शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

लाल

प्रार्थना संपली आणि सगळी मुले खाली बसली....वर्गशिक्षक एक एक विद्यार्थ्याचे नाव घेऊन हजेरीपट मांडत होते.....
तिचं नाव घेतल्यावर दारातूनच उत्तर आलं
""हजर''
शिक्षकांनी नाकावर आलेल्या चष्म्यावरुन तिच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिथंच थांब म्हणून दटावलं.
सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाल्यावर शिक्षकांनी तिला बोलावलं...
हं या आत. कुठे मैदान मारुन आलात?.....अर्थात या शब्दांचा तिच्यावर काही परिणाम होणार नसल्याचे त्यांना माहित होतं.
ती काही बोलली नाही, गप्प उभी राहिली... खूप रडली असावी असे तिचे डोळे लाल असायचे....त्यांनी तिला एकदा विचारलेही होते; पण तिने काही सांगितले नाही.....तशी ती कधीच काही बोलायची नाही... ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून उभी राहायची... तिचे ते लालभडक डोळे बघुन त्यांना त्यांची भीती वाटायची... त्या डोळ्यांत त्यांना कधी पाणी दिसलेच नाही...
ती शाळेला रोजच उशिरा यायची... रोज ते शिक्षक तिला त्याचे कारण विचारायचे पण ती बोलायची नाही.... तिच्या उशिरा येण्यापेक्षा ती न बोलता गप्प बसायची याचाच त्यांना राग यायचा....
आज जर कारण सांगितले नाहीस तर वर्गात बसू देणार नाही... तुझ्या आई-बाबाला घेऊन ये..... शिक्षकांनी फर्मावलं.
तरीही ती गप्प उभी राहिली... तिचा तो गप्पपणा शिक्षकांना बोचू लागला.... शिक्षा करावी तर दहावीच्या वर्गातील मुलीला शिक्षा तरी काय करणार.... त्यांना काही सुचेना... पण आज सोक्षमोक्ष लावायचाच याचा निर्धार त्यांनी केला.
"चल ! मुख्याध्यापकांनी जर तुला बसू दिलं तर बस वर्गात...' शिक्षक मुख्याध्यापकांच्या केबीनच्या दिशेने चालू लागले... ती त्यांच्या मागे....
मुख्याध्यापकांची केबीन ...छे! मारुतीच्या मंदिरात एका बाजुने दानात मिळालेली तिजोरी आणि दुसऱ्या बाजुला असलेल्या कट्ट्याचा आधार घेऊन केलेली छोटी जागा म्हणजे केबीन.... शाळाच चार घरांत भरायची तर केबीन कुठली असणार....
त्या दहा बारा गावांत एकच शाळा... वाड्या-पाड्यातील पोरं यायची... कधीही यायची... कधीही जायची.... शिक्षकांना त्याची सवयच झाली होती.... पण इथे फरक होता... पोरांना उशीर का म्हणून विचारलं की काही-बाही उत्तर सांगायची.... म्हस चारायला गेलतो, आई गावाला गिलीया, बाबा आजारी हाय... काहीही उत्तरं यायची पण उत्तरं यायची पण ही मुलगी काहीच उत्तर द्यायची नाही....
तसे ते शिक्षक नवीनच, इथल्या पोरांची त्यांना भाषाच कळायची नाही.. कधी कधी ते चिडायचे...पण पोरंच त्यांच्या भाषेला हसत राहायची... ते तिला घेऊन मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले...
मुख्याध्यापक.... ते कधी असत कधी नसत. असले तरी त्यांचे शाळेकडे लक्ष कमीच... कुठल्या तरी चळवळीत ते काम करायचे... त्याच्या मासिकाचे संपादनाचेच काम मोठे...ते काही तरी पांढऱ्यावर काळे करत बसले होते....
सर, ही मुलगी रोज शाळेला उशिरा येते आणि कारण विचारले तरी बोलतही नाही....
मुख्याध्यापकांनी एकदा तिच्याकडे बघितलं.. ती खाली मान घालून गप्प उभी होती....
अभ्यास कसा करुन राहिला, सर? मुख्याध्यापकांनी मान वर न काढताच शिक्षकांना प्रश्‍न केला.
चांगला आहे... म्हणजे दहावीला जर मंडळाने नंबर काढला तर हीचाच नंबर येईल... शिक्षकांनी सांगितलं...
मग येऊ द्या की.... , मुख्याध्यापकांनी तिला काहीच न विचारता सुनावलेला हा निर्णय ऐकून शिक्षकांना काय बोलावे सुचेना....
ते वर्गात आले... आज त्यांना शिकविण्याचा मूडच राहिला नाही... सरांनी असा का निर्णय दिला असेल... तिला बोलतं करण्याचा प्रश्‍नच नव्हता....
तिच्या उशिरा येण्याचा प्रश्‍न नव्हताच, पण ती उशिरा का येते याचे कारण कधीच सांगत नव्हती हाच प्रश्‍न होता...ते वर्गावर आले पण त्यांचे शिकविण्याकडे लक्ष लागले नाही....
पुढच्या जवळपास प्रत्येक दिवशी ती उशिराच यायची.... एकदा त्यांनी तिला सरळ सांगून टाकलं तू मला विचारत जाऊ नकोस आलीस की सरळ वर्गात येऊन बस.... पण तरीही ती उशिरा आली की पहिली एक दोन मिनीटे त्यांना त्रास व्हायचाच....
दहावीची परीक्षा झाली...... निकाल लागला....अपेक्षेप्रमाणे ती शाळेत पहिली आली होतीच.... कदाचीत ती मंडळातही पहिलीच असावी... सगळ्या शिक्षकांनी तिचे तोंडभरुन कौतुक केलं... पण ती बोलली नाही...
त्या शिक्षकांनीही ती शाळा सोडली... पुन्हा धकाधकीच्या प्रवाहात स्वतःला वाहतं केलं... इथं चकचकीत बुट आणि टाय घातलेली पोरं बघितली की त्यांचा त्यांना हेवा वाटायचा... एखादा विद्यार्थी उशिरा आला की मग त्यांना ती आठवायची...त्याचबरोबर तिचे ते लाल डोळे आठवायचे. ती मुलगी त्यांच्या डोक्‍यातून काही गेली नाही....एकदा असेच नवीन कुठले मासीक आले म्हणून ते बघत होते.... मासीक चाळता चाळता त्यांची नजर त्या फोटोवर गेली... तीच ती...त्यांची उत्सुकता ताणली... त्यावेळी ते ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा तो लेख होता.....
"" वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच तिने या लढाईत भाग घेतला. शालेय शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं पण व्यवस्थेला संपवायचा विडाच तिने उचलला. खरे तर तिने पेनाने लढाई लढावी, असेच मला वाटायचे पण तिने तो मार्ग नाकारला आणि पेनाऐवजी तिने हातात बंदूक घेतली...या दिशेने पाऊल टाकल्यानंतर येणारा शेवट निश्‍चित होता... पण, ती शेवटपर्यंत डळमळली नाही...'' लेख खूपच मोठा होता... पण त्यांना पुढे वाचता आले नाही.... त्या लालभडक डोळ्यांना आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले.....

२ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

:((

Unknown म्हणाले...

खरे तर आपली सुंदर मराठी वाचताना भान हरपून जाते, आपल्या सिद्धहस्त लेखणी समोर बोलण्याची माझी ऐपत नाही, तरीही कुतूहल म्हणून विचारतो.

आपल्या बहुतांश कथांना दुःखाची एक किनार असते. काहीतर अगदीच हळवं करून जातात. ह्या कथाप्रकाराच्या विशेष ओढीचं कारण आहे का काही ?