बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

पौर्णिमा...

तो
गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.
""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''
माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही.

--------------------------

ती

त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता,
""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.

https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl 

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

अश्रू

तो
ती काय करत असेल आता.... कदाचित रडून-रडून डोळे सुजले असतील.... जगजीत सिंह गेल्याचा धक्‍का तीनं कसा सहन केला असणार... वेड्यासारखी प्रेम करायची त्याच्यावर. त्याच्या गजलांवर मरायचीच म्हणा ना....वो कागज कि कश्‍ती हे तिचं आवडतं गाणं... हात छुटे भी तो रिश्‍ते नही छोडा करते.... या गझलेप्रमाणे तिने अनेकवेळा जगण्याचा प्रयत्नही केला पण जमला नाही.... जगणं गाण्याचे शब्द बनतात... पण गाण्याच्या शब्दांवरच्या मार्गावरुन चालणं सोप्प नसतं, हे तिला जाणवून गेलं त्यामुळेच तिनं हात सोडवून घेतला... ती गाण्यात रमायची... .. पण गजलांवर तिचं खास प्रेम....प्रत्येकवेळी ती नवनव्या गजलांवर बोलायची... तिच्या जगण्याच्या अनेक आधारांपैकी एक आधार गझल आहे हे नक्‍की.. त्यामुळे या आधाराला बसलेला धक्‍का तीनं कसा सहन केला असेल देव जाणे... कदाचित दारं खिडक्‍या बंद करुन जगजितचीच एखादी कॅसेट प्ले केली असेल... किंवा त्या अंधारात उशी ओली होईपर्यंत रडत बसली असेल...गुलजार आणि जगजीत सिंह या दोघांच्या शब्द -सुरावर तिचे अनेक इमले उभे आहेत, अशा इमल्यांना असे धक्‍के थोडे जडच जातात.....

ती
जगजीत सिंह गेले...त्याला बातमी समजल्यावर तो कसा रिऍक्‍ट झाला असेल.... त्याला धक्‍का बसला असेल... छे धक्‍का बसणाऱ्यांमध्ये तो कधीच नव्हता.... ब्रेन हॅमरेज झालेलं होतं... डॉक्‍टरांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले एवढंच म्हणेल आणि मान एका दिशेला फिरवून गप्प बसेल.... माहित नाही नक्‍की तो कसा रिऍक्‍ट झाला असेल... संवेदना तशा त्याच्या बोथटच झाल्यात जणू.... सुख -दुःख मानायला वेळ कोणाकडे आहे, हे त्याचं तत्वज्ञान....त्यात माणसं मरायचीच कधी ना कधी हे नेहमीचंच वाक्‍य त्यानं नक्‍की कोणाच्या तरी तोंडावर फेकलं असणार... पण जगजीत वेगळाच माणुस... या माणसाकडे काय शक्‍ती आहे नाही, जखमांना तोच उघडं करतो आणि त्यावर हळुवार फुंकरही घालतो.... जखमा ओल्या ठेवताना त्यातील वेदना हलकेच सुखावह करण्याचे जे कसब त्याच्यात आहे ते मुळी कुणाच्यात नाहीच...शब्दांच्या अर्थांना सुरातून त्यानंच प्रवाहीत करावं... त्याचं गाणं रेडीओवर लागावं आणि ऐन दुपारी कातरवेळीची हुुरहूर जाणवावी... त्याच्यासारखा सूरकर्मी सापडणं मुश्‍किल... बंधमुक्‍त गाताना, ऐकणाऱ्याला बंधिस्त करण्याची त्याची हातोटी जगावेगळी... ही सारी वाक्‍ये तर त्याचीच की... त्यामुळं जगजीत गेल्याचं त्याला नक्‍कीच दुःख झालं असणार... रात्री घरी आल्यावर त्यानं जगजीतच्या गझला लावल्याच असतील... आणि त्या ऐकताना नाकावर अश्रुचा थेंब आला असणारच....

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

महाराजांचं उपरणं....

अमुक तमुक महाराज की जय... महाराज की जय... एक पट्टेवाला जोरात ओरडला. त्याच्या पाठीमागून मग दुसरा आणि मग तिसराही ओरडला. "महाराज की जय...' जयजयकार गगनात दुमदुमला.
महाराजांनी हात वर केला. दरबार शांत झाला..
मग एक एक दरबारी बोलू लागला.
महाराजांचा विजय असो.... महाराजांच्या राज्यात गुरं-ढोरं सुखी आहेत. महाराजांची कृपा आहे.... एका दरबाऱ्याने सूर आळवला.
महाराजांचा विजय असो... महाराजांच्या राज्यात स्त्रिया सुखी आहेत... दुसऱ्या दरबाऱ्याने री ओढली.
महाराजांचा विजय असो... विजय असो... महाराजांच्या राज्यात पोरं-सोरं सगळी प्रजा सुखी आहे... महाराजांचा विजय असो... आता अश्‍वमेध केलाच पाहिजे...
दरबाऱ्याने अश्‍वमेधाचं नाव काढताच महाराजांच्या अंगावर मास चढलं.
उद्याच्या चक्रवर्ती सम्राटाचा विजय असो... पट्टेवाला जोरात ओरडला... त्याच्या पाठीमागून दरबारानेही जयजयकार केला.
"उद्याच्या चक्रवर्ती सम्राटांचा विजय असो... पण...' एका दरबाऱ्याने मुजरा करता करता "पण...' थोडा लांबवला...

पण काय? महाराजांना काही कळेना...
गुरं-ढोरं... पोरं-सोरं... सगळी सुखी; तरी पण काय? महाराजांनी सवाल केला...
दरबार शांत. पट्टेवाल्याने जोरदार "अमुक तमुक महाराजांचा विजय असो...' "उद्याच्या सम्राटाचा विजय असो' अशी जोरात घोषणा केली... "महाराजांचा विजय असो... महाराजांचा विजय असो...' दरबारी एकसुरात ओरडले.
थांबा... दरबाऱ्याच्या पण या... प्रश्‍नाला उत्तर नाही मिळालं... पण काय?
सरदार बोला... पण काय?... सुभेदार बोला. पण काय?... मंत्री बोला... कोणी तरी बोला हा "पण' कशासाठी?
कोणी बोलेना... महाराज संतापले... काय आहे ही भानगड... आम्ही एवढं चांगलं राज्य करतोय; पण तरीही "पण' आहेच...
एका दरबाऱ्याने अभय मागितले... महाराजांनी हात वर केला...
होय महाराज... पोरं-सोरं... गुरं-ढोरं... सगळी सुखी आहेत... पण महाराजांच्या उपरण्यावरचा डाग लोकांच्या डोळ्यात खुपतोच आहे...
लोकं म्हणताहेत... सगळी प्रजा सुखी; पण तरीही उपरण्यावरचा डाग काही जात नाही...
महाराजांनी एकदा उपरण्याकडे बघितले आणि दुसऱ्यांदा दरबारात... सगळे दरबारी माना खाली घालून बसलेले...
यावर उपाय आहे की नाही... सरदार, चोपदार, मंत्री सगळे चूप...
प्रधानजी, तुम्ही सांगा आहे का उपाय?... प्रधानजी काही बोलले नाहीत...
आहे. महाराज उपाय आहे... जालीम उपाय आहे... मघाचाच दरबारी बोलला.
काय आहे उपाय तातडीने सांगा... उपरण्यावरचा डाग घालवायचा कसा...?
महाराज... आता तुमच्या वाढदिवसाला राज्यातल्या सगळ्या धोब्यांना बोलवा.... तीन दिवस धोबी उपरणे धुतील. डाग धुऊन जाईल... उपरणे लख्ख होईल. मग अश्‍वमेधाची तयारी जोरात करता येईल...
महाराजांना दरबाऱ्याचा हा सल्ला आवडला... चला. शाही थाटात धोब्यांची फौज तयार करा... राज्यातले सगळे धोबी बोलावून घ्या...
खलिते सुटले... घोडेस्वार चारी दिशांना रवाना झाले... राज्यातील धोबी राजधानीत येऊ लागले... महाराजांनी त्यांची बडदास्त ठेवली... धोब्यांची फौज बघून महाराज मनातच खूश झाले... आता डाग धुतला जाणारच... एवढ्या लोकांनी उपरणे धुतल्यावर कशाला डाग राहतोय.... महाराजांचा आनंद गगनात मावेना...
महाराजांनी सगळ्या धोब्यांना साबण दिले... उपरण्याचा डाग धुण्यासाठी एक एक धोबी पुढे येऊ लागला.
महाराजांना उपरणे उंचावून दाखवू लागला... महाराज मनोमनी खूश होत होते... महाराजांचे उपरणे किती देखणे, किती रेशमी... महाराजही किती देखणे, किती चांगले याचे कौतुक होत होते...
एक दिवस झाला... महाराजांनी उपरण्याकडे बघितले... डाग अजून शिल्लक होताच... दुसऱ्या दिवशी दुसरे धोबी आले... उपरणे धुऊन निघून गेले... महाराजांनी पुन्हा उपरणे बघितले... उपरण्यावर डाग तसाच होता... महाराजांनी तिसऱ्या दिवशी नेटाने उपरणे धुण्यास सांगितले... धोब्यांनी केलेल्या साबणाचा फेस दुसऱ्या राज्याच्या राजांच्या तोंडाला यायला लागला...
राजांनी उपरणे पुन्हा बघितले... आता मात्र महाराजांना कळलं... उपरणं पुरतं फाटलं होतं... पण डाग काही गेला नव्हता... अश्‍वमेधाची तयारी थांबवावी लागणार होती...


http://72.78.249.107/Sakal/25Sep2011/Normal/Kolhapur/KolhapurToday/page4.htm
("सकाळ' च्या 25 सप्टेंबरच्या टुडेमध्ये छापलेला माझा लेख.... (सुषमेय) प्रवीण कुलकर्णी )


बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

स्टेथ्‌स्कोप

पोरीचा फोन होता. तिला तीन हजार रुपये पाहिजे आहेत. ते डॉक्‍टरांच्या गळ्यात नसतं का? तसलं काही तरी घ्यायचं आहे. त्यानं एकदा तिच्याकडे बघितलं आणि तो तिथेच सैंपाकघरात केलेल्या मोरीत पाय धुवायला गेला.
रात्रभर झोप लागली नव्हतीच. वॉचमन म्हणून काम करत असला, तरी रात्री उशिरा एखादी झोप मिळायची. तेवढंच बरं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून ही झोप पण पार उडाली होती. त्या प्रसंगानंतर तर ती मिळणे शक्‍यच नव्हती. आता शाळेत दिवसभर काम करायला लागणार. मुख्याध्यापक आज नसले तर बरं होईल, थोडं डोकं तरी टेकता येईल, असा विचार त्याच्या डोक्‍यात येत होता. त्याचे डोळे तारवटले होते. त्यातच बायकोची बडबड.
गेल्याच महिन्यात सहा हजार दिले होते ना?
ते होस्टेलचं बिल भागवलं. आता हे पैसे त्या स्टेथ्‌स्कोप का काय म्हणतात, त्यासाठी आहे. मी काय म्हणतेय, उद्या पैसे पाठवायलाच हवेत.'' पोरीचे मास्तरांनी वर्गात यायचं नाही, म्हणून सांगितलं आहे. तीनं चार दिवसांपूर्वीच सांगितले होते; पण मी मुद्दामच सांगितले नव्हतं.
आता यावर त्याला बायकोचा रागच आला. आधीच सांगितलं असतं तर काय तरी तजवीज करता आली नसती का? आता उद्या लगेच पैसे कोठून आणायचे.
पण तो काही बोलला नाही. आतापर्यंत किती पैसे दिले. शाळेतल्या शिपायाला पगार तो केवढासा; पण पोरीला डॉक्‍टर करण्यासाठी त्यानं कितीही कष्ट उपसायचे ठरवले होते. प्रॉव्हिडंड फंड तर तिच्या बारावीच्या आणि प्रवेश परीक्षेच्या क्‍लासलाच संपला होता. बाकी कर्जाची मर्यादा केव्हाच उलटली होती. लोकांसमोर किती हात पसरायचा, म्हणून त्यानं रात्री वॉचमन म्हणून काम करायला सुरवात केली. मोठ्या बिल्डींगची वॉचमनगिरी असल्याने त्याची सुरूवातील काही महिने झोपही व्हायची. पोरीचा दर महिन्याचा खर्च भागायचा. दुसऱ्या पोराचा शिक्षणाचा खर्च भागायाचा. त्याचं ठीक चाललं होतं. पण आता पोरीचा खर्च दिवसेंनदिवस वाढत चालला होता. त्यातच बिल्डींगमध्ये झोपताही येत नव्हतं. रात्र-रात्र जागून त्याची तब्येत पुरती ढासळली होती. शाळेत काही काम सांगितलं की तिथेही चुका व्हायच्या, मुख्याध्यापक ताडताड बोलायचे; पण पोरीला डॉक्‍टर करायचंच हा त्याचा हट्‌ट मात्र कायम होता.
त्यानं बायकोकडे बघितलं. तिच्या बापाने दिलेली चार टिकल्यांची माळ त्यानं केव्हाच विकली होती. गळ्यातील खोट्या मंगळसुत्राला बाजारात चार आणेसुद्धा कोणी देणार नव्हतं; पण पोरीला पैसे तर पाठवायला हवेच. बिल्डींगच्या सोसायटीकडून गेल्याच महिन्यात दोन महिन्याचा ऍडव्हान्स घेतला होता. त्यामुळे तिथेही कोणी पैसे देणार नव्हते. शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचे देणे होते, सगळे दरवाजे बंद होते. आता काय करायचे त्याला प्रश्‍न पडला. त्यातच रात्रीचा तो प्रसंग त्याला आणखी बेचैन करत होता. काय करायचे त्याला कळत नव्हते. डोकं फार बधीर झालं होतं.
तो तसाच शाळेत गेला. रात्रीच्या त्या प्रसंगानंतर तर त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. काय करावे काहीच कळत नव्हतं. दिवसभर तो तीन हजारांचा आकडा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. पैसे कसे उभे करायचे. कोणाकडे मागायचे. आणखी काही काम करता येईल का? त्यानं मेंदूची पेशी आणि पेशी झिजवली. पण हातात काहीच लागलं नाही.
शाळा सुटल्याची घंटा त्यानंच वाजवली. घंटेवर दिलेल्या प्रत्येक ठोक्‍यासरशी त्याच्या डोक्‍यात विचारचक्र सुरू झालं. त्यानं निश्‍चय केला. पोरीला डॉक्‍टर करायचंच. काही झालं तरी डॉक्‍टर करायचं. कितीही पैसे लागोत.. कितीही... यातना सहन कराव्या लागोत.
तो घरात आला.
जरा पडून घेता का? रात्री पण झोप नाही मिळत. बायको म्हणाली.
तो गप्प गप्प होता. त्यानं दाढी केली. रात्रीची वाट बघत शांत बसला....जेवला.. जेवण कसलं ते काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. डोक्‍याची टोपी, काठीबरोबर आज त्यानं बायकोची साडीही पिशवीत टाकली.
गेल्या कित्येक दिवसांपासून त्या बिल्डींगमधला एक मोठा साहेब त्याला सांगत होता. जवळ आलास तर तीन हजार देईन फक्‍त साडी नेसायची.

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

काळा

माझ्यातील लेखकावर प्रेम करणाऱ्या एका चाहत्याने काळा या रंगावर गोष्ट लिही असं सांगितलं होतं, ही गोष्ट म्हणून खास आहे.
ं.....
काळा
.........
तिनं डबीतून काजळ काढलं आणि हलकेच बाळाच्या डोळ्यांत घातलं. त्या बाळाच्या गालाचा हळूच पापा घेतला आणि त्याला पाळण्यात झोपवलं. त्यानं मिटलेली मूठ, त्याचं ते इवलंसं नाक, फुगरे गाल, कुरळे केस ती तासन्‌ तास बघत राहायची. त्याच्या इवल्याशा डोक्‍यावरून मायेचा हात फिरवत राहायची. त्या झोपलेल्या सानुल्याला अलगद उचलायची आणि छातीशी धरायची. त्याला कुठे ठेवू, कुठे नको असंच तिला व्हायचं.... लग्नानंतर दहा वर्षांनंतर तर ते जन्माला आलं होतं. या दहा वर्षांत तिनं किती सोसलं होतं. बायकांच्या नजरा टोचायच्या तिला. त्यांचं ते कुजबुजणं असह्य व्हायचं. पहिल्यांदा ती त्याकडे दुर्लक्ष करायची, पण अलीकडे तिला ती असह्य झाली होती. लग्नापूर्वीही तिला अशाच कुजबुजी ऐकायला मिळायच्या.
""तिशी गाठली की, अजून किती दिवस हुंदडायचं. घर बसवायचं नाही का? की पोरं फिरवत बसणार आहे नुसती....
एवढा सुंदरतेचा मिजास कशाला.... बाहेर कमी का बायका सुंदर असतात?
थोडी करायची ऍडजेस्टमेंट... नवऱ्याचा नसला पगार जास्त ;पण हिचा आहेच ना? मग त्यात भागवायचं... लग्नच करायचं नाही, असं सरळ सांगून टाकायचं. कारणं कशाला द्यायची..... अशा कुजबुजी ती ऐकायची. अनेकवेळा तिला ऐकू येईल अशीच कुजबूज व्हायची... तिची आत्या, मावशी, सगळेच यांत सामील असायचे; पण ती
ऐकून न ऐकल्यासारखी करायची. गप्प बसायची. ती खरंच देखणी होती. अगदी गोरीपान, नाक सरळ, केस लांब... पण तिला त्याचं फार कौतुक नव्हतं. लग्न करायचं तर किमान बरोबरीचा तरी हवा.. तिची आई तिच्यासोबत असायची... तिला म्हणायची, तू नको काळजी करू... तिच्या आईनं तिच्यासाठी पारड्यात जोखूनच मुलगा आणला.... लग्न झालं... पहिली दोन-तीन वर्षे खूप चांगली गेली... पण नंतर सुरू झालं मूल पाहिजे... ती गप्प बसायची.. तिच्याबाबतीत काहीबाही बोलणं सुरु असायचं...
काही नाही... पदर उडवत फिरायची सवय लागली आहे... त्यामुळे मूल कशाला?
फिगरची काळजी, बाकी काय कारण असतंय.... बॉसशी लफडं आहे म्हणे, त्यामुळेच तर प्रमोशन मिळालं ना?... ती वैतागायची, नवऱ्याशी भांडायची.. पण तो शांत बसायचा.... कशाला पाहिजे मूल, तुझ्या करिअरला ब्रेक लागेल... तिला नवऱ्याचं म्हणणं पटायचं. ती गप्प बसायची... अलीकडे मात्र ती मुलाबाबत हळवी झाली होती... तिने नवऱ्याच्या मागे धोशा लावला, "मला मूल हवंच.... तिने दोन वर्षे वाट बघितली; पण यश आले नाही; मग तपासण्या झाल्या. सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या नवऱ्याला तिनं कारण सांगितलं... त्यालाही ते पटलं... मूल हवंच आहे...डॉक्‍टरांनी उपाय सांगितला... नवरा समजूतदार होता... त्यानं पटकन सही केली...
तिच्या सासूला किती मोठा आनंद झाला होता. तिला कुठे, ठेवू कुठे नको असंच केलं. हे नऊ महिन्यांत नवऱ्यानेही किती काळजी घेतली. तिच्या पोटात दुखायला लागलं, नवऱ्याचा जीव कासावीस व्हायला लागला... तिची ती तळमळ त्याला बघवत नव्हती. सासूने देवापुढे दिवा लावला... तिथला अंगारा तिच्या कपाळाला लावला... डॉक्‍टरांनी तिला आत घेईपर्यंत तिचा नवरा तळमळत होता... त्या खोलीच्या बाहेरही तो येरझाऱ्या घालत होता... सकाळी दहापासून येणारा तिचा आतला ओरडण्याचा आवाज दुपारी तीनच्या दरम्यान थांबला....
नर्स धावत बाहेर आली... मुलगा झाला...बाळ फारच पोसवलंय त्यामुळे त्रास झाला बाईंना.... दोघेही आता उत्तम आहेत...
नर्सचे शेवटचे वाक्‍य ऐकल्यावर त्याच्या जिवात जीव आला... तो धावत आत गेला.... थकव्याने तिची शुद्ध नव्हती...त्याने तिला बघितले... डोळ्यांच्या कडा पुसल्या... नर्सने त्याच्या हातात ते कपड्यात गुंडाळलेलं बाळ दिलं... त्यानं एकदा बाळाकडं बघितलं आणि एकदा तिच्याकडं.... त्याने नर्सला जोरात हाक मारली... नर्स आज आणखी कोणाला बाळ झालं आहे का?... चुकून बाळ बदललंय का?...
नर्सने नकारार्थी मान डोलवली... आता त्या खोलीत तो.. ती... आणि ते तासभर वयाचं पोर एवढेच काय ते होती.... त्याला ते पोर हातात धरवेना... तो काळामिट्ट कुरळ्या केसांचा मांसाचा दोन-अडीच किलोचा गोळा त्याला शंभर किलोचा वाटायला लागला.... त्याला ते बाळ धरवेना... त्याची आई सोबतच होती... तिनं बाळाकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं.. तिच्या आईकडे बाळ देऊन दोघे खोलीच्या बाहेर आले... त्याच्या डोळ्यासमोरून तो काळा गोळा सरकत नव्हताच. काहीही सांगितले तरी कळणार होतेच....तो अस्वस्थ झाला... त्याने घर गाठले... त्याची आईही होती समोर....
दुसऱ्या दिवशी तो आला.... त्यानं तिला बघून हसायचा प्रयत्न केला... तिनं बाळाला छातीला लावलं होतं... तो गप्प बसला; मग हळूच बोलला... तुला काय वाटतं....
ती म्हणाली, कशाबद्दल...
बाळाला घरला घेऊन जाण्याबद्दल.... लोकांना सगळं कळेल...
ती गप्प बसली... तो तिला समजावत राहिला... ती काहीच बोलली नाही.... तो जायला निघाला, त्यावेळी ती इतकंच बोलली...
ते बाळ तुमचं नाही म्हणून तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही... पण ते माझं आहे... मी त्याला सांभाळेन... तुमची साथ असली तर तुमच्यासोबत नाही तर एकटी.... त्या काळ्या कुरळ्या केसांतून फुन्हा हात फिरवताना तिला उगाच त्या बाळाचा अभिमान वाटला....

मंगळवार, २६ जुलै, २०११

पैंजण

तिनं कपाटातून जुनं पैंजण काढलं आणि तिच्यासमोर ठेवलं.
हं! घाल हे..
तिची सोळा - सतरा वर्षांची पोरगी पसरली होती.
तिच्या पसरलेल्या पायावर तिनं जोरात चापट मारली...
""हे असं फतकाल मांडून बसायचं न्हाई, असं कितीयेळा सांगिटलंय. कवा अक्‍कल येणार हाय देवास ठावूक. बारकी ऱ्हायली न्हाईस आता. '' तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा चालू झाला.
तिनं पाय मागं घेतले, पण तिचं आईकडं लक्षच नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ती सारखी चिडचिड करत होती. रोज रोज सूचनांचे डोस पाजायची. त्यामुळं तिला त्यात नवीन काहीच वाटलं नाही. आईकडं दुर्लक्ष करत ती टी.व्ही.चे चॅनेल बदलू लागली.
तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा सुरूच होता. तिचं सगळं लक्ष टीव्हीकडेच होतं.
मी काय म्हणते आहे...
आपल्या बोलण्याकडं पोरीचं लक्षच नाही कळल्यावर तिची चिडचिड आणखी वाढली. तिनं सरळ टीव्ही बंद केला आणि तिच्यासमोर टाकलेलं पैंजण तिच्या हातात दिलं.
"घाल हे....'
"अगं हे ल्हान व्हईल. सातवीत असताना घेतलं होतंस.'
"काय होत न्हाई एका दिसानं.. माघारी आल्यावर काढून टाक..
पण आपण जातोय कुठं....
तुला दाखवाय न्यायची हाय!
गेल्या चार-पाच दिवसांपासून आईची धावपळ अशाच काही कामासाठी चाललीय हे तिला कळत होतं. पण तिने स्पष्ट काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे विचारायचा प्रश्‍न नव्हता. आता मात्र आईनं सरळ दाखवायचीच भाषा केल्याने ती जाम पिसाळलीच. मला काही लगीनबिगीन नाही करायचं, आताशी कुठं कॉलेजात जायाला लागलीय. धाव्हीला चांगलं मार्क मिळाल्यावर तूच म्हणाली व्हतीस की, तू शिक, तू मोठी झाल्याबिगर तुझं लगीन करणार न्हाई म्हणून..
म्हणले व्हते... पण आताचं आयकायचं... निमूटपणे ते पैंजण घाल पायात... बोडक्‍या पायांनी जायाचं न्हाई.
तिला माहीत होतं, आईला आता विरोध केला तर ती मारायला कमी करणार नाही. आज तिचा चुलताही घरात नव्हता. ज्याच्याजवळ तिला तक्रार करता आली असती. आज जाऊन येऊ या. एवढं काय तातडीनं लगीन लावीत न्हाई, असा विचार करून ती उठली. तिनं ते पैंजण घेतलं आणि पायात घालू लागली.
आये, येत न्हाई गं...
अगं फासकी मोठी कर म्हंजे ईल.... तिच्या आईनं पर्याय सुचविला.
तिनं फासकी मोठी केली आणि ते पैंजण ओढून पायात घातलं....तरी काही ते येईना..
तिची आई बघत होती.. तिनं चटकन पुढे होऊन ती फासकी मोठी केली आणि जोरात दाबली. ते पैंजण ओढून ताणून तिच्या पायात बसले, पण त्याचे ते टोक तिच्या पायात रुतलं. ती जोरात ओरडली, पण त्याचा तिच्या आईवर परिणाम झाला नाही. तिनं तशीच कपाटातील तिची नवी कोरी साडी काढली आणि तिच्यासमोर टाकली.
नेस ही.... चल... पावणे धा ची गाडी हाय.... मामा बी तिथंच येणार हाय.
तिच्या पायातल्या पैंजणाची फासकी रुतत होती, पण तिला माहीत होतं, आई माया करायला लागली, की गाय होते, नाही तर कडकलक्ष्मीचा अवतार. झिंज्या पकडून बुकलून काढील. त्यामुळं तिनं साडी उचलली. पायात पैंजण फारच रुतत होतं.
"यंदा अकरावीला हाय', मुलगी काय करते, या मुलाच्या बापाने विचारलेल्या प्रश्‍नावर मामानेच उत्तर दिले.
मग शिकवा की तिला.. लवकर का लगीन करतायसा? मुलाच्या बापाने तिच्याकडे एकदा बघितलं आणि मामाला प्रश्‍न केला.
मामा काही बोलला नाही.
मुलगा तरतरीत होता. तो काही बोलला नाही. पण त्याला ही मुलगी पसंत पडलेली त्याच्या नजरेत दिसत होते.
आमचा मुलगा दहावी नापास हाय, काय? घरची पाच एकर शेती हाय, ती त्योच कसतोय. खायाला ल्यायला कमी न्हाई, पर थेरं इथं चालणार न्हायती. राबायला पाहिजे तवा खायला मिळंल.
तिची आई मुलाच्या बापाच्या प्रत्येक वाक्‍यावर डोके हलवत होती.
मग हातावर पाणी टाकू आजच....
व्हंय पर पोरीला आठरावं बी लागल्यालं न्हाई ! कायद्याचं काय? पोराकडच्या एकाने शंका विचारली.
तेची काळजी तुमी करू नका. शाळेचा मास्तर हाय माझ्या वळखीचा... वरीस दीड वरीस वाढवून दिल.
मग घालायचं का आज हातावर पाणी.. मुलाच्या बापानं आग्रह सोडला नाही.
तिची आई गडबडली.... तिनं मामाला खुणावलं... कोपऱ्यात नेलं....
ही माणसं जरा जास्तच घाई करत्यात .... मामानं तोंडावर बोट ठेवलं...
अगं पोराची आई जाऊन वरीस झाले... हाताची गाठ तोंडाशी पडत न्हाई....पोरीचं कल्याण व्हील...
पर समदं जमायचं कसं.. माझ्या अंगावरच्या ह्या चार टिकल्याशिवाय काई न्हाई....
तू नग काळजी करू, मी हाय.... पण पोरीला इचारायला पाहिजे....
तिनं हाक मारली... ती आली.... काय गं... पोरगा कसा हाय!
आये, शिकलेला न्हाई...
मग काय धोंडा न्हाई, पाच एकर शेती हाय....एकर इकला तरी लाखाची मालकीण व्हशील.
ती काही बोलली न्हाई.... पोरगं दिसायला चांगलंच होतं.. घरदारपण बरं दिसत होतं.. नकार द्यायला तिच्याजवळ दुसरं कारण नव्हतं..
चला तर मग हातावर पाणी टाकू.... मामानं सांगितलं.....
लग्नन झालं... लग्नाच्या फेऱ्यात पोरीच्या पायातील पैंजण लोकांच्या नजरेत आलं.. रुतलेल्या फासकीतून रक्‍त येत होतं.... पण कोणी बोललं नाही..
पोरीचं लग्न करून ती परतली.... पोरीचा चुलता भलताच बिघडला होता...पण बोलला नाही...
तिच्या शेजारीनं विषय काढलाच... का गं एवढी घाई केलीस... शिकली असती पोरगी....तिच्या शेजारच्या चार-पाच बायांनी तोच प्रश्‍न विचारला...
तिला काही सुचेना.... सकाळपासनं तिनं धरलेला बांध सुटला....
मला नगो व्हती व्हंय माजी पोर.... अजून न्हाणपण पण सरलं न्हाई तिचं.... पर काय करणार.... पाच दिस झालं तेला, ह्यो रेडा मला म्हणतोय कसा... पोरगी तुजी ताजीतवानी दिसतीया.... तवापसनं डोळ्याला डोळा लागला न्हाई माजा...
तिच्या आईचा हुंदका सुटला.... पोरीच्या चुलत्याची वाईट नजर व्हती....राक्षसानं मला खाल्ली आता हिला खायचा....
पोरीच्या पायात रुतलेल्या पैंजणापेक्षा तिच्या आईची कळ जरा जास्त मोठी होती.....

शुक्रवार, १५ जुलै, २०११

पाऊस

तो....
काळ्या ढगांचा हिला एवढा नाद का? नादच, नाही तर काय!
ढग जमू लागले की ही तिची उरत नाही. सगळी हातातील कामे बाजूला टाकून ती अंगणात येते, ढगांच्या काळ्या पंखाखाली स्वतःला हरवून बसते. कानठळ्या बसविणारा तो ढगांचा गडगडाट ऐकण्यासाठी जन्माची आतूर झाल्यासारखी वाटते. निसर्गातील प्रत्येक श्‍वासाला घाबरवून सोडणाऱ्या त्या आवाजाने हिला कोणती मोहिनी घातली आहे कोणास ठावूक. पण तिला तो आवाज आवडतो. त्या लखलखणाऱ्या विजांचा तिच्या नितळणाऱ्या सावळ्या चेहऱ्यावरून परावर्तीत होणारा तो प्रकाश जेव्हा माझ्या खिडकीत येतो त्यावेळी तो गोळा करून साठवून ठेवावा वाटतो. किती पावसाळे लोटले पण, पहिल्यांदा तिला पावसात भिजताना बघितले तेव्हाची "ती' आणि आजची "ती' तशीच आहे उत्कट. उत्कटता हाच तर तिच्यातील आणि पावसातील समानतेचा धागा. कधी कधी प्रश्‍न पडतो की, तिचा हा सावळा रंग तिने ढगांकडून घेतला की ढगांनी तिच्याकडून. दोघांकडेही स्वतः रिते होऊन दुसऱ्याला सर्वस्व देण्याचा गुण. पाऊस जणू तिच्यात पुरता भिनला आहे. कधी ती गडगडाटासह येणाऱ्या वादळी पावसासारखी वाटते तर कधी आषाढातल्या मुक्त होऊन कोसळणाऱ्या सरीसारखी, तर कधी श्रावणसरींसारखी हलकेच बरसत राहते. ती अशी बरसत राहते म्हणूनच तर आपल्या रखरखीत आयुष्यात हिरवाई आहे....

ती
"तो' असा का आहे हा प्रश्‍नच आहे. वळवाच्या ढगांसारखा अगदी अनाकलनीय. कधी कोसळेल? कधी नाही काहीच पत्ता लागू देत नाही. पावसाचं याला वावडं म्हणावं तर तासन्‌तास खिडकीत बसून "तो' पाऊस न्याहाळत असतो; पण त्याने कधी ओंजळ गजाबाहेर काढून हात ओले केल्याचं स्मरत नाही. पावसात चालायची वेळच जर आली, तर इतका अंग चोरुन चालतो की रेनकोटवरचा पाऊसही जणू त्याच्या अंगाला छेडतो की काय असे वाटते. भर पावसात हा इतका कोरडा कसा राहू शकतो? कधी कधी ढगांनाच जणू तो जमत असेल तर मला भिजवून दाखवा, असे आव्हान करतो आणि त्यावर हे आव्हान न पेलवल्याने ढग थयथयाट करतात की काय असे वाटून जाते. पण तो आहे तसाच आहे म्हणून तर मी आहे. तो त्या खिडकीत उभा असतो त्यामुळेच तर त्या ढगांच्या आवाजाची भीती नाही वाटत. एकटीला भयग्रस्त करणारे ते ढग, तो सोबतीला असला की
अगदी सुतासारखे सरळ वागायला लागतात. मग त्यांच्या त्या गर्जनेत ढोलांचा नाद ऐकायला मिळतो, विजांचा लखलखाट अंगभर घ्यावा वाटतो, पण त्यासाठी तो खिडकीत उभा असायला हवा. तो समोर असतो त्यामुळेच तर हे ढग आणि वीज आपल्या मर्यादा नाही सोडत...

शनिवार, ९ जुलै, २०११

कपाटातील समृध्द अडगळ

जगातील कोणत्याही ललित साहित्याचा मूळ गाभा वाचकांचे रंजन करणे हाच असतो, किंबहुना तोच असायला हवा. समाजप्रबोधन, नीतीमत्तांची शिकवणी साहित्यांनी घ्यायला हरकत नाही; पण त्यापूर्वी त्यांचा मूळ गाभा रसरशीत असायला हवा. जर एखादी कथा, कविता, नाटक, कादंबरी या गाभ्यापासून दूर गेली तर ती कलाकृती कागदांचे भेंडोळे किंवा चांगल्या वेष्टणातील रद्दी एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. अशा कलाकृतीकडून वाचकही काही अपेक्षा करत नाहीत आणि प्रकाशक आणि लेखक दोघांनाही त्यातून काही मिळत नाही. बऱ्याचदा जाहिरातबाजी आणि लेखकाचे नाव वापरून प्रकाशक दुय्यम, तिय्यम दर्जाचे पुस्तक वाचकांच्या माथ्यावर मारण्यात यशस्वी होतात. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ याबाबतीत प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक श्रीयुत भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्घ अडगळ कादंबरी प्रसिद्ध करून आणि प्रसिद्धीला आणून रामदास भटकळ यांनी मराठीजनांवर जो काही उपकार केला आहे त्याला तोड नाही. अत्रेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या दहा हजार वर्षांत असे पुस्तक छे.., कादंबरी छे.., प्रबंध छे.., झोपेची गोळी जे काही त्यांनी प्रसिद्ध केले आहे तसे प्रसिद्धीस आणण्याची कुणाच्या बापाच्यात धमक नाही.
अनेक साहित्यिकांची उतरत्या वयात प्रतिभा संपुष्टास गेलेली असते. प्रतिभेचे तळे आटले, की हे जुन्या काळात रमू लागतात; मग प्रतिभेच्या अत्युच्च स्थानी असताना यांच्या हातातून निसटलेली काही पाने त्यावेळी त्यांना दुय्यम दर्जाची वाटलेली, पण आता हातातून काहीच निसटत नसल्याने आधार वाटू लागतात. मग हे साहित्यिक असे कागदाचे कपटे गोळा करून एका पोत्यात बांधतात आणि त्याला काही तरी नाव देतात. अनेकवेळा हा प्रयोग यशस्वीही होतो. त्या कागदांच्या बोळ्यातून काहीतरी हाताला लागते. उरलेला कचरा जरी सोडला तरी काही तरी हाताला लागले म्हणून वाचकही खूश असतो. रा. रा. नेमाडेंनीही असाच सगळा कचरा एका पोत्यात भरला. त्याला गोंडस असे नावही दिले "हिंदू'. हे िंहंदू नाव का, तर त्या पोत्याबाबतीत काही तरी वाद निर्माण होईल आणि पोती हातोहात खपली जातील. "होराभूषण' नेमाडेंचा हा होरा पक्‍का खरा ठरला. पोती भराभर खपली खरे; पण लोकांनी त्याचे तोंड उघडले आणि हातात फक्‍त संदर्भहीन कागदांचे कपटे मिळायला लागले. त्यामुळे लोकांनी एकदा ते तोंड झाकले ते पुन्हा काही उघडले नाही. त्यामुळे 650 रुपयांची ही कादंबरी कपाटातील समृद्ध अडगळ ठरते.
साहित्यिकाची प्रत्येक कलाकृती एकटी असते. लेखकाने यापूर्वी काय लिहिले आणि ते कसे होते यावर त्याने नंतर लिहिलेल्या पुस्तकांना प्राथमिक ग्राहक मिळण्यासाठी फायदा होतो खरा; परंतु त्या प्रत्येक पुस्तकाची स्वतःची ओळख निर्माण झाली तरच साहित्यिक यशस्वी ठरतो, नाही तर लेखक अमुक"कार' तमुक"कार' बनतो. एखाद्या लेखकाच्या दृष्टीने असे "कार' बनणेही खूप मोठे भाग्याचे असल्याने तो त्यावर समाधानी असतो. पण जातिवंत लेखकाला त्याची स्वतःची ओळख एखाद्या पुस्तकावरून व्हावी, असे वाटत नसते. त्यामुळे तो प्रत्येकवेळी प्रतिभेची नवनवी शिखरे चढत राहतो. त्यामुळे त्याची मागची पुस्तके कितीही गाजली असली तरी तो नूतन नवा भेटतो. नेमाडेंच्या बाबतीत अगदी तसेच म्हणायला गेल्यास ते "कोसला'पुरतेच मर्यादित राहतात आणि उद्या त्यांची ओळख सांगायची झाल्यास "कोसला'कार म्हणूनच सांगावी लागेल. प्राध्यापकी पिंड असलेल्या नेमाडेंना हिंदू धर्माबद्दल लिहायचे होते, त्यांना जातीपातीबद्दल लिहायचे होते, त्यांना ब्राह्मणी संस्कृतीबद्दल लिहायचे होते, रुढी-परंपरा यावर लिहायचे होते, त्यांना प्रत्येक गोष्टीवर लिहायचे होते, पण त्यासाठीचा आराखडा सापडत नव्हता. मग ते पस्तीस वर्षे लिहित राहिले, जमेल तसे आणि जमेल तेवढे.. घरात कागदांची नुसती अडगळ निर्माण झाली. आता ही अडगळ कमी करण्यासाठी त्यांनी पोती शोधायला सुरवात केली. या कागदाच्या कपटांना एका धाग्यात गुंतविणे आवश्‍यक होते. सध्या प्रबंध आणि शोधनिबंधांना कोणी कुत्रं खात नाही. विचारवंतांची पुस्तके ग्रंथालयांच्या कपाटात धूळ खात पडली आहेत. अशात या कपटांना विकून चांगला पैसा मिळविण्याच्या दृष्टीने कादंबरीसारखा मार्ग हा सोयीस्कर होता. त्यामुळे त्यांनी कादंबरीचं पोतं निवडलं. ज्या पोत्यात ही सगळी कागदे घातल्यानंतर ते विकलंही गेलं पाहिजे. मग त्या पोत
्याच्या नावावरून वाद निर्माण झाला पाहिजे. मग काय करायचे तर पोत्याला "वादळी' नाव द्यायचे. समाजातील भावनांचे ध्रुवीकरण झाल्याच्या काळात त्यांना "हिंदू' नावाचं पोतं सापडलं. त्यात त्यांनी हा सगळा पसारा कोंबला आणि तो खंडेराव नावाच्या एका काल्पनिक पात्राला पकडून त्याच्यावर वाचकांच्या दारात नेऊन टाकण्याची जबाबदारी सोपविली.
मुळात नेमाडेंना काय म्हणायचे आहे, कशासाठी म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे काहीच या कादंबरीतून स्पष्ट होत नाही. त्यांना हिंदू धर्मातील रुढी-परंपरांवर टीकाही करायची आहे आणि त्याबद्दल भूमिकाही घ्यायची नाही. ब्राह्मणांना दुखवायचेही नाही आणि सोडायचेही नाही. केवळ मत्सर आणि आपल्याला खूप काही कळतं एवढं सांगण्यासाठी त्यांनी 603 पाने खर्ची घालण्याचे कारण नव्हते. त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं असतं, की मला खूप काही कळतं आणि मी यांचा यांचा मत्सर करतोय, तर नेमाडेंचे साहित्यिक पुण्य एवढेही लयाला गेलेले नाही. त्यामुळे मराठी माणसांनी मान डोलविली असती. पण महाकाव्य लिहिण्याच्या अट्टहासापोटी त्यांनी केलेला हा कारभार आहे. पुस्तकातील त्रुटींबद्दल लिहायचे तर प्रत्येक पानावर त्रुटीच आहे. "नेमाडपंथी' भाषा म्हणून लोकांच्या डोक्‍यावर काहीही थापायचे हे योग्य नाही. रंजकता तर नाहीच, पण निवेदनाच्या पातळीवरही सगळा सावळा गोंधळ आहे. शेजारी झेंडू बामची डबी ठेवून वाचायला बसले तरी वाचता येत नाही. कादंबरी कुठल्याच पातळीवर चांगली नाही. ज्यांच्या सहनशक्‍तीची परीक्षा घ्यायची आहे अशा लोकांसाठी ही कादंबरी खूप चांगली आहे. त्यांनी ती वाचावी आणि सहनशक्‍ती दाखवावी हे माझे आव्हान आहे.

सोमवार, ६ जून, २०११

मोगऱ्याची वेणी

केवढयाला रे, हे केवड्याचे पान.. सोळा, सतरा वर्षांच्या त्या मुलीने त्याच्याकडे बघत, थोडं मुरकंतच विचारलं.
बारा रुपये! त्याने थंडपणे उत्तर दिलं. त्याला माहित होतं की बारा रुपये म्हणून सांगितलं की पुढची बाई दहा रुपयाला मागते. थोडा मोलभाव केला की दहा रुपयाला ते पान विकलं जायचं. पण तीनं ना पर्समध्ये हात घातला, ना मोलभाव केला, जशी आली तशी ती निघून मंदिरात शिरली.
त्याला क्षणभर वाटलं पुढे जावं... दहा रुपयाला देईन असं सांगाव पण त्याचा धीर झाला नाही. कदाचीत ती जर त्याच्या वयाचीच नसती तर तो पुढे नक्‍की गेला असता. पण ती त्याच्याच वयाची असल्याने तो संकोचला. जाऊ देत, म्हणून तो मागे सरला...
काय रे! काल तू केवड्याची पाने विकत होतास ना? मग आज तू या मोगऱ्याच्या वेण्या का आणल्या आहेस... कालची तीच ती होती. काल घातलेल्या निळ्या ड्रेसपेक्षा आज हिने घातलेला लाल रंगाचा ड्रेस खूप छान शोभतो. त्याच्या मनात एक विचार येऊन गेला..
केवड्याची पाने मिळाली नाहीत. विकायला काहीतरी पाहिजे ना? म्हणून मग मोगऱ्याच्या वेण्या आणल्या आहेत. घ्या ना वेण्या! दहा रुपयाला दोन दिल्या... त्यानं विनंती केली.
तिनं वेण्या उचलल्या... त्या मोगऱ्याचा गंध श्‍वास भरुन घेतला. केवड्याचा सुगंध, मोगऱ्याला नाही रे! मला केवडा हवा होता. ती एवढीच बोलली आणि निघून गेली.
तिसऱ्या दिवशी तो माळ्याशी भांडला, पण केवडा मिळाला नाही. आज कधी नव्हे तो त्याला केवडा हवा होता. नाही तर वेण्या संपल्या की याला केवडा मिळायचा...
आज ती परत आली आणि परत तिने केवडाच मागितला तर.. आज तिनं येऊच नये... उद्या तिच्यासाठी केवडा आणीन अगदी कुठूनही आणीन, पण आज तिनं येऊ नये...असं त्याला वाटत होतं... पण कालच्यावेळीच ती आली.
ती सरळ त्याच्यासमोरच आली... तीनं पुन्हा त्याच्याकडे बघितल... त्याच्या परडीतील मोगऱ्याच्या वेण्या इकडे तिकडे केल्या.
""केवडा नाही ना आणलास तू''
नाही... नाराजीनंच त्याने मान हलविली.
हातातील वेण्या तिथेच ठेवून ती निघायला लागली, तसा तो पुढे झाला.
"" या वेण्या घ्या... बघा किती ताजा मोगरा आहे...पैसे नका देऊ....''
त्याने हातात एक वेणी उचलली. त्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांच्या पार्श्‍वभूमिवरचा तिचा सावळा चेहरा आणखी तजेलदार दिसत होता. क्षणभर तीही भांबावली, पण लगेच सावरली...
""नको! मला केवडाच हवा.''
तिच्या उत्तराने तो हिरमुसा झाला. मागे सरला.... पुढच्या दोन दिवसांत त्याला केवडा मिळाला नाही, मिळालेले गजरेही त्याने घेतले नाहीत... तो रस्त्यावर आलाच नाही.... नंतर तो कितीतरी दिवस त्याच रस्त्यावर यायचा. केवडा घेऊन .. पण ती यायची नाही... तो गजरे विकायचा... पण त्याच्या परडीत एक केवड्याचे पान मात्र तसेच सूकुन जायचे... कोणी त्याला विचारलेच तर केवडा विकायला नाही एवढेच म्हणायचा... कधीतरी ती येईल म्हणून तो परडीत नेहमी केवड्याचे एक पान ठेवायचा.... पण ती आली नाही. त्याची नजर तिच्या रस्त्याकडे असायची....दिवसा मागून दिवस सरले....त्याचं कॉलेज संपलं.... तसं त्याचा गजरे विकण्याचा पार्ट टाईम जॉबही सुटला......हातात गाडी आली... कधी तो त्या रस्त्यावर थांबायचा... गाडीच्या काचा खाली करुन तेथील गजरे विकणाऱ्या पोरांकडे बघायचा.... तेथील पोऱ्याकडून केवडा घ्यायचा... त्या केवड्याचा वास त्याच्या केबीनमध्ये दरवळत राहायचा....
आजही तो असाच आपल्या नादात चालला होता... त्याची गाडी मंदिरासमोर थांबली.... एक पोरगं परडी सांभाळत त्याच्यासमोर आलं...
"" केवडा आहे का रे!''
""नाय साहेब! '' त्यानं उत्तर दिलं.... आज माळ्याने केवडा दिला नाही...
तो हसला... पोराला नाराज करायला नको म्हणून त्याने एक छानशी मोगऱ्याची वेणी घेतली आणि तो मंदिराच्या पायऱ्या चढला.... त्यानं देवीला नमस्कार केला आणि तो परतला... चप्पल घालायला तो सहज वाकला, तर एक केवड्याचे पान त्याच्या चपलासमोर पडलं होतं. त्यानं ते उचललं... समोर ती तीच होती... काळ लोटला असला तरी त्यानं तिला कधीच ओळखले होते... बहुतेक तिनेही ते ओळखले असावं... ती हलकेच पुढे आली... तिने त्याच्या हातातील ते केवड्याचे पान हलकेच घेतले... त्याच्यासमोरच ते केसांत माळले.... त्याने मघाशी घेतलेली वेणी तिच्या समोर केली.... आज तिने ती वेणीही घेतली....

सोमवार, २३ मे, २०११

आई भूक

"अण्णा, आपण आता कुटं! मामाच्या गावाला! बापाच्या खांद्यावर बसलेल्या त्या साडेचार, पाच वर्षांच्या पोरानं बापाचा मुंडासा घट्‌ट पकडत प्रश्‍न विचारला. झपाझप पावलं टाकत चाललेल्या त्या बापानं पोराच्या त्या प्रश्‍नाकडे लक्षच दिले नाही. सोबतिला त्याची बायको दिड पावनेदोन वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन त्याच्या चालण्याच्या गतीत गती मिळवत होती. तिन्हीसांजेची वेळ जवळ येत होती. शेतात राबणारी माणसं घराला जवळ करीत होती.
"अण्णा, या पावटी मला जत्रेतनं, ट्यॅक्‍टर घेणार न्हवं! रंग्याला तेच्या मामानं लय चांगला ट्यॅक्‍टर घेतलाया, ही चाबी दिली की धुssम! ते पोरगं अखंड बडबडत होतं. त्याचा बाप मात्र त्याच्या कुठल्याच प्रश्‍नाचं उत्तर देत नव्हता. चालण्याची गती तेवढी वाढत होती. बापाच्या खांद्यावर बसून ते पोर टकामका नजरेनं सगळा परिसर डोळ्यात साठवून घेत होतं. लांबच लांब जाणाऱ्या पायवाटा, अंब्यांनी लगडलेली झाडे, घरट्याकडे परतणारे पक्षी.. त्याची नजर स्थीर राहात नव्हती. या रानात तो कितीतरी वेळा आला होता, अनेकवेळा घराकडे परीतीच्या वाटेवर त्याला हेच चित्र दिसायचं. पण आज काही तरी वेगळं होतं. आज त्यानं आईचं बोट धरलं नव्हतं, तर बापाच्या खांद्यावर तो बसला होता, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट नविन वाटत होती. सहज त्याची नजर बगळ्यांच्या थव्याकडे गेली... नकळत त्याची मूठ झाकली गेली. मूठ झाकली की आकाशातून जाणारे बगळे आपल्या नखांवर येऊन बसतात, असं कोणतरी त्याला सांगितलं होतं. त्यानं मूठ वळली आणि ती बगळ्यांच्या दिशेने केली. बगळ्यांचा थवा आला आणि एका झाडावर जाऊन विसावला. त्यानं मूठ सोडली, मिटलेले डोळे उघडले. त्याच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांवरच्या नखांवर बगळ्यांनी दाटीवाटीने ठाण मांडले होते. त्याला प्रचंड आनंद झाला."अण्णा! समदं बगळं हातावर आल्याती! त्याचा बाप काही बोलला नाही. झपाझप पावलं टाकत तो पुढेच चालला होता. रानातील वर्दळ बरीच कमी झाली होती. अंधार पसरायला लागला होता. खरेतर त्याला अंधाराची खूप भीती वाटायची, पण आज बापाच्या खांद्यावर बसून जाताना ती भीती पार दूर लोटली होती. बाप जवळ असला की खरेच त्याला कशाचीच भीती वाटायची नाही. आईही बापासमोर त्याला काही बोलायची नाही. अंधार गडद होत गेला, तशी त्याची आईही दिसायची बंद झाली.
त्यानं मोठ्यानं हाक मारली. आई... . आईनं नुसतं हूूं केलं. छोटी घरातून निघातानच झोपली होती.मघाशी घरातून बाहेर पडताना दुधासाठी ती रडत होती. पण दूध घरात कुठे होतं, रडली रडली आणि झोपून गेली. अण्णा घरात आल्यावर आई खूप रडली. बराचवेळ त्याला काही कळेना. मग आई आणि अण्णा दोघे रडायला लागले, आणि आईनं छोटीला काखेत घेतलं. आणि अण्णांनी त्याला बखोटीला धरुनच खांद्यावर घेतलं.
अण्णा कुटं ! त्यानं विचारलं. गावाला त्याच्या बापानं त्याचं कुतूहल शमविण्याचा प्रयत्न केला. पण गावाला जाताना आई नेहमी तोंड धुते... त्याला त्याचा नवीन ड्रेस घालू देते पण आज यातील काहीच झाले नाही याचे त्याला आश्‍चर्य वाटले, पण तरीही गावाला जायचे या कल्पनेने तो आनंदून गेला.
अण्णा कवा यायचं गाव... त्यानं काकुळतीला येऊन प्रश्‍न केला. खरे तर त्याला भूक लागली होती, पण आईकडं काही मागायचं तर आई दिसत नव्हती. त्याचा बाप नेहमीसारखा शांत राहिला. आता अंधार मिट्‌ट झाला होता. मिणमिणत्या चांदण्यात काहीच दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज गहिरा झाला होता. एवढ्यात त्याला काही तरी विहिरीत पडल्याचा आवाज आला.... जोरात.... त्याला काही कळलं नाही. त्याची भूक त्याला जास्त जाणवायला लागली. त्यानं मोठ्याने आईला हाक मारली... आई भूक.... ते शब्द त्या विहिरीत घुमू लागले. त्याच्या अण्णांनी त्याच्यासकट विहिरीत उडी टाकली होती. "आई भूक' एवढेच शब्द जीवंत होते... बाकी चारही जणांचे श्‍वास शांबले होते.

रविवार, २४ एप्रिल, २०११

कडी जोडणारा संपादक



कडी जोडणारा संपादक

वर्तमानपत्रे आपला चेहरा गमावून बसली आहेत, अशी ओरड आता अभिजनांमध्ये सारखी होताना दिसते. संपादकांचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नाही अशा आशयाच्या चर्चाही घडत आहे. वाचकांची रुची आणि वर्तमानपत्रांना आलेले भांडवली स्वरुप या कारणांनी अभिजनांच्या या चर्चामध्ये तथ्य नाहीच असे नाही, पण तरीही काही संपादक आपला चेहरा अंकातून दाखवत आले आहेत. पण केवळ संपादकांचा चेहरा वर्तमापत्रात दिसून चालत नाही तर संपादकांमध्ये समाजाला एकवटण्याची आणि त्या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याची ताकद असली पाहिजे. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक संपादकांनी समाज एकवटण्याचे काम केले, स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रश्‍नांच्याबाबतीत संपादकांनी समाजाजागृती करुन त्याला दिशा देण्याचे काम केले नाहीच असे नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांचा ताजा इतिहास बघता संपादक मंडळींना हे काम जमल्याचे दिसत नाही. पण कोल्हापूरच्या 24 एप्रिलच्या पंचगंगा वाचवुया मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता ही तुटलेली साखळी जोडण्याचे काम "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीराम पवार करत आहेत हे दिसते. संपादकाला लागणारी वैचारीक बैठक त्यांची घट्‌ट तर आहेच पण त्याशिवाय समाजाला एकवटण्याची आणि त्याला दिशा देण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.
कोल्हापुरातील "झाडे लावा' ही मोहिम असो वा पंचगंगा स्वच्छता मोहिम या दोन्ही मोहिमांचे रुपांतर लोकचळवळीत करण्याची हातोटी आणि त्यापाठिमागचे तात्वीक अधिष्ठान पवारसर यांच्याकडे आहे. एकीकडे वर्तमानपत्रे रोजच्या घडामोडी देत असताना त्याच घडामोडींवर लिहिणारे अनेक संपादक आहेत ( ते चूकही नाही), तर दुसरीकडे आपल्याच विचारांना कवटाळून समाजातील सगळे प्रश्‍न त्याच चष्म्यातून बघत लिहिणारे संपादक आहेत. वेगळे विषय मांडणे आणि ते लावून धरणे हेही समजण्यासारखे आहे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी करता येईल का हे बघणे आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही गोष्ट आव्हानात्मकच नव्हे तर अवघडही आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न काय हे हेरुण तो प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनाच पुढे आणण्याची ताकद तुमच्या लेखणीत पाहिजे. पवारसर यांच्याकडे ही लेखणीची ताकद तर आहेच पण तो प्रश्‍न काय हे हेरण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच "सकाळ'च्या या दोन्ही मोहिमा लोकचळवळ बनल्या.

बुधवार, १३ एप्रिल, २०११

अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...

आंदोलनाचा विषय कोणी चांगला घेतला म्हणून तो माणूस महानायक ठरतो का? एखादा विषय मार्गी लावल्यानंतर त्या माणसाला सगळ्याच विषयांतील सगळेच कळते, असे मानायचे का? त्याच्या प्रत्येक कृतीमागे कोणताही छुपा उद्देश नाहीच, हे का मानून चालायचे? समाजहित बघताना त्या महानायकाने केलेल्या चुका आणि त्याच्याकडून होत असलेल्या चुका यांना क्षमा करतच राहायचे का? एखाद्या विचाराने प्रभावित होणे वेगळे आणि तो विचार अंगीकारताना त्यामागची विचारांची बैठक मजबूत असणे वेगळे. याबाबत त्या महानायकाचे विचार ठिसूळ असतील तर तो त्या विचारांचा कसा मानायचा?..... असे अनेक प्रश्‍न आहेत... त्याची उत्तरे सापडत नाहीत. केवळ भोळेपणाने आणि समाजातील मोठा घटक अण्णा हजारे यांच्या मागे जातो म्हणून अण्णांना महानायक म्हणायला मन धजत नाही. अण्णांच्या प्रामाणिकपणावर आक्षेप घ्यायचे कारण नाही. त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबाच द्यायला हवा, तरीही आंदोलनकर्त्या माणसाला महानायक मानण्याची गरज आहे का? अण्णा खरेच महानायक आहेत का? प्रश्‍नांची माळ तुटता तुटत नाही. या प्रश्‍नांची ठोस उत्तरे अण्णांना पाठिंबा देणाऱ्यांकडेही नाहीत.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेला कोणीतरी ठोसा लावला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. रोजच्या "संसारिक' जबाबदाऱ्या पेलताना भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांना दिसत होता; पण त्यावर उपाय मिळत नव्हता. ए. राजा, सुरेश कलमाडी यांच्या प्रकरणानंतर तर लोकांचा राजकारण्यांवरील विश्‍वासच उडू लागला होता. त्यातच अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केले आणि लोकांचा अण्णांना पाठिंबा मिळायला लागला. इथपर्यंत सगळं ठीक चालले होते; पण इथून पुढे मात्र अनेक घटकांनी हे आंदोलन प्रभावित होत गेले. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. अण्णांच्या आंदोलनाला इंग्रजी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. यामागे केवळ या देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले पाहिजे, हा हेतू नक्‍कीच नव्हता. गेल्या सहा महिन्यांतील काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चा बघितल्या तर हे लक्षात येईल, की यांना हे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. ए. राजा प्रकरण असेल, सुरेश कलमाडी प्रकरण असेल किंवा विकिलिक्‍स प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांतून सरकारला अडचणीतच आणायचे होते, हे सहज लक्षात येते. (केंद्रातील युपीए सरकारही काही फार दिवे लावत नसल्याने या माध्यमांची भूमिका अयोग्य म्हणता येणार नाही; पण त्या पाठीमागे केवळ लोकहित हाच उद्देश नाही हे त्यांच्या आक्रस्तळेपणावरून लक्षात येते.) इथे मात्र एक मूलभूत फरक आहे. कलमाडी, राजा किंवा विकिलिक्‍स प्रकरणी विरोधी पक्षाने मोठा गदारोळ केला; पण लोकांचा पाठिंबा मात्र त्यांना मिळाला नाही. आता विरोधी पक्षांनी उठविलेल्या प्रश्‍नांना लोकांतून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या माध्यमांचीही गोची होत होती. सरकारची विश्‍वासार्हता कमी झालीच आहे; पण विरोधकांकडेही ती नाही, असाच संदेश जणू जनता देत होती. या दोन्हीपेक्षा तिसऱ्याच कोणीतरी हा प
्रश्‍न हाताळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती आणि अण्णांच्या रूपाने ती पूर्ण झाली. आता या प्रश्‍नाचे भांडवल करून सरकारला नमवावे, यासाठी ही माध्यमे पुढे झाली. त्यांनी अण्णांना हिरो करायचे ठरविले. चोवीस तास अण्णांच्या बातम्या दाखवून लोकांमधील असंतोष जागृत केला. लोकांना तिसरी व्यक्‍ती मिळाली आणि माध्यमांना नवा मुद्दा. विकिलिक्‍स आणि ए. राजा प्रकरणात सरकार कोसळले तर नाही; पण तरीही काही चिरा पडल्या होत्या. आता अण्णांना हिरो करून ती तोफ डागायची, याच उद्देशाने माध्यमे कामाला लागली. अण्णांच्या अनिश्‍चित (बेमुदत नव्हे) उपोषणाचे दिवस जसे पुढे पुढे जाऊ लागले तस तसे माध्यमांची धार तीव्र होत गेली. लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि एका वळणावर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. आता खरा प्रश्‍न परत निर्माण झाला आहे. आता अण्णा महानायक झाले. ते गांधीवादी विचारांचे आहेत, ते अंगावरच्या कपड्यांनीशी लढताहेत वगैरे वगैरे चर्चा झडू लागल्या. प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आणि तो प्रश्‍न सोडविणाऱ्यांना प्रतीक करून त्यांचा यथोचीत मान राखणे, हेही महत्त्वाचे असतेच. अण्णांच्या आंदोलनाबद्दल कोणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही; पण याचा अर्थ अण्णांना महानायकपदावर बसविणे हे अण्णांसाठी आणि समाजासाठीही घातक ठरेल.
विचारांची पताका हातात घेणे आणि ती घेऊन पुढे जाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींना हे दोन्ही जमले. स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण यांनाही ते काही प्रमाणात जमले (जयप्रकाश नारायण यांना गुरू मानणारे किमान डझनभर नेते दिल्लीत सरकारला हलविताना दिसतील); पण हे अण्णांना जमेल का? हा प्रश्‍न आहे. अण्णांकडे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी शक्‍ती नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या विचारांचा गोंधळच प्रचंड आहेत. बौद्धीक क्षमतेविषयी कोणी जर आक्षेप घेत असेल, तर त्यामागील असूया आणि निगरगट्टपणा सोडून त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. हा प्रश्‍न उपस्थित करण्याचे कारण, अशा माणसांना देव्हाऱ्यात ठेवून आपला कार्यभार करणारे निर्माण होतात (इथे तर ते झाले आहेतच) आणि आंदोलनाची दिशा दाखविणे, बघून घेणे, अडचणीतच आणणे या पातळीवर येते. त्याचबरोबर देव्हाऱ्यातील या महानायकालाही आपण खूप मोठे आहोत असा भास होतो आणि तो वेगवेगळ्या मागण्या करू लागतो. या मागण्या बहुंताशवेळा व्यवहारवादाच्या पलीकडच्या असतात आणि मग समाजासाठी रणांगणात उतरलेला महानायक समाजाचेच नुकसान करायला लागतो. त्यांचे शिष्य त्यांच्या विचारांना विरोध म्हणजेच समाजावादाला, पुरोगामित्वाला विरोध, देशाला विरोध अशा आवया उठवायला लागतात. त्यामुळेच अण्णांना महानायक करणे समाजाने पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे.
अण्णांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात कुठे गांधीवाद दिसत नाही. गांधीजी ज्या प्रकारे आंदोलन करायचे त्यालाच गांधीवाद समजायचा का? गांधीवाद हा विचारांचा आणि आचारांचा एक मार्ग आहे. एका बाजूला अण्णा फाशी द्या, गोळ्या घाला अशा पद्धतीचे आवाहन करताहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधीवादी म्हणवून घेताहेत. अरे गांधींना तलवारच मान्य नव्हती आणि हे तर तलवारीच्या म्यानेत गांधीवाद कोंबताहेत. प्रश्‍न केवळ तलवार किंवा फाशीची गोष्ट करण्याबाबत नाही, तर प्रश्‍न आहे त्या विचारांची अधिष्ठान असण्याचे. एक क्षणभर आपण मानू की काय फरक पडतो, की ते गांधीवादी आहेत की नाही याचा. भ्रष्टाचारविरोधी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपला प्राणही पणाला लावला होताच की. त्यांच्या प्राण पणाला लावण्याबद्दल आक्षेप नाही किंवा त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेबद्दलही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो त्यांच्याभोवती जमत असलेल्या जळमटांबद्दल. ही जळमटे वाढली, की त्यात समाजाचाच श्‍वास कोंडला जाण्याची शक्‍यता आहे. नेत्याकडे अशी जळमटे बनू न देण्याची ताकद असायला हवी. दुर्दैवाने ती अण्णांकडे नाही. त्यामुळे ते दीर्घकालीन मोठे आंदोलन उभे करू शकत नाहीत. अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...