ट्रंकेतील तो जांभळा ड्रेस हलकेच काढतानाही त्याचा कडेचा पत्रा लागलाच... जीर्ण झालेल्या त्या कपड्याला तो पत्र्याचा स्पर्श पेलवला नाही, भाजी चिरताना नकळत विळीची धार बोटांना लागावी, अशी ती कळकळली.... किती वर्षे झाली ... बारा तरी होऊन गेली असावीत.... अकरावी परीक्षा पास झाल्यावर हट्टाने बाबांकडून तो ड्रेस मागून घेतला होता.... दुकानाच्या काचेतून दिसणारा तो मोरपंखी जांभळा ड्रेस कितीतरी दिवस तिच्या डोळ्यात घर करुन राहिला होता...तोच ड्रेस घ्यायचा म्हणून ती हट्टून बसली होती....घागरा चोली घालून काय तमाशा करायचा आहे काय? असं बाबा म्हणाले खरे पण त्यांचा हा राग लटका होता..
""एकच तर मुलगी आहे तिचा हट्ट नाही, पुरवायचा तर मग कोणाचा हट्ट पुरवायचा.''
आईच्या या वाक्यापुढे बाबांचं काहीच चालायचं नाही. त्या तलम मोरपंखी जांभळ्या कपड्याचा पहिला स्पर्श झाल्यावर असंख्य मोर मनात नाच करत होते....
त्यावर्षी दांडिया खेळताना उगाचच आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटून गेलं. कितीजणींनी त्या ड्रेसबद्दल विचारलं होतं....
""असे गडद रंग तुला फार शोभून दिसतात.''
शेजारच्या काकूंनी केलेली ती स्तुती आठवली तरी आजही अंगावर मुठभर मांस चढते....
तिला त्या ड्रेसविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.... कितीकाळ ती त्या ड्रेसला कुरवाळत बसली...
""उठा ! पब्लीकला जमा करायचंय. आजच्या खेळाला चार पैसं मिळालं न्हायी तर जेवायला घावणार न्हायी.... ''
तिचा नवरा तिच्यावर डाफरत होता.... तो सायकल सर्कस करायचा... पण त्याच्या खेळाला माणसं कुठं जमायची म्हणून तिला आधी नाचवायचा....
त्याच्यासोबत पळून आली त्यावेळी ती अवघी आठरा वर्षांची होती. घरात बाबांना विचारायची हिम्मतच झाली नाही.... त्याच्याही घरात विरोधच....
""कुठेही राहू, मीठ भाकर खाऊ'', तो सांगायचा... तिलाही ते पटायचं....दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला... पळण्याचा आधी निर्णय घेतला आणि नंतर तो नशीबाचाच भाग बनला... पळणं मागेच लागलं....लग्न होऊन सहा महिने झाले नसतील... तोच एका रात्री तिचा नवरा भीत भीत घरात शिरला....गेल्या चार-पाच महिन्यात तो कमालीचा दारु प्यायला लागला होता... दुकानदाराशी उदारीवरुन भांडण झालं, हातातील फुटलेली बाटली तशीच त्याच्या पोटात खुपसली....तिला समजायचं ते समजलं... हातात जे लागेल ते घेतलं आणि पळायला सुरवात केली... एक गाव झालं की दुसरं... दुसरं झालं की तिसरं....प्रत्येक गावात जाऊन रोजगार कुठे मागायचा, म्हणून मग सायकल सर्कस सुरु केली.... तो सायकलीवर कसरती करायचा.... पण पब्लीक जमा व्हायचं नाही....म्हणून मग तिच्या नवऱ्याने तिला नाचायला लावलं....घरातनं बाहेर पडताना घेतलेला तो ड्रेस तेवढीच तिची संपत्ती.... तो ड्रेस घालून ती रस्त्यावर उतरली की भल्या भल्यांच्या नजरा तिच्यावर खिळायच्या... त्या लोकांची लोचट नजर बघून तिला असह्य व्हायचं पण इलाज चालायचा नाही....चार पैसे हाताशी लागायचे पोटाची खळगी भरायची आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा....ज्याचा हात धरुन ती पळून आली होती त्याच्यासाठी पळणं एवढंच तिच्या नशीबी उरलं होतं...
पाठित एक जोराचा मुक्का मारुन त्यानं तिला जोरात शिवी हासडली, तशी ती भानावर आली.
"चल बाहेर''
तो म्हणाला आणि तसाच मागे वळला..
तिने हातातल्या त्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसकडे बघितलं...त्याचा रंग आता पार फिका पडला होता....
तिनं घागरा, चोली घातली आणि रस्त्यावर येण्यासाठी दारात उभी राहिली.... तिचा नवरा मोठ-मोठ्याने ओरडत होता... तमाशा देखो- तमाशा देखो....
नवऱ्याचे ते शब्द ऐकून बांबाचे शब्द तिला आठवले....घागरा चोली घालून काय तमाशा करायचाय....ती अस्वस्थ झाली...
मघाशी ट्रंकेतून बाहेर काढताना तो ड्रेस दंडावरच फाटला होता.... लोक त्या फाटलेल्या भागाकडेच बघत राहाणार...तिला स्वतःचीच किळस आली...आता नाचलं की पैसे मिळणार आणि त्याच पैशानं हा दारु पिणार आणि रात्री पुन्हा मारणार.... ती स्वतःशीच पुटपुटली.... त्या जांभळ्या ड्रेसचा रंग जसा फिका पडला होता....तसंच तिच्या नवऱ्याविषयी वाटणाऱ्या भावनांच्या आता चिंध्या झाल्या होत्या... त्याचा रंग तर केव्हाच उडून गेला होता...तीची ही जाणीव आणखी तीव्र झाली... तिने अंगावरचा तो ड्रेस काढला, त्या ड्रेसकडे पुन्हा एकदा तिने पाहिले... त्या विटलेल्या जांभळ्या ड्रेसमधुन असंख्य मोर तिला खुणावत होते.... तो ड्रेस तिने ट्रंकेत ठेवला.....तिचा नवरा बाहेर ओरडत होता..... तीने ट्रंक उचललली आणि ती पळू लागली... यावेळी तिच्या नशिबापासून नाही तर नशीबाच्या शोधात डोळयात नाचणारे जांभळे मोर घेऊन.....
६ टिप्पण्या:
मान गए उस्ताद !! सुषमेय, लघुकथा लिहावयास तर तूच !!!
सुप्रीम..... हेरंब + १००००००००
bhannat zale aahe...akdam sahi...
वाचायला चांगलं वाटलं तरी मन विषण्ण झालं. खरच तीचं आयुष्य कसं वाया गेलं असेल ना ? कोणाचाही बाबतीत अस घडु नये, हेच खरं
zakkas !!!!!!!
सुषमेय,
'हिरवा' पूर्वीच वाचली होती, पण आज 'जांभळा' वाचली.
आत कुठेतरी तुटले. नेहमीच लिहित राहा, आणि सर्व
रंगांवर लिहून झाल्यावर "इंद्रधून" तील रंग असा
कथासंग्रह प्रसिद्ध करा. त्यासाठी माझ्या आत्ताच
शुभेच्छा!
टिप्पणी पोस्ट करा