प्रति,
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात असत नाही. आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं, आपलं लिंग काय असावं, आपला रंग काय असावा, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला यायचं याबाबत आपल्या हातात काहीही असत नाही. असतं ते पुढे आलेले आयुष्य जगणं, ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणं. पण तेही आपल्या हातात कुठे असतं?. तुम्ही कोण व्हायचं हे तुम्ही ठरवू शकलात तरी तुम्ही ते व्हालच असे नाही. झालाच तर तुम्हाला हवा असलेला आनंद त्यात मिळेलच असे नाही. तुमच्या अवती-भवती कुठली माणसे असावीत, कुठली नसावीत काहीच ठरवता येत नाही. प्रवासाचा रस्ता आपण निवडलेला असला तरी त्या प्रवासातील सांगाती आपल्याला निवडता येत नाहीत. ते बरे असतील तर तो प्रवास सुखाचा होतो नाही तर मग मुक्कामाचे ठिकाण येईपर्यंतची धडपड. आपण हे मिळविले ते मिळविले म्हणतो खरे.... पण ते खरेच आपण मिळवलेले असते की आपले विधीलीखित आपल्याला तिथपर्यंत पोचवते? आपली इच्छा असो वा नसो? तो प्रवास करावा लागतो. आपल्याला वाटते आपण मुक्त आहोत, पण खरेच आपण मुक्त असतो की आपल्या दोऱ्या दुसऱ्याच कोणाच्या हातात असतात? अगदी पतंगासारख्या. विधिलीखिताच्या दोराशी घट्ट बांधलेले आणि वाऱ्याच्या हिंदोळ्यावर भरकटणारे. त्यात त्याची मर्जी कुठे असते? वाऱ्याची दिशा, त्याचा वेग आणि विधिलिखीत दोराच्या हिसक्याप्रमाणे प्रवास सुरू होतो. कधी उंच जातो तर कधी खाली कोसळतो. पुन्हा उडण्याचे त्राण आणि बळ पंखात असेल तर पुन्हा उडतोही. पण सगळ्याच पतंगाच्या नशिबी आकाशात घिरट्या घालत राहाणे कुठे असते? कधी कधी विधीलिखिताच्या लेखणीचा झटका एवढा मोठा असतो की वाऱ्याचा हिंदोळ्यावर डोलणाऱ्या पतंगावर ते वारंच स्वार होतं. मग फाटून कोसळणं एवढाच कार्यभार राहातो. एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात, झाडाच्या फांदीत अडकून पडणे हेच नशिबी येतं. आकाशात भरारी मारून थकून जमिनीवर कोसळलेल्या पतंगाला मुक्ती मिळत असेल, पण वाऱ्याच्या झटक्याने वा दोर तुटून झाडांच्या फांद्यांवर अडकून पडलेल्या पतंगाला मुक्ती कुठे.. तो तर वेदनेचा सांगाती. ती वेदना केवळ फाटल्याची असत नाही... फाटलेपणाची आणि दुखावल्याची वेदना तर असतेच ती नसते असे नाही पण त्याहीपेक्षा मोठी वेदना असते ती दुर्लक्षित झाल्याची, निरुपयोगी झाल्याची... त्या अवस्थेतून त्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अगदी कोणी काढलंच तर तो आपली उंच भरारी घ्यायची ताकदच गमावून बसलेला असतो. कायमचे हे अपंगत्व केवळ शारीरिक कुठे असते ती तर मनोवस्था असते. सर्वांच्या नजरेतून उमटणारा केविलवाणा भाव आणि खोटे दुःख असह्य होते. नजरेतील केविलवाणा भाव बदलत जात पुन्हा दुर्लक्षित परावर्तित होणारा भाव टोचण्या देत राहातो... ? पराभवाचं दुःख खूप मोठं असतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख पराभवानंतर आलेल्या दुर्लक्षपणाचं. लोकांच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अविश्वासाची वेदना खूप भयानक असते. प्रत्येक नजर सांगत असते की अरे तू पराजित आहेस तुला बोलायचा हक्क नाही. तुला नजर वर करायचा अधिकार नाही. मेलेल्या गोमेला ज्या प्रमाणे पुन्हा पुन्हा ठेचले जाते अगदी तसेच या नजरा प्रत्येकवेळा ठेचत राहातात. तुमच्यातील उभे राहाण्याचे बळ शोषित राहातात.....मग तो पराभव कसला का असेना. नैतिक-अनैतिक. प्रत्येकवेळी अनैतिक असते ते तितके अनैतिक असतेच का? की त्याचीही काही रूपं असतात? गुन्हा आणि अनैतिक हे एकाच बाजूला कसे असू शकते? काहीच कळत नाही... याक्षणी असंख्य विचार डोक्यात घिरट्या घालत आहेत. मरणासाठी कारणांची जंत्री तयार करत आहेत. प्रत्येक कारण वेगळे. पण तरीही ते गरजेचे. त्या-त्या वेळेला मरणाला ते कारण उपयोगीही. पण त्या कारणांनी काही मरण यावे वाटले नाही. अगदीच विचार आला नसेल असे नाही, पण यापासून लांब जावे, खूप लांब जावे एवढे वाटले असणार, पण सगळं संपून देऊन जगणंच नाकारावे असे काही वाटले नाही. अपमान, पराजय आणि अवहेलना या गोष्टी नित्याच्याच होत्या. त्यामुळे काही काळाने तो जगण्याचा भाग बनला होता. तरीही प्रश्न पडतो माणसं आत्महत्या का करतात? केवळ जगण्याचा कंटाळा आला म्हणून? की जगण्याचा वीट आला म्हणून? जगण्याचे प्रयोजन राहिले नाही म्हणून की मरणातून पुन्हा जन्माला येऊन नवा डाव मांडावा म्हणून? असाध्य रोगाला कंटाळून आत्महत्या करणारे जसे आहेत तसे डॉक्टरांकडे काही दिवस मला जगायचे आहे म्हणून रडणारेही असतातच की. दोघांचे रोग सारखेच पण तरीही एकाला जीवनेच्छा तर दुसऱ्याला मरण जवळ करावे वाटते. काय फरक दोघांच्या वेदनांतील? नवरा चांगला मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया आहेत तशाच मिळालेली फिक्की पाने मांडून डाव रंगविणाऱ्या स्त्रियाही असतात. मग यांत फरक काय? जगण्याचा स्वतःचा अधिकारच का लोक नाकारतात...? यांसारख्या अनेक प्रश्नांनी आता माझ्या मनात गर्दी केली आहे. कुठल्याच प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत नाही. ते उत्तर मिळाले असते तर लोकांनी जगण्याची ही कारणे आणि मरण्याची ही कारणे अशी सरळ भेदाभेद केली नसती का? मरण्याच्या कारणांपासून दूर नेणारी अनेक औषधे आणि सल्लाकेंद्रे बाजारात उपलब्ध आहेत पण तरीही लोक त्याकडे न जाता सरळ मरण का पत्करतात? गुंता.... गुंता.... गुंता... अगदी काही वेळाने समोर ठेवलेला दोर माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. श्वांसांचे येणे-जाणे बळजबरीने बंद होईल. पायांची हातांची एक धडफड होईल आणि पुन्हा सगळं शरीर शांत होईल..... काही काळ तसाच जाईल... मग दारात पडलेल्या दुधाच्या पिशव्या आणि पेपर... खोलीतून येणारा कुजका वास यांमुळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांना संशय येईल.... दार उघडलं जाईल... लटकेल्या देहाकडे बघून लोक लोक आत्महत्या म्हणतील. पण खरेच ही आत्महत्या आहे का? आत्महत्या म्हणजे काय? हत्या या शब्दात कुणाचे तरी नुकसान आहे. पण मी जे काही करायला निघालो आहे त्या कोणाचे नुकसान आहे का? छे! असा कोणीच समोर दिसत नाही ज्याचं माझ्याविना आडून राहील. आई-वडील चारऐवजी आठदिवस रडतील, छे! रडतील की नाही हेही माहित नाही. कदाचित रडणारही नाहीत. गेल्या 20 वर्षात त्यांनी कधी कदर केली नाही आता का रडतील. ओळखणारही नाहीत कदाचित. त्यांच्या जगण्याचा मी काही अविभाज्य घटक वैगेरे कधीच नव्हतो. भाऊ-बहिणींना मी जिवंत आहे किंवा नाही हेही माहित नाही. कदाचित दरवर्षी त्यांच्या मेळाव्यात माझी आठवण निघत असेलही, यावेळच्या मेळाव्यात काहींचे डोळे ओलही होतील... अगदी लहाणपणीच्या एकदोन आठवणी काढून... पण त्यापेक्षा फार काही नाही होणार... त्यांना काही तरी आपलं हरवलंय असे वाटणार नाही. नुकसान तर नाहीच नाही... यापेक्षा काय? मी आता आत्महत्या केली किंवा माझा अपघात होऊन मृत्यू झाला किंवा मी आणखी चाळीस वर्षे जगलो तरी जे हयात असतील त्यांना माझ्याबद्दल यापेक्षा काही वेगळे वाटणार नाही. अगदीच स्पष्ट सांगायचे झाल्यास मी मेल्याचे कोणाला काहीच वाईट वाटणार नाही. मी आणखी काही काळ जगलो तरी त्या जगण्याचेही कोणाला काहीच वाटणार नाही. मग का जगायचे? केवळ श्वास चालू आहेत म्हणून ? जगण्याला काही तरी प्रयोजन नको का? कोणतीही गोष्ट शाश्वत असत नाही. अगदी आज ज्या गोष्टी चिरंतन वाटतात त्याही चिरंतन नाहीत, त्यांचाही प्रवास लयाकडेच सुरू आहे. वेग कमी असेल पण लय सुरूच आहे. मग आपण का जगायचे. लयापर्यंत पोचेपर्यंत श्वास घ्यायचा.... पण का? आणि त्यातून मिळवायचे काय? काहीच नाही. राहणार काय? काहीच नाही...... आताही हे सगळे शब्दांचे बुडबुडे.. यांतून काही मिळणार नाही. लावलेला दोर, त्याची लांबी. त्याचा पीळ पोलिस तपासतील. पडलेल्या स्टुलाचे फोटो काढले जातील. खिशातील या चिठ्ठीचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेमभंग की आर्थिक अडचण? व्यवसायात खोट की आणखी काही कारण? काही चुका? काही काही श्लेष काढले जातील. त्यातून नसलेल्या जवळच्या माणसांना आणखी त्रास दिला जाईल. जिवंत होता त्यावेळी त्रास आणि आता मेला तरी त्रास म्हणून ते या घटनेकडे बघतील. मग कारण काय द्यावे. द्यायचे म्हणून द्यावे की खरोखरचे द्यावे. जीवनेच्छा संपली हे कारण ठीक आहे. पण ही जीवनेच्छा का संपली याचा मग पोलिस शोध घेत राहातील. कदाचित त्यासाठी कोणाला तरी कारणीभूत ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. उभे-आडवे प्रश्न विचारून त्याला सोडून देतील. पण त्याला त्रास व्हायचा तो होणारच. तो रोखायचा कसा.? आजाराला कंटाळून म्हटलं तर मग डॉक्टरांच्या काही चिठ्ठ्या तरी सापडायला हव्यात. पण त्याही सापडणार नाहीत. मग काय? प्रेमभंग छे! वयाच्या साठाव्या वर्षी प्रेमभंगाचे कारण चालेल? मग म्हातारा चाळवला होता हा श्लेष काढला जाईल. आता हेच बघा मी मेल्यानंतर माझ्या मृत शरीराकडे बघून लोकांना काय वाटेल याचीही भीती वाटते.. मेल्यानंतर मला चाळवलेला म्हातारा किंवा आणखी काही म्हटले तर काय फरक पडणार... पण ती भीती आहेच... पण केवळ आपल्याला म्हातारा चाळवला होता म्हणण्याचा राग नाही, त्याचे कारण ते आत्महत्येमागे कारण नाही... जे खरे कारण आहे ते द्यायला काय हरकत आहे.. लोक विश्वास ठेवो अथवा न ठेवो.. आता माझी जी अवस्था आहे त्याला प्रेमभंग म्हणता येईल? छे! ! प्रेमलय म्हणता येईल किंवा आठवणींचा लय. काहीच कळेनासे झाले आहे. वयाच्या 27 वर्षी प्रेमात पडल्यानंतर आणि एकोणतीशीत नकार मिळाल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी आत्महत्या..... हे कारण कसे लागू होईल. पण हेच खरे आहे. 27 ते 29 या दोन वर्षांत मिळालेल्या सहवासाच्या आठवणींवर पुढची तीस वर्षे निभावली. ती आठवणींची पुंजी तीस वर्षे पुरवून खाल्ली. आता सगळं संपलं. त्या पुरचुंडीचा चोळा-मोळा झाला आहे. आता पुन्हा पुन्हा त्या पुरचुंडीकडे वळून बघून तो आनंद मिळेनासा झाला आहे. नव्या आठवणींसाठीचे दरवाजे केव्हाच बंद करून ठेवले होते. आता त्या दरवाजांना पुन्हा उघडणे शक्यच नाही. त्याच्या बिजागरी केव्हाच गंजून गेल्या आहेत. त्यावर लाथ मारावी तशा काळाच्या आघाताने कमकुवत झालेल्या भिंतीच कोसळताहेत. त्या एकेक कोसळलेल्या भिंती आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहे. त्यामुळे सगळंच उद्ध्वस्त करावं असं वाटतंय. गेल्या तीस वर्षांचे संचीत त्या दोन वर्षांत दडलेलं होतं. एखादं माणुस तुमच्या आयुष्यात किती काळ असावं हे तुमच्या हातात असत नाही. पण जेवढा वेळ तुमच्यासोबत असणार आहे त्या वेळेच्या आठवणी तुम्हाला कितीकाळ पुरतात त्यावर बरेच अवलंबून आहे. प्रत्यक्षात जगातली कुठलीच भाषा "प्रेम' ही संकल्पना पूर्णपणे मांडू नाही शकत. काळजी म्हणजे प्रेम? सेक्स म्हणजे प्रेम? आदर म्हणजे प्रेम? छे! ! अशा कुठल्याच चौकटीत प्रेमाला बसवता येत नाही. अगदी स्पर्श न करता गेली तीस वर्षे मी जगलोच आहे. अगदी तिने टाकलेला तो एक कटाक्ष आता-आतापर्यंत अंतःकरण ढवळून टाकायचा. त्या कटाक्षाच्या आठवणींच्या नशेसाठी हे शरीर असावं असे वाटायचे. त्यासाठीच तर हे शरीर जपलं. पण अलीकडे ती नशा काही उरली नाही. नशेला शरीराची गरज असते. शरीराशिवाय नशा येत नाही. त्यामुळे शरीर आवश्यक असते. आता मात्र आठवणींची पुरचुंडी कितीही हुंगली तरी ती नशा आता चढायची बंद झाली आहे. व्यसनी माणसाला जसे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे वळावे वाटते तसे मात्र होते आहे. मेंदूतील प्रत्येक कण आणि कण पुन्हा पुन्हा बंड करतो आहे. आता गेल्या तीस वर्षात कॅन्व्हासवरील चित्रांवर पुन्हा पुन्हा गिरवून त्याचे रंग एकमेकांत इतके गुंतले आहेत की मूळचे चित्रही आठवेनासे झाले आहे. असह्य.. असह्य आणि असह्य ही एकच भावना आता वारंवार उचंबळून येत आहे. जगण्याचे प्रयोजन हलकेच कोणीतरी काढून घेतल्याची भावना दृढ होत आहे. आता काय करायचे हेच कळत नाही. शरीराचे हे चोचले पुरविणे शक्य नाही. बाजारात तुम्हाला सेक्स मिळतो अगदी हवा तितका मिळतो पण "मन' मिळत नाही. ते मिळविताही येत नाही. ते विधीलिखितानं तुमच्या भाळी लिहिलं असावं लागतं. कोणाच्या मनात स्थान मिळवायचे हे तुम्ही ठरवू शकत नाही. दया, करुणा या भावना तुम्ही जाग्या करालही पण प्रेम छे!! प्रेम नाही उत्पन्न करू शकत. सहवासाने माया निर्माण होते, त्याची सवय लागते पण प्रेम नक्कीच नाही. सहवास संपला की सवयीने माणुस अस्ताव्यस्त होतो... पण तो काही काळापुरताच ... पण पुन्हा तो पुर्वपदावर येतो, एका सवयीपासून दुसऱ्या सवयीकडे तो वळतो. प्रेमाचं तसं असत नाही. गेल्या तीस वर्षांचे संचीत संपले आहे. आता जगण्याला प्रयोजन राहिले नाही. म्हणून हा दोर गळ्यात. आता गळा आवळला की डोळ्यासमोर अंधार येईल. गिजबटेल्या कॅन्व्हासवरचे चित्रही काळे बनून जाईल. जाणिवांच्या काळ्या रंगात हा काळा रंग मिसळून जाईल. मग कोणतेच रंग राहणार नाहीत. अंधार... ती कोण याचा शोध मात्र होऊ नये एवढीच अपेक्षा.... सर ! पीएमचा रिपोर्ट गळा आवळल्यानेच मृत्यू असा आलाय. पण बॉडी न्यायला कोणी आलेलं नाही. काय करायचं? हवलदाराच्या प्रश्नासरशी, त्या इन्स्पेक्टरची तंद्री तुटली. त्याने हातातले ते पत्र टेबलावर ठेवले. डोळ्यांच्या कडा पुसल्या...आणि आवाजात जितकी जरब आणता येईल तितकी आणली.... काय? सर ! बॉडी न्यायला कोणी आलं नाही. काय करायचं? आपण लावायची का विल्हेवाट.! नाही..थांब.... त्याची फाईल बघू.... फोटो बघू! हवालदाराने तातडीने त्याचा फोटो काढून दिला... सर ! काय करू विल्हेवाट लावू... नाही... ? काय करायचे.. हवालदाराने पुन्हा प्रश्न केला? रिपोर्ट फाईल काढ, त्यात लिही. बॉडी ताब्यात घेणारा ः सुहास रामचंद्र फडके. वय 28 ृताशी नाते ः मुलगा.... ................................................................ चार वर्षापूर्वी त्याला नोकरी लागल्यानंतर त्याच्या आईने अशीच आत्महत्या केली होती. तिनेही चिठ्ठी लिहिली होती, पतंगाचा दोर तुटल्याने पतंग भरकटतो, मी मात्र स्वतःच्याच हाताने दोर तोडला. मग भरकटलेपण आले... मग अडगळीत जाऊन पडणेही नशिबात आले.... छे!! अडगळीत कुठे तुझ्या बाबांच्या संसारात तर अडकून पडले होते. संसारत काही त्रास नाही झाला... पण शरीराला त्रास झाला नाही म्हणून शरीर का जोपासायचे... काही वेदना त्यापलीकडच्या असतात... पण आता सहन होत नाही रे! दोर तर खूप आधीच तुटला होता. तरी संसाराच्या वाऱ्यावर बरेच वर्षे घिरट्या घालत राहिले... तुझे बाबा होते आणि पुन्हा नव्हतेही. सगळं सारखंच... तुला तुझ्या पायावर उभे करण्यासाठी जगत होते. आज तू तुझ्या पायावर उभा राहिलास. आता पतंगाला मोक्ष मिळायला हरकत नाही... त्यानं घर पालथं घातल्यावर एका पुस्तकात एक फोटो सापडला होता... आज आत्महत्या केलेल्या माणसाशी तो चेहरा बराच जुळता होता.... ............................................ |
संवेदना जागृत ठेवल्या की मग समोर घडणाऱ्या घटनां मनापर्यंत पोहचतात आणि मग त्याचा गंध मनात दरवळत राहातो. अनेकदा हा गंध दर्पाच्या अंगाने गेला तरी अंतिम त्यातील जगणं चाफ्याच्या मंद गंधासारखं नितांत सुंदर असतंच असतं.
रविवार, १७ मार्च, २०१३
पतंग
रविवार, १० मार्च, २०१३
माया
""गुलजारांनी मायाला का मारलं असेल रे?''
दोरीवरचे कपडे काढता काढता तिने केलेल्या या प्रश्नाने तो थोडा आश्चर्यचकीतच झाला, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
""सांग ना? गुलजारांनी मायाला का मारलं असेल? केवळ महेंद्रला एकटं ठेवण्यासाठी? की महेंद्रला नायक करण्यासाठी?... बोल ना?''
""कशाला आडकतेस सिनेमांत.. तीन तासांचा सिनेमा बघायचा, आवडला तर वेळ चांगला गेला म्हणायचं. नाही आवडला तर वेळ तरी गेला याचं समाधान मानायचं आणि सोडून द्यायचं.''
त्यानं आपलं सरळ तत्वज्ञान मांडलं.
"" हे खरंच, पण तरीही काही सिनेमे राहातातच ना मनात घर करुन. प्रभाव टाकतात, का माहित नाही, पण त्यातली पात्रं आपली वाटतात, त्यांच्या सुखानं आपण सुखावतो आणि दुःखानं दुःखी होतो. त्यामुळे वाटतं रे. तिचा काय दोष? तिनं कोणताही अपराध नाही केला.. आपल्या भावनांशी प्रामाणिक राहिली ती... महेंद्रला जमलं नाही ते... मग महेंद्रला मारायला नको का?...''
तो काहीच बोलला नाही... ती त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेनं बघत होती.
""जर माया मेली नसती तर...
""तर काय?...''
""...तर महेंद्र नायक झाला असता?... त्याला नायक म्हणून लोकांनी स्वीकारलं असतं?... नसतं स्वीकारलं... महेंद्रला नायक करायला माया मरायलाच हवी होती.''
हातातला पेपर खाली घेतला आणि त्याने वर बघितलं. ती अस्वस्थ वाटत होती... बाहेर उत्साहाने भरलेली आणि आतून खूप एकटी.. एकाकी.. तसं ती बोलायची खूप.. सांगायचीही खूप.. पण गाळून... आडून आडून सांगायची... सर्वच दुःखांना सुखाचा मुलामा लावण्यात तिच्याइतकं पटाईत कोणीच नव्हतं. एकदा चुकून बोलून गेली होती, अवती-भवती माणसं खूप असतात... पण तो सगळा कचराच नाही रे?... पण तेवढंच.. नंतर कधी तिच्या बोलण्यातून अनुत्साह दिसला नाही. खळखळ कधी जाणवली नाही..
""मी काय विचारते आहे? लक्ष आहे का इकडे? तुझं बाबा त्या पेपरकडेच लक्ष..
""महेंद्रला नायक करण्यासाठी मायाने का मरायचं? की कथा पुढे जाण्यासाठी लेखकाला कुणाला तरी मारावंच लागतं? माया जगली असती तर तिचं अस्तित्व काय? महेंद्रसोबत ती राहिली असती तर काय? महेंद्र नायक राहिला असता? त्याचं नायकत्व त्याच्या एकटं राहण्यात आहे... म्हणूनच तर तर इंदू त्याला सोडून जाते आणि माया मरुन जाते... '' ती बोलत होती. विचारत होती.. तो मात्र गप्प होता..
""तू बोलत का नाहीस? खरंच ना? महेंद्र एकटा राहिला म्हणूनच तर नायक ना?...''
ती खूप वेळ विचारत राहिली.. पण तो काहीच बोलला नाही.. मग ती आपल्या कामांसाठी निघून गेली.
खरंच, महेंद्र आहे का नायक? च्छे! महेंद्र कुठला नायक?... चित्रपटाच्या लांबीत त्याला जास्त रोल आहे एवढंच. पण त्यामुळे तो नायक कुठे होतो? तो जगतो का? कोणासाठी? त्याचं मायावर प्रेम की इंदूवर? त्याला एकच निवडायची असेल तर ते शक्य आहे का? नायकाला ते जमलं पाहिजे. महेंद्रला कुठला निर्णय कधी घेता येतो? तो सर्वसामान्यांपेक्षा दुर्बळ, हतबल, कदाचित पिचलेलाही.. नायक कुठे पिचलेला असतो?...
त्याची नजर सहज समोरच्या आरशात गेली.. गालावरचे वाढलेले खुंट आणि कपाळावरची आठी त्याला स्वस्त बसू देत नव्हती. आपण जर महेंद्रच्या जागेवर असतो तर सर्वसामान्याप्रमाणे वागलो असतो? की आपली अवस्थाही अशीच झाली असती?.. इंदूला आपण सोडू शकलो असतो की मायाला?... इंदूला सोडणं तुुलनेत सोप्पं... मायाला सोडतो म्हटलं तरी सोडता येत नाही. तिच्याविना जगता येणं अशक्य आणि तिच्या सोबत जगणं त्याच्या प्राक्तनात नाही..!
त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे आणि कपाळावरच्या आठ्यांकडे बघून ती जोरात हसली..
""अरे नको विचार करू इतका... मी सहज विचारलं.... जाऊ दे रे !''
जाऊ दे!
हा आपला परवलीचा शब्द.. प्रत्येक गोष्टीला जाऊच तर द्यायचं...! गुंत्यात अडकू नये यासाठी जाऊ दे... आपल्या बोलण्याचा विपर्यास्त काढला जाईल म्हणून जाऊ दे... सोप्या प्रश्नांची उत्तरं कठीण वाटू लागली की मग जाऊ दे... जाऊच तर दिलं आत्तापर्यंत... पण असं जाऊ दे म्हटल्यानं जातं का? गुंत्यातून पाय निघतो का?... मग असा एक एक गुंता वाढत जातो आणि तो गळ्याभोवती पाश टाकत राहातो... त्यात श्वास गुदमरत राहातो.. कधी कधी वाटतं... या गुंत्यांनी आपला गळा दाबून टाकावा आणि मोकळं करावं... पण इतक्या सहज मोकळं कसं होता येईल?...
मरते. का? लेखकही समाजाच्या खोट्या चौकटीतच अडकून पडला म्हणून? त्यालाही समाजाने ठरवून दिलेल्या रंगातच चित्र रंगवायला आवडतं म्हणून?... की... की त्याला पुन्हा पुन्हा महेंद्रला मारायचं आहे म्हणून..? माया सोडून जाते आणि सुटते... इंदूही स्वतःचा पदर सोडवून घेत दुसऱ्याच्या हातात हात घालून निघून जाते.. उरतो तो फक्त महेंद्र...! रोज मरायला...!!
डोक्यात असंख्य मुंग्या चावा घेत आहेत असं त्याला वाटून गेलं... विचारांची माळ कधी गुंफली आणि मायाचा चेहरा कधी पटलावर आला हे त्यालाच कळलं नाही... समोर बायको असूनही त्याला तीच दिसत होती... मेंदूचा सुक्ष्मातील सुक्ष्म भाग तिनेच व्यापून गेला होता.. त्याचीही ती जणू मायाच होती...
.........................
ती... आपल्यावर अतोनात प्रेम करणारी... आपल्यासाठी झुरणारी... कदाचित आपल्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी... पण हलकेच हात सोडवून घेणारी... महेंद्र आणि आपल्यात तेवढे साम्य नक्की आहे. आहेच की.. तीही तितकीच सहज... निरपेक्ष आणि संवेदनशील... समाजाला फाट्यावर मारणारी... नकारातही ठाम आणि होकारातही ठाम... नकार देताना आपल्याभोवती सगळी कडी रचून स्वतःला सुरक्षीत करणारी आणि होकार देताना ती सगळी कडी मोडून टाकून जवळ घेणारी... प्रवाही... प्रवाहात ओढून घेणारी... त्या प्रवाहात तुम्हाला काय वाटते याला काही महत्त्व नाही... त्याची दिशा आणि पोचण्याचे स्थळ निश्चित असते.. त्यात तुम्हाला स्थान काहीच नाही.. त्यामुळंच
तिच्यासोबत संसार थाटायची स्वप्नं स्वप्नंच राहिली... ती स्वप्नं कसली होती... त्यात तर आपण किती तरी काळ जगलो होतो... तिच्या केसांना कुरवाळायचं होतं... गालांना गोंजारायचं होतं... तिच्या तप्त ओठांवर ओठ टेकवून तू फक्त माझीच आहेस हे सांगायचं होतं... तिच्या कुशीत शिरुन बरगड्या मोडेपर्यंत गच्च मिठी मारायची होती... प्रेम कुठे शारीर पातळीवर असतं..? नसतंच ते... पण स्पर्शाइतक्या सहज भाषेशिवाय ते पोचत नाही, एकरूप होता येत नाही... हे खरं... तिच्या स्वप्नांची पाखरं माझ्या डोळ्यांतून उडू द्यायची होती... पण नाही जमलं. काही वेळाच इतक्या वाईट असतात की त्या वेळांना काही बळी लागतात... तिने नकार दिला ती वेळ तशीच होती.. त्या वेळेला माझा बळी हवा होता. वेळेचे बळी आणि काळाचे बळी यांत फरक आहे. काळ एकदाच बळी मागतो आणि तो घेतला की पुन्हा मागे वळून बघत नाही. वेळ तसं करत नाही. ती असूरासारखी असते. तिला चटक लागते. रक्ताची. त्याच त्या रक्ताची. त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा बळी घेत राहाते आणि पुन्हा पुन्हा जिवंतपणाचे पाणी शिंपडत राहाते... जिवंत करून पुन्हा बळी घेण्याचं कसब वेळेइतकं कोणाकडेही नाही...
........
त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती जणू इंदूसारखीच भासत होती. इंदूसारखीच ती.. कर्तव्यनिष्ठ. सोशिक.. ही आपल्याला सोडून जाईल.. नाही कदाचित.. आणि माया मिळेल... तीही नाही मिळणार... इंदूकडे जाण्याचा रस्ता आपल्या हाताने उघडूही.. तिच्यापर्यंत शारीर पातळीवर पोहचूही पण मानसिक आधाराचे काय?.. ना इकडे ना तिकडे... लटकणं हेच प्राक्तन...
...............
रात्री केव्हा तरी तिला जाग आली... सकाळच्या एका प्रश्नाने त्याचा दिवस खराब गेला होता... आता झोप तरी निट लागली का बघायला ती उठली.. दिवे लावले... खोलीत तो नव्हताच.. नेहमीप्रमाणेच तो अभ्यासिकेत असणार म्हणून तिने अभ्यासिकेचं दार उघडलं... आणि जोरात हंबरडा फोडला... आयुष्यभर लटकत राहण्यापेक्षा एकदाच लटकलेलं बरं म्हणून त्यानं स्वतःला लटकून घेतलं होतं... काळापुढे वेळ हरली होती... तिच्या प्रश्नाचं उत्तर आता तिलाच नको होतं !
सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३
प्रिय,
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. इतके दिवस पत्राला का उशीर हा काही तुला प्रश्न पडणार नाही. आणि खरेतर माझ्याकडेही त्याचे असे खास उत्तर नाही. कंटाळा, आळस हे माझ्या नावाचे काही समानार्थी शब्द आहेत. (त्यात तू म्हणतेस तो मूर्ख हा शब्दही आहेच!).त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे माझे सरळ साधे उत्तर असते. कंटाळा! अर्थात काही करण्याचा उत्साह असण्याचे काही प्रयोजन तरी हवे... जाऊ देत. पत्र लिहिण्यास एक कारण मात्र आज मस्त आहे.. काल 24 फेब्रुवारीला पन्हाळ्यावर चंद्रशेखर गाडगीळांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. मैफल खासगी स्वरुपाचीच होती. आणि ती रंगलीही अशी की खूपच खासगी वाटून गेली. अगदी पौर्णिमेचा चंद्र आपल्या पूर्ण तेजाने आकाशात माथ्यावर येऊन आपली किरणांची बरसात करत होता आणि त्याचवेळी गाडगीळ "" फिर वही श्याम वही गम, वही तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है... '' गात होते. तलतच्या आवाजात लागलेला सूर गाडगीळांनी तंतोतंत लावला होता. आणि तीच आर्तता होती. रात्रीततल्या त्या चंद्रबिंबाकडे बघत त्यावर सुरांचा अभिषेक ते घालत होते. व्हायोलिनवर फिरणार गज तर लिलया फिरत होता. या वाद्याचे वैशिष्ट्यच असे की त्याची तार ही उसाच्या पानाइतकी धारधार असते. चटकन कोणी उसाच्या पानावरुन हात फिरवावा आणि बोटे रक्तबंबाळ व्हावीत इतकी ताकद व्हायोलिनमध्ये आहे. तो गज त्या तारांवर पडला की मनाशी तो तार जोडू पहातो. आणि गझलेची जर त्याला फूस असेल तर तो ती तार आणखी धारधार होत जाते. त्यामुळेच ती ""फिर वही...चे सूर आणि तुझी याद एकदमच आली.... नारळांच्या झावळ्यांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे बघत कानातून मनात अलगद उतरणारी ती गझल तुझ्यापर्यंत तो चंद्र वाहून नेतो आहे की काय असे वाटून गेले. तू आत्ता त्या चंद्राकडे एकटक बघत बसली असशील असे वाटून गेले. आणि तो आपला दुवा साधतोय असा भास झाला. मैफीलीचा रंग वाढत होता.. गाडगीळ रंगात आले होते. आपल्या गायकीचे एक एक अनुभव सांगत होते. आणि अचानक त्यांनी एक शेर ऐकवला...
किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो ज़माने के लिए आ
पन्हाळ्याच्या त्या उघड्या वातावरणात गार वारा अलगद गरम वाटू लागला..
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ...
ंदी हसन साहेबांचीची ही गझल पूर्वीही मी ऐकली होती, पण खरेच यावेळी ती आणखी वेगळी वाटली. अहमद फराज यांनी ती लिहिलीय अप्रतिम. पण मनापर्यंत पोचविण्यासाठी जो सूर लावावा लागतो तो मेहंदी हसन साहेबांचा तर लागतोच पण काल गाडगीळांचाही लागला. त्या शब्दांच्या अर्थापर्यंत ते घेऊन गेले आणि तिथून पुढचा प्रवास अर्थात तुझ्यासोबतीनेच झाला. गम्मत बघ कार्यक्रमाची सुरवात भजनाने झाली आणि शेवट गझलेने. देवाला भजन का आवडते याचा प्रत्यय मला काल पुन्हा उमजला. भजनातील भाव सुरांच्या रस्त्यावरून धावत सुटतात ते भगवंताच्या चरणापाशीच जाऊन थांबतात, गझलही तशीच अगदी शब्दांचे रुपेरी रूप घेऊन आलेले भाव आर्ततेच्या सुरांना जेव्हा मिठी मारतात तेव्हा ते मनात घर करत नाही तर तिथून आपला रस्ता शोधत हव्या त्या ठिकाणी पोचतात. त्यामुळेच ज्यावेळी कार्यक्रमाचा शेवट "तोच चंद्रमा नभात या गाण्याने झाला त्यावेळी... एकांती मजसमीप तीच तूही कामीनी.. हे शब्द खोटे नाही वाटले..!
तुझाच...
शनिवार, १९ जानेवारी, २०१३
गाजराचा हलवा अन् उकडीचे मोदक

गाजराचा हलवा अन् उकडीचे मोदक
साहित्य संमेलनात साहित्याविषयी चर्चा व्हावी, समाजाच्या बदलत्या
धारणांबाबत ऊहापोह व्हावा, परिसंवाद असे घडावेत, की त्यातून काही दिशा ठरवता यावी, उल्हासित करणाऱ्या ललित साहित्याचा गौरव व्हावा आणि प्रत्येक साहित्य प्रकाराकडे नेणाऱ्या वाटांचा धुंडोळा घेतला जावा; परंतु 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याबाबत काहीच झाले नाही. संमेलन संपल्यानंतर दुधी भोपळा आणि गाजराचा हलवा किती खाल्ला आणि मोदक किती रिचवले, याचीच चर्चा रंगली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्घाटनाच्या भाषणात केलेल्या विवेचनाशिवाय एकही वक्ता साहित्याच्या परिघात बोलला नाही. काठावर पोहणारेच जास्त जमले होते, हे खेदाने म्हणावे लागेल.
86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकदाचे पार पडले. वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाला पोलिसी छावणीचे रूप देऊन पूर्ण करावे लागले यातूनच तेथे विचार काय आणि कसा मांडला गेला हे स्पष्ट होते; पण मुळातील वादांमध्ये येथे पडायचे नाही. ते वाद का झाले आणि ते गरजेचे होते का, याचा ऊहापोह अनेकांनी अनेक व्यासपीठांवरून केला आहे; परंतु साहित्य संमेलनातून प्रत्यक्ष काय मिळाले हे जर रसिकांना विचारले तर ""पैसे भरले होते म्हणून गाजराचा हलवा आणि उकडीचे मोदक मिळाले,'' यापेक्षा ते फारसे काही सांगतील असे वाटत नाही. संमेलने केवळ उत्सवी स्वरुपामुळे लक्षात राहात असतील तर तो त्या संमेलनाचाच अपमान मानायला हवा. साहित्य संमेलनात नेमके काय हवे आणि कसे हवे याचाही ऊहापोह अनेकांनी केला आहे. अनेकजण काठावर राहून आणि आता यापुढे आपल्याला साहित्य महामंडळाकडून काहीच मिळवायचे नाही, या भावनेतून टीका करतात. साहित्य महामंडळाची वारेमाप स्तुती करणाऱ्यांचा उघड लोभ असतो तसाच तो त्याला विरोध करणाऱ्यांचाही असतो, हे मानून घेतले तरी काही प्रश्न उरतातच आणि त्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
चिपळूणला झालेल्या साहित्य संमेलनात राजकीय लोकांची उपस्थिती हा वादाचा विषय ठरला होता. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्घाटनाच्या भाषणात केलेल्या फटकेबाजीमुळे हा वाद किती निरर्थक होता हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले आणि पाहिले आहे; पण त्यापुढे जाऊन साहित्य महामंडळाने त्याचे केलेले समर्थन हा भाग चर्चेला घेण्याशिवाय पर्याय नाही. साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. उषा तांबे यांनी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाबाबत केलेल्या दोन-चार विधानांचा उल्लेख करावा लागेल आणि मग साहित्य संमेलनाच्या यशापयशाबाबत चर्चा करता येईल. सौ. तांबे म्हणाल्या, ""साहित्य संमेलनाच्या पत्रिकेकडे बघून लोक दोन टिपण्या करतात. समजा जर आम्ही नामांकित लोकांना बोलावले तर टीका करणारे म्हणतात, की त्याच त्या चेहऱ्यांना साहित्य संमेलनात कायम बोलावले जाते, तर समजा आम्ही नव्या लोकांना संधी दिली तर कार्यक्रम पत्रिका फडकवत लोक विचारतात यातील एक तरी ओळखीचे आहे का?'' हे सांगताना आम्ही नव्या चेहऱ्यांना व्यासपीठ मिळवून देतोय अशी मखलाशीही सौ. तांबेबाईंनी मारली; पण संमेलनात नावे नवीन असणं आणि त्यातून काहीतरी मिळणं या बाबीही आवश्यक आहेत. ते मात्र कुठेच दिसले नाही. खुल्या गप्पा, कथाकथन, कविसंमेलनासह सहा परिसंवाद होते; पण हे सगळेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंगाने गेले. काही वक्ते खरेच चांगले बोलले यात वाद नाही; पण सहाहून अधिक परिसंवादात 24 हून अधिक वक्ते बोलूनही चांगल्या वक्त्यांची नावे सांगायला एका हाताची बोटेही खूप व्हावीत यासारखे दुर्दैव नाही. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर यांच्या खुल्या गप्पा रंगल्या. खरे तर या गप्पांची संमेलनात आवश्यकता होती का? हा प्रश्न पडावा अशा पद्धतीने त्याचे आयोजन आणि सादरीकरण झाले. नायगावकर आणि फुटाणे यांनी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात आणि जगभरातील कार्यक्रमांत जे सांगितले तेच त्यांनी संमेलनाच्या मुख्य सभामंडपाच्या व्यासपीठावरून सांगितले. त्यात नावीन्य काहीच नव्हते. मुख्य सभामंडपात किती गर्दी झाली याचा उल्लेख नंतर समारोपाच्या भाषणात नियोजन समितीतील सर्वच वक्त्यांनी केला असला तरी केवळ सभामंडपातील उपस्थितीवर संमेलन यशस्वी मानायचे असते तर मग आणखी दोन चार सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन चार हिंदी-मराठी अभिनेत्रींना बोलावले असते तर गर्दीचा उच्चांक झाला असता. रंजनात्मक कार्यक्रमांची आवश्यकता कोणी नाकारत नाही. अगदी संमेलनात रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही आक्षेप असण्याचे कारण नाही; पण मुख्य सभामंडपातला पहिलाच गप्पांचा कार्यक्रम आणि तोही या पद्धतीने करायचा म्हणजे साहित्य संमेलनाला उपस्थित साहित्यप्रेमींपेक्षा राजकारण्यांचाच विचार झाल्याचे स्पष्ट होते आहे.
मुख्य सभामंडपातील कार्यक्रम आणि सभामंडप क्रमांक दोनमधील कार्यक्रमांवर बारकाईने बघितले तर साहित्यसंमेलनात साहित्यालाच अस्पृश्य मानले आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. जागतिकीकरण आणि मराठी कादंबरी या शीर्षकाखाली एक परिसंवाद दोन क्रमांकाच्या सभामंडपात झाला. त्यात एक दोन वक्ते खरेच चांगले बोलले. अगदी श्रीराम पचिंद्रे यांनी जागतिकीकरणात ग्रामीण महाराष्ट्र कसा बदलला याचे चांगले विवेचन केले; पण परिसंवाद हा काही व्याख्यान असत नाही. त्यात उपस्थितांनी त्याच्या अनेक पैलूंवर चर्चा करावी, ही अपेक्षा असते; पण ती काही झाल्याचे चित्र समोर आले नाही. जागतिकीकरणात मराठी कादंबरी कित्येक मैल लांब असताना आणि आंग्लेतर भाषांमध्ये त्याचे प्रतिनिधित्व चांगले उमटले असताना मराठी मात्र याबाबत अनेक बाबतीत का मागे राहिली, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अनुवादित साहित्याला मराठीत चांगले दिवस येण्याचे कारण मुळात मराठी कादंबरीकारांनी सकस आणि आताच्या पिढीला आवश्यक विषय हाताळले नाहीत किंवा ते ज्या ताकदीने हाताळायला हवेत तसे ते हाताळले नाहीत, हे सूर्याइतके स्पष्ट आहे; पण त्याबाबत वक्त्यांनी आणि अध्यक्षांनी फारसे विवेचन केले नाही. मुख्य सभामंडपात झालेला आम्ही काय वाचतो आणि का वाचतो हा परिसंवादही असाच. (इथे मुद्दाम मुख्य सभामंडपातील कार्यक्रम असा उल्लेख याचसाठी केला आहे, की राजकारणी मंडळी व्यासपीठावर असतील तर कार्यकर्ते सभागृहात असतातच आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तळ ठोकून राहातात याचा जणू अभ्यासच नियोजन समितीने केला होता.) यातील राजकारण्यांची निवड नियोजन समितीने की साहित्य महामंडळाने भांग पिऊन केली होती का, असा प्रश्न विचारण्याची गरज आहे. राजकारण्यांबाबत राग नाही; पण परिसंवादात किमान काही विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना बोलाविणे आवश्यक होते. महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण या दोनच विचारांच्या लोकांना बोलाविण्याचा अर्थ काय? एक सुनील तटकरे यांनी आपण काहीच वाचत नसल्याचे स्पष्ट करत राजकारण्यांनी समाजमन वाचायला हवे, हे एक वाक्य बोलून परिसंवादाचा नूर बदलला. तुम्ही काय वाचता, त्याचा उपयोग तुमच्या राजकारणात कसा होतो आणि त्या विचारांमुळे तुम्ही त्या पक्षाचे काम करता का, असे साधे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात होते. राजकीय लोक वाचतात का? गंमत म्हणून एक उल्लेख करायला हरकत नाही. व्यासपीठावरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील या दोघांनीही गांधीजींचा उल्लेख केला नाही. गांधीविचाराने आम्ही राजकारण करतो, असे सांगणाऱ्या राजकारण्यांना गांधीजी वाचू वाटले नाहीत, ही बाब आश्चर्याची आणि खेदाचीच म्हणावी लागेल. कदाचित त्यांनी गांधीजी वाचलेही असतील; पण व्यासपीठावरूनही त्यांनी ते सांगणे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांसाठीही गरजेचे होते. हीच बाब भाजपच्या आमदार आणि खासदारांची. आत्मचरित्र आणि चरित्रग्रंथ आम्ही वाचतो, असे सांगणाऱ्या आमदार-खासदारांना गोळवलकर गुरुजी, देवरस आणि संघाच्या नेतृत्वाचा विसर पडला. आम्ही हे वाचतो, ते वाचतो आणि त्याचा आमच्यावर हा परिणाम झाला, तो झाला असे सांगताना आम्ही सोयीचे राजकारण करतो, हेच त्यांनी सांगितले. नियोजन समितीला समाजवादी कोणी मिळाला नसेल हे कदाचित मानण्यासारखे होते; पण आठवले मिळाले असते. मार्क्सवादी एखादा मिळाला असता; पण त्यांनी ते केले नाही. सर्वच विचारांचे प्रतिनिधित्व जसे साहित्य महामंडळाकडे नाही त्याचेच जणू हे प्रतिबिंब होते.
आमच्या रेषा बोलतात भाषा, हा परिसंवादही असाच. चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देताना त्यातील प्रमुख चित्रकारांना बोलायची संधी मिळाली पाहिजे, याचाही अट्ट्हास नियोजन समितीने धरायला हवा होता. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर माईकसमोर येऊन जे चार शब्द बोलले ते खरेच एक मोठे व्यंगचित्रच होते. पुढे कार्यक्रम आहे, आटपा असे सांगत चाललेला परिसंवाद म्हणजे मेंढीला ओढत नेण्याचा प्रकार होता. सभामंडपात राजकारण्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सरकवलेल्या चिठ्ठ्या फार काही सांगून गेल्या. या परिसंवादात शि. द. फडणीस खरेच खूप चांगले बोलले; पण सगळा मूडच आता राजकारणी व्यासपीठावर कधी येणार आणि ते काय बोलणार अशाच आशयाचा होता.
कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था अशा आशयाचा एक परिसंवाद होता. आता यात कहर म्हणजे सूत्रसंचालिकेनेच परिसंवादात भाग घेतला. त्यांना तो अधिकारही आहे; पण परिसंवादात अध्यक्षीय भाषण (भाषण हा शब्द येथे गैरलागू असला तरी साहित्य संमेलनातील बहुतेक सगळ्याच वक्त्यांनी आपल्याला आता भाषण द्यायची संधी मिळाली आहे. पुढे चार टकली बसली आहेत, तर बोला याच अंगाने त्या वेळेचा "सदुपयोग' केला.) झाल्यानंतर परिसंवाद संपतो; पण येथे उलटेच. बाई बोलायला लागल्या. अध्यक्ष महाराज आपल्या खुर्चीत चाळवाचाळव करत होते. त्या परवानगी मागितल्यासारखे करत होत्या. माईक हातात घेऊन अध्यक्ष मान डोलावतील म्हणून बघत होत्या; पण अध्यक्ष काही बोलत नव्हते. मग त्यांनी त्यांची परवानगी आहे असं स्वतःच जाहीर केले आणि सुरू केले. संयोजन समितीतील एक असल्यानेच अध्यक्षांनी (ऐनवेळचे कारण मुळात कार्यक्रम पत्रिकेतील अध्यक्ष आलेच नाहीत) मूक संमती दिली.
कथाकथन, समारोप कार्यक्रम अशा अनेक बाबींवर सविस्तर लिहायला हवे. कथाकथन कार्यक्रमात सहभागी कथाकारांकडून कथा घेतल्या असत्या आणि त्याला लागणारा वेळ निश्चित केला असता तर समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठ रिकामे करून देण्याची घाई झाली नसती. बेल परिसंवादात मारली आणि एखाद्या वक्त्याने आपले आवरते घेतले तर ते फार अडचणीचे ठरत नाही; पण कथा सांगणाऱ्या लेखकाला कथा अर्धवट कशी सोडून माघारी फिरता येईल. समारोपाच्या कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांचे नाव पत्रिकेवर आणि प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेता एवढे 180 अंशांमध्ये बदल करण्याचे धाडसच कसे होते, हा प्रश्न आहे. व्यावहारिक विचार करा म्हणजे प्रश्नाची उत्तरे मिळतील, असे नियोजन समिती आणि महामंडळ सांगत असले तरी व्यावहारिक विचार आणि धंदेवाईक विचार यांत फरक असतो, हेही कुणीतरी सांगायला हवे. केवळ पत्रकारांना गाजराचा हलवा खायला दिला म्हणून ते सगळं गोड-गोड नाही लिहिणार....
बुधवार, २ जानेवारी, २०१३
प्रिय,
प्रिय,
नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! प्रत्येकवेळा पत्राची सुरवात काय करावी हेच कळत नाही. म्हणजे माणूस बघ कोणाशी बोलायचं असेल तर मुद्दाम खाकरतो. कळलं का? ऐकलं का? असे उगाच सांगतो. तसेच पत्र लिहिताना हा उगाचचा पसारा खूप मांडावा लागतो. मग एकदा पसारा मांडला की मग त्यातून हवे ते उचलून दाखविता येते. खरे तर पत्र लिहिण्याचा उद्देश दुस्तर हा घाट. गौरी तुझी आवडती लेखिका होय ना! तुला तिची नमू आवडते! नमू, हरिभाई आणि वनमाळी सगळ्यांच्याच प्रेमात जणू तू. गौरीने खूप सहजतेने नमू निर्मिली आहे. मला नमू अस्वस्थ करुन गेली हे खरेच पण मला आवडला तो नकुल. अलिप्त. मुक्याने प्रेम करणारा. कादंबरीत त्याला फारसा वाव नाही तरीही का कोणास ठावूक पण मला नकूलच आवडला. अर्थात त्याच्यावर गौरीने अन्याय केलाय ही भावनाही आहेच. नकुलचा जेवढा हक्क होता तेवढं काही त्याला मिळालेलं नाही. अगदी त्याला दिलेल्या अपंगत्वासारखंच कादंबरीतील त्याचं अस्तित्वही पंगू करुन ठेवलंय जणू. गौरीने त्याला "नकुल' हे का नाव दिले मला माहीत नाही. कदाचित तो घोड्यावरुन रपेट मारतो एवढ्या एकाच संदर्भासाठीच जर तिने त्याला नकुल म्हटले असेल तर त्या नकुल या नावावरही अन्याय आहे. अर्थात त्या एका कारणासाठी गौरीने त्याला नकुल हे नाव दिले नसणार हे निश्चित. त्याच्यातील आणखी काही पुसटरेषांना अधोरेखीत करण्यासाठी तिने हे नाव दिले असावे पण तरीहीमहाभारतातील नकुलाची बाकीची वैशिष्ट्य गौरीच्या नकुलमध्ये अस्पष्टच दिसतात. काही रेषा आणखी ठळक करता आल्या असत्या तर... तर कदाचित त्या रेषांपुढे वनमाळीच्या रेषा कमकुवत झाल्या असत्या की काय? हा प्रश्न पडतो.
नकुल शब्दाचा मुळात अर्थच देखणा, विद्वान आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारा असा आहे. महाभारतातील नकुल असाच होता. आपल्या भावांवर कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा. अश्वप्रशिक्षणात प्रवीण असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनक पित्याचे रुप घेतलेला. माद्रीची दोन्ही मुले देखणी होती. सहदेव आणि नकुल. पण त्यातही नकुल उजवा होता. व्यासांनी अर्जुनाला पुर्ण पुरुष केले पण आकर्षक ठेवले नकुलला. तो एवढा देखणा होता की त्याच्यासारखा देखणा पुरुष त्याकाळी अस्तित्वातच नव्हता. ( लक्षात घे कृष्ण आणि अर्जुन दोघे असतानाही नकुलाबाबत जर ही अख्यायिका असेल तर तो किती देखणा असेल!) त्यामुळेच अज्ञातवासाच्या काळात नकुलला आपल्या अंगावर राख आणि माती माखून घेऊन रुप लपवावे लागले होते. अशा देखण्या पुरुषाचे नाव देताना गौरीने या नकुलवर प्रचंड अन्यायच केला ही भावना तीव्र होते. त्यात त्याला पंगू करुन तर तिने नकुलवर सुड उगवलाय की काय असे वाटत राहाते. वनमाळीचे रुप आणि नकुलाचे रुप हे भिन्न. अगदी कृष्ण आणि नकुलासारखे. दोघांच्या रुपातला गोडवा वेगळा. दोघांची प्रेम करण्याची ते जाणवू द्यायची पद्धत वेगळी. पण तरीही महाभारतातल्या नकुलाला मिळालेली अवहेलना गौरीनेही कायम ठेवली म्हणायला वाव आहे. खरे तर तिने नकुल हे नावच घ्यायला नको होते.
पांडवांच्यात सगळ्यात कर्तृत्वान पुरुष होता अर्जून त्याखालोखाल भीम मग युधिष्ठीर आणि नकुल सहदेव हे पांडवांची पाच नावे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली दोन कडी एवढ्याच अंगाने येतात. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी त्वेषाने लालेलाल झालेला भीम लोकांना दिसला, पण त्याचवेळी आपल्या भावाच्या प्रेमाखातर गप्प बसावे लागल्याची विषन्नता मनात दाबून काळाठिक्क पडलेला नकुल नाही कोणाला दिसला. मल्लविद्येत निपून असलेला भीम, धनुर्विद्येत एकमेवाव्दितिय असलेला अर्जून किंवा धर्मनिष्ठेने राहणाऱ्या युधिष्ठिराच्या झोळीत व्यासांनी भरभरुन माप ओतले. पण माद्रीच्या नकुल आणि सहदेवाच्या ओंजळीत तिर्थ घालतानाही जणू कंजूषपणा केला. यक्ष प्रश्नावेळीसुद्धा युधिष्ठीर माद्रीचा एक पुत्र मागतो तो माद्रीवर उपकार करत असल्यासारखा. त्याला तर भीम आणि अर्जुनच हवा असतो पण मग मी कुंतीचा एक मुलगा जिवंत असताना दुसराही कुंतीचा कशाला त्यापेक्षा माद्रीचा एक. त्यात भावना आणि धर्म असेलही पण त्यातही व्यासांनी नकुलला किंवा सहदेवाला त्यांच्या अंगभूत कर्तृत्वाची शबासकी दिलेली नाही. त्या प्रश्नावेळी तर युधिष्ठीराला त्यागाची मूर्ती दाखविताना नकुल आणि सहदेवाला नालायकच जणू दाखविण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे मूळ महाभारतात नकुलला त्याचे माप ओंजळीत टाकलेलेच नाही उलट त्याच्याकडे असलेल्या अश्वविद्येचा आणि तलवारबाजीत निपूण असलेल्या कलेचा ओझरता उल्लेख केला आहे. महायुद्धात अर्जूनाने रथ अडकलेल्या कर्णाचा वध केला तोही शल्याच्या सारथ्यामुळे. शल्य हा सहदेव आणि नकुलचा मामा. त्यामुळे आपल्या भाच्यांचा पराभव होऊ नये म्हणून क्षणोक्षणी त्याने कर्णाचा तेजोभंग केला आणि त्याचा रथ चिखलात अडकला. अर्जूनाने कर्णाचा वध काय किंवा भिष्म, द्रोणाचा केलेला वध हा युद्धनिपूणतेवर कुठे केला आहे. कधी शिखंडीची मदत तर कधी युधिष्ठिराची मदत घेऊन कट-कारस्थाने रचून विजय मिळविले. पण त्याचवेळी धर्माने युद्ध करणाऱ्या नकुलने कर्णादि कौरंवाच्या मुलांचा केलेला पराभव अगदी त्रोटकपणे मांडला आहे. व्यासांनी कदाचित सर्वांना समान न्यायाने वागवले असेलही पण त्यानंतर महाभारत जीरविणाऱ्या लोकांनी मात्र नकुल आणि सहदेवाला खड्यासारखे बाजुला काढून ठेवले हे मात्र खरे. गौरीनेही तेच केले. नकुलला तेवढेच महत्त्व दिले. त्याच्यातील अंतर्विरोध, त्याच्या भावना सगळे कसे त्याच्यासोबतीनेच ठेवले. त्याचे नमूवर प्रेम आहे का? नमू त्याच्याबाबतीत नेमका किती विचार करते ते स्पष्टपणे येतच नाही. तोही येता-जाता येतो. डोकावतो आणि निघून जातो. घर करुन राहात नाही. तो घर करतो अगदी काहींच्याच मनात. त्यांना तो हॅण्डसम वाटतो कदाचित दुर्लक्षित किंवा अजाणही. त्याच्या एकटेपणाची किव येत नाही तर त्याच्या एकटेपणाबाबत कुतुहलता वाटते. कुसुमाग्रजांची एक कविता आहे . अहि नकुल नावाची त्या कवितेतला नकुलही असाच. अचानक येणारा आणि आपले कार्य संपल्यावर निघून जाणारा. रेंगाळणे हे त्याच्या प्राक्तनात नाहीच. रेंगाळले की आशा वाढते आणि आशा वाढल्या कि त्यातून अटी निर्माण होतात. त्यामुळे तो अटी निर्माण करत नाही. जे द्यायचे त्याचा हिशोब मांडत नाही. त्यासाठी त्याला काही वेदना होतात का? याचाही हिशोब नसतो. म्हणूनच त्याला नकुल म्हणतात. मला नकुलासारखे प्रेम करणे ज्याक्षणी जमेल त्या क्षणाची वाट बघतोय.
तुझाच...
गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२
प्रिय,
सुनीताबाई देशपांडे यांचा उल्लेख मागच्या पत्रात झाला होता. तो सहज आला आज मात्र तो मुद्दाम करतो आहे. बाईंची दोन-तीन पुस्तके पूर्वी कॉलेजमध्ये असताना वाचली होती. त्यातील आहे मनोहर तरी हे तर सगळ्या गावाने सांगितल्यामुळे केवळ उत्सुकतेपोटी वाचले आणि मग ठेवून दिले. त्याचा त्या वयातही फारसा परिणाम झाला नाही. पु.लं.च्या बद्दल त्यांनी एक दोन जिव्हारी लावणारे उल्लेख केले असले तरी त्याचा मूर्तीभंजन वैगेरे होण्याचा काही परीणाम झाला नाही. खरे तर त्या वेळी या जातकुळीतील अनेक पुस्तके वाचली होती. वाचली कसली चावलीच होती ती. कांचन घाणेकरचे नाथ हा माझा आणि माधवी देसाई यांचे नाच गं घुमा... पण या पुस्तकांमुळे काशिनाथ घाणेकरांबद्दल वेगळं वाटण्याचा संभव नव्हता कारण त्यांना काही मी रंगमंचावर कधी बघितले नव्हते. रंगमंचावरील त्यांच्या अभिनयाचे विश्लेषण जाणकार नाटककाराने केले असते आणि त्यावर जर काही प्रश्नचिन्हे उपस्थित केली असती तर ती मान्यही झाली असती. पण ते तसे नव्हते हे मनाशी पक्के ठाऊक असल्याने मूर्तीभंजन झाले नाही हे खरेच. विषयांतर हा पत्रकारांना राजकारण्यांकडून मिळालेला संसर्ग आहे की काय असा प्रश्न मला अलीकडील काळात पडायला लागला आहे. नाही तर पत्राचा विषय आणि आशय या दोन्ही बाबतीत मी जे काही विषयांतर करतो त्याची कारणमिमांसा करताच येत नाही. असो! तर सुनीताबाईंनी लिहिलेल्या त्या पुस्तकाचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर मात्र सुनीताबाईंनी पु.लं. गेल्यानंतर लिहिलेल्या लेखाने परत त्यांना वाचावे वाटू लागले. "मण्यांची माळ' फारसं रुचलं नाही. पण मग प्रिय जी. ए. वाचनात आले. जी.ए. बद्दल प्रचंड कुतूहल होतेच पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या कथांतून दिसणाऱ्या अंधाराचे कुतूहल किंवा ओढ जास्त होती. त्यापायी प्रिय जि. ए. हातात घेतले. त्या पत्रातून एखादा कवडसा त्या अंधारावर पडावा हीच अपेक्षा होती. पण झालं भलतंच. सुनीताबाईंच्या पत्रात जी. ए. भेटतात ते पुन्हा अंधाराच्या अनेक छटांमधुन. दरीतील खोल अंधार, गुहेतील अंधार आणि त्यापेक्षा जास्त खोल विहिरीतील खुणावणारा अंधार. खरे तर त्या विहिरीत नेमकं किती गोड पाणी आहे हे बघण्यासाठी खोल खोल उतरत राहातो पण तरीही एखादी पायरी चुकतेच. काळजाचा ठेका चुकतो. पुन्हा सावरतो. त्या विहिरीत पुन्हा उतरायचे नाही असे ठरवून वर येतो आणि पुन्हा पुन्हा ती विहीर खुणावत राहाते. त्या विहिरीतील तो निळाशार काळोख अजब आहे. सुनीताबाई त्या अंधारात आपल्या घेऊन जातात आणि मग हलकेच आपला हात सोडवून पुढे निघून जातात. मग आपला प्रवास सुरू होतो. त्या काळोखातून पुढे जाण्याचा. खोल उतरत राहण्याचा. काळोखात भरकटत राहावं वाटणं हेच तर जी. ए.चं वैशिष्ट्य. त्यातील प्रत्येक पत्र असेच आहे. त्या विहिरीकडे नेणारे, खोलपर्यंत पोचविणारे आणि पुन्हा माघारी फिरायला लावणारे. झिंग आणणारे आहे हे. व्यसनी माणुस एकाच गोष्टीकडे परत परत का वळतो याचे कारण येथे कळते. ती झिंग हवी-हवीशी वाटते. त्याच-त्या सुखासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी माणुस पुन्हा पुन्हा करतो. त्यामुळेच ती पत्रे.. (तशी सगळीच पत्रे आपली) पुन्हा पुन्हा वाचत असतो. तूही वाचली असशील ती पत्रे. तरी पुन्हा एकदा वाच.. अनेकदा त्या पत्रातून तू दिसतेस. आहा! काय पण प्रत्येकवेळा मीच कशी दिसते रे तुला? असा प्रश्न तुझ्या डोक्यात उमटेलही.. पण खरेच तू दिसतेस. भांडणारी.. आपल्या मतांवर ठाम असणारी... पत्र हा खरे तर वैयक्तिक मामला. पण तो वैयक्तिक राहात नाही. याचे कारण व्यक्तीला चिकटलेले सगळे गुण-दोष त्यातून प्रकट होतात. ते काही एकाच व्यक्तीची मक्तेदारी असू शकत नाही. तशाच गुणांच्या अनेक व्यक्ती असतातच. त्यामुळे प्रत्येकवेळी मीच कशी दिसते असा जर तुझा प्रतिवाद असेल तर तो आधीच खोडून काढलेला बरा. " तुम होती तो ऐसा होता' च्या तालावर हे नाही... तुम ही हो चा ताल आहे हा.. बाकी.. आज शतकातील सर्वात अनोखा दिवस होता. 12-12-12.. भारीच ना! आपल्या आयुष्यात आता पुन्हा ही तारीख येणार नाही. पुढच्या या तारखेला कदाचित तू असू शकतेस...( हा हा...मी तुझ्यापेक्षा लहान आहे हा तुझा युक्तिवाद असतो ना म्हणून.) हा झाला विनोदाचा भाग. पण असे दिवस, असे काही क्षण साठवून ठेवावे वाटतात. ते साठवायचे असतातही. पण आज काहीच नाही.. साठवण्यासारखे.. दिवस असा-तसाच गेला.. अगदी रोजची कामेही नीट झाली नाहीत... मग चला तुला पत्र लिहावे म्हणून पत्र लिहायला घेतले..पत्र बारा तारखेलाच लिहिले आहे. कदाचित ते 13 तारखेला पोस्ट होईल. पण ते लिहून झालं बारा तारखेला. बारा तारीख खरेच किती महत्त्वाची आहे तुलाही माहीत आहे.....मागच्या पत्रात लिहिलं होतं की प्रत्येक पत्र कुठे स्वतंत्र असतं आता हेच बघ ना? हेही त्याच माळेतील पत्र.. तुझाच.... |
मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२
प्रिय,
सुनीताबाई देशपांडे म्हणतात, तुमचं पहिलं पत्र हे निव्वळ पत्र किंवा मूळ
पत्र आणि बाकीची सगळी पत्रे ही पत्रोत्तरे. खरे असेलही. पत्राला उत्तर लिहिताना
किंवा त्याचा संदर्भ घेऊन लिहिताना ते पत्र मूळ पत्र राहत नाही. पत्रांच्या माळेतील
तो एक मणी होतो, त्याचे अस्तित्व त्या माळेतील इतर मण्यांप्रमाणेच असते. वेगळे
अस्तित्व त्याला असत नाही. दोन्ही हात एकमेकांत गुंफून घेतलेल्या शिल्पाप्रमाणे.
त्यातील प्रत्येक शिल्प आपपल्या ठिकाणी सुंदर दिसत असले तरी, त्या शिल्पांना
एकमेकांपासून दूर करता येत नाही. ते केलं की मग अपुरेपणा जाणवतो. मूळ पत्रात तो
अपुरेपणा असत नाही. पण मूळ पत्र म्हणजे तरी काय? प्रत्येक पत्र मूळ पत्र असू शकते
का? छे! प्रत्येक पत्र कधीच मूळ असू शकत नाही. पहिले पत्र केवळ मूळ म्हणता येईल.
बाकीची सगळी पत्रे ही पुन्हा माळेतील मणीच. त्याला एकमेकांपासून दूर नाही करता
येणार. आता हेच बघ. तुला लिहिलेले पहिले पत्र आणि त्यानंतरची ही सगळी पत्रे ही एका
अदृश्य अशा कडीत बांधलेलीच आहेत की. त्यातून त्यांना वेगळे करता येणार नाही.
पहिल्याच पत्रात फक्त तुम्हाला तुमचेपण मांडता येते. बाकीच्या पुढच्या सगळ्या
पत्रांमध्ये तो पहिला धागा असतोच, कधी उत्तरांचा तर कधी प्रश्नांचा. पण ज्या
पत्रांना उत्तरे मिळत नाहीत, ती पत्रे पुन्हा मूळ पत्रासारखी असतात का? छे तीही मूळ
असत नाही. जाऊ दे ! आपण या भानगडीतच न पडलेले बरे. मला तुला जे सांगायचे आहे ते
सांगितले म्हणजे झाले. ते पत्र मग मूळ आहे की पत्रांच्या कडीमधले याला काही अर्थ
असत नाही.
तू साथ-साथ चित्रपट बघितला असशीलच ना? दीप्ती तुलाही आवडते आणि मलाही. तिच्या डोळ्यात तुझे साधेपण दिसते. खरे तर नूतनच्या मीनाक्षी डोळ्यांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलके आहेत. हे कधीतरी सांगायचे होते, पण ते राहिलेच. तर दीप्तीचा साथ-साथ चित्रपट. त्यातील बहुतेक गाणी सुंदरच आहेत. पण तरीही "तुम को देखा तो ये ख्याल आया ' हे गाणं अप्रतिम. तुझ्या आवडत्या जगजीतसिंहने गायलेले. पडद्यावर फारुख डोळ्यात ीजतका आर्त भाव आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मागे गेलेले केस आणि समोर साधी पण आश्वासक दीप्ती. जगजीतच्या पहिल्या हुंकारापासून आणि चित्राच्या आलापापासून गाणं खोल मनात उतरत राहातं. समोरची दीप्ती हळूहळू विरत जाऊन तिथे तू दिसू लागतेस. खास करुन ज्या वेळी आज फिर हमने इक तमन्ना की, ही ओळ तो गातो त्यावेळी हाय! जणू ती ओढणी आपल्याच हातात असल्याचा भास होतो. तो ज्या सहजतेने ती सोडून देतो आणि म्हणतो "आज फिर दिल को हमने समझाया... हाय... दीप्तीच्या चेहऱ्यावरचे ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मागे केस हलक्या हाताने घेणारी. मान हलकेच तिरकी करुन बोलणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे मी नजर चुकवत असताना धिटाईने नजर मिळविणारी... तूच आणखी कोण असणार.. "हम जिसे गुणगुणा नही सकते...' हे कडवं गाताना जगजीतचाही घसा थोडा कोरडा पडला असणार नक्की. काही वेळाच अशा असतात.. त्यांची गाणी आपल्याला गुणगुणायला येतच नाहीत... कितीही ओठांवर असलं तरी सांगता येत नाही हेच खरे.... आज पुन्हा तुझी आठवण खूप दाटून आली. असे काही क्षण असतात त्यावेळी खूप सैरभैर व्हायला होतं. जगणंच अवघड वाटायला लागतं, पण हे क्षण धिटाईने पेलायला लागतात. ही कला मला यायला लागली आहे असे वाटते तरी काही क्षण सुटतातच की... आजही आठवणींचा आवेग आवरून धरला आहे. आज पुन्हा मनाला समजावलं आहे....
तुझाच
तू साथ-साथ चित्रपट बघितला असशीलच ना? दीप्ती तुलाही आवडते आणि मलाही. तिच्या डोळ्यात तुझे साधेपण दिसते. खरे तर नूतनच्या मीनाक्षी डोळ्यांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलके आहेत. हे कधीतरी सांगायचे होते, पण ते राहिलेच. तर दीप्तीचा साथ-साथ चित्रपट. त्यातील बहुतेक गाणी सुंदरच आहेत. पण तरीही "तुम को देखा तो ये ख्याल आया ' हे गाणं अप्रतिम. तुझ्या आवडत्या जगजीतसिंहने गायलेले. पडद्यावर फारुख डोळ्यात ीजतका आर्त भाव आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मागे गेलेले केस आणि समोर साधी पण आश्वासक दीप्ती. जगजीतच्या पहिल्या हुंकारापासून आणि चित्राच्या आलापापासून गाणं खोल मनात उतरत राहातं. समोरची दीप्ती हळूहळू विरत जाऊन तिथे तू दिसू लागतेस. खास करुन ज्या वेळी आज फिर हमने इक तमन्ना की, ही ओळ तो गातो त्यावेळी हाय! जणू ती ओढणी आपल्याच हातात असल्याचा भास होतो. तो ज्या सहजतेने ती सोडून देतो आणि म्हणतो "आज फिर दिल को हमने समझाया... हाय... दीप्तीच्या चेहऱ्यावरचे ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मागे केस हलक्या हाताने घेणारी. मान हलकेच तिरकी करुन बोलणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे मी नजर चुकवत असताना धिटाईने नजर मिळविणारी... तूच आणखी कोण असणार.. "हम जिसे गुणगुणा नही सकते...' हे कडवं गाताना जगजीतचाही घसा थोडा कोरडा पडला असणार नक्की. काही वेळाच अशा असतात.. त्यांची गाणी आपल्याला गुणगुणायला येतच नाहीत... कितीही ओठांवर असलं तरी सांगता येत नाही हेच खरे.... आज पुन्हा तुझी आठवण खूप दाटून आली. असे काही क्षण असतात त्यावेळी खूप सैरभैर व्हायला होतं. जगणंच अवघड वाटायला लागतं, पण हे क्षण धिटाईने पेलायला लागतात. ही कला मला यायला लागली आहे असे वाटते तरी काही क्षण सुटतातच की... आजही आठवणींचा आवेग आवरून धरला आहे. आज पुन्हा मनाला समजावलं आहे....
तुझाच
रविवार, २ सप्टेंबर, २०१२
प्रिय,
तुझी आठवण आली की... छे! आठवण हा शब्दच चुकीचा. तुझ्याशी खूप बोलावं वाटलं की पत्र लिहिणं हे आता माझं नित्याचं झालं आहे. तुझ्याशी बोलायचे म्हणजेच तुला पत्र लिहायचे, म्हणजे तुझं वेगळं अस्तित्व मान्य करायचं. म्हणूनच या पत्र लिहिण्याच्या काळापुरता का होईना, मी तुझ्यापासून वेगळा होतो. तुला माझ्यातून बाहेर काढून, तुझ्याशी गप्पा मारण्याचा हा एकच मार्ग माझ्याकडे आता उरला आहे. एवढंच. जगातील माहीत झालेली प्रत्येक गोष्ट तुला सांगावी, त्या गोष्टीकडे तुझ्या डोळ्यांनी बघावे अशी खूप इच्छा असते, पण.. पण हा पण आडवा येतो. म्हणून हा पत्रप्रपंच. तुझ्यापर्यंत पोचण्याचा. तुला पुन्हा पुन्हा आळवत स्वतःला जगवत ठेवण्याचा. एकदा का तू समोर आलीस की मग अनेक गोष्टी सुचू लागतात. काही उपयोगाच्या काही निरूपयोगी, तरीही मग मी बरळत राहातो. तुझ्याशी बोलत राहातो अखंडपणे. आताही असंच होईल. विषय एक आणि मी भलतंच काहीतरी सांगत राहीन.......
रामायणाचा मी अनेक अंगाने विचार करतो. रामायणातील प्रत्येक पात्र प्रत्येकवेळी वेगळी भासतात. त्याच्याकडे तर्काने बघितले तर ती आपापल्या जागा सोडून दुसऱ्याच जागा घेताना दिसतात. श्रद्धेने बघितले तर त्यांच्यात दैवत्व दिसते, तर डोळ्यांना मर्यादा दिसतात. पण हीच पात्रे मनाच्या चक्षुतून बघितली की तर त्यांची उंची कैक पटीने वाढते. रामायण आणि महाभारताचे हेच तर वैशिष्ट्य आहे कि त्यांतील अनेक पात्रे आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे भेटतात. ती कोणालाच भेट नाकारत नाहीत. जसे समोरच्याला हवे तसेच ती भेटत राहातात. आता हेच बघ. रामायणात जर उत्तम प्रेमकथा आहेत असं म्हटलं तर तुलाही शंका येईल. पण खरेच रामायणात अप्रतिम अशा प्रेमकथा आहेत. राम-सीता, रावण-मंदोदरी, लक्ष्मण-उर्मिला अशा अनेक. पण यांत प्रेमाचे सगळे रंग दिसतात ते राम-सीता प्रेमकथेत. रावण-मंदोदरीला कधी वियोग सहनच करावा लागला नाही. रावणाचे मंदोदरीवर इतके प्रेम होते, त्यामुळेच समोर सीतेसारखी रुपगर्वीता असतानाही त्याचे मन चळले नाही. लक्ष्मण-उर्मिला यांच्यात वियोगाचा एक मोठा कालखंड आला पण नंतर ते एकत्र झाले. अगदी शेवटपर्यंत. राम-सीतेच्या प्राक्तनात मात्र मिलन-वियोग-मिलन आणि पुन्हा वियोग आहे. खरे तर खूप मोठी आणि उत्सुकतेने ताणलेली ही प्रेमकथा आहे. आपल्या पुराणांनी याबाबत अनेक श्लोक लिहिले आहेत. ते अनेकदा अतिशयोक्ती अलंकारांनी सजलेले वाटतात, तरीही त्यात राम आणि सीतेच्या प्रेमाचे रंग अचूकतेने टिपलेले आहेत. एका श्लोकाचा अर्थच मुळी असा आहे. रावणाने सीतेला पळवून आणून अशोकवनात ठेवलेली असते. रामाच्या वियोगाने सीता प्रचंड दुःखी झालेली आहे आणि तिला रामाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ती तिच्या सेवेत असलेल्या त्रीजटा नामक राक्षसीला म्हणते, त्रीजटे मला आता भीती वाटू लागली आहे. ज्या प्रमाणे किडा कुंभार माशीचे सतत ध्यान करतो आणि तिचेच रुप घेतो, अगदी तसेच माझे झाले आहे. मी रामाचा इतका विचार करते, त्याचे इतके चिंतन करते की मला कधी कधी वाटते की मी रामच होऊन जाईन. पण मी राम झाले तर संसारसुख कसे घेणार?, त्यावर त्रीजटा तिला म्हणते, ""अगं तू जसा रामाचा विचार करतेस अगदी तसाच रामही तुझाच विचार आणि चिंतन करतो आहे. त्यामुळे जर तू राम बनलीस तर तोही सीता बनेल. मग राम बनलेली तू रावणाचा वध कर आणि आपल्या सीतेकडे जा.
राम आणि सीतेतला हा प्रेमगंध खरेच अगदी वेगळा आहे. विरह
प्रेमाचा हा रंग विरहात असलेल्यांनाच कळतो, कळावा. विरह रंग हाच तर प्रेमाचा खरा रंग. मलाही कधी कधी वाटतं माझंही असंच होईल. मलाही तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. जगण्याचे मार्ग सगळे तुझ्याभोवतीच घुमत राहातात. मी तुझा इतका विचार करतो आहे की कदाचित मी तूच बनून जातो की काय असं वाटत राहातं. तुझ्या बोलण्यासारखं बोलू लागतो. अलीकडे तर अनेक शब्द तुझेच तोंडात येतात. तुझ्या आवडी निवडी माझ्याच होऊन गेल्या आहेत. कधी कधी मी चटकन असा बोलून वा वागून जातो की मी असा नव्हतोच कधी . कुंभारमाशीच्या चिंतनात अडकलेल्या किड्यासारखा मीही कुंभारमाशीच होऊ लागलो आहे. पण या कुंभारमाशी होण्यातही एक मजा आहे. एक गुंगी आहे हे खरेच.
तुझाच...
रविवार, २६ ऑगस्ट, २०१२
"पॉलीश'
"पॉलीश'
एवढाच शब्द त्याने उच्चारला आणि त्याच्यापुढे पाय पुढे केला.
झाडाखाली बसलेल्या त्या सत्तरीतल्या चांभाराने एकदा त्याच्याकडं बघितलं आणि आपल्याकडचा चपलांचा एक जोडा त्याच्यापुढं ढकलला.
त्याने त्या जोड्यात पाय घुसविले आणि तसाच उभा राहिला.
लय दिस झालं, पन बुटाचं हे मॉडेल नायी बघिटलं. मागं लय फॅशन व्हती याची, पर आता कोन न्हाय वापरत.
चांभाराच्या त्या वाक्याने त्याला उगाचच अंगावर मास चढल्यासारखं वाटलं. आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्यांवर ताव मारत त्यानं नुसतं स्मित केलं. उगाचच आपल्या दाढी केलेल्या तुळतुळीत गालावरून हात फिरवला. कोटाची बटने काढली आणि पुन्हा घातली.
साधं करू की पेशल?
हं. स्पेशल. त्यानं आवाजात जितका जरब आणता येईल तितका आणला.
सायब कसं हाय! तुमच्यासारख्या लोकांस्नी असा चकचकीतच बूट लागतो. चालायचं कुठं असतंया. गाडीत बसला की धूम निघाला.....
हं.. चांभाराच्या त्या जवळीकतेनं तो थोडा अस्वस्थ झाला. बोलून चालून चांभार, दिडदमड्या मिळविणार आणि किती आगाऊपणे बोलतो, असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
किती वेळ? त्यानं पुन्हा आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न केला, पण ती तितकीशी जमली नाही.
लय नायी, पर चकाकी तर आली पाईजे..
हं. तो गप्प बसला.
बराचवेळ शांतता तशीच राहिली. कोणीच काही बोललं नाही. त्या चांभाराचे हात वेगानं बुटावर फिरत होते. मघापासून हातापेक्षा वेगाने चालणारी त्याची जीभ थंड पडली होती. एक बूट झाल्यावर त्यानं दुसरा हातात घेतला. त्याच्यावर तो ब्रश फिरवू लागला.
आपण उगाचच त्याला थांबवलं, असं वाटून त्यानं काही तरी प्रश्न करायचा म्हणून केला.
हं. किती वर्षे झाली. इथे बसतोस?
हं...
आता त्या चांभारानं त्याचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यानं गप्पपणे आपलं काम सुरूच ठेवले. सायबाने समोर बघितलं. उन तसं बऱ्यापैकी होतं. अंगातून आता घाम येऊ लागला होता. तो ज्या गाडीतून आला होता, ती नवीकोरी गाडी समोरच उभी होती. गाडीच्या थंडाव्यात जा,वं असं त्याला वाटून गेलं. पण त्यानं तो विचार टाळला. त्या चांभाराशेजारी असलेल्या एका मोडक्या खुर्चीवर त्यानं रुमाल टाकला आणि तिथंच बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. ती शांतता त्याला आणखी डसू लागली.
त्यानं पुन्हा विचारलं.
किती वर्षे झाली. इथे बसतोस?
वरीस, दोन वरीस झालं असल की, इथं बसतो. तेच्याआगुदर.. तो बघा बंगला तिथं बसायचो. म्हणजे तिथं बंगला नव्हता. व्हतं एक घर. त्याच्या पुढ्यात एक झाड व्हुतं. तिथं बसायचो, न्हान व्हतो, तवापसनं.
त्यानं त्या बंगल्याकडे बघितलं. खूपच दिमाखात तो बंगला उभा होता.
मागल्या साली घर पाडलं. अन् आता तिथं बंगला झाला. म्या ज्या झाडाखाली बसत हुतो ते झाड बी तोडलं गेलं. मंग काय. काही दिस बंगल्याच्या भित्तीला टेकून टाका घालायचो. पन एकदा वाचमन चिडला, म्हणाला सायबांकडं लय पावणं येणार हायती, उठ इथंनं. मग दोन चार दिसाला कोण कोण येत राहिलं आणि मग म्या सरळ इथ मुक्काम ठोकला.' तो बोलत होता.
""मोठ्या बंगल्यांस्नी न्हान माणसं पेलवत न्हायीत सायेब. तेंच्या शिरमंतीपुढं आपल्यावानी गबाळ्याचा कशापायी संसार थाटायचा. ह्या बुटांचं भारी असतंया बघा, गरीब दिसू लागली की हात फिरवायचा. थोडं पॉलीश केलं की झ्याक नव्यावानी दिसतंया. माणसांचं तसं नसतंया. माणसांना का कोणी पॉलीश करणार. म्हणलं त्यांचं नशीब त्यांच्याकडं आपलं आपल्याकडं. आपण जनमलोच तुटक्या चपलेवानी, दोन-चार टाकं काय घातलं तेवढंच आपलं. आता ते बी काय उपेगाचं न्हायी. शिवायला आता तळ बी राहिला न्हायी.''
हं.. सायबानं आता नुसता हुंकार भरला.
तू बघितलं आहेस त्या बंगल्यातील सायबांना? पुन्हा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं प्रश्न केला.
नाय बा, काळ्या काचंच्या गाड्यातली माणसं कुठं दिसत्यात गरीबाला. पर गाड्या बघितल्यात. लय झ्याक हायती. तुमची ही गाडी बी तशीच, पर त्या बंगल्यातील गाड्या लय निराळ्या. रोज येगळी गाडी.
तो गप्प बसून राहिला. त्यानं त्या बंगल्याकडं एक नजर टाकली आणि पुन्हा त्या चांभाराकडं. त्याने आता दोन्ही बूट चकचकीत करुन ठेवले होते.
चांभाराने त्याच्याकडे बघितले.
त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. पण तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर पुढे आला, ड्रायव्हरने पन्नासाची एक नोट त्याच्यापुढे ठेवली. साहेब गाडीत बसून निघून गेला. चांभाराने त्याच्या गाडीकडे बघितले. गाडी त्या बंगल्याच शिरली.
चांभार स्वतःशीच हसला. त्या बंगल्याच्या सायबालाच आपण सांगत व्हुतो की. त्याने मान हलवली आणि सायबानं टाकलेल्या पन्नाशीच्या नोटेकडं बघत चांभार पुटपुटला, आजचा दिस गेला आता, उद्याचं उद्या बघू.
त्यानं तिथं ठेवलेलं आपलं सामान आवरायला सुरवात केली. सायब बसलेल्या खुर्चीवर सायबाचा रुमाल तसाच होता. एवढा मोठ्ठा साहेब आणि त्याचा रुमाल बघून चांभाराला कसंतरीच वाटलं. रुमालाला पडलेल्या भोकांवरुन त्याला समजलं, त्या बंगल्यात जाण्यापूर्वी सायबालाही पॉलीश केलं होतं. माणसांना पॉलीश केलेलं त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं.
एवढाच शब्द त्याने उच्चारला आणि त्याच्यापुढे पाय पुढे केला.
झाडाखाली बसलेल्या त्या सत्तरीतल्या चांभाराने एकदा त्याच्याकडं बघितलं आणि आपल्याकडचा चपलांचा एक जोडा त्याच्यापुढं ढकलला.
त्याने त्या जोड्यात पाय घुसविले आणि तसाच उभा राहिला.
लय दिस झालं, पन बुटाचं हे मॉडेल नायी बघिटलं. मागं लय फॅशन व्हती याची, पर आता कोन न्हाय वापरत.
चांभाराच्या त्या वाक्याने त्याला उगाचच अंगावर मास चढल्यासारखं वाटलं. आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्यांवर ताव मारत त्यानं नुसतं स्मित केलं. उगाचच आपल्या दाढी केलेल्या तुळतुळीत गालावरून हात फिरवला. कोटाची बटने काढली आणि पुन्हा घातली.
साधं करू की पेशल?
हं. स्पेशल. त्यानं आवाजात जितका जरब आणता येईल तितका आणला.
सायब कसं हाय! तुमच्यासारख्या लोकांस्नी असा चकचकीतच बूट लागतो. चालायचं कुठं असतंया. गाडीत बसला की धूम निघाला.....
हं.. चांभाराच्या त्या जवळीकतेनं तो थोडा अस्वस्थ झाला. बोलून चालून चांभार, दिडदमड्या मिळविणार आणि किती आगाऊपणे बोलतो, असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
किती वेळ? त्यानं पुन्हा आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न केला, पण ती तितकीशी जमली नाही.
लय नायी, पर चकाकी तर आली पाईजे..
हं. तो गप्प बसला.
बराचवेळ शांतता तशीच राहिली. कोणीच काही बोललं नाही. त्या चांभाराचे हात वेगानं बुटावर फिरत होते. मघापासून हातापेक्षा वेगाने चालणारी त्याची जीभ थंड पडली होती. एक बूट झाल्यावर त्यानं दुसरा हातात घेतला. त्याच्यावर तो ब्रश फिरवू लागला.
आपण उगाचच त्याला थांबवलं, असं वाटून त्यानं काही तरी प्रश्न करायचा म्हणून केला.
हं. किती वर्षे झाली. इथे बसतोस?
हं...
आता त्या चांभारानं त्याचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यानं गप्पपणे आपलं काम सुरूच ठेवले. सायबाने समोर बघितलं. उन तसं बऱ्यापैकी होतं. अंगातून आता घाम येऊ लागला होता. तो ज्या गाडीतून आला होता, ती नवीकोरी गाडी समोरच उभी होती. गाडीच्या थंडाव्यात जा,वं असं त्याला वाटून गेलं. पण त्यानं तो विचार टाळला. त्या चांभाराशेजारी असलेल्या एका मोडक्या खुर्चीवर त्यानं रुमाल टाकला आणि तिथंच बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. ती शांतता त्याला आणखी डसू लागली.
त्यानं पुन्हा विचारलं.
किती वर्षे झाली. इथे बसतोस?
वरीस, दोन वरीस झालं असल की, इथं बसतो. तेच्याआगुदर.. तो बघा बंगला तिथं बसायचो. म्हणजे तिथं बंगला नव्हता. व्हतं एक घर. त्याच्या पुढ्यात एक झाड व्हुतं. तिथं बसायचो, न्हान व्हतो, तवापसनं.
त्यानं त्या बंगल्याकडे बघितलं. खूपच दिमाखात तो बंगला उभा होता.
मागल्या साली घर पाडलं. अन् आता तिथं बंगला झाला. म्या ज्या झाडाखाली बसत हुतो ते झाड बी तोडलं गेलं. मंग काय. काही दिस बंगल्याच्या भित्तीला टेकून टाका घालायचो. पन एकदा वाचमन चिडला, म्हणाला सायबांकडं लय पावणं येणार हायती, उठ इथंनं. मग दोन चार दिसाला कोण कोण येत राहिलं आणि मग म्या सरळ इथ मुक्काम ठोकला.' तो बोलत होता.
""मोठ्या बंगल्यांस्नी न्हान माणसं पेलवत न्हायीत सायेब. तेंच्या शिरमंतीपुढं आपल्यावानी गबाळ्याचा कशापायी संसार थाटायचा. ह्या बुटांचं भारी असतंया बघा, गरीब दिसू लागली की हात फिरवायचा. थोडं पॉलीश केलं की झ्याक नव्यावानी दिसतंया. माणसांचं तसं नसतंया. माणसांना का कोणी पॉलीश करणार. म्हणलं त्यांचं नशीब त्यांच्याकडं आपलं आपल्याकडं. आपण जनमलोच तुटक्या चपलेवानी, दोन-चार टाकं काय घातलं तेवढंच आपलं. आता ते बी काय उपेगाचं न्हायी. शिवायला आता तळ बी राहिला न्हायी.''
हं.. सायबानं आता नुसता हुंकार भरला.
तू बघितलं आहेस त्या बंगल्यातील सायबांना? पुन्हा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं प्रश्न केला.
नाय बा, काळ्या काचंच्या गाड्यातली माणसं कुठं दिसत्यात गरीबाला. पर गाड्या बघितल्यात. लय झ्याक हायती. तुमची ही गाडी बी तशीच, पर त्या बंगल्यातील गाड्या लय निराळ्या. रोज येगळी गाडी.
तो गप्प बसून राहिला. त्यानं त्या बंगल्याकडं एक नजर टाकली आणि पुन्हा त्या चांभाराकडं. त्याने आता दोन्ही बूट चकचकीत करुन ठेवले होते.
चांभाराने त्याच्याकडे बघितले.
त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. पण तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर पुढे आला, ड्रायव्हरने पन्नासाची एक नोट त्याच्यापुढे ठेवली. साहेब गाडीत बसून निघून गेला. चांभाराने त्याच्या गाडीकडे बघितले. गाडी त्या बंगल्याच शिरली.
चांभार स्वतःशीच हसला. त्या बंगल्याच्या सायबालाच आपण सांगत व्हुतो की. त्याने मान हलवली आणि सायबानं टाकलेल्या पन्नाशीच्या नोटेकडं बघत चांभार पुटपुटला, आजचा दिस गेला आता, उद्याचं उद्या बघू.
त्यानं तिथं ठेवलेलं आपलं सामान आवरायला सुरवात केली. सायब बसलेल्या खुर्चीवर सायबाचा रुमाल तसाच होता. एवढा मोठ्ठा साहेब आणि त्याचा रुमाल बघून चांभाराला कसंतरीच वाटलं. रुमालाला पडलेल्या भोकांवरुन त्याला समजलं, त्या बंगल्यात जाण्यापूर्वी सायबालाही पॉलीश केलं होतं. माणसांना पॉलीश केलेलं त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं.
शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२
प्रिय
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. त्याबद्दल माफ कर. तुझ्याकडे माफी मागायची हाही एक बहाणा असतो, तुझ्याजवळ जाण्याचा, हे बहुतेक तुलाही माहीत आहे. काही नात्यांचं असंच असतं. जे दिसतं तसं असत नाही. महाभारत हा जसा तुझ्या आवडीचा विषय तसा माझ्याही. महाभारताचे वैशिष्ट्यच हे की ते प्रत्येकाला आपपल्या नजरेतून वेगळे भासते. कृष्ण-राधा ही जोडी महाभारतात नाही, ती नंतरच्या काळात कीर्तनकारांनी टाकली, दुर्गा भागवतांनी याबाबत खूप संशोधन केले आहे. खरे तर राधा आणि द्रौपदी ही पात्रे कीर्तनकारांनी वेगळी केली. राधाही विवाहित आणि द्रौपदीही विवाहित. पण दोघींचे कृष्णावर प्रेम. राधा-कृष्ण मांडताना कीर्तनकारांनी त्या प्रेमाला भक्तीचे रुप दिले आणि द्रौपदी-कृष्ण प्रेमाला बहीण-भावाचा मुलामा; पण मला नेहमी वाटते, राधा ही काही गोकुळातली गवळण नव्हती. शिवाजी सावंतांनी युगंधर लिहिताना राधेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण त्यांनाही तो लागला नाही. मग त्यांनी शब्दांचा किस काढत राधा म्हणजे मोक्ष वगैरे असा काहीसा अर्थ लावला. पण राधेला महाभारतात शोधण्याचा त्यांनी आणखी थोडा प्रयत्न केला असता तर राधा महाभारतात क्षणा-क्षणाला भेटली असती. राधा आणि द्रौपदी या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. द्रौपदीत राधेला बघायचे थोडेसे धाडस केले तर तिच्यात राधा दिसतेच. अगदी स्वच्छ निर्मळपणे ती दिसते. विशेष म्हणजे प्रियतमेसाठी सर्वस्व देणारा कृष्ण द्रौपदीसाठीच भारतीय युद्ध घडवून आणतो हेही आरशासारखे स्पष्ट आहे. पाच पती असूनही द्रौपदीला कृष्ण का आवडावा? हा प्रश्न उपस्थित होईलही, पण नवऱ्यांची संख्या किती यावर का प्रेम असते. पाचही पतींमध्ये पराक्रम आणि शौर्य होते, पण प्रेम केवळ शौर्य आणि पराक्रमावर केले जात नाही, ती अंतरिक गोष्ट आहे. दुर्गाबाई याबाबत खूप सविस्तर सांगायच्या, पण त्यांनीही राधेला आणि द्रौपदीला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मांडलेले नाही. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते हे भावा-बहिणीचे रंगविले ते खरे कीर्तनकारांनी आणि त्यानंतर भावगीत रचणाऱ्या कवींनी. द्रौपदी खरे तर कृष्णाची सखी. गंमत बघ हं, कृष्णाच्या रुक्मिणी-सत्यभामेसह सोळा सहस्र स्त्रिया असल्या तरी त्याला त्याची सखी भेटली ती द्रौपदीत आणि पाच नवरे असूनही कृष्णेला अर्थात द्रौपदीला कृष्णातच सखा दिसला. खरे तर हा प्रेमाचा रंग नाटककारांनी आणि कवींनी फुलवायला हवा होता. अगदी प्लेटो सांगतो तसे हे प्रेम अशारीरिक आणि उच्च पातळीवर होते. द्रौपदीच्या लज्जा रक्षणापासून ते तिच्यातील सूडाला मूर्त रूप देण्यापर्यंतच्या प्रवासात पांडवांहून जास्त पुढाकार कृष्णाने घेतला आहे. त्यासाठी त्याने वाट्टेल ते केले आहे. यांत तिच्यासाठी सर्वस्व द्यायचा हेतू होता. कृष्णाला भारतीय युद्ध थांबवायचे असते तर ते केव्हाच थांबले असते. पण ते त्याला थांबवायचे नव्हते. द्रौपदीचा झालेला अपमान जितका पांडवांना जिव्हारी लागला होता, त्यापेक्षा जास्त कृष्णाला लागला होता. म्हणूनच तर त्याने अर्जुनाला "युगंधर' तत्त्वज्ञान सांगून लढायला भाग पाडले. एखाद्या शूर सेनानीने युद्ध लढण्यापूर्वी आपल्या शस्त्रांना धार द्यावी, दारूगोळ्यांचा साठा करावा, व्यूहरचना करावी, अगदी त्याचप्रमाने द्यूत सभेनंतर कृष्णाने केले. पांडवांपेक्षा कृष्णालाच हे युद्ध हवे होते हे उघड आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण काही चक्रवर्ती सम्राट वगैरे होणार नव्हता, किंवा तोही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरच्या साम्राज्यातील एक मांडलिक राजा होणार होता. तरीही त्याने पांडवांना मदत केली. याचे कारण धर्माची पुनर्स्थापना हे नव्हतेच. कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा पक्ष धर्माचा हे कशावरून ठरणार? युद्धभूमीवरचा धर्म काय हे कृष्णाने सांगितले, याचा अर्थ असा नव्हे, की कौरवांचे राज्यच मूळी अधर्माचे होते. त्याचे संदर्भ वेगळे वेगळे करायला हवेत. सांगायचा मुद्दा हाच, की कृष्णाने केवळ आणि केवळ द्रौपदीसाठी हा महाभयंकर संग्राम घडवून आणला. पण हे अमूर्त आणि संयमी प्रेम उघड झाले नाही हे खरेच. आपल्याकडे सामाजिकदृष्टया स्त्री-पुरुषांना कुठल्यातरी नात्यात अडकविणे भाग पडते. तसे न झाल्यास अनैतिकतेच्या गाळात त्यांना अडकावे लागते. द्रौपदी विवाहित आणि कृष्णही विवाहित त्यात कृष्णाला दैवपद बहाल केलेले. त्यामुळे द्रौपदी आणि कृष्ण यांच्यात प्रेम होते आणि राधा दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदीच होती, असे जर कोणी सांगितले तर त्याला एक तर मुर्खात काढण्याचा संभव होता किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा. त्यामुळे राधेला कृष्णेतून वेगळे करण्यात आले आणि द्रौपदीला बहीण करण्यात आले. पण द्रौपदी आणि कृष्णाचे खरे प्रेम होते. अपुरेपण दोघांतही होते, माणसांच्या गर्दीत आपण एकटे असतो ना तसेच त्या दोघांचे होते. पण त्यातही गंमत आहे. या दोघांचे प्रेम उच्च असले तरी खरे उच्चतम प्रेम महाभारतात सापडते ते भीमाचे. युधिष्ठिर एकपत्नीव्रत राहिला पण त्यात त्याच्या प्रेमापेक्षा तत्त्वाचा भाग जास्त होता, भीमाचे हिडिंबाशी लग्न झाले होते, ते खरे द्रौपदी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी. हे खरे तर एकतर्फी प्रेम होते. द्रौपदी मनाने कृष्णाची होती. खरे तर ती राधेसारखी कृष्णाबरोबर होती आणि भीम राधेप्रमाणे द्रौपदीवर प्रेम करायचा. द्यूत सभेत कृष्णेची विटंबना होताना तिला आठवला तो कृष्ण, पण पांडवात ज्याची सर्वात जास्त तडफड झाली तो भीम. तुझाच.. |
सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२
फेडरर तू हरायला नको होतस.... मला टेनिसमधला "टे' कळत नाही,
रॅकेट कशाची असते काही माहीत नाही,
बॅक हॅण्ड, फोर हॅण्ड मला समजत नाहीत
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....
सर्व्हीस म्हणजे काय याचा मला पत्ता नाही
गुणांचा तक्ता कसा केला जातो, कळत नाही
ब्रेक पॉंईट म्हणजे कशाला ब्रेक ते समजत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....
स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह
टेनीसमध्येही असतं का माहीत नाही..
चेंडू प्रेक्षकांत भिरकावल्यावर टाळ्या
मिळतात का हेही माहीत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतंस...
टेनिसमधला तू बादशाह वैगेरे असशील
अनेक लढाया तू जिंकल्या असशीलही
पण तरीही तू उपयोगाचा नाहीस.....
तू खरंच हरायला नको होतंस...
मला गोल्डन चेरी माहीत नाही..
पण मला माहीत आहे डोळ्यांतील अश्रुंची किंमत
लाखो डोळ्यांतून तुझ्यासाठी गालावर आलेल्या
आणि त्यापेक्षा जास्त "त्या' दोन डोळ्यांतील अश्रू,
तुझ्या हरण्यामुळे तसेच डोळ्यात थबकून राहिलेले
त्या दोन डोळ्यांसाठी किमान तू हरायला नको होतसं...
फेडरर खरेच तू जिंकायला हवं होतंस, त्या दोन डोळ्यांसाठी तरी.......
(लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने रॉजर फेडररला हरवून गोल्ड जिंकल्यानंतर)
बुधवार, ४ जुलै, २०१२
प्रिय,
प्रिय,
पहाटेचे तीन वाजलेत. गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही झोप आलेली नाही. येण्याची शक्यताही नाही. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश आत येतोय. नुकत्याच चालायला लागलेल्या बाळाच्या पायातील पैंजणाप्रमाणे पावसाच्या थेंबांचा नाद होत आहे. मघाशी ऑफीसमधून येताना त्याचा नाद कानात साठवतच आलो. पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस थांबायची खूप वेळ वाट बघितली आणि मग रेनकोट अंगावर चढविला. गाडीला किक मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आषाढी पौर्णिमेचा चंद्र ढगांच्या दाटीतून चांदण बरसत होता. शब्दशः चांदणं बरसत होतं. चंद्राचा मंद प्रकाश आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्यासाठी रेनकोट काढला आणि पाऊस आणि चांदण दोन्ही अंगावर झेललं. रिकाम्या, एकट्या रस्त्याला सोबत करत रस्त्याच्या मध्येच गाडी लावून चिंब भिजत राहिलो. पावसाच्या धारांसोबत तुला आठवत राहिलो. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द, तू घेतलेला एक अन् एक हुंकार, तुझं हसणं. सगळं आठवत राहीलं. पावसाचा सांगाती बनून जणू आठवणींच्या धारा बरसत राहिल्या आणि त्यात मी चिंब होत राहिलो. पावसासारखा आठवणींचा दुसरा कोणी सांगाती नाही. आवणींबरोबर येणाऱ्या आसवांना तो हलकेच आपलेसे करतो. तू कोण? कोणासाठी? असले प्रश्न विचारत बसत नाही आणि त्याचे डागही मागे ठेवत नाही. त्यामुळे त्याच्यासोबतीने खूप रडून घेतले. मोकळे होण्याचे मी नवनवे मार्ग शोधतो आणि प्रत्येक वाटेत तूच भेटत राहतेस. तू एकदा म्हणाली होतीस, माझं सगळं विश्व तू व्यापून टाकले आहेस. तू तर माझं विश्वच आहे. त्यातून कसं बाहेर पडणार. पण पडायचे आहे कोणाला ?
तुला लहानपणीची एक गोष्ट सांगतो. तेव्हा दुसरीत होतो मी. नागपंचमीची सुटी होती. गावाकडे त्यावेळी आमच्या वर्गातील बरीच मुलं गुरांना चारायला घेऊन जात. मग मीही त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो. दिवसभर त्या माळरानात आम्ही चिखलाचे नाग करत राहिलो. संध्याकाळ झाली तरी आम्ही तिथून हालायला तयार नाही म्हटल्यावर आमच्यासोबत असलेल्या एका मोठ्या माणासाने उगाचच आम्हाला दटावले. नागपंचमीला नाग करायचे नसतात. त्यात तुम्ही मातीचा नाग करुन तो मोडलात. आता नाग रात्री येऊन तुम्हाला चावणार. आप्पांना विचारलं, त्यांना वाटलं मला देवघरात ठेवलेला नाग हवाय, त्यामुळे त्यांनीही सांगितलं, नाग मोडला की नाग रात्री येतोच. मला काही सुचेना. भीती प्रचंड वाटत होती. त्या रात्री नाग बऱ्याचदा स्वप्नात आला. दरदरून घाम फुटला आणि कडाडून ताप आला. दुसरा आख्खा दिवस आप्पा समजावत राहिले, नाग-बिग काही येत नाही. पण भीती काही पुरती गेली नाही. पुढे-पुढे तो नाग माझ्या गळ्याभोवती वेटोळा घालून बसलाय असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून तो कुठे बिळात लपून बसला होता, देव जाणे. तू गेलीस आणि पुन्हा तो नाग वळवळायला लागला. जणू कात टाकून ताज्या दमाने तो येतो आहे असं वाटू लागलं, आणि तेवढ्यात तुझ्या आठवणींचे हजारो गरुड आकाशात घिरट्या घालू लागले. आता काही तो परत येईल असे वाटत नाही.
तुझाच
पहाटेचे तीन वाजलेत. गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही झोप आलेली नाही. येण्याची शक्यताही नाही. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश आत येतोय. नुकत्याच चालायला लागलेल्या बाळाच्या पायातील पैंजणाप्रमाणे पावसाच्या थेंबांचा नाद होत आहे. मघाशी ऑफीसमधून येताना त्याचा नाद कानात साठवतच आलो. पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस थांबायची खूप वेळ वाट बघितली आणि मग रेनकोट अंगावर चढविला. गाडीला किक मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आषाढी पौर्णिमेचा चंद्र ढगांच्या दाटीतून चांदण बरसत होता. शब्दशः चांदणं बरसत होतं. चंद्राचा मंद प्रकाश आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्यासाठी रेनकोट काढला आणि पाऊस आणि चांदण दोन्ही अंगावर झेललं. रिकाम्या, एकट्या रस्त्याला सोबत करत रस्त्याच्या मध्येच गाडी लावून चिंब भिजत राहिलो. पावसाच्या धारांसोबत तुला आठवत राहिलो. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द, तू घेतलेला एक अन् एक हुंकार, तुझं हसणं. सगळं आठवत राहीलं. पावसाचा सांगाती बनून जणू आठवणींच्या धारा बरसत राहिल्या आणि त्यात मी चिंब होत राहिलो. पावसासारखा आठवणींचा दुसरा कोणी सांगाती नाही. आवणींबरोबर येणाऱ्या आसवांना तो हलकेच आपलेसे करतो. तू कोण? कोणासाठी? असले प्रश्न विचारत बसत नाही आणि त्याचे डागही मागे ठेवत नाही. त्यामुळे त्याच्यासोबतीने खूप रडून घेतले. मोकळे होण्याचे मी नवनवे मार्ग शोधतो आणि प्रत्येक वाटेत तूच भेटत राहतेस. तू एकदा म्हणाली होतीस, माझं सगळं विश्व तू व्यापून टाकले आहेस. तू तर माझं विश्वच आहे. त्यातून कसं बाहेर पडणार. पण पडायचे आहे कोणाला ?
तुला लहानपणीची एक गोष्ट सांगतो. तेव्हा दुसरीत होतो मी. नागपंचमीची सुटी होती. गावाकडे त्यावेळी आमच्या वर्गातील बरीच मुलं गुरांना चारायला घेऊन जात. मग मीही त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो. दिवसभर त्या माळरानात आम्ही चिखलाचे नाग करत राहिलो. संध्याकाळ झाली तरी आम्ही तिथून हालायला तयार नाही म्हटल्यावर आमच्यासोबत असलेल्या एका मोठ्या माणासाने उगाचच आम्हाला दटावले. नागपंचमीला नाग करायचे नसतात. त्यात तुम्ही मातीचा नाग करुन तो मोडलात. आता नाग रात्री येऊन तुम्हाला चावणार. आप्पांना विचारलं, त्यांना वाटलं मला देवघरात ठेवलेला नाग हवाय, त्यामुळे त्यांनीही सांगितलं, नाग मोडला की नाग रात्री येतोच. मला काही सुचेना. भीती प्रचंड वाटत होती. त्या रात्री नाग बऱ्याचदा स्वप्नात आला. दरदरून घाम फुटला आणि कडाडून ताप आला. दुसरा आख्खा दिवस आप्पा समजावत राहिले, नाग-बिग काही येत नाही. पण भीती काही पुरती गेली नाही. पुढे-पुढे तो नाग माझ्या गळ्याभोवती वेटोळा घालून बसलाय असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून तो कुठे बिळात लपून बसला होता, देव जाणे. तू गेलीस आणि पुन्हा तो नाग वळवळायला लागला. जणू कात टाकून ताज्या दमाने तो येतो आहे असं वाटू लागलं, आणि तेवढ्यात तुझ्या आठवणींचे हजारो गरुड आकाशात घिरट्या घालू लागले. आता काही तो परत येईल असे वाटत नाही.
तुझाच