"सकाळ'चे उपसंपादक प्रशांत कुलकणीं यांचे अपघाती निधन झाले त्यावेळी "सकाळ'मध्ये लिहलेला हा लेख......
प्रशांत
प्रशांत! नावाप्रमाणेच तुमचा उत्साह उधाणलेल्या समुद्रासारखा होता. शांत स्मिताचे तुम्हाला तसे वावडेच, एखाद्या निरागस बालकाप्रमाणे भावना चटकन तुमच्या डोळ्यांत दिसायच्या. खरे तर मी तुम्हाला प्रशांत अशी हाक कधी मारलीच नाही. तसा तो माझा अधिकारही नाही; पण मी सर म्हणून जरी हाक मारत असलो तरी त्याचा नात्यात कधी दुरावा आला नाही. एक सीनिअर आणि एक ज्युनिअर एवढे नाते कधीच नव्हते. खास मैत्रीचे नाते होते, असेही मी म्हणणार नाही; पण जी केमिस्ट्री जमली होती ती केवळ आपल्यातच! त्याला मग कोणी मैत्रीचे नाव देवो वा आणखी काही.जगणे किती सहज असते हे तुमच्यावरून जाणवायचे. अगदी झऱ्यासारखे तुमचे वाहणे... तुम्ही नेहमी वाहत राहिला, अगदी निर्मळ. राग, लोभ, मत्सर या भावनांसह तुम्ही होता. अगदी सामान्यांप्रमाणे; पण तरीही तुमच्यात वेगळेपण होते. कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर उपभोग घ्यायची तुमची मनीषा सदैव असायची. ऑफिसमध्ये कधी तुमचा शर्ट चुरगळलेला पाहिला नाही की सलग दुसऱ्या दिवशी तोच शर्ट अंगावर दिसला नाही; पण म्हणून तुम्ही इतरांना कधी नावे ठेवले नाही. अगदी कामाच्या बाबतीत आपल्यात बऱ्याच वेळा मतभेद झाले, अबोला झाला; पण हे फार काळ ताणले गेले नाही, यात बहुतेक वेळा तुमचाच हात पहिल्यांदा माझ्या खांद्यावर पडायचा. जसे तुमचे राहणे टापटिप, तसे बोलणेही. थोडे अनुनासिक असले तरी त्याला टिपिकल बाज होता. आपले म्हणणे जर खरे असेल, तर समोर कुणीही असले तरी तुम्ही माघार घ्यायचा नाही आणि आपल्यापेक्षा जर समोरच्याला जादा माहिती असेल तर तुम्हील लहानांनाही विचारायला संकोचायचा नाही. एकूणच तुम्ही पहिल्यापासून थोडे इतरांपासून वेगळेच. तुम्ही मनगटी घड्याळही उजव्या हातावर घालत असायचा, याबाबत एकदा मी तुम्हाला विचारले होते, की घड्याळ उजव्या हातात का घालता? त्यावर तुमचे सरळ आणि साधे उत्तर होते. जसे घड्याळ
डाव्या हातात घालण्याला काही कारण नाही, तसे उजव्या हातात न घालायलाही कारण नाही. एकूण तुमचे व्यक्तिमत्त्व सर्वांत राहून सर्वांत वेगळे. घरातही तुम्ही लहान मीही लहान. तुम्ही नेहमी म्हणायचा नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. मी मात्र तुम्हाला विरोध करायचो. त्यावेळी तुम्ही म्हणायचा, जितके लाड होतात तितकेच फटकेही खायला लागतात. त्यापेक्षा सर्वांत मोठे असावे. असे अनेक विषयांवर आपल्या चर्चा व्हायच्या. बहुतेक त्या खासगी असायच्या.शेवटी, तुमचे तुमच्या पिल्यावर खूप प्रेम. होय तुम्ही तुमच्या यशला चार चौघांतही पिल्याच म्हणायचा. बाप होणे सोपे; पण बापपण निभावणे अवघड; पण तारेवरची त्रिस्थळी नोकरी करूनही तुम्ही तुमच्या पिल्याला जपले अगदी त्याची आई बनून. वहिनी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तुमच्यावरच त्याची जबाबदारी. त्यामुळे कामावर आलेल्या आईला पिलाची काळजी वाटून कसे व्याकूळ होते, अगदी तुम्ही तसे असायचा. रात्री कधी कधी तुम्हाला वेळ होणार असेल, तर तुमची ती तळमळ जाणवत राहायची. कदाचित देवालाही अशीच माणसे आवडत असावीत म्हणूनच तर त्याने तुम्हाला बोलावून घेतले. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच आकाशातून चंद्र गायब व्हावा आणि अमावस्या यावी, अगदी तसे तुम्ही गेला. आता तारे कितीही लुकलुकले तरी चंद्राची जागा कोण घेणार?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा