खिशातील पाचशेची नोट त्यानं दोनदा चाचपून बघितली. पगार होण्याला अजून किमान दहा-बारा दिवस तरी आहेत. हे दहा दिवस ही नोट जपून वापरायला पाहिजे. खरे तर या महिन्यात तशी तोशीस पडण्याची कारण नव्हते, पण पोरांनी हट्टच केला बाबा कुठेतरी फिरायला जाऊया.... बायकोनेही मग पोरांच्या हो मध्ये हो मिसळला आणि मग पर्याय नव्हता. सज्जनगडाच्या त्या गंधीत वातावरणात आपण आज इकडे आलो ते बरेच झाले असं त्याला वाटू लागलं. मग पोरांचे हट्ट त्याने बिनबोभाट पुरवायला सुरवात केली. मनाला एक प्रकारची शांती मिळाली.
बायकोला तो म्हणालाही
""बरं झालं आपण आज आलो इकडे. त्या रोजच्या दगदगीच्या दलदलील नाका तोंडात सगळा चिखल जातो बघ, कितीही हातपाय हलवा तसूभरही इकडे वा तिकडे जात नाही... चिखलातच खोल खोल जात राहतो आणि मग धडपड फक्त नाक वर राहण्याची करायची... या धडपडीत कधी उगवलेला दिवस मावळतो तेच कळत नाही....
तो काय बोलतो हे त्याच्या बायकोला काही समजायचे नाही, हे त्यालाही कळायचे पण तो बोलत राहायचा... पुर्वी कधी कधी त्याला तिचा राग यायचाही पण पर्याय नसायचा...मग तो उठून निघून जायचा... कधी कधी रात्री उशीरा परत यायचा, तोंडाचा वास लपवत...
पण अलीकडे त्याची बायको समजुतदार झाल्यासारखी वागायची... तिला त्याचं कोड्यातलं बोलणं कळायचं नाही पण ऐकून घ्यायची, कधी कधी ती मानही डोलवायची... तिला काय समजलं असेल का नसेल याचा तो आता विचार करायचा नाही पण बोलत राहायचा....
ती काही बोलली नाही, फक्त हुं हां तिने केले. पोरं लांब खेळत होती. त्यानं खिशात पुन्हा हात कोंबला आणि ती नोट चाचपली. पोराच्या शाळेत दोनशे रुपये द्ययाचे होते.. शंभर रुपये भाड्याला जाणार होते....मग दोनशे रुपये शिल्लक राहणार होते. आता तेवढ्यावर दहा-बारा दिवस कसे काढायचे, पण निघतील काहीतरी करुन निघतील... तो स्वतःशीच पुटपुटला.... संध्याकाळेने आता अंगावर अंधाराची चादर ओढून घेतली होती... त्याला आता गडावरुन खाली उतरायची घाई झाली होती... शेवटची गाडी चुकली की गडावरुन पहाटेच खाली उतरता येणार होते... रात्र गडावर काढणे त्याला परवडणारे नव्हतेच... त्याने लगबगीने पोरांना हाक मारली आणि स्टॅंडच्या दिशेने चालू लागला.... मनात देवाचे नाव घेत तो एक एक पाऊल टाकत होता.... तो स्टॅंडवर पोहचला...
शेवटची गाडी कधी सुटणार? दुकानदाराला त्याने प्रश्न केला.
अर्धवट राहिलेले शटर बंद करत तो पुटपुटला
सुटली....
काय गाडी सुटली, अहो रात्री आठ वाजता गाडी सुटते ना?
हो पण गडाचा दरवाजा आता आठला बंद होत असल्याने पावणे आठलाच गाडी सुटते... तुम्ही पोहचेपर्यत गडाचा दरवाजाही बंद होणार
मग?
मग काय पावणं, आता रात्र इथेच काढायची...
मंदिराचे भक्तनिवास आहे... तिथे झोपण्याची मोफत सोय आहे... फक्त जेवणाची सोय तुम्हाला करावी लागणार.... त्याच्या डोळ्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले... आजची रात्र इथे काढायची म्हणजे जेवणाचाही खर्च वाढला....खिशातली ती पाचशेची नोट आता त्याला ढिसूळ लागू लागली...
मघाशी त्याला पोरांचा हेवा वाटू लागला होता... आता त्यांचा त्याला राग यायला लागला. कशाला यायचं इथे... घरात काय जीव जात होतो यांचा.... त्याला बायकोचाही राग यायला लागला. काय आफत आहे, मठ्ठ आहे नुसती... तो त्या मंदिराच्या भक्तनिवासात पोहचला. तिथल्या कर्मचाऱ्याने त्याला राहण्याची जागा दाखविली. तिथे असलेल्या चादरीवर तो आडवा झाला. आता सकाळच्या पहिल्या गाडीने परतायचे एवढेच त्याच्या डोक्यात होते. त्याचा तिथेच डोळा लागला. थोड्यावेळाने पोराच्या रडण्योन त्याला जाग आली. त्याची आईने त्याला बहुतेक मारले असावे. त्याने विचारलं का मारलंस...
सकाळपासून नुसता भूक भूक करतोय... आता हाडं खा म्हणावं...
एकदा त्याची आईही त्याला असंच म्हटल्याचे त्याला आठवलं.... च्यायला पोरांच्या नशिबीही आपलंच दुर्दैव का..
त्यानं पोरांना उठवलं आणि कुठे काही खायला मिळतंय का ते बघितलं....
रस्ते सगळे झोपलेले... दुकाने बंद... त्याला काय करावे कळले नाही... एका हॉटेलच्या खिडकीतून मिणमिणता दिवा त्याला दिसला. त्याने खिशात हात घातला आणि पुन्हा ती पाचशेची नोट चाचपली... त्याने दारावर थाप मारली...
एक साठीच्या आसपास असलेल्या बाईने दार उघडले....
काय काय पाहिजे...
जेवायला काही आहे.....
त्या बाईने एकदा त्याच्याकडे आणि नंतर त्या बाईकडे आणि मुलाकडे बघितलं....
नाही काहीच शिल्लक नाही....
बघा की पोरं उपाशी आहेत काही आहे का?
भात पिठलं चालेल का? पन्नास रुपये पडतील....
भात पिठल्याला पन्नास रुपये म्हणजे चौघांचे मिळून दोनशे रुपये झाले.... या पोरांना एक रात्र उपाशी काढायला काय होतंय... मरणार आहेत काय एका रात्रीतून....त्याच्या मनात आलं पण तो बोलला नाही...पोरांना खायला घालू आणि जाऊ... त्यानं विचार केला...
मलाही भूक लागलीय.... मीही भात-पिठलं खाईन.... त्याच्या बायकोने सांगितले.. मग मी काय घोडं मारलं आहे.
द्या की...
तो आत आला.. त्या एकत्र केलेल्या खुर्च्या त्याने वेगवेगळ्या केल्या ....सगळे बसले....
काय बाई आहे.. गरजवंताला अक्कल नसते असं म्हणतात ते उगाच नाही.. दहा रुपयांचे भात-पिठलं पन्नास रुपयांना... त्याने मनातल्या मनात त्या बाईला शिवी हासडली.... त्याला त्याच्या बायकोचाही राग आला.. येताना काहीतरी खायला घेऊन आली असती तर... पण तो काही बोलला नाही..... घरी गेल्यावर बघतो....
अर्ध्या तासाने त्या बाईने चार पानं केली...
प्रत्येक घास खाताना त्याला मोडल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची नोट समोर येत होती... आता पन्नास रुपये घेणार आहेच तर मग खा की भरपूर म्हणून मग त्याने पुन्हा पुन्हा भात मागितला. शेवटी भात संपला सांगण्यासाठी तिने पातेलंच समोर आणलं...
पन्नास रुपयांत आता पोटभर भातही नाही याची त्याला आणखी चिड आली...
पोरं जेवली.... यानंही मग हात धुतला...
खिशातून त्याने पाचशेची नोट काढली....त्या बाईच्या हातात दिली...
भात पोटभर मिळाला नाही मावशी....
माफ करा हं पण मला अंदाज नाही आला... त्या बाईने अपराधी भावनेनं माफी मागितली...
एवढे पैसे सुटे कुठले..... जरा सुटे पैसे असतील तर द्या की....
नाही हो... एवढेच आहेत... यातील दोनशे रुपये घ्या आणि बाकीचे तिनशे परत द्या....
म्हातारीची चेष्टा करता काय? आहो भात पिठल्याला कोणी दोनशे रुपये घेते काय? आणि मी भात-पिठलं काय धंदा म्हणून नाही वाढलं... ही पोरं उपाशी झोपू नयेत म्हणून केलं.... त्यात तूमचं पोट तरी कुठे भरलं. तुम्हाला मी पन्नास रुपये म्हटलं खरं पण तीस रुपये असले तरी द्या...
त्याला काही सुचेनासं झालं... म्हणजे या बाईने चौघांसाठी पन्नास रुपये सांगितले होते. मघाशी प्रत्येक घास खाताना आपण या बाईला शिव्या-शाप दिला...
सुटे तीस रुपये नसतील तर नाही दिले तर चातलील.... बाईच्या त्या वाक्याने तो भानावर आला...
नाही घ्या नाय यातील तीस रुपये....
नाही ओ... चार दिवस धंदा कुठे झालाय पैसे असायला.... तुम्ही नंतर कधी आलात गडावर तर द्या पैसे....
त्याने पाचशेची नोट खिशात कोंबली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पकडण्याच्या नादात त्याला त्या बाईची आठवण झाली नाही, पण आजही मध्यरात्री कधीतरी त्याला त्या बाईचा चेहरा आठवतो आणि तो दचकून उठतो...
त्या बाईचे ते तीस रुपये तसेच त्याच्या खिशात वेगळे आहेत... सज्जनगडावर जाण्याच्या प्रतीक्षेत.......
१२ टिप्पण्या:
अप्रतिम!!!
khup sunder
जबरदस्त!
ह्र्द्यस्पर्शी लिखाण...
आवडलं...
भिडल् मनाला..खूप खूप छान
thanks aanand, sangeeta, aaditya, aanand kale, suhas zele.... tumachya pratikriyemulech lihayala bal yeta
अप्रतिम.. फारच सुरेख !!
kamal ahe mitra tuzi ...khupach chan, Mi deto tuze paise
Khupach chan :) kadam chan watal wachun ....
phaar ch chhan!
अजून एक "सज्जन"गड" घडला असे आनंदाने लिहावेसे वाटते...
असेच सज्जनगड घडविणाऱ्या गडाचे नांव काय असावे..? कथा काय वर्णावी?
:-)
sundar zale aahe. sagla prasang dolysamor agdi oobha rahila. lai bhari.
टिप्पणी पोस्ट करा