संवेदना जागृत ठेवल्या की मग समोर घडणाऱ्या घटनां मनापर्यंत पोहचतात आणि मग त्याचा गंध मनात दरवळत राहातो. अनेकदा हा गंध दर्पाच्या अंगाने गेला तरी अंतिम त्यातील जगणं चाफ्याच्या मंद गंधासारखं नितांत सुंदर असतंच असतं.
रविवार, १९ डिसेंबर, २०१०
नारंगी
ते रानबोरांनी लदडलेलं झाड बघत ती पोरं फाटकाच्या दारात रेंगाळली होती. त्यांचे आई-वडिल समोरच चालू असलेल्या रस्त्यावर काम करत होते. त्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या सावलीत ती पोरं खेळत होती. त्यातच एकाची नजर त्या बोरांनी बहरलेल्या झाडाकडे गेली आणि मग ती फाटकापाशी रेंगाळू लागली. फाटकाच्या कोपऱ्यावर असलेली वॉचमन केबीन आणि त्यातल्या त्या मिशावाल्या बंदुकधारी माणसाची नजर त्यांना आत जाण्यापासून रोखत होती, पण तो कधीतरी तिथून जाईल आणि आपल्याला आत शिरता येईल या आशेने ती तीन-चार पोरं त्या तिथंच रेंगाळत राहिली. थोडा वेळ तसाच गेला... त्या केबीनमधला तो मिशावाला बंदुकधारी आता कुठेतरी गेला होता. एका पोराच्या ही बाब लक्षात आली. त्यानं इतरांना खुणावलं आणि त्या तीन-चार पोरांनी हलकेच फाटक ढकललं. फाटकाचा किर्र-कट असा आवाज आला पण लगेच थांबला. ती पोरं पळतच त्या बोराच्या झाडापाशी गेली. तिथे तर पिकलेल्या बोरांचा सडा पडला होता. आता एक बोर तोंडात आणि थोडी फाटक्या ओट्यात साठवत ती पोरं त्या झाडाभोवती पिंगा घालू लागली.... पोरांचा दंगा वाढला तसा तो मिशावाला तिथे आला... त्या पोरांचा चाललेला पिंगा त्याने बघितला आणि न बघितल्यागत करुन तो केबीनमध्ये शिरला. पोरांना वाटलं त्याचं लक्षच नाही. पोरांनी झाडाला हलवायला सुरवात केली. बोरांचा आणखी सडा पडला. ती आंबट गोड, पिठूर बोरं तोंडात घालत मिटक्या मारत पोरं झाडाभोवती फिरत होती. हाताला लागेल ती हिरवी, पिवळी, नारिंगी बोरं गोळा करत होती... एवढ्यात फाटकाचा दरवाजा पुन्हा करकरला. एक मोठी गाडी आत आली... मघाच्या मिशावाल्यानं त्यातल्या साहेबाला नमस्कार केला. ती गाडी पुढे गेली... पोरांचं लक्ष गाडीकडे गेलं... ती पुढं गेलेली गाडी मागे आली... तो मिशावाला बंदुकधारी लगबगीने पुढे गेला... आणि मग गयावया करु लागला... पोरांना काही समजले नाही... तो तसाच गेला... त्याने फाटक लावले आणि त्याला कुलूप घातले... आणि तो पोरांकडे येऊ लागला... आता पोरांना भीती वाटू लागली होती... आता हा आपल्याला मारणार!... त्यातल्या लहान पोरांना मोठ्याने आपल्या पाठिशी धरले आणि हात पुढे केला... त्या मिशावाल्याने त्या पोरांना मारलं नाही. चला, साहेबांनी बोलावलंय... पोरांना आता पळून जावं वाटलं... पण फाटक बंद होतं..... पोरं गुमान त्या मिशावाल्याच्या मागून चालू लागली... थोड्यावेळाने बंगला आला... मघाच्या त्या गाडीतला तो उंचापुरा साहेब गाडीच्या बाहेर उभा होता... पोरांना आता हा आपल्याला काय शिक्षा करणार याची उत्सुकता लागली होती... साहेब तिथल्याच एका पायरीवर बसला... त्याने पोरांना जवळ बोलावलं... ओट्यातली बोरं सांभाळत पोरं जवळ गेली... साहेबाने त्या बोरांकडे बघितलं...बोरं कोणी कोणी खाल्ली... साहेबाच्या या प्रश्नावर कोणीच काही बोललं नाही... साहेबानं पुन्हा प्रश्न विचारला... साहेबाची भाषाच पोरांना कळली नाही... साहेब या बोरांबाबतच काहीतरी विचारत असणार याची त्यांना खात्री होती... त्यामुळे त्यातल्या दोघा मोठ्या पोरांनी माना डोलावल्या. बारक्यांनीही त्यांचं अनुकरण केलं... साहेबाने त्यांना ओट्यातली बोरं खाली टाकायला सांगितलं... पोरांनी बोरं खाली टाकली... मग साहेबाने त्यातल्या सगळ्यात लहान पोराला जवळ बोलावलं,तुला चॉकलेट आवडतं?... पोराला साहेबाची भाषाच कळली नाही... त्यामुळं ते मख्ख चेहरा करुन उभं राहिलं... साहेबाला काय करावं काही कळेना... साहेबाने आत हाक मारली... त्याबरोबर एक नोकर पळत पुढे आला... त्याला काहीतरी साहेबांनी सांगितले... तो लगबगीने गेला आणि बरीच चॉकलेटं घेऊन आला... साहेबाने प्रत्येक पोराला चॉकलेट दिलं... पोरांना ते चॉकलेट फोडता येईना... साहेबाने त्यातलं एक चॉकलेट फोडलं आणि खाल्लं. पोरांनी बघितलं आणि तसंच ते चॉकलेट फोडून तोंडात टाकलं... पोरांची भीती पार पळाली होती... पोरांनी आता आपल्या ओट्यात, खिशात ती चॉकलेटं भरुन घेतली... साहेबाने त्या मिशावाल्या बंदुकधाऱ्याला पुन्हा खुणावलं... तो लगबगीने पुढे झाला. पोरांसाठी फाटक खुलं झालं... पोरं आनंदानं उड्या मारत गेली... फाटक बंद करुन तो साहेबांपाशी आला... साहेब त्या विखुरलेल्या बोरांकडे बघत होता... ती पिवळी नारिंगी बोरं त्याला खुणावत होती... त्यातलं एक बोर त्यांनं उचललं आणि तोंडात टाकलं... त्या पिढूर नारंगी बोराच्या आंबट तुरट चवीने साहेबाच्या मनावरचे अनेक बंध सुटे झाल्याचे त्या बंदुकधाऱ्या मिशावाल्याला वाटले....
७ टिप्पण्या:
भावले.
आवडेश...
mastch
वाह अतिशय उत्तम पोस्ट..
sundar !!!
मस्त झालीय कथा!
टिप्पणी पोस्ट करा