सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

कर्ण

तो प्रश्‍न तिच्या मनात रेंगाळत राहिला. गेल्या वीस वर्षांत हजाराहून अधिक पत्रकारांनी मुलाखती घेतल्या असतील, प्रकट मुलाखतीही खूप झाल्या पण हा प्रश्‍न कोणीच विचारला नाही, किंबहूना तसा विचार आपल्या मनालाही कधी शिवला नाही. आतापर्यंत किती प्रकारचे लेखन केले,नाटक, कादंबरी, चित्रपट, टिव्ही मालिकांची स्क्रीप्ट ललीतमधील कित्येक प्रकार हाताळले, पण तसा विचारच कधी मनात शिरला नाही.
शिरला नाही की कधी कुठल्या पात्रात तो लपला ...?
सगळं कसं कपोकल्पीत असतं, असं ती आजवर सांगत आली. पहिल्या कादबंरीला जेव्हा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेव्हा किती लोकांनी मुलाखती घेतल्या. हे सगळं कल्पनेतलं, सुचलेलं, पाहिलेलं, दुसऱ्याचे अनुभव अशी ती उत्तरे देत राहिले. पण मनाचा एक कोपरा रात्री-अपरात्री जागे करायचा आणि ठासून सांगायचा पात्रांच्या ओझ्याखाली तूच आहेस बघ ती पात्रे बाजुला सारुन... पण त्या पात्रांचा पालापाचोळा बाजुला करण्याचा प्रयत्न तिने केला नाही.
पण आजच्या त्या प्रश्‍नाने ती पार गोंधळून गेली.... मनावर चढविलेली सगळी पुट दूर करुन खोल काहीतरी आत शोध घ्यावा अस तिला वाटून गेलं. खूप थकल्यासारखंही तिला झालं.
""प्राक्‍तनात माझ्या पाच नवरे होते हे मला कुठे ठावूक होते, मस्ययंत्रात फिरणाऱ्या मत्स्याचा वेध घेण्यास येणाऱ्या प्रत्येक नृपात आपण आपला पती बघत होतो. पण दरबारातील एकाही नृपाला तो मत्स्यवेध सोडाच पण धनुष्यास प्रत्यंचा जोडणे शक्‍य झाले नाही. मग तरीही कर्ण सभेत आपल्यावर आपल्या पायाचा थरकाप का उडाला. त्याचे ते अजस्र बाहु, ती डोळे दीपवणारी कुंडले बघुन आपले डोळे का दीपले नाहीत. त्याने ते धनुष्य उचलले आणि आपण कर्णाला नकार दिला, का? या प्रश्‍नाचे उत्तर माझ्याकडेही नाही. श्रेष्ठ वर्णासाठी, श्रीकृष्णाने सांगितले म्हणून की त्यावेळी आपली मती कुंठीत झाली म्हणून. वस्त्रहरणाचा आदेश देणारा कर्ण हा इतिहासात नोंदविला जाईल पण तो नवरा म्हणून कुठे वाईट होता. जुगारात हरल्यावर आपल्या बायकोला पणाला लावणाऱ्या सम्राटापेक्षा तो नक्‍कीच मोठा होता, आणि नशीबाचे खेळ बघा सूत कुळातील म्हणून ज्याला नाकारलं तो तर पांडवांचा भ्राता निघावा. यापेक्षा दैवदुर्विलास कोणता...कृष्णाला पुढे महाभारत घडवायचे होत म्हणून का त्यानं मला कर्णाला न वरण्याचं सांगितलं.'' द्रौपदीच्या भूमिकेत काम करणाऱ्या नायिकेच्या तोंडातील ती वाक्‍य होती. अगदी सहज तिच्या हातातून ते उतरली गेले. कादंबरीतली ही वाक्‍ये खरे तर द्रौपदीच्या मनातील अवस्था दाखविणारी पण तीच वाक्‍ये तो पत्रकार आपल्याला सांगत होता. आणि चेहऱ्यावरचे भाव निरखीत होता. आणि त्यानं विचारलं,
"" तुम्ही काय केलं असतं, कर्णाला वरलं असतं की अर्जुनाची वाट बघितली असती....''
त्या प्रश्‍नाने ती चरकली... आयुष्यात अनेक प्रश्‍न विचारले, कधी चोरट्या चर्चाही झाल्या, त्याचं कधीच काही वाटलं नाही, पण या प्रश्‍नाने ती भांबावली. खरंच आपण काय केलं असतं, अर्जुनाची वाट बघितली असती...की कर्णाला होय म्हटलं असतं....ती अडखळली... नाही देता येणार या प्रश्‍नाचे उत्तर... त्यानंही मग ताणलं नाही.... त्यानं फक्‍त एक चिठ्‌ठी तिच्या हातात दिली. आणि सांगितलं या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं की मग वाचा...ज्यांची ही चिठ्‌ठी आहे त्यांची ही शेवटची इच्छा आहे. तिला वाटलं जाऊ दे की काय ती अट पाळायची, पत्र वाचून टाकू.... पण नंतर तिलाच वाटून गेलं.. खरंच आपण काय केलं असतं.. तिची अस्वस्थता वाढली....रात्रभर तिला झोप लागली नाही...पहाटेपर्यंत तिला उत्तर मिळाले नाही.... तिने पत्र उघडले....
प्रिय,
कर्ण आणि माझ्यात एक फरक आहे. द्रौपदीने नाकारल्यावर कर्णाने तिचा सूड उगविला पण मला तुझा राग करता आला नाही. किंबहुना अर्जूनापेक्षा जास्त मी प्रेम केलं. अगदी आयुष्यभर......
कॉलेजमध्ये असताना तिला लग्नाची मागणी घालणारा तो. त्याला आपण का नकार दिला, तिला काहीच कळलं नाही...
तिचे डोळे भरुन आले...तिला तिच्या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं होतं.... तिनं अर्जूनाची वाट बघितली कारण तिला कर्णच कळाला नव्हता....

११ टिप्पण्या:

teja म्हणाले...

classic. mastach

prajkta म्हणाले...

अखेरच्या वाक्‍याला पंच हे वैशिष्ठ्य कायम असले तरी ही पोस्ट इतर पोस्टपेक्षा वेगळी झाली आहे. ही पोस्ट नुसती वाचून सुटून जात नाही. मनात रेंगाळत राहते. विचार करायला भाग पाडते. खरंच द्रौपदीच्या जागी आपण असतो तर? हा प्रश्‍न उत्तर मागत राहतो. छान झाली आहे.

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

मस्त.

सागर म्हणाले...

उत्तम छान लिहील आहे आपण

सचिन उथळे पाटील ला धन्यवाद कि त्याने हि लिंक दिली

Anand Kale म्हणाले...

खुपच छान पोस्ट आहे...
मनापासुन आवडली...

THEPROPHET म्हणाले...

मस्त आहे एकदम!

Sagar Kokne म्हणाले...

सुरेख लिहिले आहे...
कर्ण नेहमीच दुर्दैवी ठरला.

rock म्हणाले...

karn is very brave and unlaky man. but i lick karn very much

अनामित म्हणाले...

mala watate karn manus hota

अनामित म्हणाले...

मला वाटते कर्ण माणूस होता.

अनामित म्हणाले...

karn was good. but story notlike