शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

रेल्वे स्टेशन

दादा,
एवढाच शब्द त्या पोरीनं उच्चारला आणि त्याच्यासमोर तिने हात पुढे केला. पहाटे साडेतीन-चारची वेळ.
रेल्वे स्टेशनवर त्याच्याबरोबर उतरलेले, घराकडे लगबगीने चाललेले प्रवासी, चहावाल्या पोरांच्या आरोळ्या.. पेपर स्टॉलवर मोठ्याने लावलेला रेडिओ.. रिक्षावाल्यांची येणाऱ्या प्रवाशांकडे कुठे जाणार म्हणून विचारपूस. या गर्दीत भिकारी नव्हतेच. नव्हते म्हणजे ते भीक मागत नव्हते. झोपलेली, पेंगाळलेली भिकाऱ्यांची पोरे आणि बाया अस्थाव्यस्थ पडल्या होत्या. अशा या पहाटेच्या वेळी हात पुढे केलेली ती बारा-तेरा वर्षांची पोरगी अस्वस्थ करत होती. अंगात कुठल्याशा शाळेचा युनीफॉर्म होता. पण तो इतका मळला होता, की तो नेमक्‍या कोणत्या शाळेचा हेच कळत नव्हतं. हातात कंडे, केस विस्कटलेले आणि मातीने माखलेले. गाल खोल गेलेले, अगदी बरेच दिवस काही खाल्लं नसल्यासारखे. बरेच दिवस झोप नसल्यासारखे डोळे तारवटलेले आणि पोटातील भूकेमुळे लाचार झालेले. तिची ती नजर आणखी अस्वस्थ करत होती.
चल हट यहॉं से!
बहुतेक त्याची अस्वस्थ नजर बघून चहावाल्याने तिला हटकलं. पण ती हलली नाही. आपली लाचार दृष्टी आणखी लाचार करत ती त्याच्याभोवती घुटमळत राहिली. त्याने खिशात हात घातला, काही नाणी हाताला लागतात का बघायला, पण हात रिकामा वर आला.
तू चहा पिणार?
त्याच्या या प्रश्‍नावर ती काही बोलली नाही. पण हललीही नाही. हिला एक चहा दे.. चहावाल्याने आपल्या ठेवणीतील एक कप काढला आणि तिच्यापुढे चहा ओतला. ब्रेड खाणार...तिने नकार दिला नाही. चहावाल्याने न सांगताच ब्रेड काढला आणि तिच्या हातात दिला. तिने तो अगदी आधाशासारखा खाल्ला. पुन्हा तिने हात पुढे केला नाही. अजून उजाडायला दोन तास अडिच तास अवकाश होता, तोपर्यंत त्याला स्टेशनवरच थांबावे लागणार होते. तिथल्याच एका बाकड्यावर त्याने बॅग ठेवली आणि प्रवासाने थकलेल्या अंगाला त्या बाकड्यावर अक्षरशः सैल सोडलं. डोळ्यातील झोप चहाने कमी झाली नव्हती, त्याने जोराची जांभई दिली. एवढ्यात ती पोरगी त्याच्याजवळ येऊन बसली. ती जवळ बसल्यावर त्याला काही सुचेना. बॅगेत फारसे सामान नव्हतेच पण आहे, ती बॅगही चोरीला गेली तर या अनोळखी शहरात फार पंचायत व्हायची म्हणून त्याने ती मांडीवर ठेवली. पोरीच्या ते लक्षात आलं असावं, त्यामुळे तिने नजर फिरवली. तो काही बोलला नाही. बसून राहिला. तीही काही बोलली नाही. बराच वेळ गेल्यानंतर तीची चूळबूळ सुरु झाली.
सुटे पैसे नाहीत माझ्याकडे, तिच्यापासून सुटका करण्यासाठी तो बोलला.
""नको दादा, पैसे नको मला.''
मग काय? जा इथून निघून. मला थोडं झोपायचं आहे.
ती काही बोलली नाही, पण तिथून निघूनही गेली नाही. बाकड्याच्या कोपऱ्यावर बसून ती बाकड्याचा हात टोकरत राहिली.
आई-बाबा कोणी आहे का नाही? तिची अस्वस्थता सहन न होऊन तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
त्याच्या या प्रश्‍नासरशी ती गडबडीने मागे सरकली. त्याच्याकडे बघत म्हणाली.
आहेत की.
मग तू इथे काय करते आहेस.
घरातून पळून आले आहे?..
काय म्हणतेस काय? त्या प्रश्‍नाने तो उडाला. आता त्याला ती भिकारी वाटेनाशी झाली. आपल्यासारखीच कोणीतरी चांगल्या घरातील मुलगी ही भावना त्याला सुखावून गेली.
का आलीस पळून... मघापेक्षा त्याच्या बोलण्यात आलेला तो ओलावा. तिला जाणवला पण लगेच ती सावरली. मघाशी मागे सरलेली ती पुन्हा पुढे सरकरली, तिने बाकड्याचा कडा आणखी घट्‌ट पकडला.
त्याला ते जाणवलं. तो मागे सरला. काहीच बोलला नाही. बराचवेळ शांतता पसरली.
काय झालं.. आई रागावली म्हणून घर सोडलंस?
नाही..
मग?
ती काही बोलली नाही. कदाचित तिला कारण सांगायचे नसेल, समजून तो गप्प बसला. कुठे राहातात आई-बाबा..
बोरीवलीला.
फोन नंबर आहे. आपण फोन करुया.
त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्याकडे आशेने बघायला लागला.
पण, बाबा मारतील मला.
नाही मारायचे..
काय करतात तुझे बाबा..
मॅथचे प्रोफेसर आहेत.
मग, गणितात नापास झालीस म्हणून घर सोडलंस काय?
नाही. गणितात मला नेहमीच सेंट परसेंट असतात.
मग?
पुन्हा ती गप्प बसली.
बर राहू दे, नंबर सांग...
तिने नंबर दिला. नावही सांगितलं. तिचे बाबाच होते फोनवर. खूपवेळ रडले. मग बोलले. गयावया करु लागले, पोरीची काळजी घ्या म्हणून... खूपवेळ दोघे तसेच बसून राहिले. आता उजाडले होते, गर्दीचा आवाज वाढला होता.
बराच काळ गेल्यानंतर त्याने पुन्हा चहा घेतला. दोन-चार तास तसेच निघून गेले. त्याचा मोबाईल वाजला. साहेब त्याची वाट बघत बसला होता. त्याने थातूर-मातूर उत्तरे दिली. थोड्यावेळान पुन्हा फोन वाजला. तिच्या वडिलांचा फोन होता. ते समोरच उभे होते. त्यांची पोरगी मात्र त्याच्यामागे लपली होती. तो काही बोलला नाही. ते पुढे आले त्यांनी तिला एका हाताने जवळ घेतलं. त्याच्याही डोळ्यातून अश्रु आले. ती अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. बाप-लेकीचं भेटणं झाल्यावर ते त्याच्याजवळ आले, त्यांनी त्याचा हात हातात घेतला. डोळ्याच्या कडा ओलावल्याच होत्या.
""आम्हला आनाथ होण्यासापासून वाचवलंत.'' त्यांचे हे वाक्‍य त्याच्या जिव्हारी लागलं. फोनवर मघाशी त्यांनी सांगितलं होतं, ती अनाथ होती, हे समजल्याने तिनं घर सोडलं होतं.
तो मागे न बघता निघून गेला. मागे त्यानेच त्याच्या आई-वडिलांना असंच आनाथ केलं होतं.

१५ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

बाप रे.. फार भयानक... तुझी सगळ्यात बेस्ट कथा आहे ही !!!!!!!!!

Saket म्हणाले...

खरच खूप सुंदर लिखाण आहे !!
मी जेवढे काही वाचले ती प्रत्येक गोष्ट / लेख हृद्यस्पर्शी होता.
ह्या सुंदर लिखासाठी मनपूर्वक अभिनंदन.

prachipurva म्हणाले...

atishay sundar katha.......
aani hruday helavun takanar te shevatach vakya...
hrudayala bhidnar..!!!!

SUSHMEY म्हणाले...

@ herambh thanks..

SUSHMEY म्हणाले...

@ saket … tumchyasarkhyanmulech tar lihayala hurup yeto

SUSHMEY म्हणाले...

@prachipurva - blogvar swagat..

prajkta म्हणाले...

खूप मस्त ! हलवून सोडणारी. ती पोरगी आणि तिचा बाबाही अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहिले. "अनाथ'पणाचा धक्का काय असतो हे सांगणारी कथा! आवडली

epundit म्हणाले...

सुषमेय
उत्तम कथा...सर्व प्रसंग अगदी डोळ्यासमोर आल्यासारखे वाटले...सुखद शेवट नेहेमीच चांगला वाटतो..अजून लिहित राहावे...

Priya Kulkarni म्हणाले...

मस्तच !
"अनाथ'पणाचा धक्का काय असतो हे सांगणारी कथा!" +1
खूप आवडली. Superb aahe....

---Priya.

SUSHMEY म्हणाले...

@ prajkta … tumchyasarkhyanmulech lihita yete

SUSHMEY म्हणाले...

@ sidharth - tumchyasarkhe rasik vachak asatil tar lihayala hurup yeto

SUSHMEY म्हणाले...

@priya … blogvar swagat...vachat raha tipanya post karat raha

रवींद्र म्हणाले...

आपले लिखाण नेहमीच भावते.पण हा लेख लाखात एक जमला आहे. असेच लिहीत राहा.इतरांना वाचन आनंद घेत राहू दे!

मुक्त कलंदर म्हणाले...

ही कथा मन अस्वस्थ करुन गेली. अनाथ मुलांचे भावविश्व काय आहे हे समजण्याची गरज आहे.

THEPROPHET म्हणाले...

अतिशय सुरेख.
तुमच्या ब्लॉगवर मी जेव्हाही येतो.. उत्तम लघुकथा मिळतेच मिळते... अप्रतिम!