तो....(लपंडाव)
तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे चारच शब्द आपण किती घोगऱ्या आवाजात बोललो. अखंड बडबडणारी ती मग शांत झाली. बोल की एवढच म्हणाली, नंतरची एक दोन मिनीटं तरी दोघंही काहीच बोललो नाही. नंतर महत्त्वाचं बोलणं राहूनच गेलं. पण तिला बहुतेक ते कळलं असावं. त्यामुळे तीही बोलली नाही. खूप दिवसांपासून तिला विचारायचं धाडसं करत होतो पण ते जमलं नाही म्हणून आज मनाचा हिय्या केला. पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं एकच वाक्य बोलल्यानंतर मात्र आपला धीर झाला नाही. श्वास जड झाला... छाती धडधडत होती. बहुतेक तिला ते जाणवलं त्यामुळे नंतर
तिने बोलण्याचा आग्रह धरला नाही. अखंड बडबडणारी ती हरवून गेल्यासारखी होती. नजर चोरटी आणि श्वास जलद होतं होते.
नंतर बराच वेळ हवा-पाण्यासंदर्भात बोलत होतो. एका चित्रपटाची सगळी कथाही सांगून टाकली. उगाच हसलो... पण ती शांत होती.....तिच्या केसांच्या बटांनी आपल्याला वेड लावले आहे हेच तर सांगायचे होते. पण धीर झाला नाही. महत्त्वाचं बोलण्यासाठी भेटलो पण शब्दांचाच लपंडाव खेळत राहिलो.
ती....(लपंडाव)
तो असा का आहे वाट चुकलेल्या वाटसरुसारखा. कायम भांबावलेला असतो. समोरची सरळ वाट त्याला त्याच्या मुक्कामापर्यंत घेवून जाणारी असते पण तो वळणं घेत राहातो. आणि वळल्यावर मग तो मार्गदर्शकाची वाट बघत राहातो. प्रत्येकवेळा त्याला सावरणारं कोणीतरी लागतं. तो मुलगा आहे त्यानं विचारलं पाहिजे. मी कोण वाघीण आहे का सिंहीण याला फाडून खाणार आहे का? .... पण त्याचा हाच स्वभाव तर आपल्याला खूप आवडला. त्यानं चटकन विचारलं असतं तर त्याच आश्चर्य वाटलं असतं. पण त्याचं वळणं घेत बोलणंच तर आपल्याला आवडतं. नेहमी शांत शांत असणारा आज किती बडबडला. महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला, पण हवा पाण्याच्या गप्पा मारत राहिला. उगाचच हसत होता.
आज आपण नुसतं हं हा हू करत राहिलो, पण तो बोलत होता. त्याच्या बोलण्याचे हसू येत होते, पण तो ओशाळेल म्हणून ते दाबून धरले. कदाचित मनातल्या भावना ओठावर येऊ नयेत यासाठीच तर तो बोलण्याचा लपंडाव करत होता.
४ टिप्पण्या:
अरे विचारून टाक रे तिला आता. घाबरू नकोस. बिनधास्त :-)
Gud One...
मस्त झालाय. दोन्ही बाजुचं एवढं कळतय राव तुम्हाला.
dhanyavad heramb, atul yadav and sadhak
टिप्पणी पोस्ट करा