असतो. गेल्या अडीच वर्षांपासून मी त्याला बघतोय. तो त्याच फांदीवर असतो. अगदी एकटा. दिवसाच्या कुठल्याही वेळेत मी त्या फांदीकडे बघतो, त्यावेळी तो तिथेच असल्याचे मला दिसले आहे. अगदी पहाटेच्या चंद्रप्रकाशातही त्याची ती लांब काळी शेपूट फांदीतून खाली दिसतच असते. अर्थात त्याला मी तिथे पहाटेच जास्त वेळा बघितले आहे. पण भर दुपारीही तो तिथून आर्त गात असायचा. अगदी गेल्या गुरुवारपर्यंत त्याचे ते आर्त गाणे सुरू होते. हिवाळा असो वा उन्हाळा अथवा पावसाळा, अशा कुठल्याच ऋतूचा आणि त्याच्या गायनाचा काहीच संबंध नसायचा. कोकीळ सहसा वसंतातच गातात हा झाला विज्ञानाचा नियम, पण हा पठ्ठ्या कधीही गायचा. कुठल्याही ऋतूत, कुठल्याही वेळी.
पण त्यातही भर दुपारी त्याची गायनसमाधी लागायची. त्याची ती आर्तता बघून मला मंदिरात व्याकूळ होऊन एकतारी घेऊन भजन गाणाऱ्या भक्‍ताची आठवण येते. देवाची आळवणी करताना स्वतःला विसरून गाणारा भक्‍त आणि तो कोकीळ यांच्यात मला बरेच साम्य वाटते. भजनकऱ्याला जसे स्वतःचीही जाणीव नसते. अगदी तसेच त्या कोकीळला कुठल्याही ऋतूची जाणीवच नसते. जणू एक ऋतू त्याच्याभोवती वेढा टाकून बसला आहे आणि तो त्यात गुरफटून राहिला आहे. त्यामुळेच अगदी भर पावसातही तो "कुहू'चा टाहो फोडत असतो. त्याला मी असे पावसातही गाताना बऱ्याचवेळा ऐकले आहे. जणू आपल्या प्रियतमेची आठवण त्याला जगू देत नाही आणि मरूही देत नाही. तिला आळवताना त्याचा सूर आर्त व्हायचा. त्याची ती आर्तता ऐकून स्वर्गात जर देव असतील तर तेही नक्‍कीच व्याकूळ झाले असतील यात शंका नाही. अगदी निसर्गाच्या उलटच आहे. पण जे आहे ते हे आहे. पण का कोणास ठाऊक पण तो कोकीळ गेल्या गुरुवारपासून गायचाच बंद झाला. तो तिथेच असतो. त्याची ती काळी शेपटी त्या फांदीतून तिथेच दिसते, पण तो गात नाही. अगदी समाधी लावल्यासारखा असतो. मला वाटलं त्याला जोड मिळाला असेल. पण त्या फांद्याआडून दुसरी शेपटी दिसली नाही कधी. तरीही तो गात नाही, सूर आळवत नाही. त्याची आर्तता संपली की काय असा प्रश्‍न मला पडला होता. समाधीस्त ऋषीच्या दर्शनानेही समाधान मिळते ना अगदी तसेच समाधान त्याच्याकडे बघितले की मिळते. काल पहिल्यांदा मी त्याला त्याच्या नेहमीच्या फांदीपेक्षा दुसऱ्या फांदीवर बसलेलं बघितलं. त्याच्या पंखांची थोडी फडफडही ऐकू आली. अगदी कीर्तनात दंग झालेल्या महाराजांसारखाच तो. देवाने दृष्टांत द्यावा आणि कीर्तनकाराच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहावा असाच तो भासला. बहुतेक त्यालाही त्याच्या प्रियतमेने दृष्टांत दिला असेल. त्या क्षणभर दर्शनानेही तो मोहरून गेला असेल. कोकीळच तो... आता तो येत्या वसंतात गायीलही, पण ते सूर आनंदाचे असतील आणि समाधानाचेही.....त्याला ते सूर नक्‍की सापडतील... तुला काय वाटतं....
तुझाच...

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

प्रिय,

खूप दिवसांनी जुने कपाट आवरायला घेतले होते. वर्तमानपत्रातील काही कात्रणे, काही टिपण्या आणि पिवळे पडलेल्या पुष्कळश्‍या कागदांनी कपाट गच्च भरुन गेलं होतं. अर्धवट लिहिलेले.. रेघोट्या ओढलेले.. टाचण मारुन ठेवलेले....कोणी कथेच्या शेवटाच्या प्रतिक्षेत तर कोणी अगदीच एखादा शब्द लिहून ठेवून टाकल्यामुळे रुसलेले, तर काही पत्रे लिहून पूर्ण झालेली पण पत्त्याच्या शोधात... म्हटलं तर सगळा कचरा म्हटलं तर प्रत्येक कागद आणि कागद एक-एक जाणिव.. एक-एक भावना.. एकाच कपाटात कोंबून ठेवलेल्या.. काही दडवलेल्या... काही कागदांच्या ओझ्यामुळे दडपून गेलेल्या... मुक्‍या आणि बहिऱ्याही...खरे तर त्या मुक्‍या होत्या म्हणूनच तर त्या एकत्र राहात होत्या. एकमेकांच्या उरावर पडलेले काही पिवळे कागद मात्र आपल्याच भावविश्‍वात रमलेले होते. अंगाला माती लागल्यावर पैलवान कसे छाती काढून चालतात, तसेच अंगावरची धूळ अभिमानाने मिरवत होते. मी ती हलक्‍या हाताने झटकल्यावर उगाचच त्यांना राग आला की काय असे वाटून गेले. त्यातच एका कोपऱ्यात एक कागद सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कोरा.. हा पण पिवळा पडला नव्हता. मी सहज तो उचलला... चटकन तो थरथरला असे वाटून गेलं. सगळ्या पिवळ्या कागदांत हा पांढरा शुभ्र कागद कुठून आला हे मलाही कळले नाही. कागद आणि पेन गोळा करण्याची मला तशी हौस आहेच, पण हा त्याखातर हा कागद नक्‍कीच आणला नव्हता. कारण तसे असते तर त्याच्यासारखे आणखी काही कागद तिथे असायला हवे होते. एकटाच.. त्याचा उजवा कोपरा थोडासा मुडपला होता.. तो मुडपलेला कोपरा मी हलकेच सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण वळल्याची खूण घट्‌ट उमटली होती. त्यावर तारीख 20 फेब्रुवारी असं लिहिलं होतं. आणि मग काहीच लिहिणं झालं नव्हतं.
20 फेब्रुवारी...तुला पत्र लिहायला घेतलं होतं. त्यासाठीच हा खास कागद आणला होता. पत्र लिहायचे ही कल्पनाच खूप मजेशीर आणि धाडसाची वाटत होती. अगदी उत्साहाने पत्र लिहायचा घाट घातला होता. त्यासाठी हा खास कागद आणला होता. त्याचे पाकिटही तितकेच खास आणले होते.अगदी चित्रपटात दाखवतात ना तसेच गुलाबी रंगाचे.. इथेच कपाटात कुठेतरी नक्‍की असेल. ते पाकिट मिळविण्यासाठी किती दुकाने फिरलो होतो देव जाणे. सायकल मारुन मारुन पाय थकले होते. त्यावर गुलाबाचे एक फुल चितारले होते. मस्त टपोरे फूल होते ते. तो कागद हातात घेतला आणि विचारांच्या माळेत दोरा ओवला गेला बघ.
किती दिवस.. किती वर्षे सरली तरी त्या कागदाचा शुभ्रपणा तसाच होता. अगदी पांढऱ्या ढगांसारखा. तो काळवंडला नाही की पिवळा पडला नाही. काळाच्या खुणा त्याच्या अंगावर जराही दिसत नाहीत, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमासारखं. काळाचा कधीच त्यावर परिणाम झाला नाही. अगदी व्हावा, अशी इच्छा बाळगुनही. खरेच हे पत्र पहिलं प्रेमपत्र होतं. अगदी कोरं. निखळ, निरपेक्ष आणि सर्वात महत्त्वाचं खूपच निरागस. खरं बोलणारं. आपल्या भावना न दडविणारे, त्याला कसलाच मुलामा न लावलेलं. तुझ्या डोळ्यांसारखं. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझे डोळे बोलतातच, मी तुला कधी सांगितलं नाही. पण तुझे डोळे खूप बोलतात खूप..खूप.. आनंद झाला की किलकीले हसतात. रागावले की कोरडे पडतातत.. वेदना पापण्यांच्याच्या आड लपवतात.. आज या कागदाने पुन्हा डोळ्यांची आठवण करुन दिली. पापण्या.. कोरिव भूवया.. भूवयांमध्ये लावलेली टिकली.. कधी साधी..कधी चंद्रकोरीसारखी.. किती आठवणी आल्या दाटून.. आज हे पत्र त्याच कागदावर लिहितोय. पण बघ ना. मघाशी प्रिय शब्द लिहिताना त्यातील य चा पाय थोडा लांबलाच. शाई थोडी जास्तच खाली ओघळली.. हा कागद तसाच कोरा ठेवायला हवा होता. जरा माझं जास्तीच झालं.
तुझाच 

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. कशी आहेस? आठवण येत नव्हती, असे नाही आणि पत्र लिहायला घेतले नाही, असेही नाही, पण लिहिता मात्र आलं नाही हे खरं. तुम्ही शब्दांना कितीही चांगले मित्र माना पण, ते ऐनवेळी तुम्हाला मदत करतीलच असे नाही. खाऊसाठी भर बाजारात हट्‌टाला पेटून मटकन बसणाऱ्या पोरट्यांसारखे कधी ते भोकाड पसरून वाटेतच बसतील याचा नेम नाही; मग कितीही मिनत्या करा, ते ऐकायचे नाहीत, मग त्यांना झटका द्यावाच लागतो. त्या पोराला जशी चापट द्यावी लागते, अगदी तशीच चापट शब्दांना वेळेची द्यावी लागते, मग शब्द वठणीवर येतात. सांगितलेल्या वाक्‍यांच्या मार्गावरुन मग सरळ चालतात. आता हेच बघ ना! मागचे पत्र लिहून आता जवळपास वीस-पंचवीस दिवस होऊन गेले. या दिवसांत कितीतरी वेळा पेनाचे टोक कागदावर टेकवले; पण शब्द काही उमटले नाहीत. सांगायचे उरले नाही, असेही नाही, पण ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी शब्दांची वस्त्रे घालायलाच तयार नव्हत्या. मग कितीतरी वेळा कागदावर रेघोट्या ओढून रात्र काढली. आता आजही सांगायचे खूप आहे. खूप लिहायचे आहे, पण तरीही हट्‌टी शब्द अडून बसलेतच की, आता एवढे गोंजारल्यावर ते नक्‍कीच शांत होतील असं वाटतं...
"तुला बोलायचं असतं एक आणि तू बोलतोस तिसरंच' हा तुझा आरोप मान्यच आहे. आजही बघ मला लिहायचे आहे एक आणि लिहितोय दुसरंच.
तुझी खूप आठवण येत आहे. खूप वाटतं... अगदी आता तुला समोर बसवावं आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून रात्रभर त्यात डुंबत राहावं.. हलकेच तुझ्या केसांतून हात फिरवावा...कोणीच बोलू नये... ना तू, ना मी....निःशब्दांतून शब्द उमटत राहावे आणि ते फक्‍त तुला आणि मलाच कळावे..... तुला आठवतं मी तुला काळी म्हटलेलं... आम्ही काही काळे नाही, गहू वर्णीय असं तुझं म्हणणं. ठिकच होतं, पण तरीही तुला चिडवायला मी काळीच म्हटलं होतं.. खरं तर काळी का म्हटलं होतं माहिती आहे तुला... काळा रंग सगळं पोटात घेतो.. क्षमा करण्याचा गुण काळ्या रंगात जितका आहे तितका कुणाच्यातच नाही. आणि जो या रंगाशी सलगी करतो तो या रंगासारखाच होऊन जातो.. म्हणून तू काळीच. आपल्या रंगात रमणारी.. आपल्या रंगाशी एकरुप असलेली...तुझा काळा रंग गडदतेतून आलेला... सगळे गडद रंग एकत्र करुन ते तुझ्यात भरले आहेत आणि ते इतके एकजीव आहेत की त्यामुळे तू काळी भासते आहेस... हा काळा रंग डोळ्यांत साठवून घ्यायचा आहे... अगदी काजळ घातल्यासारखा... मग दुसऱ्या दिवशी ऑफीसात कितीही लोकं कुजबुजू देत की अरे हा काजळ घालून आला की काय? एक दिवस वेडा होण्यातही मजा असते नाही का? नाही तरी तू मला वेडा म्हणतेसच की, कधी कधी...
तुझाच 

सोमवार, २६ मार्च, २०१२

प्रिय,

एवढा हतबल मी कधीच नव्हतो. जगण्याला आव्हान मानणारा मी आता त्याच्या हातातील कठपुतळी बनून गेलोय, असं वाटतं. तुझा नकार, तुझा होकार, तुझ्या नसण्यातील असणं आणि आता तुझ्या असण्यातील नसणं सगळंच असह्य होत आहे.... तू नव्हतीच तेव्हाची ती अपुरेपणाची भावनाही आपली वाटायची. आता मात्र ती अपुरेपणाची भावनाही राहिली नाही.. आता तुटलेपण जाणवते...मला माहीत आहे हे तुटलेपण तुलाही जाणवत असेल. तुलाही त्याच्या वेदना होत असतीलच पण तरीही हे अपुरेपण आता अवघड होऊन गेले आहे. जगण्याच्या लढाईला काही जखमा आवश्‍यक असतातच... आज मी या जखमाही हरवून बसलो आहे.. तुझ्या असण्यातील नसलेपण मला आता पोखरुन टाकेल... केवळ पोखरनार नाही तर तो मलाच खाऊन टाकेल की काय असे वाटू लागले आहे. बाहेर चैत्र फुलतोय आणि इथे मनात माझ्या पानगळती सुरू आहे.. विचित्रच सगळं... कधी कधी मला या कोवळ्या पानांचा हेवा वाटतो...सूर्य निर्दयीपणे आग ओकत असताना ही झाडांची कोवळी पालवी आपल्या एवढुशा छातीवर ती सूर्याचे अग्नीबाण कसे झेलतात.. याचे कौतुक वाटते...तू दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र वाचलं असशीलच ना? त्यांनी सगळे ऋतु मांडलेत. पण बाईंही काही ऋतुंबाबत अज्ञानीच होत्या. नाही! एकटेपणा त्यांनीही अनुभवलाच पण तरीही एकटेपणा आणि नसलेपणा या दोन गोष्टी वेगळ्याच असतात ना? तुझं असून नसणं हे सगळ्यात वाईट... हाक पोचतेय पण हाक मारता येत नाही आणि तुलाही मागे वळून बघायचे आहे आणि बघता येत नाही... ही अवस्था दोघांचीही...एक दडपण आले आहे...वेदना कुरवाळण्यात काही अर्थ नसतो हे तुझं सांगणं मला मान्य आहे पण ते मनापर्यंत पोचत नाही.... हा चैत्र संपेल आणि वैशाख येईल आणि तो कायम राहील... कदाचित त्या वैशाखात कुठून तरी तू पुन्हा भरुन येशील.. ढगांसारखी... नाही तरी तुझा रंग ढगांसारखाच की... सावळा... देणारा.. आणि बरसून जाशील... काही काळ पुन्हा चैतन्य पसरले आणि मग पुन्हा आजच्यासारखा दाह....बरसून रिकामे होणे तुला जमते...मला नाही जमत... मला भरुन घेण्याची सवय लागली आहे.. आणि मग तो भरलेपणा सहन करत जगायचे... मोकळे नाही होता येत मला... मला तो शाप आहे.. तू बोलतानाही नुसताच ऐकायचो मी. तुझा हुंकार... तुझा दोन शब्दांमधला चड-उतार...काही शब्दांवर तू देत असलेला भर आणि मग प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्यापासून शेवटापर्यंत सांगताना त्याचे तू केलेले विस्तारीकरण... प्रत्येक प्रसंग एक एक पायरीनेच सांगण्याची हातोटी.. मला नाहीच कधी जमली... मला जमले ते तुझे तूपण साठवण्यात...तुझी प्रत्येक गोष्ट साठवून ठेवण्यात... तो मिळणार नाही कधी.. ही जाणिव जीतकी घट्‌ट होत गेली तितकेच मी या साठवण्याकडेच जास्त लक्ष दिले... मला सांगायचेच बरेच काही राहून गेले.... हे साठवलेपण आता माझ्याबरोबरच जाईल... ज्या दिवशी अचानक तुझ्या हातातून एखादे भांडे पडून फुटेल, त्या दिवशी समज एक श्‍वास कायमचा थांबला..

तुझाच 

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,

प्रिय,
रात्रीचे तीन वाजलेत. अंगभर कंटाळा आणि झोप दाटून आली आहे. पापण्यांना चहाचा टेकू आता देणे गरजेचे आहे. हा टेकूही फारकाळ टिकणार नाही, हे माहीत आहे; पण तरी तो द्यायला पाहिजे. आता जर असेच थांबलो, तर कोणत्याही क्षणी पापण्या खाली कोसळतील आणि त्या कोसळलेल्या पापण्यांचा आधार घेत मग एक-एक गात्र आपली हत्यारे टाकून देतील. जागे राहण्याची लढाई संपून जाईल आणि निद्रेची शांतता पसरेल. त्यामुळे चहाची आता आवश्‍यकता आहेच. प्रिंटिंग मशिनचा आवाज आता कानापर्यंत येऊ लागला आहे. धडधड करत एक एक पेपर बाहेर पडत असणार... वातावरणात माणसाच्या आवाजाचा लवलेशही नाही. मशिनची घरघर-घरघर आणि घरघरच ऐकू येत आहे. आणखी काही वेळ तरी जागे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्टीनचा दरवाजा खटखटवणे भाग आहे.

कॅन्टीनचा दरवाजा खटखटला तसा चहावाला पोऱ्या डोळे चोळत बाहेर आला. त्याने एकवार माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितले आणि पुन्हा डोळे चोळले. मी काही म्हणण्याआगोदरच तो आत गेला. स्टोव्ह त्याने पेटवला. त्या स्टोव्हचा आवाज आता त्या मशिनच्या आवाजात मिसळला आहे. जणू त्या दोघांची जुगलबंदी चालली होती. पण ही जुगलबंदी फारकाळ टिकणारी नाही. चहाला उकळी फुटेल आणि स्टोव्ह गप्प होऊन जाईल... अगदी तसेच झाले... पोऱ्याने चहा आणून दिला आणि बाहेरची लाईट बंद करून निघून गेला. अस्ताव्यस्त मांडलेल्या खुर्च्यांमध्ये मी, माझा चहा आणि सोबतीला होते काळेभोर आकाश, त्यात टिमटिमणारे तारे, हलक्‍या पावलांनी प्रवास करणारा वारा आणि झाडांच्या मुळाशी रात्रीचे काही किडे.. बस बाकी काहीच नव्हतं. मी सरळ वर आकाशात बघितले, टिमटिमणारे तारे जणू माझ्याकडेच बघत असल्याचा भास झाला. प्रत्येक तारा वेगळा. त्याची तऱ्हा वेगळी. कोणी लांबवरचे तर कोणी जवळचे. कोणी फटकून राहणारे तर कोणी उगाच सलगी दाखविणारे... तोंड लपविणारेही काही तारे, तर काही तारे उगाचच आपला तोरा मिरविणारे... सगळेच तारे वेगळे... निराळे... आठवणींसारखे... प्रत्येक आठवणींची खासियत वेगळी... काही आठवणी जुन्याच होऊ नये वाटतात, तर काही आठवणींपासून आपण दूर होऊ पाहतो... तरीही त्या टिमटिमत राहतात... आपल्या असण्याची जाणीव सतत करून देत राहतात..आणखी तास दोन तासांनी सूर्याची काही किरणे आवेगात सगळ्या आकाशभर पसरतील आणि हे टिमटिमणारे तारे हळुहळु लुप्त होतील. तरी काही चावट तारका त्यातूनही आपले अस्तित्व दाखवत राहतील. आठवणींसारखेच..... मग सरळ सूर्यबिंब वर येईल आणि त्यापुढे त्या तारकेची धीटाई अपुरी पडेल. त्याच्या त्या प्रखरतेपुढे मान तुकवत तिलाही विरळ व्हावेच लागेल.... मग प्रतीक्षा अंधाराची... सूर्य मावळण्याची... .. आयुष्याचेही असेच असते ना? प्रत्येक प्रहर वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि त्याने मागितलेल्या आहुत्या वेगळ्या... प्रत्येक आहुतीनंतरच कळते की ती किती मोठी होती.. ... आता हे विचारांचे रंग कागदावर तसेच उमटतील का? हा प्रश्‍नच आहे. पण तसेच उतरावेत यासाठी प्रयत्न करतोय.... बघू जमेल कदाचित.... आज एक काळी रात्र आठवणींची रुपेरी किनार लेवून गेली हे मात्र निश्‍चित!

तुझाच....

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

प्रिय, प्रिय

प्रिय,
पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच.....

तुझाच.... 

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,


खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात...

प्रिय,
खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय....
पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की.

तुझाच....