बास झालं! उठा आता... हा रस्ता पुरा करायचाय... भाकरीचा शेवटचा घास तोंडात जायच्याआधीच मुकादमाची हाक ऐकून ती थोडी वैतागलीच... हातातला घास तसाच तोंडात कोंबत तिने घटाघटा पाणी प्यायलं.... डोक्यावर बांधलेला टॉवेल सावरत तिनं मांडीवरल्या लेकराला झाडाला बांधलेल्या झोळीत टाकलं... तिच्या हिसक्याच्या उठण्यानं ते जागं झालं आणि त्या झोळीत उठून बसलं...मुकादमाचा तोंडाचा पट्टा सुरुच होता... एकेकीचं नाव घेत कामाला लागायच्या तो सुचना देत होता.... हीचं नाव घेऊन तो ओरडलाच... बाई पोराला घरात ठेवा, इथं कामं असतात.... असं काहीबाही तो बडबडत राहिला.... ती उठली...तिच्या बरोबरच्या बाया मुकादमाला शिव्या देतच उठल्या... काळ मागे लागल्यासारखाच मेला पाठिवर बसतो.... त्या पुटपुटल्या.... पण हे काम सुटलं तर लवकर काम हाताला मिळायचं नाही...त्यामुळे त्या त्याच्या मागनं चालू लागल्या. तीही उठली... हातात झाडू घेवून रस्ता साफ करु लागली.... हात हालवा बाई.... सगळी धूळ गेली पाहिजे.... डांबर चिकटत नाही त्याशिवाय... मुकादम अशा सुचना देतच होता. एवढ्यात तिला तिच्या तान्हुल्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिल्यांदा तिने त्याकडे दुर्लक्षच केले, पण ते कळवळायला लागल्यावर ती उठली... आईचा स्पर्श झाल्यावर तेही रडायचं थांबलं... तिच्याकडे बघून खुदकन हसलंही.... वादी हाय जन्माचा! म्हणत तिनं त्याला झोळीतून उचललं... पटपटा त्याचे मुके घेतले.... मग त्याला पुन्हा झोळीत ठेवलं... आई लांब गेली तशी ते पुन्हा रडायला लागलं... ती मागे वळली... त्याला कडेवर घेतलं आणि काम चालू आहे तिथं त्याला आणलं... वर सूर्य आग ओतत होता...तापलेला रस्ता उष्ण उच्छ्शास सोडत होता....तिनं डोक्याचा टॉवेल सोडला त्या तापलेल्या रस्त्यावरच तो पसरला... तान्हुल्या गालाचा पापा घेत त्याला त्यावर ठेवलं....आणि पुन्हा हातात झाडणी घेतली.... तापलेल्या उन्हात ते तान्हुलं तिथंच खेळतं राहिलं...
. त्याला आईच्या डोळ्यांतील शेकडो समुद्र ओलावा देत होते....
६ टिप्पण्या:
Sundar ! Strimukti valya (Ni) la sanga he ! ASha striyanchya adhikarasathi kama kara mhanav !
Nuste blog lihitat Swamuktiche !
खूपच छान. किती बोलका शेवट आहे !!
अप्रतिम!स्पर्शून गेली पोस्ट.
thanks bhanas, herambh....and anonymos.....
सुंदर लिहीले आहे...
thanks anad pitre
टिप्पणी पोस्ट करा