खूप दिवसांनी पत्र लिहितोय. कशी आहेस? आठवण येत नव्हती, असे नाही आणि पत्र लिहायला घेतले नाही, असेही नाही, पण लिहिता मात्र आलं नाही हे खरं. तुम्ही शब्दांना कितीही चांगले मित्र माना पण, ते ऐनवेळी तुम्हाला मदत करतीलच असे नाही. खाऊसाठी भर बाजारात हट्टाला पेटून मटकन बसणाऱ्या पोरट्यांसारखे कधी ते भोकाड पसरून वाटेतच बसतील याचा नेम नाही; मग कितीही मिनत्या करा, ते ऐकायचे नाहीत, मग त्यांना झटका द्यावाच लागतो. त्या पोराला जशी चापट द्यावी लागते, अगदी तशीच चापट शब्दांना वेळेची द्यावी लागते, मग शब्द वठणीवर येतात. सांगितलेल्या वाक्यांच्या मार्गावरुन मग सरळ चालतात. आता हेच बघ ना! मागचे पत्र लिहून आता जवळपास वीस-पंचवीस दिवस होऊन गेले. या दिवसांत कितीतरी वेळा पेनाचे टोक कागदावर टेकवले; पण शब्द काही उमटले नाहीत. सांगायचे उरले नाही, असेही नाही, पण ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी शब्दांची वस्त्रे घालायलाच तयार नव्हत्या. मग कितीतरी वेळा कागदावर रेघोट्या ओढून रात्र काढली. आता आजही सांगायचे खूप आहे. खूप लिहायचे आहे, पण तरीही हट्टी शब्द अडून बसलेतच की, आता एवढे गोंजारल्यावर ते नक्कीच शांत होतील असं वाटतं...
"तुला बोलायचं असतं एक आणि तू बोलतोस तिसरंच' हा तुझा आरोप मान्यच आहे. आजही बघ मला लिहायचे आहे एक आणि लिहितोय दुसरंच.
तुझी खूप आठवण येत आहे. खूप वाटतं... अगदी आता तुला समोर बसवावं आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून रात्रभर त्यात डुंबत राहावं.. हलकेच तुझ्या केसांतून हात फिरवावा...कोणीच बोलू नये... ना तू, ना मी....निःशब्दांतून शब्द उमटत राहावे आणि ते फक्त तुला आणि मलाच कळावे..... तुला आठवतं मी तुला काळी म्हटलेलं... आम्ही काही काळे नाही, गहू वर्णीय असं तुझं म्हणणं. ठिकच होतं, पण तरीही तुला चिडवायला मी काळीच म्हटलं होतं.. खरं तर काळी का म्हटलं होतं माहिती आहे तुला... काळा रंग सगळं पोटात घेतो.. क्षमा करण्याचा गुण काळ्या रंगात जितका आहे तितका कुणाच्यातच नाही. आणि जो या रंगाशी सलगी करतो तो या रंगासारखाच होऊन जातो.. म्हणून तू काळीच. आपल्या रंगात रमणारी.. आपल्या रंगाशी एकरुप असलेली...तुझा काळा रंग गडदतेतून आलेला... सगळे गडद रंग एकत्र करुन ते तुझ्यात भरले आहेत आणि ते इतके एकजीव आहेत की त्यामुळे तू काळी भासते आहेस... हा काळा रंग डोळ्यांत साठवून घ्यायचा आहे... अगदी काजळ घातल्यासारखा... मग दुसऱ्या दिवशी ऑफीसात कितीही लोकं कुजबुजू देत की अरे हा काजळ घालून आला की काय? एक दिवस वेडा होण्यातही मजा असते नाही का? नाही तरी तू मला वेडा म्हणतेसच की, कधी कधी...
तुझाच
1 टिप्पणी:
mast....khup chan.....
टिप्पणी पोस्ट करा