अनाथ
ऑफीसला जायच्या रस्त्याच्या कडेचे ते झाड नेहमी कुणाला ना कुणाला सावलीत ठेवायचं. प्रत्येक सिझनमध्ये त्या झाडाखाली कोणी ना कोणी वेगळं असायचं. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणारा, हिवाळ्यात स्वेटरवाला, उन्हाळ्यात टोप्या विक्रेता बसलेला असायचा. परवाच्या रस्तारुंदीकरणात त्याच्या पारंब्या तोडल्या गेल्या आणि फांद्यांवरही कुऱ्हाड चालविली गेली. आता त्या झाडाची सावलीही संकुचित झाली. अलीकडे तर तर तिथे कोणीच दिसायचे नाही. परवा सहज त्या झाखाली नजर गेली आणि बघितलं तर काही कुत्र्याची पिलं तिथं खेळत होती. ती तिथे कशी आली, कुठून आली काहीच कळलं नाही. रोज ऑफीसला जाताना ती तिथे खेळत असलेली दिसायची. चार- पाच तरी असतील. भुऱ्या रंगाची, मऊ केसांची. मग रोज त्या झाडाखाली थोडावेळ थांबायचं आणि त्या कुत्र्यांना निरखायचं हा छंदच लागला. आईच्या अंगा खांद्यावर खेळणारी ती पिलं बघितली की मजा वाटायची. त्या पिलांची आईही त्यांना खेळवायची, चावायची, गुरगुरायची. ती गुरगुरली की काही पिलं लांब जायची आणि परत फिरायची.थोडे दिवसांनी त्यातील एक-एक पिल्लू कमी होत गेलं. शेवटी एकच पिल्लू राहिलं. ते पिल्लू आणि त्याची आई त्या झाडाभोवती फिरत असायची. हायवेवरुन होणाऱ्या वाहनांच्या ये-जा पासून ती त्याची जणू रक्षण करायची. काल त्याच रस्त्यावरुन जाताना समोरच्या ट्रकने जोरात ब्रेक दाबला. गाडी कचकन थांबली. काय झालं म्हणून पुढे जाऊन बघितलं तर ती पिलाची आई ट्रकच्या पुढच्या चाकात सापडलेली. थोडावेळ तिची धाप सुरु होती आणि नंतर तिही थांबली. तिचं ते पिल्लू शेजारीच केकाटत होतं. ट्रकचालकानं त्या मेलेल्या कुत्रीला रस्त्याच्या एका कडेला आणून टाकलं आणि तो पिलाकडे गेला. त्यानं ते पिल्लू उचललं आणि ट्रकच्या केबीनमध्ये ठेवलं. मला राहावलं नाही म्हणून मी त्याला विचारलं, ""सरदारजी क्या करोगे इसका?'' सहा फूट दोन
इंच उंचीच्या त्या सरदाराचे डोळे थोडे किलकीले झाले. माझ्याकडे त्यानं बघितलं आणि म्हणाला, कुछ नहीं, पालुंगा! यतीम होने का दुख मालुम है
४ टिप्पण्या:
अप्रतिम. मस्त twist दिलाय शेवटी !!
कुठेतरी खोलवर लकाकलं काळजात...
kharch etk chan lihlay ki manala lagl.khupch sundar
kharch agdi manala lagl.khup chan lihlt tumhi.
टिप्पणी पोस्ट करा