टाईमपास ः वेळेचा अपमानच
अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे.
संस्कृतमध्ये एक कथा आहे. गाढव आणि उंट एकत्र चाललेले असतात. मध्येच उंटाला गाढवाची स्तुती करावी वाटते म्हणून ते म्हणतं, ""हे गर्दभमहाराज, तुमचा आवाज किती गोड आहे.'' उंटाने केलेल्या स्तुतीने गाढवाच्या अंगावर मूठभर मांस चढतं. आपल्या या मित्राने एवढी स्तुती केली म्हटल्यावर तेही उंटाची स्तुती करतं. ""हे उंटमहाराज, तुम्ही दिसायला किती सुंदर आहात.'' ही गोष्ट आठवायचं कारण "टाईमपास' हे नाटक. नावाप्रमाणे टाईमपास म्हणूनही या नाटकाकडे बघितलं तरी नाटक बघायला जाऊन वेळ वायाच घालविला नाही तर वेळेचा अपमानही केला असं वाटतं.
सुयोगची निर्मिती, शफाअत खान यांचे लेखन आणि भरत जाधव, सुप्रिया पिळगावकर यांचा अभिनय म्हणून प्रेक्षक नाटकाकडे वळतात खरे; पण आपल्या हाती निखळ मनोरंजनसुद्धा लागू नये, या बद्दलची हळहळ व्यक्त करतच नाट्यगृहातून बाहेर पडतात. नाटकाचं नाव "टाईमपास' असल्याने त्यातून तत्त्वज्ञान सांगितले जाणार नाही, हे निश्चित होतेच;
पण विनोद तरी निखळ आणि खळखळून हसविणारा हवा. (विनोदनिर्मिती थोड्या अतिशयोक्तीने आणि डोक्याचा वापर न करता केली असती, तरी चालली असती) पण नाटक कोणत्याच अंगाने फुलत नाही आणि ते संपले कधी हेही कळतच नाही. नाटकाची संकल्पना चांगली असली, तरी संहितेवर कामच नाही. नवरा-बायको कंटाळा घालविण्यासाठी एकमेकांना अनोळखी म्हणून भेटतात आणि त्यातून विनोदाची निर्मिती ही संकल्पना खूपच चांगली असली तरी संहितेवर मेहनत नाही. एक-दोन कोट्या सोडल्या तर नाटकातील विनोद लक्षात राहत नाही. तेच तेच संवाद परत परत येत राहतात. आणि मग कंटाळा घालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच कंटाळा येऊ लागतो. प्रेक्षागृहात थोडी खसखस पिकली असली तरी ती पोरासोरांची आणि ती नवदाम्पत्यांची. नवरा हसला म्हणून बायको हसते आणि बायको हसली म्हणून नवरा; पण चांगले नाटक बघण्यासाठी आलेला प्रेक्षक मात्र हिरमूसूनच बाहेर पडतो. वेगवेगळी पात्रं उभी करण्यात नाटककाराला यश आलेले नाही. आणि नाटक बहुंताश चॅनेलवर दिसणाऱ्या हास्य कार्यक्रमाच्या अंगाने जाते आणि तिथेच फसते. खासकरून एमटीचे पात्र उभे करताना त्यात आणखी संवाद चांगले हवे होते. वेशभूषाही करायला हरकत नव्हती; पण काहीच नाही. प्रेक्षागृहातून नाटकाच्या सुरवातीपासून खसखस पिकत असली, तरी ती दमदार संहितेचे यश नसून भरत आणि सुप्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. खासकरून भरतच्या चेहऱ्यावरील भाव नेहमीप्रमाणे बदलतात आणि त्यातून थोडी विनोदनिर्मिती होते; पण ती भरतचीच जमेची बाजू. पहिल्या अंकानंतर प्रेक्षक दुसऱ्या अंकात काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला त्यातही काहीच मिळत नाही. नाटकाचा शेवटही तसाच. तो थोडा आणखी भावनिक करता येऊ शकला असता.
नाटक संपल्यावर एकांकिकेचे ओढूनताणून दोनअंकी नाटक केल्याचे जाणवते. खरे तर काही प्रसंग आणखी थोडे रंजक केले असते, थोडी वेशभूषाही केली असती तर जमेची बाजू ठरली असती. त्यामुळे नाटक उभे राहिले असते, की नाही माहीत नाही; पण पडतानाही थोडा कमी आवाज झाला असता. या नाटकाची चर्चा एवढी का झाली हा प्रश्न आहे. अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे. टाईमपासने या सगळ्याचा पुरेपूर लाभ उठविला आहे. सुमार संहिता, सुमार संवाद, दिग्दर्शनाला वावच नाही, रंगमंचावर वीस वीस वर्षे अभिनय केल्यानंतर सुप्रिया आणि भरतने केलेला अभिनय खूप उच्च दर्जाचा म्हणणे हा त्यांचाच अपमान आहे. त्यामुळे टाईमपासला जाणे म्हणजे वेळ वाया घालविणे नव्हे; तर वेळेचा अपमान करण्यासारखेच आहे.
३ टिप्पण्या:
aamchya gaavakade he naatak aale hote, nanatar sarvani ashya shivya dilya ki vicharu naka. Ektar gaavakade naatake kami yetaat aani tyat asale naatak pahile ki dokyat sanakch jaate.
बाप रे.. एवढं भिक्कार आहे हे नाटक? माहित नव्हतं.
हा! हा! काय योगायोग आहे बघ! बर्याच दिवसात नाटक पाहीलं नाही म्हणून "टाईमपास" बघायचा विचार आज सकाळीच डोक्यात आला! त्यासाठी वर्तमान पण हाती घेतलं आणि अनपेक्षितपणे तुमची ही ब्लॉग्-पोस्ट हाती आली. आणि नाटकाचा खरा रिव्हूव्ह मिळाला! आभार!
चांगलं लिहिता तुम्ही!
आणि हो! मी "टाईमपास" करणार नाही!
:D
टिप्पणी पोस्ट करा