""पुढनं लेफ्ट मारा !''
""जोतिबाला जायला रस्ता कुठला?'' असं विचारल्यावर वाघबीळच्या पायथ्याशी असलेल्या एका भाजी विक्रेत्या बाईने दिलेलं हे उत्तर... आय वॉज... आय वील टेल यू... ओपीडीत बसलेल्या डॉक्टरचं उत्तर... अरे तू मॅरीड केलंस म्हणे... दहावीपर्यंत वर्गात असलेल्या मित्राचा प्रश्न... अशी अनेक उदाहरणे देता येतील... अगदी अफलातून... या सगळ्या मंडळींना एवढंच माहीत आहे, की इंग्रजी शब्द वापरल्याने पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. ही तीनही उदाहरणे वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गातील आहेत. त्यांचे शिक्षणही वेगवेगळे आहेत. म्हणजे भाजी विकणारी बाई दुसरी-तिसरीला गेली असेल तर डॉक्टरबाई एमबीबीएस आहेत. म्हणजेच तिसरी, दहावी आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या तिघांनाही इंग्रजीचा सोस आहे. यातील कदाचित डॉक्टरबाईंना इंग्रजीचा वापर जास्त करावा लागत असेल. त्यांच्या त्या व्यवसायाची गरजही असेल; पण
तरीही प्रश्न राहतो तो त्यातील शुद्धतेचा. तो केवळ गडबड आणि गोंधळाचा परिणाम नव्हता तर मुळातच व्याकरणाचा आणि त्यांचा फार जवळचा संबंध वाटत नव्हता. कारण नंतरची अनेक वाक्यं त्या अशाच मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलत राहिल्या. का? पुढच्या माणसाला इंग्रजीत बोललेलं फार जास्त कळतं म्हणून, की पुढच्या माणसाला कळूच नये म्हणून; की मी एवढं शिकलेय आणि मराठीत कसं बोलणार म्हणून? यांतील तिसरं कारण जरा जास्त महत्त्वाचं आहे. संभाषण हे दोन्ही व्यक्तीत समान पातळीवर व्हायला पाहिजे; पण पुढच्या माणसापेक्षा मी जरा जास्त हुशार आहे हे ठसवायचं असेल तर मग इंग्रजीतून संभाषणाला सुरवात केली जाते. जेणेकरून मला यातील जरा जास्त कळतं; तुम्ही माझं म्हणणं मान्य करा, असा त्यात अर्थ गर्भित असतो. असू द्या... तो अर्थ असण्यासही ना नाही. पण मग ती भाषा तरी नीट यायला हवी ना! केवळ भाषेचा विचार करता आपल्याला मातृभाषा जरी व्यवस्थित येत असली तरी पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. अगदी चपखल प्रभाव पडतो. "तू मॅरीड केलंस म्हणे' पेक्षा "तू लग्न केलंस म्हणे' हे त्याला नीट विचारता आलं असतं. पण प्रभाव टाकण्याच्या नादात त्याचा असलेला थोडा प्रभावही कमी झाला. भाजी विक्रेत्या बाईचं इंग्रजी मात्र चिंतेचं कारण आहे. कारण तिनं तो शब्द वापरला तो पुढच्या माणसावर प्रभाव टाकण्यासाठी मुळीच नाही. "लेफ्ट मारा', "टायमाला' यांसारखे शब्द त्यांच्या बोलण्यात घट्ट बसू लागले आहेत आणि मराठीची गंगोत्री इथेच आहे. इथेच इंग्रजीचं मराठीतील प्रदूषण थोपवलं पाहिजे. म्हणजे या लोकांना इंग्रजीपासून लांब ठेवा असा अर्थ काढू नये तर खेड्यात शिकविणाऱ्या शिक्षकांनी भाषेवर अधिक काम केले पाहिजे. मराठी आणि इंग्रजीची भेसळ करायला लागू नये इतक्या दोन्ही भाषा यायला हव्यात, याची दक्षता त्यांनीच घ्यायला हवी.
२ टिप्पण्या:
अगदी मनातले बोलतात. आपण आवर्जून मराठी शब्द बोललो नाही तर मराठी भाषेचा वापर प्रथम कमी कमी होत जाईल आणि नंतर मराठी वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द येण्या-ऐवजी इंग्रजी वाक्यांमध्ये मराठी शब्द बोलण्याची पद्धत चालू होईल.
"मी स्टेट्स वरून आल्यावर मला मराठी वर्ड रिमेम्बर करायला difficult जातं. " पुलंच्या शब्दात सांगायचे झाल्यास.
खरे तर आपला मराठीचा पाया पक्का असल्यास आणि वाचन दांडगे असल्यास इंग्रजी शब्द वापरण्याची गरज भासत नाही.
टिप्पणी पोस्ट करा